19 September 2018

News Flash

आपण आहोत तिथंच असतो का..?

माणसाच्याच अस्तित्वाला दोन अंगं आहेत. तो शरीरानं तर वावरत असतोच, पण तो मनानंही वावरत असतो

जे या एका उदाहरणानं पाहिलं तेच इतर उदाहरणांच्या बाबतीत घडत असतं

माणसाच्याच अस्तित्वाला दोन अंगं आहेत. तो शरीरानं तर वावरत असतोच, पण तो मनानंही वावरत असतो. अनेकदा तर त्याच्या या शारीरिक अस्तित्वापेक्षा, वावरण्यापेक्षा मनाच्या अस्तित्वाला – त्याच्या वावरण्याला अधिक महत्त्व असतं. पण अनेकदा आपण आहोत तिथं मनाने नसतो.. त्याचे दुष्परिणाम मग भोगावेच लागतात..

‘आपण आहोत तिथंच असतो का..?’

वरवर पाहता हा प्रश्न थोडा निर्थक वाटण्याची शक्यता आहे. कदाचित मनात असंही येऊ शकतं की आपण जिथं असतो तिथंच असतो किंवा तिथंच असू शकतो. आपण एकाच वेळेला जिथं आहोत त्यापेक्षा दुसऱ्या ठिकाणी कसे असू शकू? आपणच काय, आपल्या बरोबरचे इतरही जिथं आहेत, तिथंच असतात! घरात आपल्यासमोर जर माणूस प्रत्यक्ष बसलेला दिसतो आहे, तर तो त्याच वेळी आणखी इतर कुठं, कसा असू शकेल? अशा पहिल्या प्रतिक्रिया येतीलही. आपण विचार करू.

आपला स्वत:बद्दलचा, इतरांबद्दलचा अनुभव, आपण थोडं आत डोकावून पाहिलं तर, आपल्याला आणखी काही सांगून जाईल. अभ्यासाच्या टेबलावर पुस्तक डोळ्यांसमोर ठेवून बसलेला विद्यार्थी, आपल्याबरोबर गप्पा मारणारी आपली मत्रीण किंवा मित्र, आपल्याशी काही व्यावसायिक बोलणं करीत असलेली समोरची व्यक्ती, कुटुंबात आपल्याबरोबर बोलणारी अगदी जवळची व्यक्ती, वक्त्यासमोर बसून व्याख्यान ऐकणारा श्रोता-अशा व्यक्ती, ज्या ठिकाणी बसल्या आहेत ‘त्या ठिकाणीच’ आहेत, शरीरीने, असं आपल्याला दिसतं खरं, पण आपण तसं खरोखर म्हणू शकू का?

HOT DEALS
  • Apple iPhone 6 32 GB Gold
    ₹ 25199 MRP ₹ 31900 -21%
    ₹3750 Cashback
  • Sony Xperia L2 32 GB (Gold)
    ₹ 14845 MRP ₹ 20990 -29%
    ₹1485 Cashback

प्रामाणिकपणे आणि थोडय़ा शोधक बुद्धीनं पाहिलं तर, विद्यार्थी पुस्तकासमोर बसलेला दिसत असला, तरी तो आहे त्या ठिकाणी असेलच असं सांगता तर येत नाहीच, अनेकदा तो त्याक्षणी मनाने तिथं नसतो. तो त्याच वेळी जिमवर, मित्रांत, मत्रिणींत, कॉलेजात, कुठल्यातरी कडू-गोड प्रसंगांत – कुठंही असू शकतो. अनेकदा असतोही. समोर बसलेली मत्रीण – मित्र आपल्या समोरच आहे, आपण एखाद्या विषयावर बोलतोही आहे, पण त्याच वेळी तो किंवा ती आपल्या ऑफिसमध्ये घडलेल्या एखाद्या महत्त्वाच्या घटनेच्या आठवणींत मनानं वावरत असते. कुणी उद्या घडायच्या प्रसंगात पोहोचलेली असते.

व्यावसायिक गप्पा सुरू असतात. माणूस समोर असतो. विषय व्यवसायाचा असतो. काही नियोजन असतं, काही देवघेव असते, काही तांत्रिक मुद्दे असतात, पर्याय काढले जात असतात, दोन्ही माणसं तशी समोरासमोर असतात. हे सारं चालू असतं, ती समोर आहेत हे दिसत असतं तरी, तसंच असेल, असं म्हणता येईल का? कारण समोरासमोर असतानाच, एकजण सकाळी घरातून निघताना झालेल्या भांडणांच्या, घरी पोचल्यावर होऊ घातलेल्या उत्तरार्धात पोचलेला असतो. त्यातला त्रागा, त्रास, संभाव्य मतभेद – हे सारं तो, हेच समोरचं संभाषण चालू असताना अनुभवीत असतो. तर त्याच्यासमोर बसलेला, चर्चा करणारा दुसरा, त्याच वेळी ही व्यावसायिक चर्चा संपल्यानंतर होणाऱ्या कुठल्यातरी हॉटेलमधल्या पार्टीतल्या वातावरणात पोचलेला असतो. आज तिथं कोणकोण येईल, कोणता मेनू असेल – यांत तो वावरत असतो!

तेच कुटुंबातल्या, आपल्या समोर बसलेल्या खासगी – कौटुंबिक विषय बोलणाऱ्या व्यक्तीचंही असू शकतं. अनेकदा तर, घरातल्याला काही विषय महत्त्वाचा वाटतो आहे, बोलायचा आहे, म्हणून तो त्या संभाषणात सहभागी असतो, समोर बसलेला असतो. पण त्याच वेळी, त्याच्याहीपेक्षा महत्त्वाच्या वाटणाऱ्या त्याच्या ऑफिसमधल्या घटनांत, मित्रमंडळीतल्या चर्चेत किंवा काही व्यक्तिगत काळजीच्या विषयांत तो कधीच पोचलेला असतो, वावरत असतो. हे असं आपलंच काय, असंख्य लोकांचं वेळोवेळी सुरूच असतं.

याचा विचार केला तर, मग आपल्याला आपण आहोत तिथंच राहतो का, अशा तऱ्हेचा प्रश्न फारसा निर्थक वाटणार नाही. कारण इतरांचे अनुभव तर आपल्याला असे अनेकदा आढळून येतीलच. पण आपले स्वत:चे अनेक अनुभवही आपल्याला हे जाणवून देतील. आपण स्वत:सुद्धा एखादं व्याख्यान ऐकायला बसलेले असू, किंवा प्रवचन ऐकत असू, त्यात काही विषय, उदाहरण आपल्यासमोर येत असेल, त्याच्या निमित्तानंसुद्धा आपल्या आयुष्यातल्या कुठंतरी घडलेल्या प्रसंगात आपण मनानं कधीच पोचलेले असू. त्याची थोडी आठवण शक्य आहे, स्वाभाविक आहे. तरीही ते उदाहरण आणि कधी येऊन गेलेला प्रसंग याची सांगड दाखवून ते क्षणार्धात संपायला हवं, तसं मात्र होतच नाही. आपण आहोत तर बसल्या जागी वक्त्याच्या, प्रवचनकाराच्या समोर! पण एकदा त्या उदाहरणानं कुठल्यातरी प्रसंगात पोचलेले आपण मात्र वावरत असतो ते तिथं घरी, जिथं कुठं ते घडलं असेल त्या गावीही. आश्चर्य हे की, मुळात एका क्षणाचं हे काम! पण एकदा तिकडं पोचण्यात गेलं की किती काळ आपण त्या त्या ठिकाणी वावरत राहू, हे सांगता येत नाही. कधी पाच पाच दहा दहा मिनिटं जातात आणि मग दहा मिनिटांनंतर ऐकलेल्या एखाद्या वाक्यावर श्रोते हसतात, त्या मोठय़ा आवाजानं एकदम आपण जिथं खरे बसलो आहोत, तिथं पुन्हा दचकून परत येतो. मधल्या पंधरा मिनिटांत काय झालं, हे समोर असूनही ऐकू आलेलं नसतं, समजलेलं नसतं, सांगता येत नाही. मग ‘आपण आहोत तिथंच राहू शकू का?’ हा प्रश्न नुसता निर्थक नसून तो खरा आहे. विचार करण्यासारखा आहे, हे पटतं.

तो विचार केला तर लक्षात येईल की, माणसाच्याच अस्तित्वाला दोन अंगं आहेत. तो शरीरानं तर वावरत असतोच, पण तो मनानंही वावरत असतो. अनेकदा तर त्याच्या या शारीरिक अस्तित्वापेक्षा, वावरण्यापेक्षा मनाच्या अस्तित्वाला – त्याच्या वावरण्याला अधिक महत्त्व असतं. कारण पुस्तकासमोर बसलेला विद्यार्थी नुसता शरीरानं समोर असण्यापेक्षा मनानंही तो समोरच्या पुस्तकातल्या त्या पानावरच्या विषयात वावरत असेल, राहात असेल, तर त्याला तो तो विषय तर समजेलच, पण त्यातली त्याची गुणवत्ता वाढेल, यश नक्की अधिक येईल. किंबहुना त्या अभ्यासाचा वाटणारा कंटाळा जाऊन त्याऐवजी त्याला अभ्यासाचा आनंदही मिळेल.

इथं एक लक्षात घ्यावं की, झालेल्या घटनांची स्मृती असणं, पुढं करायच्या कामांची आठवण असणं – हे उपयोगी आहे, आवश्यकही आहे. पण ते त्याची वेळ होईल तेव्हाच! आत्ता बसलो आहे त्या कामात शरीरही असेल आणि मनही असेल तर त्या कामाचा प्रवास, हा गुणवत्तेनं आणि दर्जानं परिपूर्ण होतो. त्यात त्याक्षणी संबंधित नसलेल्या गोष्टींची स्मृती ही आवश्यकही नाही, उपयोगीही नाही. उलट अडथळा आणणारी आहे, चाललेल्या कामाची गुणवत्ता कमी करणारी आहे, याची कल्पना नसल्यानं विद्यार्थ्यांनी केलेला असो किंवा शिक्षक किंवा आईवडील अशा इतर कुणी घेतलेला असो तासन्तासाचा अभ्यास आकलनही वाढवीत नाही आणि अपेक्षित गुणही वाढवीत नाही. उलट इतकं करून काही उपयोग झाला नाही, अशी नराश्याची भावना मात्र विद्यार्थ्यांत आणि असा अभ्यास करून घेणाऱ्यांत निर्माण करते आणि प्रगतीची गाडी अडखळायला लागते. अनेकांची आयुष्यातली ध्येयाची वाटचालही विस्कळीत होऊन जाते.

जे या एका उदाहरणानं पाहिलं तेच इतर उदाहरणांच्या बाबतीत घडत असतं, हे कृपया लक्षात घ्यावं. मग त्या मित्रमत्रिणींतल्या गप्पा असोत, कामाचं नियोजन असो, व्यावसायिक बोलणी असोत की कुटुंबांतले खासगी विषय असोत. त्यातही अपयश, असमाधान, आपण दुर्लक्षित होत असल्याची, एकाकी पडत असल्याची भावना – अशा अनेक प्रकारे ते आपल्याला त्रास देत असतं. दुसरं हेही असतं की, तशी कुठलीच गोष्ट विशिष्ट शक्ती वापरल्याशिवाय घडत नाही. मन ज्या वेळेला शरीर आहे तिथून दुसरीकडे जातं, विचार करतं, वावरतं, त्यावर जाणारी शक्ती हा अपव्ययच असतो. तिसरं नुकसान असं की, यामुळं आहोत तिथलंही काम नीट घडत नाही आणि जिथं मनानं वावरतो तिथलंही. कारण तिथं तर त्या वेळी काम नसतंही आणि करायचंही नसतं! चौथं, हे ठाऊक नसलेल्या किंवा येत नसलेल्या माणसांकडून कामांचा उरक होत नाही. आयुष्यातली अनेक महत्त्वाची कामं करायची राहून जातात!

अशी अनेक नुकसानं कळली तरी टाळता येतील. काम कुठलंही असो, कितीही वेळाचं असो, एकदा ते हातात घेतल्यानंतर शरीरानं आणि मनानं त्यातच शंभर टक्के राहणं हा मनुष्यजीवनातला एक विधायक अभ्यास आहे. त्याचा परिचय घडावा, तसं करता यावं आणि त्याअर्थानं मनुष्य म्हणून आपलं जीवन सार्थकी लागावं!

सुहास पेठे drsspethe@gmail.com

First Published on August 26, 2017 3:14 am

Web Title: suhaas pethe article on human life
टॅग Human Life