‘झूठकी मलाईसे सचकी सुखी रोटी अच्छी’ हा संदेश एका सिनेमात भ्रष्टाचाराविरुद्ध लढणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याने दिलेला मी ऐकला. वेगवेगळ्या क्षेत्रातील अधिकारी जनतेची कामं करताना पैशांची मागणी करतात. अज्ञानी लोकांना किंवा वेळेचा अपव्यय टाळण्याकरिता काही जणांना ही मागणी पूर्ण करून काम करून घ्यावे लागते. ‘पैसे देणार नाही’ असं सांगणारा पण एखादा भेटतो. त्याचं काम अडकवलं जातं. ज्या कामाचे पैसे पगाराच्या रूपात मिळतात त्याच कामाचे पैसे परत वसूल करणं म्हणजे झूठकी मलाईच ना? केव्हा ना केव्हा हे पकडले जातातच, मग खऱ्या कमाईचं महत्त्व त्यांना पटतं. मग या मलाईपासून दूरच राहिलेलं बरं! शांत झोप नक्कीच लागेल.
अशीच एकदा सावंत वकिलांची झोप उडाली होती. खरं तर पंचवीस-तीस वर्षे त्यांनी गावात प्रामाणिकपणे वकिली केली. जवळपासच्या गावातून येणाऱ्यांच्या केसेससुद्धा ते केसचा व्यवस्थित अभ्यास करून जिंकत असत. काय झालं कोणास ठाऊक, पण आता निवृत्तीचे दिवस जवळ असताना, साठी बुद्धी नाठी झाली. झूठकी मलाईचा मोह पडला. भरपूर पैशांच्या आमिषाने एका स्मलगरचा गुन्हा ‘खोटा’ म्हणून सिद्ध केला. गावात आणि न्यायाधीशांनासुद्धा आश्चर्य वाटलं. गुन्हेगार सुटला. न्यायाधीश महाराजांनी निर्णय देताना ‘केस रिओपन होऊ शकते’ असा शेरा दिला. वकीलसाहेब आधी खूश होते. पण चारच दिवसांत त्यांचं प्रामाणिक मन बंड करून उठलं. अपराधी भावनेने जेवण जाईना, झोप येईना. साध्या, सरळ आयुष्याला सुरुंगच लागला. पंचवीस वर्षे खपून जे कमावलं ते पंचवीस दिवसांत गमावलं ही टोचणी लागली. न्यायाधीशांच्या घरी जाऊन त्यांनी त्यांचे पायच धरले. सावंतांना पश्चाताप होणार हे न्यायाधीशांना माहीत होतं. केस रिओपन झाली. गुन्हेगाराला शिक्षा झाली. ‘झूठकी मलाई’ गावातील मुलींच्या शाळेला देऊन थोडं मानसिक समाधान त्यांनी मिळवलं.
ही कथा आहे एका टूर्स नेणाऱ्या कंपनीची. ते जास्तीत जास्त पन्नास माणसांची सोय ते आठ दिवसांकरिता करू शकत. टूर्स छोटय़ा असल्यामुळे सुरुवातीला चांगली सव्‍‌र्हिस त्यांनी दिली. थोडय़ाच दिवसांत पर्यटनस्थळांच्या हॉटेल मालकांशी ओळखी झाल्या. स्थळांची माहिती देणाऱ्या गाइड्सबरोबर मैत्री झाली. दुकानदारांशी करार झाले. सगळीकडून कमिशन म्हणजे दलाली मिळू लागली. यांनी त्यांच्याच सेवा घेतल्या. त्याचा नकरात्मक परिणाम झाला. आपोआपच व्यवसाय कमी झाला. सोमनाथराव आणि त्यांचा भाऊ माधव हा व्यवसाय सांभाळत. त्यांच्या मुलांच्या लक्षात ही गोष्ट आली. व्यवसाय वाढविण्याकरिता त्यांनी नुकसान सोसण्याचा निर्णय घेतला. खराब झालेलं नाव मूळ पदावर आणण्यासाठी भरपूर सूट द्यायला सुरुवात केली. मेळावे भरवून लोकांचा विश्वास संपादन करू लागले. त्यांच्याकडे जिद्द होती, तरुण रक्त कष्ट करायला तयार होतं. मॅनेजमेंट शिकलेली ही पिढी. कर्ज काढून नवीन बस घेतल्या. खोटा धंदा करत नाही हे लोकांना पटवून दिलं. त्यांनी हिशोब केला, आपले बाबा खोटं वागून एका टूरमधून आठवडय़ाला दहा हजार कमावत होते. आपण खरं वागून चार टूर्स काढल्या आणि एका टूरमधून पाच हजारांची कमाई केली तरी फायद्यात राहू. असे केल्याने प्रसिद्धी, नाव, फायदा सगळंच परत मिळालं. झूठकी मलाई खाऊन व्यवसायाचं बिघडलेलं आरोग्य सचकी कमाईने परत मिळवून दिलं.

गीता ग्रामोपाध्ये
geetagramopadhye@yahoo.com