तक्रारींना जसा वेळ-काळ नाही, तशी त्याला काही विशिष्ट कारणं आहेत असंही नाही. एकूण एवढय़ाशा साध्या गोष्टीत आणि जवळच्या संबंधातसुद्धा तक्रार माणसाच्या आयुष्याला एक अवघडलेपण आणते. आपल्या मनाप्रमाणं आजवर झालेल्या गोष्टी, झालेल्या सोयी, मिळत असलेला न्याय, आपल्यासारख्याच इतर अगणित लोकांच्या आनंदासाठी आपण दाखवायचं मनाचं औदार्य – अशा काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर जीवनाचं गुलाबाचं फूल पाहाण्याचा आणि सुगंध घेण्याचा, देण्याचा आनंद मिळेल आणि तक्रारींचे काटे नक्कीच कमी टोचतील!

ज्याची कशाबद्दल तक्रार नाही, असा माणूस मिळणं अवघड आहे. हे नियमासारखं असलं तरी त्याला अपवाद असतात, ही गोष्ट खरी. तरीसुद्धा आपल्याला असं आढळेल की, वर्षभर तक्रार नसलेला मनुष्य कदाचित दुसऱ्या वर्षी तक्रार करेल. तसंच दिवसभरात कशाहीबद्दल, कुणाचीही तक्रार नाही असा दिवस अगदी मुहूर्त घेऊन शोधायला निघालं, तरी मिळणं अवघड आहे. नात्यातली, जवळची, मत्रीतली- अशी माणसं म्हणजे खरं तर आपल्याला पसंत असलेली गोष्ट असायला हवी. तिथं काही तक्रार असू नये. पण उलट असं आढळेल, की जवळच्या माणसांबद्दलच तक्रारी जास्त आहेत. बरं त्या तक्रारींना काही विशिष्ट कारण, वेळ असं असावं म्हटलं, तर तसंही नसतं.

सकाळी उठल्या उठल्या नीट झोप लागली नाही, म्हणून तक्रार होते. मग दिवसभर तारवटल्यासारखं झालं म्हणून तक्रार होते. घरातलं एखादं माणूस लक्षात ठेवून एखादं काम करून येतं किंवा वस्तू घेऊन येतं, मग तरी निदान आनंदात असावं, पण तसंही होत नाही. त्यानं लक्षात ठेवून केलेल्या कामाचा आनंद घेण्याच्या आड त्यानं आणलेली वस्तू बरोबर नाही, अशी तक्रार मनात येते. इतके दिवस सांगूनही न झालेली गोष्ट आज आठवणीनं केल्याबद्दल एका बाजूला खरं तर बरं वाटलेलं असतं, पण दुसऱ्या बाजूला केलेलं काम मनासारखं झालेलं नाही म्हणून होणारी तक्रार मनाला टोचणी देत राहते. यात लक्षात घेण्यासारखं हे की, एका बाजूला काम लक्षात ठेवून केल्याचा आनंद आणि दुसऱ्या बाजूला काम पसंत नसल्याची तक्रार, या दोन्हीतलं नक्की काय व्यक्त करावं, हेही लक्षात येत नाही. केलं म्हणून आनंद व्यक्त करता येत नाही, बरोबर केलं नाही म्हणून राग व्यक्त करता येत नाही. एकूण एवढय़ाशा साध्या गोष्टीत आणि जवळच्या संबंधातसुद्धा तक्रार माणसाच्या आयुष्याला एक अवघडलेपण आणते.

या तक्रारीला वर म्हटलं तसा वेळ काळ नाही. सकाळ छान आनंदात सुरू झाली तरी, त्याच माणसांत दुपारी तक्रार होणार नाही असं नाही. स्वयंपाक लवकर उरकला म्हणून आनंदात राहावं, तर नंतर अशी काही अनपेक्षित कामं उद्भवतात, अनपेक्षित माणसं येतात आणि जेवायला दोन वाजतात. बरं त्या माणसांबद्दल तक्रार करावी तर तसंही नसतं. आपला आनंद बिघडवावा असा त्यांचा हेतू नसतो, हेही आपल्याला कळतं. पण दोन वाजता जेवताना सकाळचा नऊचा आनंद निघून जातो, तक्रार होते, चिडचिड होते. यात तसा कुणाचाच दोष नसल्यामुळं, कुरकुर, तक्रार मनात येते, पण ती कुणाबद्दल करावी हेही कळत नाही. त्यामुळं आणखीच त्रास होतो. बरं असं आहे म्हणून रागानं न जेवावं तर तेही फार वेळ निभत नाही. कारण शेवटी भुकेनं, रागानं कामं चुकायला लागतात. कुणाला तरी काही तरी बोललं जातं, दुखावलं जातं. अशा पद्धतीच्या तक्रारी कुणाला सांगताही येत नाहीत. मग शेवटी न आवडणारं एखादं कडू औषध, कडू गोळी घेण्याचं खूप वेळ टाळावं आणि मग ती एकदम घेऊन टाकावी तशी ती तक्रार सोडून द्यावी लागते.

या तक्रारींना जसा वेळ-काळ नाही, तशी त्याला काही विशिष्ट कारणं आहेत असंही नाही. कामांतून जरासुद्धा फुरसत मिळत नाही, वेळ नाही म्हणून गांजून गेलेला माणूस तक्रार करील हे एकवेळ समजू शकतो. पण असे कामाचे काही दिवस गेल्यावर जर त्याला चार दिवस बिनकामाचे, विश्रांतीचे आले तरी, त्याला करमत नाही. काम नाही म्हणून तक्रार होते. आता वास्तविक कामानं गांजून गेल्यामुळं विश्रांती नाही, म्हणून तक्रार होती ना, तर मिळालेल्या शांतपणात बिनतक्रार दिवस जायला हवे. पण असलं तर्कशुद्ध काही घडत नाही. काम पडल्याची तक्रार आहे आणि बिनकामाचं कसं राहायचं म्हणूनही तक्रार आहे.

अनेकदा माणसांना कुणाकडून तरी आदर्श जेवण कसं असावं याचा सल्ला मिळतो. पित्त, डोकेदुखी असल्या तक्रारींवर कुणी ज्येष्ठ माणसं किंवा आपले डॉक्टर, याचं मूळ आहारात आहे, असं सांगतात. आदर्श आहाराची कल्पना आपल्याला देतात. मग त्यानुसार उत्साहानं अगदी चौरस आहाराची आखणी होते. आजार, त्रासही कमी होतात. पण हळूहळू आठवडय़ाभरातच रोज तेचतेच काय खायचं, म्हणून कुणाचं एकाचं मन तक्रार करून उठतं. बाकीच्यांच्या मनात ते आधीच आलेलं असतं. पण चांगली गोष्ट आहे, बोलायचं कुणी म्हणून ते गप्प बसतात. त्यामुळं असा कुणी विषय काढला की, त्याला भराभर पािठबा मिळतो आणि तळणीत भजी सोडली जातात! आदर्श आहाराविरुद्धची तक्रार नकळत थांबते. पण किती, एक-दोन दिवस. पुन्हा पित्त, अपचन, जळजळ सुरू झालं की, तीच तक्रार दत्त म्हणून उभी राहाते.

घरात कुठले निर्णय मला विचारून घेतले जात नाहीत, म्हणून अनेक घरात अनेकांची तक्रार असते. ती दूर करावी म्हणून प्रत्येक गोष्ट सांगून करायची ठरते, निर्णय विचारून घ्यायचे ठरतात. असे काही दिवस गेले की, ज्यांची ही तक्रार आहे, तीच माणसं तक्रार करतात. प्रत्येक गोष्ट विचारून करता, तुमचे तुम्ही निर्णय घेत जा की, आता या तक्रारीवर यांनी मार्ग काढावा की त्यांनी. हे काही नक्की ठरत नाही. त्यामुळं सगळ्यांचीच तक्रार होऊन गोंधळ उडतो. बेशिस्तीला कंटाळून दुसऱ्याबद्दल तक्रार करणारा माणूस, तो दुसरा माणूस अगदी वेळच्या वेळी सगळी कामं करायला लागला की, काही दिवसांनी याच माणसाची तक्रार होते, असं काही घडय़ाळाच्या काटय़ावर सगळं होतं का, काही अडीअडचणी असतात की नाही. कामात थोडा तरी मोकळेपणा हवा की नाही!

हे तर सारं आपण घरात, नात्यात रोजच्या संबंधातलं पाहतो आहोत. पण तिकडं बाहेरच्या एवढय़ा मोठय़ा जगात या पक्षाची त्या पक्षाबद्दल, या धर्माची त्या धर्माबद्दल, या देशाची त्या देशाबद्दल -अशा असंख्य तक्रारी रोज व वर्षांनुर्वष सुरू असतात. तक्रार होऊ नये वा दूर करावी म्हणूनच तर वेगवेगळे पक्ष काढलेले असतात. वेगवेगळे धर्म स्थापन होतात, संघटनांची विभाजनं होतात. इतकंच काय देशाची विभाजनं करूनसुद्धा तक्रार दूर करण्याचे प्रयत्न होतात. पण तेच पुन्हा तक्रारींना कारणीभूत होतात.

तक्रारींचं निवारण व्हावं म्हणून लक्षावधी लोक तिकडं वर्षांनुर्वष न्यायालयात हेलपाटे मारत असतात. दोन माणसं तक्रार घेऊन तिसऱ्याकडं जातात, हे आपण एकवेळ समजू शकू, पण दोन संघटना, दोन धर्म न्यायालयात असतात, दोन देश आंतरराष्ट्रीय न्यायालयात असतात. अशा तक्रारींचे अक्षरश: कोटय़वधी खटले निकालात काढण्यात येतात, पण त्यापेक्षा जास्त पुन्हा दाखल होतात. म्हणजे एवढय़ा मोठय़ा जगाच्या पातळीवरसुद्धा सगळीकडं तक्रारच तक्रार आहे. सूर्यमालेवरच्या पातळीवर अजून कुठलं न्यायालय नाही, म्हणून बरं. नाही तर शुक्राची मंगळाविरुद्ध, शनीची गुरूविरुद्ध अशासुद्धा तक्रारी झालेल्या  पाहायला मिळाल्या असत्या!

आपल्या लक्षात येईल की, जग जसं आहे, तसं ते त्या त्या वेळी आपल्याला मानवत नाही, पचत नाही, हे तक्रारींचं मूळ आहे. रस्ता आहे म्हटल्यावर कधी त्यावर रहदारी होणार, कधी तो निर्मनुष्य असणार, कधी त्यावर रस्ता रोको होणार, कधी-कधी नव्हे, बहुधा त्यावर खड्डे असणार हे सगळं गृहीत आहे. वास्तविक यांतलं सगळं एकाच वेळेला असणार असं नाही. आपली तक्रार तर यांतल्या कशाहीबद्दल असू शकते. पण मुळात आपल्याला इच्छित ठिकाणी नेण्यासाठी रस्ता निर्माण झाला आहे, याचा आनंद, सोय ही कधीच विसरून चालणार नाही. तक्रारीच्या वेळेला नेमकी तीच गोष्ट दुर्लक्षित होते, विसरलेली असते.

त्यातही ज्या यंत्रणेमुळं आपण आपल्या ठिकाणी पोचू शकतो, कधी मोकळ्या, चांगल्या दुरुस्त केलेल्या रस्त्यांचा आनंद घेतो, तोच जर अगणित माणसांनी घ्यायचा ठरवला तर गर्दी, अतिवापरामुळं खड्डे हे होणारच ना! नियंत्रण, दुरुस्ती करणाऱ्या यंत्रणा या सगळ्याला तरी कुठे पुऱ्या पडतील? असा विचार जरी मनात आला, तरी एखादा खड्डा पार करताना बसलेला धक्का किंवा रहदारीतून जाताना सारखे लागत राहणारे ब्रेक आपण सहन करू शकू.

मला माझ्या मनाप्रमाणं व्हावं असं वाटण्याचा जो अधिकार आहे, तोच अधिकार दुसऱ्याला त्याच्या मनाप्रमाणं व्हावं असं म्हणण्याचाही आहे आणि दोन मनं त्या अर्थानं सारखी असणार नाहीत. हे जर खरं आहे तर कधी परिस्थिती आपल्या, तर कधी दुसऱ्याच्या मनाप्रमाणं असणार, हे उघड आहे. आपल्या मनाप्रमाणं आजवर झालेल्या गोष्टी, झालेल्या सोयी, मिळत असलेला न्याय, आपल्यासारख्याच इतर अगणित लोकांच्या आनंदासाठी आपण दाखवायचं मनाचं औदार्य – अशा काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर जीवनाचं गुलाबाचं फूल पाहण्याचा आणि सुगंध घेण्याचा, देण्याचा आनंद मिळेल आणि तक्रारींचे काटे नक्कीच कमी टोचतील!

सुहास पेठे drsspethe@gmail.com