कुठल्या ना कुठल्या निमित्तानं समुद्रकिनाऱ्यावर माणसं जातात. वाळूचे विस्तीर्ण किनारे पाहतात. लहानपणी आणि मोठेपणीही. आपल्याकडे पहिल्यापासून असे असंख्य किनारे – या शांततेसाठी, मोकळ्या हवेसाठी फिरण्याच्या जागा आहेत. वाहनं, वर्दळ, गजबज, गोंगाट – यांपासून दूर जाऊन, किनाऱ्यावरच्या वाळूत बसण्याचा अनुभव घेतलेले लोक असंख्य असतील. आता त्यांतल्या काही किनाऱ्यांवर खाण्यापिण्याच्या गाडय़ा, मुलांच्या खेळण्यांच्या, मनोरंजनाच्या वस्तू अशा गोष्टी वाढल्या असल्या तरी, अजूनही कित्येक किनारे वाळूत निवांत बसता यावं, इतके शांत आहेत. तिथली वर्दळही त्यामानानं कमी आहे. मोठय़ांना त्यांच्या लहानपणी आपल्या घरातल्या कुणा मोठय़ांबरोबर समुद्राकाठी जाऊन आल्याच्या आठवणी आजही येत असतील. आजही ते स्वत:, आजच्या पिढीतल्या लहान मुलांना घेऊन, असे समुद्राकाठी जात असतील, जात राहतीलही!

अशा किनाऱ्यांवर, विशेषत: मुलांचा उद्योग वाळूत खेळणं हा असतो. काही मुलं वाळूत मन मानेल तशा रेघोटय़ा ओढीत बसलेली असतात. वाळूत पाय रुतत असल्यामुळं तिथं पळणं, उडय़ा मारणं हासुद्धा खेळ चालू असतो. जर दोनतीन मुलं असतील, तर मग ती, त्यांच्या वाळूतल्या खेळांच्या वेगवेगळ्या कल्पना अमलात आणतात. कधी वाळूत त्रिकोण, चौकोन, कधी गोल, कधी चक्रव्यूह काढतात. वाळूचं सपाट मदान तयार करतात. मग त्या सपाट मदानाचं क्रीडांगण होतं. कधी चारही टोकांना गोल काढून, मधल्या चौकटी आखून एखादा कॅरमबोर्डसुद्धा होतो. कधी चारी रेषांत, मध्ये आडवी रेघ ओढून, व्हॉलीबॉलचं नेट तयार होतं. मग दोन गट पडतात. त्या दोन गटांत, छोटय़ाछोटय़ा खडय़ांनी, शंखांनी, शिंपल्यांनी वेगवेगळे खेळ सुरू होतात. कधी इकडचा गट जिंकतो, आनंदानं उडय़ा मारतो. दुसरा गट निराश होतो. त्यांतले निर्णय चुकीचे आहेत म्हणून, भांडण काढतो. कधी त्यात त्यांच्यातलं कुणी किंवा कधी बरोबर आलेली मोठी माणसं, तडजोड घडवून आणतात. प्रकरण मिटतं. खेळ पुन्हा सुरू होतो.

24 tree fall due to unseasonal rain in pimpri chinchwad
पिंपरी : अवकाळी पावसाची हजेरी, वादळी वाऱ्यामुळे २४ ठिकाणी झाडपडीच्या घटना
life of fish, fish in river, fish danger,
नदी, तलावातील माशांचे आयुष्य का धोक्यात आलंय? काय आहे नवं संशोधन?
Ship catches fire in Thailand all passengers safe
थायलंडमध्ये जहाजाला आग, सर्व प्रवासी सुखरूप
When a leopard came in front of Karkare couple who were giving nature education to students
पाऊलखुणा दिसताच ‘ते’ थांबले; समोर गेल्यानंतर ‘तो’ पुढ्यात उभा ठाकला; निसर्ग शिक्षणाचे धडे देणाऱ्या दाम्पत्याला…

कल्पक असलेली मुलं मोठे खेळ खेळतात. त्यांत पहिल्यांदा वाळूखालून बोगदे तयार करणं सुरु होतं. दोघा मुलांनी अंदाज घेऊन, थोडं खोल जाऊन वरची वाळू पडू न देता, खालच्या ओल्या वाळूपर्यंत जाऊन, हातानं हलकेच वाळू काढीत, असे बोगदे काढण्यातला आनंद घेतला जातो. ज्या क्षणी, त्या खोलवरून काढलेल्या बोगद्यात एकमेकांची बोटं एकत्र येऊन बोगदा पूर्ण होतो, तेव्हा त्यांना होणारा आनंद अवर्णनीय असतो. तो पाहायला आईवडील, मोठी माणसं, आजूबाजूचे लोकसुद्धा कौतुकानं जमतात. काही मुलांचं वाळूतली घरं, मनोरे तयार करण्याचं, एकापेक्षा दुसऱ्यानं मोठा आणि उंच मनोरा, घर तयार करण्याचं काम सुरू असतं. त्यांतल्या त्यात उंच घर, मनोरा तयार झाला की करणारी मुलं टाळ्या वाजवतात. ज्यांना तेवढं जमलेलं नसतं, त्यांतली काही मुलं टाळ्या वाजवून, या मुलांच्या आनंदात सहभागी होतात. तर काही मुलं खट्ट होतात. काही खोडकर असतात, ती त्या मनोऱ्याला कुणाचं लक्ष नाही असं बघून, मागून अलगद धक्का देतात आणि तो पाडतात. मग कधी तो पडल्याचा आनंदही मुलं घेतात, तर काही मुलं चिडून जाऊन उरलासुरला मनोराही हातानं उधळून टाकतात. काही मुलांची वाळूतली घरं तयार होतात, बोगदे तयार होतात. मध्ये रेघोटय़ा मारून हे तुझं घर, हे माझं, हे त्याचं. मग कुणाचं अधिक छान झालं आहे, यावर त्यांच्या गप्पा होतात. तिकडं समुद्राला भरती असली, तर मनोरा, बोगदा, घरं – कुणाचीही आणि कितीही लहानमोठी असली, चांगली असली, नीट जमली नसली तरीही, समुद्रातून जवळ आलेल्या लाटेनं ती सारी सपाट होतात. वाळूत पुन्हा मिसळून जातात. खोलगट केलेल्या वाळूत थोडंफार पाणी भरून राहतं. थोडा वेळ टिकतं आणि वाळूत मुरून जातं.

बाजूला बसलेल्या, बरोबर आलेल्या मोठय़ा माणसांचे हे वाळूतले खेळ सुरू नसले तरी, गप्पा सुरू असतात. त्यात जुन्या आठवणी, पटल्या – न पटलेल्या गोष्टी चालतात. कधी, पुढं काय काय करायचं यांच्या बेतांवर चर्चा होते. कुणाला फ्लॅट, कुणाला बंगला घ्यायचा असतो. त्याच्यावर विचार, मतं सुरू असतात. कुठल्यातरी मित्रमंडळींचे, नातेवाईकांचे विषय निघतात. दोघांना चांगल्या वाटलेल्या आठवणींचा आनंद मिळतो तर, एकाला आवडलेल्या आणि दुसऱ्याला न आवडलेल्या गोष्टींबद्दल मतभेद होतात. प्रत्येकजण आपलं कसं बरोबर आहे, हे पटवण्याचा प्रयत्न करीत असतो. काहींच्या सासर-माहेरच्या, ऑफिसमधल्या व्यक्तींच्या वागण्यांवरून चर्चा सुरू असतात. या सगळ्यांत चांगले विषय चालतात, त्या वेळी नकळत बाजूच्या वाळूत, वेगवेगळ्या आकारांच्या हलक्या रेषा बोटांनी नकळत ओढल्या जात असतात. कधी कधी चर्चा तापत जातात, तशा याच रेषा वाळूत नकळत अधिक खोल, वेडय़ावाकडय़ा ओढल्या जाऊ लागतात. शेवटी अंधार पडला म्हणून, विषय आहे तसेच टाकून, मुलांना हाका मारून परतीची वाट धरली जाते. त्याही बाबतीत, एखादी मोठी लाट येते आणि हलक्या असो, खोल असो, वाळूतल्या त्या रेषा पुसून लाट समुद्रात मिसळून जाते. लहान मुलांना त्यांच्यापरीनं, तर मोठय़ांना त्यांच्यापरीनं समुद्रकाठच्या वातावरणाचा फारसा लाभ न होता, आपापल्या परीनं झालेल्या सुखदु:खांचा विचार करीत माणसं घरी परततात.

वास्तविक, तिकडं क्षितिजापर्यंत पसरलेला समुद्र किती अथांग आहे, वरून इथं टेकणारं आकाश किती विशाल आहे – अशा अनेक गोष्टी आपल्या मनावरची मळभटं दूर व्हावीत, म्हणून अनायास समोर आणि इतक्या जवळ मांडून ठेवलेल्या असतात. आपण ज्या ठिकाणच्या किनाऱ्यावर बसलेले असू, तिथून समुद्रात बुडणारा तो जीवनदायी सूर्य, मावळताना आपला निरोप घेत असतो. एखाद्यानं मनापासून नमस्कार केला तरी, त्याकडं दुर्लक्ष होऊन त्यामागच्या भावाच्या आनंदाला मनुष्य पारखा व्हावा, तसा सूर्यानं केलेला निरोपाचा नमस्कार दुर्लक्षित राहतो. खरंतर, अशी संधी रोज येत नसते आणि त्यानं निरोप घेण्याऐवजी आपणच कृतज्ञतेनं त्याला निरोप तर द्यायचा असतोच, पण पुन्हा येऊन सूर्यानं आपलं जीवन सतेज, प्रकाशित करावं, अशी त्याला प्रार्थना करण्याची ती संधी असते. आपण जर वेगळ्या किनाऱ्यावर बसलेले असू, तर याच समुद्रात, क्षितिजावरून अथांग पाण्यातून वर येणारा आणि आपल्याला सबंध दिवसाची प्रकाशमय सोबत देण्याची खात्री देणारा सूर्य, उगवतानाही पाहायला मिळतो. त्या वेळीही त्याचं स्वागत करण्याची आणि त्याला प्रार्थना करण्याची दुर्मीळ संधी येत असते. पण, या साऱ्या वाळूतल्या रेघोटय़ा ओढणाऱ्या मुलांची आणि अनेकदा निष्फळ वादसंवादात अडकल्यामुळं मोठय़ांचीही, अशी दुर्मीळ संधी हुकते. तो समुद्र, त्यावर टेकलेलं विशाल आकाश आणि हा उगवता किंवा मावळता सूर्य – हा सारा आजचा आनंद आणि संधी ‘आजच’ असते. ती हुकते, त्या वेळेला संधी आणि नुकसान कायमचंच असतं. कारण, ते सारं शाश्वत असेल, पुन्हाही येईल. पण आपलं ‘आजचं’ नुकसान भरून काढता येत नाही! हे सारं माहीत झालं, तशी संधी घेण्याचं महत्त्व

कळलं तर, ते सारं जुळून येऊ शकतं. पण ते उद्या, पुन्हा केव्हातरी किंवा कदाचित कधीच नाही!

हे आपल्या लक्षात येईल. ते करण्यातली सुखदु:खं भोगण्यात आयुष्य कधी निघून जातं, ते कळतही नाही.मुलांनी वाळूत रेघोटय़ा मारून जेजे केलं, तेच आपण आयुष्यात वेगवेगळ्या क्षेत्रांत करीत असतो, गत नाहीत असं नसतं. पण काही कर्तव्यं, काही प्रारब्धं यांच्या त्या ‘वाळूतल्या रेघोटय़ा’ असतात, हे विसरायला झालं तर, आयुष्यभर सुखदुखं संपत नाहीत, ते खेळ आहेत हे लक्षात येत नाही. मधेअधे येणाऱ्या लाटा, घरंदारं काय, राजेरजवाडे काय, सहज सपाट करून जाणारच असतात.

आनंदाच्या या संधी कुणालाही, कुठंही आणि कुठल्याही प्रकारे निसर्ग, ईश्वर निरंतर देत असतो. त्या घेण्यासाठी ना फार खर्च करावा लागतो, ना कष्ट! त्यासाठी आयुष्यातल्या अशा ‘वाळूतल्या रेघोटय़ांची’ गरज, पण तो खेळ ओळखणारं, त्याला मनमोकळेपणे सामोरं जाणारं सावध मन लागतं. मग त्यातूनच आनंदाच्या विश्वाचं द्वार उघडतं.

सुहास पेठे

drsspethe@gmail.com