..आणि शेवटची ओव्हर सुरू होते. सहा चेंडू, नऊ धावा! पहिला चेंडू टाकायला जात असताना, अनेकांनी रोखून धरलेला श्वास, चेंडू पडल्यावरच सुटतो. एकही धाव निघत नाही. तणाव वाढतो. जरी पाच चेंडू शिल्लक असले तरी, काय होईल हे सामान्य माणसाला सांगता येत नाही. त्याला त्या क्षणी एकच सांगता येतं, ते म्हणजे, हे सगळं ‘अनिश्चित’ आहे! असेच चेंडू वाया गेले, तर हातचा सामना निसटून जाईल आणि एखादा षट्कार आणि चौकार बसला तर, हाच अनिश्चित विजय दुसऱ्या क्षणी हातात येईल! सामान्य माणसाचं ठीक आहे. पण आयुष्यभर खेळांतले सारे चढउतार, अशक्य कोटीतले जय-पराजय, यांतून गेलेले दिग्गज खेळाडूही केबिनमध्ये भाष्यकार म्हणून तर काही बाहेर विशेष तज्ज्ञ म्हणून बसलेले असतात. तेही श्वास रोखून. इतकी मदानं, स्वत: खेळण्यातला अनुभव, समोरच्या स्थितीतल्या बारकाव्यांचं आकलन – सगळं जमेला असूनसुद्धा, त्यांनाही एकच गोष्ट दिसते, ती म्हणजे – अनिश्चितता!

सामन्याचं पुढं काय होतं, हे समजून घेण्याची फारशी गरज नाही! खरी गरज आहे, ती आयुष्यात सगळीकडे वावरत असलेली अनिश्चितता समजून घेण्याची! तिला त्या अर्थानं कुठलं क्षेत्र, परिस्थिती, वय- वर्ज्य नाही. भक्कम बहुमतानं राज्यावर बसलेल्या लोकप्रतिनिधींच्या मनात ती वावरू शकते. तशीच, ती उद्याची भ्रांत असलेल्या गरिबाच्या मनातही वावरू शकते. कच्चा अभ्यास असलेल्या विद्यार्थ्यांच्या मनात ती वावरते, तशीच अव्वल गुणवत्तेनं पास होण्यासारख्या विद्यार्थ्यांच्या मनातही, ती अनिश्चितता मोकळेपणानं वावरताना दिसते. ही वस्तुस्थिती असली तरी, समजून घेतानासुद्धा अवघड जाते.

ज्याचं खूप लांबच्या प्रवासाला जायचं अचानक ठरतं, रेल्वेशिवाय पर्याय नसतो, काही ठरावीक काळात गाडीत पाय ठेवायलासुद्धा जागा मिळेल की नाही, यातली अनिश्चितता एकवेळ कळू शकते. पण ज्यानं दोन दोन महिने आधी आरक्षण केलेलं आहे, त्याच्या मनात, फलाटावर उभा असतानासुद्धा ही अनिश्चितता एका कोपऱ्यात घर करून बसलेली असते. कारण दोन महिन्यांपूर्वी आरक्षण करताना, घरातसुद्धा कडक उन्हानं घाम गळत होता. पण प्रवासाच्या आदल्या दिवशीपासून, अवचितपणे आलेल्या वारा आणि वादळी पावसानं सगळीकडं दाणादाण होऊन, आतापर्यंत लांबच्या पल्ल्याच्या दोन गाडय़ा रद्द झाल्याची बातमी, मधूनमधून महत्त्वाच्या बातम्यांत झळकत असते. मनात येत असतं, की खिशात दोन महिन्यांपासून जपून ठेवलेल्या तिकिटावर, योजलेला प्रवास होणार की पशाचा रेल्वेकडून परतावा मिळणार? त्या वेळी सोबत असते ती फक्त आरक्षणाचं तिकीट आणि अनिश्चितता – यांची!

अनेक प्रयत्न करून, कुठं नोकरी लागत नाही, त्या वेळी पुढं काय होणार, ती वेळेत लागणार की नाही, कुठं लागणार – याची अनिश्चितता अनेकांना माहिती असेल. पण, जे तो टप्पा पार करून एखाद्या कंपनीत, त्यांना हव्या असलेल्या ठिकाणी, नोकरीचं काम करीत असतील, तरी काम करता करता मध्येच कुणाला तरी अचानक काढून टाकल्याचं कळतं. कंपनी मोठी, पगार मोठा, पण ती बहुराष्ट्रीय आहे, त्यांतल्या एका राष्ट्रात सत्ताबदल झाल्याच्या बातम्या आहेत. तसं आजूबाजूला खरी स्वत:पुरती तरी नोकरी, स्थिती, पगार चांगला आहे. पण तिथंही, अनिश्चितता डोक्यावरच्या फॅनसारखी फिरत का राहाते – ते सांगणंही अवघड जातं!

विसाव्या मजल्यावरच्या कँटीनमध्ये, भिंतीच्या कडेजवळची खुर्ची पकडून, शेजारच्या काचेतून खाली पाहात, कुणी डबा खात असतो. सकाळी ऑफिसमध्ये येताना, मागमूसही नसलेल्या पावसाची भुरभुर खिडकीतून दिसते. कुठल्याही क्षणी रौद्र रूप धारण करणाऱ्या महानगरातल्या त्या समुद्रकाठच्या पावसाचे झटके, पूर्वी बसलेले असतात. अजून चार तासांनंतर तो काय करील, याची शंका येते. अर्ध्या तासाच्या या डब्याचा वेळ या अनिश्चिततेवर विचार करण्यात कधी जातो, ते कळत नाही. पाऊस उग्र होत चालला आहे, दोन तासांत तो सगळीकडे पाणीच पाणी करील. हळूहळू बाहेरच्या लोकल धिम्या गतीने जायला लागतात. तोवर काही ट्रक पाण्याखाली गेल्याची बातमी कुणीतरी सांगतं. यात विजेनं गोंधळ केला तर काय होईल, याची चित्रं डोळ्यांसमोर येतात. पूर्वी आपण दहादहा तास वाटेत कसे अडकलो होतो – असे विचार करता करता, लक्षात येतं की, भाजीपोळीच्या डब्यात काही उरलेले नाही. दुसऱ्या क्षणी हाही विचार मनात येतो, की असं सगळं घडेलच, असे कशावरून? त्याचबरोबर असंही वाटतं, की यातलं काहीच निश्चित नाही, तरी आपण या अनिश्चिततेच्या गुंत्यात सापडावे आणि आपल्या डब्यातलं अन्न संपल्याचीसुद्धा आपल्याला जाणीव होऊ नये? या विचाराचासुद्धा त्रास होतो!

काही सन्मान्य अपवाद सोडता, सर्वाना, सर्वकाळी ग्रासणारी ही आयुष्यातली – अनिश्चितता! ती ऑफिसमधल्या साहेबांचा सकाळचा मूड, संध्याकाळी असेल याची खात्री देत नाही. लग्न आपण स्वत:च ठरवलं तरी ते तसंच होईल, याची खात्री देत नाही. सगळं ठरवून अगदी नोंदणी झाली, तरी आपलं जमेल-टिकेल याची हमी देत नाही. इतकंच नाही, तर दहा-वीस वर्ष संसार करूनही, आपण अखेपर्यंत असेच बरोबर राहू याची खात्री वाटत नाही. ती प्रत्येक गोष्टीवर शंकेचं-संदेहाचं प्रश्नचिन्ह उभं करीत असते! बोलणारा मनुष्य, खरंच मनातलं बोलतो आहे की नाही, याची खात्री देत नाही. आपण ज्यांची फी त्यांच्या मनाप्रमाणं देत आलो आहोत आणि आपण जिंकणार, असं ते म्हणत आले असले तरी, खटला जिंकण्याची खात्री वाटत नाही. त्यातही ते ‘पुन्हा वेळ पडली, तर आपण अपिलात जाऊ’, असं म्हणाले की अनिश्चितता वाढते. त्यातही आपले वकील विरोधी वकिलांबरोबर चहाला एकत्र गेलेले दिसले, की आणखीच अनिश्चितता वाढते!

नातेवाईक, प्रतिष्ठा, मान, न्याय, सरकार, व्यवसाय, कायदेकानू, माणसांचा चांगुलपणा, वाईटपणा, प्रकृती, स्वभाव, गरजेच्या वस्तू, बाजार, दर – कुठं विचार करील तिथं – ही अनिश्चितता माणसाला सावलीपेक्षा जास्त सोबत करते. सावली एक वेळ, ऊन्ह आलं तर पडेल, सावली पडली तरी, आपल्या व्यवहारांत त्रास देणार नाही, अस्वस्थता उत्पन्न करणार नाही. पण ही अनिश्चिततेची सावली मात्र बारा महिने, तेरा काळ सोबत सोडीत नाही. एकेकाळी सरकारी कर आणि मृत्यू हे निश्चित असतात, एरवीचं सारं अनिश्चित आहे, असं म्हटलं जाई, पण आता कर नसतील, कमी असतील की जास्त असतील – अशा स्वरूपात ही अनिश्चितता आहेच. मृत्यूच्या बाबतीत मृत्यू अजून तरी निश्चित असला, तरी कोणत्या वयाला आणि आज, उद्या की दहा वर्षांनी हे सर्व अनिश्चित आहे!

मग आपण या सार्वत्रिक अनिश्चिततेबद्दल काय लक्षात घेऊ शकतो? तर अनिश्चितता जगात राहीलच! पण तिच्यातून निर्माण होणारं काळजीचं, भयाचं ओझं – हे सुरक्षिततेच्या अपेक्षेपोटी, ज्याचं त्याचं मन निर्माण करीत असतं. म्हणूनच, ते प्रत्येकाला कमी-जास्त प्रमाणात त्रास देतं. ते ओझं स्वाभाविक वाटत असलं, तरी असं ओझं घेऊन जगलंच पाहिजे, असं अजिबात नाही. जयपराजय, यशअपयश – अशा गोष्टी जर आज निश्चित कळतील, तर त्या मिळण्यातलाच नव्हे तर प्रयत्नांतलासुद्धा आनंद निघून जाईल! अनिश्चितता म्हणजे नुकसान, अपयश, दु:ख, वियोग – असल्या नकारात्मक गोष्टी आपणच ठरवल्या आहेत. त्यानं जगण्यातला आनंद झाकोळून जातो. जर हे अनिश्चित असेल तर फायदा, यश, सुख हेही अनिश्चित असेल आणि तेही तितक्याच प्रमाणात मिळणारं असेल, याची आपल्याला खात्री असावी आणि तसं ते मिळतं, हाही अनुभवच आहे!

चांगल्याचा, आनंदाचा, यशाचा, सुखाचा, सार्थकाचा – अंतरंगातला सूर्य समोर ठेवून, सुरक्षिततेच्या फोल अपेक्षा सोडून, आयुष्याची वाटचाल करणाऱ्याला, अनिश्चिततेचा अंधार गृहीत असला, तरी प्रकाशातल्या वाटचालीतला अनुभव आणि विधायक गोष्टी, नक्की अधिक प्रमाणात अनुभवाला येतात! त्यामुळं अनिश्चिततेनं आयुष्य झाकोळून जात नाही. एखादा ढग कधीतरी येईलही, पण तो आपल्या मार्गानं निघूनही जातो आणि माणसाची आनंदाची वाटचालही थांबवू शकत नाही!

सुहास पेठे

drsspethe@gmail.com