26 March 2019

News Flash

‘तेवढंही अवघड नाही!’

..आणि नोकरीसाठी निवडीचं आणि नेमणुकीच्या अटींचं पत्र हातात पडतं..

..आणि नोकरीसाठी निवडीचं आणि नेमणुकीच्या अटींचं पत्र हातात पडतं.. शिक्षणात चोवीस-पंचवीस वर्ष निघून गेलेली असतात. नोकरीच्या प्रयत्नांत आणखी एक-दोन वर्ष जातात. चांगल्या चांगल्या नोकऱ्यांची स्वप्नंही पाहिलेली असतात. चांगल्या पगारासाठी खासगी क्षेत्र, थोडय़ा स्थर्यासाठी सरकारी- निमसरकारी क्षेत्रं अशा दोन्ही रुळांवर धडपड, अडखळणं सुरू असतं. अपयशानं अस्वस्थता वाढत असते. बरोबरचीच काय, मागे असलेली मुलंसुद्धा नोकरीला लागून त्या अर्थानं पुढं निघून जातात. म्हणून वेगवेगळ्या निकालांची वाट पाहणं आणि निराश होणं, हा जणू दिनक्रमच होऊन बसतो.. आणि ज्याची वाट पाहत होतो, ते नोकरी देणारं पत्र, खोलीतल्या अंधारात प्रकाशाचा कवडसा एकदम यावा, तसं येऊन पडतं!

नोकरी चांगली. पगार चांगला. इतर नियम, अटी, फायदे सारं चांगलं असतं. घरातलेही सर्व आनंदित होतात. फक्त नेमणुकीचं ठिकाण गोंदिया वाचल्यावर, आनंदानं चांगलं जेवण सुरू असताना खडा लागावा, तसे एकदम सर्वाचे चेहरे बदलतात. वास्तविक, अर्ज करताना याची कल्पना असते. पण आता मात्र पश्चिम महाराष्ट्रात लहानपण, शिक्षण, नातेवाईक, मित्रमंडळी असं सगळं आयुष्य गेल्यानं, नेमणुकीच्या गावामुळे ते सारं फारच अवघड आहे, असं वाटायला लागतं. मोठय़ांनाही कधी बाहेर जायची वेळ न आल्यामुळे, तेही अवघड असल्याचा सूर लावतात. कुणी ओळखीचं नाही. नातेवाईक नाहीत. हवामान खूप वेगळं आहे. जेवणखाण वेगळं. खाणावळीची कधी सवय नाही. हवापाण्यानं तब्येत बिघडली तर, बघणारं कुणी नाही. इतक्या लांबची माणसं कशी वागतील, कुणास ठाऊक? त्याचा नोकरीतल्या कामांवर विपरीत परिणाम झाला तर करिअरचा प्रश्न येईल.. असं ते सगळंच ‘खूप अवघड’ आहे, असं ठरतं!

एक-दोन रात्री अस्वस्थतेत जातात. त्या तरुणाचा दोन्ही बाजूंनी विचार होत असतो. आपण इतके दिवस शिक्षण असूनही बेकार राहून काढले. त्या वेळेला कुठलीही संधी आली तरी घेईन, अशी मनाची तयारी होती. आलेली संधी नक्कीच चांगली आहे, हे एका बाजूला वाटत असतं. पण दुसऱ्या बाजूला दोन-तीन दिवसांच्या चच्रेत अवघडपणाचे इतके मुद्दे निघालेले असतात, तेही सारखे डोळ्यांसमोर येत असतात. दहा दिवसांत हजर व्हायचं असतं. त्याचाही एका बाजूला मनावर ताण असतो. सकाळी निरुत्साही उठल्यावर मित्राचा मात्र उत्साहानं फोन येतो. ‘‘मला आज पत्र आलं. आपलं तर काम झालं बुवा! तू तर हुशार आहेस, तुला अजून नाही का काही आलं पत्र?’’ ‘‘आलं तीन दिवसांपूर्वीच. पण पोिस्टग गोंदिया म्हटल्यावर सगळं अवघडच आहे, असं वाटायला लागलं म्हणून गप्प बसलो. फोनही नाही केला. तुला जवळपास कुठं पुणं, मुंबई मिळालं का?’’ ‘‘छे, चंद्रपूर आहे. जवळ काय आणि लांब काय, आपल्याला नोकरी तर चांगली मिळते आहे. घरच्या बेकारीपेक्षा लांबची नोकरी अधिक बरी!’’ मित्राने असं म्हटल्यावर थोडा प्रकाश दिसायला लागतो. मग मित्राला आपल्या अडचणी सांगून होतात. तो म्हणतो, ‘‘माझंही गाव तुझ्यासारखंच लांब आहे. पण त्या गावात नेमणूक होते, इतपत ते मोठं आहे, हे तर नक्की! गावात इतर लोक राहत नाहीत का?  तिथं राहणारे तर जेवतात, खातात, जगतात. गाडय़ा, वाहनं, हॉटेल, लॉज, खाणावळी, उद्योग, इतर कार्यालये, माणसं, सणसमारंभ- अनेक गोष्टी तिथंही आहेतच की.आपण तर जाणार बुवा!’’ आता हे ‘तितकं अवघड’ नाही, हे लक्षात येतं! दिशा लांबची असली तरी तीच असल्यानं दोन दिवसांत दोघेही मित्र एकाच रेल्वेनं ‘पश्चिमेकडून’ आता ‘पूर्वेकडे’ निघतात! वाटेत तिथल्या संभाव्य अडीअडचणी, त्यांचे मार्ग, मिळालेल्या संधीचं चीज करायचे प्रयत्न- यांची चर्चा होते. तिथली माणसं कशी वागतील, याची शंका पहिल्याच दिवशी नाहीशी होते. त्यांना कामासाठी माणसाच्या मदतीची जरूर असते. लांबचा असल्यामुळे येईल की नाही याची चिंता असते, त्यामुळे ते उलट उत्साहानं त्यांचं स्वागत करतात. तिथले वरिष्ठही राहण्या-जेवण्यापासून कामापर्यंत सहकार्याची खात्री देतात!

‘भावी गोष्टींचा अवघडपणा’ हा एखाद्या रस्त्यातलाच अडथळा नसतो, तर आयुष्यातल्या अनेक प्रकारच्या वाटचालींत लागणारं ते एक टर्मिनस-जंक्शनच असतं. अनेक ठिकाणांहून निघालेल्या गाडय़ा ‘हे खूप अवघड आहे’ नावाच्या या जंक्शनवर येऊन अडकलेल्या असतात. संधींचं, काळाचं, प्रगतीचं नुकसान होत असतं. अनेक जण अवघडपणावर ठाम असतात. त्रास सहन करतात, पण ‘हे आपल्याला वाटतं तेवढं अवघड नाही’, हे मान्य करीत नाहीत. परिणामी, घरातल्या इतरांनाही त्रास सोसावा लागतो. काहींना ‘हे तेवढं अवघड नाही’ हे लक्षात येतं. ते थोडा अवघडपणा सोसून पुढं सरळ, सोप्या आयुष्याकडे निघून जातात, यशस्वी होतात. हे जागीच थांबलेले मात्र अकारणच अशांची असूया, मत्सर धरून स्वत:चं आणखीच नुकसान करून घेतात. म्हणून याचा विचार करणं चांगल्या जीवनासाठी खरोखरच गरजेचं आहे. तसं पाहिलं तर आयुष्यात जन्मापासून मृत्यूपर्यंत अवघडपणा नाही कुठं, फक्त त्याचबरोबर सोपेपणाही नाही कुठं – हे विचारण्यासारखे प्रश्न आहेत!  लहानपणी शाळेत एकटय़ानं थांबायचं, सवयीचे आई-बाबा-भावंडं कुणी नाहीत, बरोबरच्या मुलांतलं कुणी ओळखीचं नाही. त्यांनी त्रास दिला तर आपण काय करायचं, बाई शिक्षा करतील का – असा सारा अवघडपणा तिथेच अनेकांचं शिक्षण थांबवतो. तीच शाळा सहवासानं उपयोगी पडली, सोपी झाली की ती सोडताना महाविद्यालयात जाण्यातला अवघडपणा जाणवायला लागतो. त्याला तोंड द्यावं लागू नये म्हणून बहिस्थ शिक्षणाचा मार्गसुद्धा स्वीकारला जातो. खरं तर, तिथंही अनेक गोष्टी कल्पनेपेक्षा चांगल्या, सोप्या असतात. संधी, विकासाला वाव असतो. पण अवघडपणाच्या या थांब्यावर, गाडी एकदा अडकली की ती तशीच अनेक टप्प्यांवर अशीच त्या त्या टर्मिनसना खोळंबून राहते. जोडीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, बदल्या, माणसांशी-परिस्थितीशी जमवून घेणं, वेळीच बाजूला होणं, आजारपणं, वृद्धत्व, परावलंबित्व, एकाकी जीवन- अशी कित्येक जंक्शन येतात. त्यातल्या संधी, सोपेपणा, मार्गदर्शन, प्रयत्न, प्रयोग, विकासाचा निर्धार-अशा अनेक बाबी त्या टप्प्यावरचा अवघडपणा कमी करून प्रवास सोपा, सरळ करीत असतात. पण त्याची कल्पना नसली किंवा कल्पना असूनही तयारी नसली तर मग त्या त्या बाबतींत आयुष्यं खोळंबून राहतात. साधं पाहा. आपण गावाहून आल्यावर रिक्षात बसतो. घरी जाईपर्यंत वाटेत रस्ते अक्षरश: बंद करून टाकणाऱ्या मिरवणुका असतात, याची आपल्याला आणि रिक्षाचालकांनाही कल्पना असते. पण ते आपल्याला न्यायला नकार देत नाहीत, फार तर पाच-दहा रुपये जास्त लागतील असं सांगतात. कारण अडचण समोर असूनही त्यांना ती ‘तेवढी अवघड वाटत नाही.’ बोळ, गल्ली अशा आपल्याला एरवी माहीतही नसलेल्या मार्गातून वाट काढीत ते आपल्याला घरी अचूक नेऊन पोहोचवतात. एवढय़ावरूनही आपण शिकू शकू!

मन गोष्टी अवघड करून टाकतं! गोष्टी अनपेक्षित, अपरिचित असतात. त्या सवयीच्या नसतात. त्या गोष्टींबद्दल अज्ञान असतं. त्यातल्या अडचणी ‘संभाव्य’ आहेत, त्या येतीलच असं नाही, याची जाणीव होत नाही. अनेक अवघड वाटणाऱ्या गोष्टी सरावानं, शिकण्यानं पूर्वी सोप्या झालेल्या असतात, हा स्वानुभवही विसरतो. असं सारं विसरणारं मन आपणच आता ओळखून लक्षात ठेवलं पाहिजे. कर्तव्यं अवघड असली तरी करणाऱ्याला माणूसच काय, देवही मदतीला येत असतो. मग कुठली गोष्ट मनाला वाटते ‘तेवढी अवघड नाही’, हे लक्षात येईल आणि आपल्या आयुष्याची गाडी कुठल्या अवघडपणाच्या जंक्शनवर न थांबता ध्येयाच्या दिशेनं जरूर प्रगती करील.

सुहास पेठे

drsspethe@gmail.com

First Published on December 16, 2017 5:28 am

Web Title: kathakathan by suhas pethe part 9