प्रवास करणं नवीन नाही. लहान मुलांनाही ते कळतं. लहानपणी या प्रवासाच्या कल्पना ढोबळ स्वरूपाच्या असतात. आपण आपल्या गावाहून कुठल्या तरी दुसऱ्या गावाला जाणं, एवढीच ती कल्पना असते. फक्त फरक होतो, तो त्यांच्या दृष्टीनं कधी नातेवाईकांकडं, कधी मित्रमंडळींकडं, कधी एखाद्या देवस्थानाला तर कधी एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी जाणं. दुसरी एक कल्पना त्यांना असते, ती म्हणजे आपल्या प्रवासासाठी वापरली जाणारी वाहनं, त्यांचे प्रकार. त्यांना पायी जाण्यापासून सार्वजनिक वाहनं, कधी रेल्वे, कधी विमान असेही अनुभव वेगवेगळ्या वेळी येत असतात. त्यात त्यांच्या आवडीनिवडी, मतं असंही सगळं असतं. त्या-त्या वाहनाच्या गतीप्रमाणं आपण सावकाश जातो, कधी जलद जातो. बऱ्याचशा मोठय़ा माणसांच्या प्रवासाच्या कल्पनाही अशाच असतात.

पण आपण अशी काही दृश्यं पाहिली आहेत का? किराणा दुकानात काही माणसं जातात, त्यांना काही वस्तू घ्यायच्या असतात. तिथं गेल्यावर ज्या काही दोन-चार वस्तू असतील, त्या ती माणसं दुकानदारांना सांगतात. हे सगळं होत असताना, त्या वस्तू मिळेपर्यंत त्यांचं दुकानात इकडंतिकडं सहजच लक्ष जातं. तिथं अजून अनेक वस्तू त्यांना दिसतात. काही माहितीच्या, काही नवीन. मूळ वस्तू घ्यायचं काम दहा मिनिटांत झालेलं असतं. पण, त्या माहितीच्या वस्तू समोर दिसल्यावर, त्यांना त्याविषयीची पूर्वीची आठवण होते. कुठली, कशी, कधी, किती घेतली, तिचा उपयोग तेव्हा कसा झाला – यावर त्यांच्या डोक्यात विचार सुरू असतात. नंतर नवीन वस्तूंचा विचार सुरू होतो. त्या नवीनच असल्यामुळं त्या कधी निघाल्या, त्यांचा उपयोग, त्यांच्या किमती – हे माहीत नसल्यामुळं, त्या वस्तूंविषयी तिथल्या माणसांकडं चौकशी सुरू होते. काही वस्तूंचा उपयोग होईल की नाही, घ्यावी की न घ्यावी – अशा विचारात या गिऱ्हाईकांचा वेळ जातो. बहुतेक वेळा एखादी वस्तू घेतली जाते, उरलेल्या घेतल्याही जात नाहीत. मग हळूहळू घडय़ाळाची आठवण होते. बिल देऊन बाहेर पडेपर्यंत अर्धा तास उलटून गेलेला असतो, ते लक्षात येतं. तरीसुद्धा, दुकानाच्या पायऱ्या उतरताना, न घेतलेल्या नवीन वस्तूंकडे ते नकळत मागं वळून बघतात. साहजिकच, पायऱ्याही सावकाश उतरल्या जातात.

आपण असंही पाहिलं असेल की, अनेकांची हीच अवस्था कापड दुकानात झालेली असते. पंचवीस साडय़ा पाहा की वेगवेगळे ड्रेस, वा त्याचे कापड! काय एक-दोन घ्यायचे ते ठरले, तिकडं बिल करायला वस्तू गेल्या, तरी इकडं अजून काही नमुने पाहात, अशी मंडळी रेंगाळत असतात. मोठमोठय़ा मॉलमध्ये यापेक्षा वेगळी परिस्थिती नसते. तिथं तर, मूळ ठरलेल्या वस्तूंपेक्षा रेंगाळत रेंगाळत पाहत चाललेल्या वस्तूंची संख्याच अनेकदा जास्त होते. त्यांतलं काही विशेष खरेदी होतं, असंही नाही. खरेदी झालंच, तर वेळ दिला, दिसलं, रेंगाळत राहिलं म्हणून!

विचार करावा की, हे काही कुठल्या दुकानापुरतं, खरेदीपुरतं असतं असं नाही. कित्येक कार्यालयांमध्ये निर्णयासाठी फायली रेंगाळत असतात. त्या संपवायच्याही असतात. त्या विचारानं एखादी फाईल पुढे ओढली जाते. चाळून, विचार करून काही निर्णयावर येऊन, पुन्हा सरकवून ठेवली जाते. हे एक-दोनदा होतं. मग मध्येच दुसरी कुठली तरी फाईल, विषय अधिक महत्त्वाचा वाटतो. मग ती फाईल घेतली जाते. पुन्हा ती चाळून विचार करून बाजूला ठेवली जाते. तसा निर्णयाला येण्याइतपत विचार झालेला असतो. पण ही फाईलसुद्धा अशीच रेंगाळते.

आपण विचार करू की, याची खरोखरच गरज असते का? अनेकदा ती नसते. उलट आधी म्हटलं तसं, जर एखादी वस्तू जरुरी वाटली, नवीन दिसली तर ती घेणं गरजेचं असतं. तो निर्णय अमलात आणण्यानं उलट तो विषय संपतो. वस्तूचा उपयोग, वापर सुरू होतो. कपडालत्ता, रंग, प्रकार यांची निवड झाली, तो घेतला, की ते काम पुढं दहा-पंधरा मिनिटांत संपणारं असतं. कदाचित, एखादी गोष्ट नंतर घ्यायचीही ठरवता येते. पण तेही काम त्या पाच-दहा मिनिटांत होऊ शकत असतं. तीच गोष्ट अशा फाईलच्या बाबतीतही असते. निर्णय झाला असला तर, त्यावर तो नोंदवून, ती फाईल हातावेगळी होऊ शकते. त्या विषयासंबंधित लोक – कामंही पुढं मार्गी लागतात. जिथं त्रुटी आहे, कागदपत्रांची गरज आहे, तिथंही तशा त्रुटी नोंदवून, कागद मागवून घेऊन, ते काम पुरं होऊ शकतं. त्या मार्गानंसुद्धा असं रेंगाळणं टाळता येतं.

असा विचार आपण करीत गेलो तर जरूर लक्षात येईल की, कधी शाळा-महाविद्यालय प्रवेशांचे विषय असोत, विद्याशाखेची निवड असो, प्लॉट-घरं यांची निवड आणि खरेदी, विवाहांच्या बाबतीत वधू-वर, कार्यालय-आचारी, पदार्थ – अशा बाबतींतही अनेकांचे निर्णय, महिनामहिना रेंगाळत असतात. त्यानं काही साध्य होतं असं म्हणावं तर, तसंही दिसत नाही. उलट, जेवढे दिवस मध्ये जातात, तेवढे पर्याय, माणसं, त्यांची मतं, ओघानंच मग मतभेद, अकारण समज-गैरसमज, मानअपमान – अशा नकारात्मक गोष्टींना वाव मिळतो. त्यात कधी कुणाची आपल्याला डावलल्याची भावना वाढते. यात जे घडतं, ते खरं तर अनेकदा या रेंगाळण्यामुळं होतं. यातल्या प्रत्येक बाबतीत, निर्णयासाठी वेळ देण्याची गरज जरूर असते. रेंगाळलं तरी, निर्णय तर घ्यावे लागतातच, त्यातून घडणाऱ्या गोष्टीही त्याच असतात. मध्ये जाणाऱ्या आणि बरेचदा अकारण असलेल्या या वेळामुळं, घडणाऱ्या गोष्टींना तर विलंब होतोच. पण, संबंधित लोकांचा वेळ, संभाषणं, कधी मिळालेल्या जादा वेळामुळं वादविवाद, खर्च, मनशक्ती – अशा अनेक गोष्टींचा अपव्यय होतो.

मूळ शिक्षण झाल्यानंतर पुढं कुठं, किती शिकावं, नोकरीच्या संधींपैकी कुठली संधी स्वीकारावी – अशा आयुष्यातल्या अनेक बाबतींत, लोक रेंगाळताना आपल्याला दिसतील. घाईगडबडीचे दुष्परिणाम उघड असतात, ते तर टाळावेतच. पण, रेंगाळण्याचे दुष्परिणाम त्यांच्यापेक्षा जास्त असतात. अकारण कुठल्या बाबतीत घाई करू नये, हे रास्तच आहे. त्यामुळे, आर्थिक नुकसान, अपघात, फसवणूक – अशा गोष्टी घडू शकतात. पण, यांतल्या कुठल्याही बाबतीत त्याला द्यायचा वेळ, हा त्या कामाशी सुसंगत असावा लागतो. कुठलीही गाडी चालवताना, तिच्या प्रकाराप्रमाणं गाडी चालवण्याच्या गतीचे अनिष्ट, इष्ट आणि अति असे प्रकार गतीचा काटा नेहमी दाखवत असतो. अनिष्ट म्हणजे, खूप कमी वेगानं गाडी चालवणं, हे गाडीलाही मानवत नाही. तसंच, अतिवेगानं चालवणं हेही गाडीलाच काय, आपल्यालाही धोक्यात आणणारं असतं. तेच गाडीच्या प्रकाराप्रमाणं इष्ट असलेल्या मध्यम गतीनं चालवणं, गाडीही चांगली ठेवतं, धोके टळतात आणि ठरल्या ठिकाणी पोचणंही वेळेत घडतं.

हे जसं गाडीच्या प्रकाराप्रमाणं ठरतं, मग त्यात खूप कमी वेगानं चालवणं, म्हणजे रेंगाळणं, आपल्याला वेळच्या वेळी योग्य ठिकाणी पोचण्यात उशीर, त्यामुळं गरसोय, त्रास – अशा अनेक बाबतीत नुकसानकारक ठरतं, तसंच आधी उल्लेख केला तशा विषयांच्या प्रकाराप्रमाणं, त्यांना द्यायचा वेळ जर योग्य दिलेला असेल, तर अशा लोकांच्या आयुष्याच्या गाडय़ा, इच्छित ठिकाणी योग्य वेळी पोचतात. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणं आपण प्रवासी आहोतच, पण आयुष्याच्या एका दीर्घ वाटेवरचे! हे लक्षात ठेवणं आपल्याच हिताचं आहे. नाही तर, रेंगाळणाऱ्या लोकांच्या आयुष्याच्या गाडय़ा, एखाद्या लेट – उशीर करीत जाणाऱ्या रेल्वेसारख्या, आयुष्यातल्या साध्यासुध्या गोष्टींपासून, महत्त्वाच्या घटनांच्या टप्प्यांवर लेटच होत जातात.

कारण, प्रत्येकाच्या आयुष्यासाठी वेगळं घडय़ाळ नसतं, तसा वेळ मर्यादित आणि अनिश्चित असतो. त्यात जर आपण अशी आयुष्याची गाडी साध्या साध्या खरेदीसारख्या गोष्टींपासून, महत्त्वाच्या घटनांतल्या निर्णयांपर्यंत रेंगाळत चालवली तर, दिलेला वेळ मर्यादित असल्यामुळं, तो तर वाया जातोच, पण आयुष्यात खऱ्या महत्त्वाच्या असलेल्या, अनेक गोष्टी करायच्या राहून जातात. मग उत्तरं येत असूनही, वेळ संपली म्हणून, हातातला पेपर काढून घ्यावा आणि अपयश यावं, तसा आपल्या मोलाच्या आयुष्याचा पेपर, काळ आपल्या हातून काढून घेतो.

तसे आपण सारेच ‘जगातले प्रवासी’ आहोत, पण ‘रेंगाळणारे प्रवासी’ नसावं, हे चांगलं!

सुहास पेठे

drsspethe@gmail.com