15 October 2019

News Flash

शाश्वत आनंदासाठी

माझ्या खाण्याला माझ्या पोटाची मर्यादा होती, त्यामुळंच माझ्या आनंदालाही तीच मर्यादा होती.

माणसाचा खऱ्या किंवा टिकणाऱ्या आनंदाचा शोध सुरू होतो; त्यावेळी त्याच्या एक गोष्ट प्रथमच लक्षात येते की, दुसऱ्या प्रकारातला आनंद हा कशावर तरी अवलंबून होता, म्हणून ते कारण संपलं की, तोही संपतो. मग जर तो टिकायचा असेल, तर तो अशा कारणांवर अवलंबून असला पाहिजे की, जे कारण कधीच संपणार नाही, शाश्वत असेल.

आनंद घेण्यातसुद्धा जी धडपड आहे, जी कृती आहे-ती अगदी नाममात्र असो किंवा मोठी, उलाढालीची असो, तिचेही तीन तरी ढोबळ प्रकार दिसतात. काहींच्या बाबतीत असं आढळतं की, त्यांच्या कृती त्यांना आनंद देतात, पण इतरांना मात्र दु:खी करतात, त्रासाच्या ठरतात. म्हणजे यात दुसऱ्यांना त्रास होता पण त्यातून मला आनंद मिळतो तर दुसऱ्या प्रकारातले लोक स्वत:ला त्रास करून घेतात, पण दुसऱ्यांसाठी आनंद निर्माण करतात. या दोन्ही प्रकारातले लोक आपण आजूबाजूला पाहिले असतील.

अगदी उदाहरण घ्यायचं झालं तर, दुसऱ्यांचा पैसा, त्यांच्या वस्तू हिसकावून, स्वत:साठी आनंद मिळवणारे अनेक लोक असतात. त्यांना स्वत:ला असा पैसा आनंद देतो. अगदी चोरी करणारासुद्धा याच प्रकारानं आनंदित होत असतो. दुसऱ्याचं डबोलं जेवढं मोठं तेवढा त्याचा आनंद मोठा. पण त्याचबरोबर ज्याचा पैसा त्यानं चोरला, लुबाडला तो मात्र चोराच्या या कृतीनं दु:खी झालेला असतो. अनेकांना तर एकदोन दिवस नव्हे, तर आयुष्यभरसुद्धा हे दु:ख विसरता येत नाही. म्हणजे ही कृती चोराला किंवा अशा मार्गानं आनंद मिळवू पाहणाऱ्याला सुखाची वाटली, तरी ती दुसऱ्याला दु:खाची ठरत असते.

यात पैसा नि चोरी एकवेळ जाऊ द्या. पण इतर अनेक बाबतीत आनंद मिळवतानासुद्धा काही वेळा असं घडताना आपल्याला दिसतं. दुर्दैवानं एखाद्याला एखादं शारीरिक व्यंग असेल, काही उणीव-दोष असेल, परिस्थितीनं एखादी कमतरता आली असेल तर, त्याच्यावर बोट ठेवून, त्याचा विनाकारण विषय करून माणूस जेव्हा आनंद मिळवू पाहतो, तेव्हा तो त्या क्षणिक आनंदाच्या भ्रमात असला, तरी तो आनंद असा दुसऱ्याच्या दु:खाच्या पायावर उभा असतो, हे कसं विसरता येईल? असले आनंद हे कितीही शक्य असले आणि घ्यावेसे वाटले तरी ते त्याज्यच मानायले हवेत.

दुसरा प्रकार स्वत: त्रास, दु:ख घेऊन दुसऱ्यांना आनंद देण्याचा आहे. यामध्ये माणसाची अधिक प्रगत अवस्था आहे. आत्ताच्याच चोराच्या नि पैशाच्या उदाहरणानं पाहायचं तर, स्वत: कष्ट करून मिळवलेला पैसा गरजवंताला देण्याचा तो आनंद आहे. आपला पैसा जाईल, त्यामुळं आपल्याला काही उणीव, त्रास भासेल हे खरं, पण गरजूंच्या जीवनात त्यानं आनंद पसरेल, हेही तितकंच खरं आहे.

अर्थात याही पलीकडं जाणारा तिसरा प्रकार आहे, तोही आपण समजून घेऊ शकतो. तो म्हणजे स्वत:लाही आनंद आहे, त्रास नाही आणि दुसऱ्यालाही आनंद आहे, त्रास नाही. या अत्यंत श्रेष्ठ प्रकारातले लोक म्हणजे सत्पुरुष होत. त्यांना स्वत:ला कृतींचा त्रास नाही. म्हणजे ते काहीच करीत नाहीत असं नाही, पण ते त्रास करून घेत नाहीत किंवा ते त्याच्या पलीकडे गेलेले असतात; किंबहुना त्यांची इतरांनाही आनंदित करणारी कृती अगदी सहजपणे घडते. ते स्वत: आनंदानं इतके भरलेले असतात की, तो आनंद सहजपणे ओसंडून वाहतो, इतरांना अत्यंत सहजपणे मिळतो. शिवाय यांचा स्वत:चा आनंदही कमी होत नाही.

आपलं पैशाचंच उदाहरण घ्यायचं म्हटलं, तर त्या बाबतीत हे लोक, कुबेरासारखे किंवा त्याही पलीकडचे असतात, असं म्हणावं लागेल. म्हणजेच ते गरजूला देतील, तर त्यांना त्याची नड भागते आहे याचा आनंद होईलच, पण स्वत:चं काही कमी झालंय अशी स्थिती इथे नसते. कितीही देऊनसुद्धा यांना कधीच काही कमी पडत नाही. शिवाय देणंसुद्धा अगदी सहज घडत असल्यानं देण्याच्या कृतीचासुद्धा त्रास संभवत नाही. विशाल सागरातलं पाणी जसं कितीही वाटलं, उपसलं तरी पुन्हा त्याची पातळी तशीच राहावी तशी ही अवस्था म्हणावी लागेल.

याचा अर्थ तिसऱ्या प्रकारातल्या लोकांच्याकडं वस्तू, पैसा, घरदारं भरपूर असतात, न संपणारी असतात असा नसून ते देण्यानं त्यांना त्रास होत नाही, कमी पडल्याचं दु:ख होत नाही, या मानसिक अवस्थेत ते वावरतात, असा आहे. लोक व्यवहारानं अशा तऱ्हेच्या देण्यानं त्यांना कधी कमी पडत असेल, उणिवा निर्माण होत असतील, पण त्यामुळं आपल्याला जसा त्रास व्हावा तसा त्यांना तो होत नाही, हे लक्षात घेणं गरजेचं आहे.

आनंदासाठी करण्याच्या तीन प्रकारच्या कृतींची जी गोष्ट आपण पाहिली, तीच गोष्ट आनंदाच्या तीन प्रकारांची आहे अािण ती आपल्याला आजच्या आजूबाजूच्या धावपळीच्या, बाजारू, अस्वास्थ्याच्या युगामध्ये फारच महत्त्वाची आहे, असं म्हणावंसं वाटतं. त्यात आपण पाहिल्याप्रमाणं पहिला आनंदाचा प्रकार फसवा आहे, दुसरा प्रकार क्षणिक, तात्पुरता आहे, मात्र तिसरा आनंदाचा प्रकार टिकाऊ आहे, शाश्वत आहे.

आनंदाचा दुसरा प्रकार मात्र आजूबाजूला अधिक आढळणारा आहे, प्रचलित आहे. जो खाण्यापिण्यातला आहे, कपडेलत्ते, पैसापाणी, मौजमजा यांतला आहे. याची व्याप्ती फार मोठी आहे; किंबहुना बरचंसं जग याच्याच मागं आहे. आपल्या देहाला- इंद्रियांना सुखाचं झालं की, झालं, अशी समजूत याच्यामागं आहे. खाण्याचीच गोष्ट घ्या. एखादा पदार्थ त्याज्य नाही, निषिद्ध नाही, तो चांगला आहे, हे खरंच आहे. पण तो मी खाल्ल्यानं मला होणाऱ्या आनंदावर माझी मदार आहे, भिस्त आहे आणि व्यवहारानं पाहिलं तर, त्याचा अनुभव तसा येतोसुद्धा. एखादा चांगला पदार्थ खाल्ल्यावर आनंद होतो, मनुष्य तृप्त होतो हेही खरंच आहे. पण यात विचार करण्यासारखं आहे, ते पुढं आहे. अशा तऱ्हेनं एखादा तृप्त झालेला मनुष्य खरं म्हणजे तसाच तृप्त आणि आनंदी राहायला हवा होता. पण अनुभव तसा नाही. तो पुढं टिकण्याचं तर सोडाच, पण काही ताससुद्धा हा आनंद टिकत नाही. पुन्हा पोट रिकामं झालं की भूक सतावू लागते. म्हणजे हा आनंद, आनंद वाटतो खरा, पण तो टिकाऊ नाही, शाश्वत नाही. दुसऱ्या बाजूनंही त्याला मर्यादा आहे.

समजा, हेच खाण्याचं उदाहरण घेऊ. खाण्यानं आनंद होतो आहे, ठीक आहे. खावं, पण आनंद होतो आहे, तो जास्तीत जास्त व्हावा, म्हणून खातच राहिलं, तर आनंदही सतत टिकून राहिला पाहिजे आणि खाण्याबरोबर वाढत गेला पाहिजे, तर तसं होत नाही. कारण आपल्या खाण्याला मर्यादा आहेत. पण याऐवजी क्षणभर असा विचार करू की, आपल्याला जसा खाण्यानं आनंद मिळतो आहे, तसाच तो इतरांनाही मिळतो. म्हणून आपण तोच पदार्थ इतरांना खायला घालून आनंद द्यायचा व आपण आनंद घ्यायचा ठरवायला हवं. माझ्या खाण्याला माझ्या पोटाची मर्यादा होती, त्यामुळंच माझ्या आनंदालाही तीच मर्यादा होती. पण आता दुसऱ्याला द्यायचं आहे. घ्यायला कितीतरी माणसं आहेत! प्रत्येक माणसागणिक आनंद आहे. माणसांना मर्यादा नाही तशी ती आपल्याला मिळणाऱ्या आनंदालाही नाही. आपण देत राहावं, अख्खं जग घेत राहील. आधी स्वत:साठी आनंद मिळवण्यानं आपलाच आनंद मर्यादित, न टिकणारा, अशाश्वत झाला होता, आता तोच आनंद दुसऱ्यांसाठी द्यायचा ठरवल्यावर अमर्याद, टिकणारा आणि शाश्वत झाला.

खाण्यापिण्याइतकाच आनंद माणसाला कपडेलत्ते, घरदार अशा गोष्टींनी मिळतो, हे तर आपण सर्वजण जाणतोच. पण जेव्हा कधी या गोष्टी माणसाला मिळतात, त्यावेळी हे कळतं की, हा आनंद शाश्वत नाही, टिकणारा नाही. कारण अगदी मनासारखा कपडा मिळाला तरी तो झिजतो, फाटतो- मनासारखं म्हणून बांधलेलं घरही कधी मोडतं, पडतं, गैरसोयीचं ठरतं!

या गोष्टी स्पष्टपणे दिसणाऱ्या आहेत, पण ज्या गोष्टी न दिसणाऱ्या आहेत, पण आनंद देणाऱ्या वाटतात. म्हणून त्या मिळवण्यासाठी अनेकांची अविरत धडपड सुरू असते.  उदाहरणार्थ, सत्ता, अधिकार, मान. हे मिळाल्यावर लक्षात येतं की, यालाही मर्यादा आहे, दुसऱ्या ठिकाणी गेलं की, कुणी आपल्याला विचारत नाही, साधं ओळखत नाही, मान तर दूरच. मग माणसाचा खऱ्या किंवा टिकणाऱ्या आनंदाचा शोध सुरू होतो. त्यावेळी त्याच्या एक गोष्ट प्रथमच लक्षात येते की, दुसऱ्या प्रकारातला आनंद हा कशावर तरी अवलंबून आहे, म्हणून ते कारण संपलं की तो आनंदही नष्ट होतो. मग जर तो टिकायचा असेल, तर एक तर तो अशा कारणांवर अवलंबून असला पाहिजे की, जी कारणं कधीच संपणार नाहीत, तो आनंद शाश्वत असेल. माणसाला या तिसऱ्या प्रकारातल्या शाश्वत आनंदाची एकदा ओळख झाली की, झाली! ती कायमची टिकते.

सुहास पेठे – drsspethe@gmail.com

First Published on January 28, 2017 2:31 am

Web Title: man search for true happiness