सोबतीचा अभाव माणसाच्या आयुष्याच्या आनंदी प्रवासात अडथळा आणतो,  असं अनेकदा जाणवत असलं, तरी सोबतीचं खरं स्वरूप काय आणि खरी सोबत कोणती – याचा विचारही अनेकदा होत नाही. या सोबतींना आपल्या अपेक्षा, गरजा, अनुकूलता – अशा गोष्टींच्या मर्यादा आहेत. जगण्याच्या धावपळीत खऱ्या सोबतीची ओळख घडणं राहून जातं. खरी सोबत कशावर अवलंबून नसलेली आणि आंतरिक असते. सोबतीच्या या स्वरूपांची आणि मर्यादांची कल्पना नसली, तर दु:ख अटळ असतं.

सकाळची गडबडीची वेळ. मुलीच्या घरी माहेरून आईचा फोन येतो. धावपळ एवढी असते की, केवळ आईचाच आहे म्हणून तो फोन घेतला जातो. काही घडणं, आजारी पडणं – असं अचानक काही असलं तर फोन घेतलेला बरा, अशा शंकेनं फोन उचलला जातो. इथं स्वयंपाकाचा कट्टा, गॅसवर ठेवलेल्या वस्तू, मुलांची दप्तरं भरणं, आपली ऑफिसची वेळ सांभाळण्याचं व्यवधान – असल्या गडबडीत फिरतफिरत संभाषण होतं. लक्षात येतं, तसं काही घडलेलं नसतं; पण आठवण आली, बोलायला कुणी नाही, एकाकी वाटतं – अशा नेहमीच्याच कारणानं फोन केलेला असतो.

तेवढय़ा गडबडीतही मुलगी ते समजावून सांगत असते. अनेक गोष्टी सांगूनही शेवटी, तशी कुणाची खरी सोबत नाही, यावर आईचा आवाज जड होतो. पुढं बोलवत नाही. फोन बाबांकडं दिला जातो. तेही त्याच भावनेत असतात. मुलीला घडय़ाळ दिसत असतं. अखेर नाइलाजानं, आत्ता मला वेळ नाही. रात्री आल्यावर निवांत फोन करीन, असं सांगावं लागतं. इकडं आईवडिलांना वाटतं, तिला फोन घ्यायलाही सवड नाही. एकीकडं तिची बाजू समजते; पण आपल्याला सोबत नाही, अशी खंत काही मनातून जात नाही!

एखादा दिवस ढगाळ वातावरणात, कोंदटलेल्या हवेत उजाडावा आणि संपावा अशा अवस्थेत अकारणच खिन्न, एकाकी वाटत दिवस जावा, तसे अशा अनेकांचे दिवस सोबतीच्या अभावी जातात. या आईवडिलांना मुलगा आहे, मुलगी आहे. मुलगी त्याच महानगरात असली तरी दूरवरच्या उपनगरात राहते. आईवडिलांना प्रत्यक्ष भेटणं तिला कठीण असतं. आपल्या आयुष्याची सारी कमाई मुलाच्या उच्च शिक्षणासाठी रिकामी करून आईवडील मोकळे झालेले असतात; पण मुलाची बुद्धिमत्ता, यश, त्यामुळं मिळत गेलेल्या संधी त्याला अखेर परदेशात घेऊन जातात. पहिल्यांदा तो इथं येणार, मग त्याची, सुनेची, नातवंडांची सोबत होणार – या कल्पनांनी पूर्वीच घेऊन ठेवलेल्या मोठय़ा घरातल्या दोन-दोन खोल्या आता वर्षांनुर्वष रिकाम्याच राहतात. हळूहळू वर्षांतून येणारा मुलगा, आता दोन वर्षांतून येतो, सुनेला, नातवंडांना आणीत नाही. त्यांनाही त्यामुळं यांचं प्रेम लागत नाही. नंतर कधी तरी ओघात कळतं, की त्याचा तिकडंच स्थायिक व्हायचा विचार आहे. कर्तृत्वानं मिळवलेल्या पशाची आधीची ऊब-सोबत तर कधीच कमी झालेली असते. त्याची खंत मध्ये मध्ये मनात येत असते. रिकाम्या खोल्या सोबत देत नाहीत. तेव्हा एवढं मोठं घर मोकळं करून छोटय़ा फ्लॅटमध्ये जावं, असा विचार मनात येतो. मधल्या काळात महागाई, बाजारभाव एवढे वर गेलेले असतात, की ते विकून त्यात दोन खोल्यासुद्धा येणं अवघड दिसतं. वनआरके एवढंच शक्य दिसतं. मुलाचा अंदाज घ्यावा म्हणून त्याच्या कानावर घातलं, तर तो तिकडं अमाप पसा मिळवीत असून मदतीची भाषा करीत नाही. तर उलट, त्याच किमतीत येईल असं बघा, असा सल्ला देतो!

त्यावरून जवळ राहून नाहीच, पण लांबूनसुद्धा त्याची सोबत होणार नाही, हे अवघड सत्य हळूहळू पचवावं लागतं. मुलीच्या परीनं तिचं बरोबर, तसं मुलाच्या परीनं त्याचंही बरोबर आहे, हेही कळतं; पण त्यामुळं सोबतीच्या अभावी एकाकीपण अधिकच जाणवायला लागतं.

हा प्रश्न अशा उतरत्या वयात येतो, असं नाही. ऐन उमेदीत आपल्याबरोबर जोडीदार, मित्र, मत्रिणी, वेगवेगळे ग्रुप असं सारं असतानाही, अखेर एखाद्या क्षणी जो तो आपल्या वाटेनं जाणार आहे, याची एकदम वीज चमकून जावी, तशी जाणीव होत असते. ती वस्तुस्थिती अटळ असते; पण सोबतीची उणीव मात्र मनात जागी राहात असते. अनेक मुद्दय़ांवर एखाद्या संघटनेत, प्रसंगात एकत्र आलेली माणसंसुद्धा एका मर्यादेपर्यंत सहमत होतात, बरोबर काम करतात; पण पुढं ही सोबतीची वाटचाल अशीच राहणार नाही, याची जाणीव देणारे प्रसंग घडतात. कुणी आडून, कुणी उघड मतभेद व्यक्त करतात, सोबत सोडून जातात. तरुणपणी, प्रौढपणीसुद्धा सोबत नसण्याचा प्रश्न असतोच! आपण एकाकी आहोत, ही भावना माणसाला अस्वस्थ करते. त्याचा जगण्यातला आनंद झाकोळून टाकते. काही व्यक्तींची अवस्था तर चालण्याचं बळ असेपर्यंत ‘एकला चलो रे’ अशी होते. नंतर ते बळही संपतं. मग, पाऊस कोसळत असताना, पूर्ण भिजून, कुठल्या तरी निष्पर्ण झाडाच्या आसऱ्यानं कुडकुडत राहाणाऱ्या माणसासारखी अवस्था होते. ना पावसावर राग धरता येत, ना लोकांवर, ना न मिळालेल्या सोबतीवर!

मोठमोठी करय करून यशस्वी झालेल्या, नावाजलेल्या माणसांतसुद्धा, आत हा सोबतीचा कोपरा रिकामाच असतो, अस्वस्थ करीत असतो. सामान्य माणसांची अवस्था यापेक्षा वेगळी नसते. इतर मोठय़ा माणसांना निदान पसा, मान, प्रतिष्ठा, घरंदारं, इस्टेटी, स्थावर – अशा गोष्टींची तरी अनुकूलता असते. सामान्य, मध्यमवर्गीयांना तीही नसते. त्यामुळं अशा मोठय़ांच्याकडं बघून सामान्यांना अधिकच एकाकी वाटतं. तिथंही खरं तर हे लक्षात घेण्याची गरज असते, की अशा अनुकूलता म्हणजे सोबत नसते. अनेक अनुकूलता असल्या तर सोबत नसल्याचं दु:ख अधिकच असतं; पण याचा अनुभव त्यांनाच असतो. राजाची दु:खं राजाला माहीत असतात.

असा सोबतीचा अभाव माणसाच्या आयुष्याच्या आनंदी प्रवासात अडथळा आणतो, दु:खाच्या लाटा निर्माण करतो, असं अनेकदा जाणवत असलं, तरी सोबतीचं खरं स्वरूप काय आणि खरी सोबत कोणती – याचा विचारही अनेकदा होत नाही. म्हणून सोबतीचं स्वरूप थोडं समजून घेऊ.

पहिल्या पातळीवरची सोबत ही माणसाची एक प्राथमिक गरज असते. जसं एखाद्या लहान मुलाला दूध, पाणी, उभं राहण्यासाठी आधार या गरजांपोटी आईवडिलांची सोबत लागते. ती समजून येण्यासारखी आहे, कारण मूल मोठं झालं की, हळूहळू या गरजा कमी होतात आणि त्या अर्थानं आईवडिलांच्या सोबतीची गरजही कमी होत जाते. याला पुढं दोन्ही रस्ते फुटतात. मोठय़ांकडून मुलाला लागणाऱ्या सोबतीची गरज संपली, तरी मोठय़ांनाच मुलांच्या सोबतीची सवय लागते. ती सवय वेळीच लक्षात आली नाही, तर आता मुलांना सोबतीची गरज नाही, हे पचवणं अवघड होतं. वास्तविक, मुलं मोठी होणं, ही आनंदाची गोष्ट असली, तरी दुसऱ्या बाजूला नकळत, आपली त्यांना गरज उरली नाही, असं दु:ख निर्माण होतं. तितकंच, मोठय़ा होत जाणाऱ्या मुलांना मोठय़ांच्या सोबतीची गरज आता उरली नसली, तरी मित्र, मत्रिणी, मार्गदर्शक यांच्या सोबतीची गरज असते. हे लक्षात आलं नसलं, तर आपण आता स्वावलंबी झालो, आपल्याला सोबतीची गरज उरली नाही, अशा भ्रमात राहायला होतं. सोबतीची माणसं बदलली, तरी सोबतीची गरज कायम राहाते, हे लक्षात येत नाही. मग कुठं तरी उमेदीच्या काळातसुद्धा अचानक यातल्या कोणी सोबतसंगत सोडली की, दु:ख निर्माण होतं.

गरजा असोत, माणसांतल्या उणिवा असोत, त्याला जगाचं वाटणारं भय असो किंवा जगाकडून मिळणाऱ्या आधारांची त्याला गरज असो – त्या त्या टप्प्यावर त्या सोबतींशिवाय माणूस राहू शकत नाही. हे जितकं खरं, तितकंच त्या त्या सोबतींना अनेक प्रकारच्या मर्यादा असतात. हे सारं वेळेतच समजून आलं, तर कधी सोबत करणाऱ्या आणि कधी सोबत सोडून जाणाऱ्या व्यक्तींमुळं दु:ख निर्माण होत नाही. मग सोबती असल्या आणि नसल्या तरी माणसाला समजूतदारपणे, आनंदानं आयुष्याचा प्रवास सुरू ठेवता येतो.

सोबतींचं स्वरूप असं कुठल्या माणसांच्या सोबतीपुरतं मर्यादित नसतं. अनेकांच्या बाबतीत, त्यांच्या आवडीच्या गोष्टी, कला, छंद – अशा गोष्टींचीही त्यांना सोबत वाटत असते. त्यांना वाटतं की, ते ते छंद जोपासले, त्या त्या कलेमध्ये असलो, म्हणजे मला इतर सोबतींची गरज नाही. ते त्या अनुकूलता असेपर्यंत खरं असतं, हे अनेकदा लक्षात घेतलं जात नाही. वास्तविक माणसांच्या काय, कलाछंदांच्या काय – सोबतींनासुद्धा एक मर्यादा आहे. गायकाला गाण्याची सोबत असली, तरी आवाज बसत नाही तोपर्यंत किंवा वयानुसार आवाज साथ देईनासा होईपर्यंत! नुसत्या श्रवणाचा छंद जोपासून त्या सोबतीनं आपण आयुष्यभर आनंदात राहू, अशा समजुतीत असणाऱ्यालासुद्धा त्याचे कान ऐकायला साथ देतात, तोपर्यंत! गळा अंतरला, कान अंतरले, भ्रमंतीची आवड असलेल्यांचे पाय थकले, डोळे थकले, पसा आटला – म्हणजे या सोबतींना मर्यादा येतात. त्या वेळी सोबतीच्या या स्वरूपांची आणि मर्यादांची कल्पना नसली, तर दु:ख अटळ असतं. तेच सोबतींचं स्वरूप नीट आणि वेळेत समजून घेतलेलं असलं, तर मात्र आनंदाला बाधा येत नाही. त्या साऱ्या गोष्टी निसर्गक्रम म्हणून स्वीकारल्या जातात.

आपल्या एक लक्षात येईल, की या साऱ्या सोबतींना आपल्या अपेक्षा, गरजा, अनुकूलता – अशा गोष्टींच्या मर्यादा आहेत. जगण्याच्या धावपळीत खऱ्या सोबतीची ओळख घडणं राहून जातं. खरी सोबत कशावर अवलंबून नसलेली आणि आंतरिक असते. सश्रद्ध माणसांना त्यांच्या श्रद्धास्थानांची सोबत असते; पण तीही आंतरिक असली तर शेवटपर्यंत साथ देते. खरं तर सर्वाना एक सोबत शाश्वत असते. थोडय़ा शांतचित्तानं पाच-दहा मिनिटं विचार केला, तरी ती लक्षात येणारी आहे. ती म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंत अखंड चाललेल्या श्वासाची. ती निश्चित, निरंतर आणि सदैव असणारी खरी सोबत आहे. माणसं येतील-जातील, श्रवण-भ्रमण-दर्शन असं काहीही चालू राहील-बंद पडेल, पण श्वासाची सोबत त्या अर्थानं आजीवन आहे, कारण आपण असताना ती सदैव असते आणि ती नसली तर आपण नसतोच!

ही खरी सोबत जाणली, लाभली तर सोबतीचा आनंदही आजन्म लाभेल!

सुहास पेठे drsspethe@gmail.com