22 November 2019

News Flash

अनुभव आणि ज्ञान

‘अनुभव म्हणजे ज्ञान’ ही आपल्या सर्वाची गैरसमजूत आहे

‘अनुभव म्हणजे ज्ञान’ ही आपल्या सर्वाची गैरसमजूत आहे. त्या दोन भिन्न गोष्टी आहेत, तरी त्यांचा मेळ घालून काही काम केलं तर चांगले परिणाम मिळतात. मोठी माणसं नेहमी म्हणतात, ‘‘उन्हात फिरून माझे केस पांढरे नाही झाले’’ किंवा ‘‘खूप पावसाळे पाहिले आहेत मी’’ याचा अर्थ त्यांच्याकडे अनुभवाची शिदोरी भरपूर आहे. पण ज्ञान असेलच याची खात्री नाही.

एका अतिसामान्य बोहारणीच्या मुलीची ही गोष्ट आहे. हिची आई लोकांचे जुने कपडे गोळा करून त्यातील चांगल्या कपडय़ांची छान रंगसंगती साधून गोधडय़ा शिवून विकायची. लहानपणी ती आईला त्यात मदत करायची. जशी मोठी होत गेली तिला वेगवेगळ्या कल्पना सुचू लागल्या. दुकानात विकायला ठेवलेल्या ‘क्विल्ट्स’ म्हणजेच गोधडय़ा फारच सुंदर असतात असं तिच्या लक्षात आलं. ‘‘मी गरीब आहे, मी हे कुठे शिकणार? कोण शिकवणार मला?’’ या विचाराने ती दु:खी झाली. पण धाडस करून एका दुकानात स्वत: शिवलेली गोधडी घेऊन गेलीच. हिच्या हातात कला आहे हे मालकाच्या लक्षात आलं. तिच्या विनंतीवरून तिला प्रशिक्षण द्यायला ते तयार झाले. तीन महिन्यात तिने त्यातील परिपूर्ण ज्ञान प्राप्त केले. तिथेच काम करून थोडे पैसे जमविले. हप्त्यावर मशीन घेतलं. सुंदर पॅचवर्क, छान आकार लावून टेबल क्लॉथ, सोफा कवर्स अशा वस्तू करू लागली. चांगले पैसे मिळू लागले. लहानपणीच्या अनुभवांना मोठेपणी मिळवलेल्या ज्ञानाची जोड मिळाली आणि तिचं, तिच्या आईचं आयुष्य बदलून गेलं.

राघवजी उत्तम प्रवचनकार आहेत. वर्तमानातील राजकारण, समाजकारण, अर्थकारण यांचे दाखले देत ते पौराणिक गोष्टी सांगतात. खूप विषयांचा अभ्यास त्यांनी केला आहे. व्यवस्थापक मोरोपंतांच्या बरोबर ते व्याख्यानांचे दौरे करतात. बरीच वर्षे व्याख्याने ऐकून मोरोपंताना ती पाठ झाली होती. ते एका संस्थेत येत होते तेव्हा प्रवासात पंतांच्या लक्षात आलं आज राघवजी फारच थकलेले दिसताहेत, व्याख्यान देणं त्यांना त्रासदायक होईल. म्हणून राघवजींच्या संमतीने स्वत:च व्याख्यान देण्याचं ठरवलं. ‘‘आपण दमलेले आहात, आज व्याख्यान मी देतो,’’ असं ते राघवजींना म्हणाले. त्यांचा दांडगा आत्मविश्वास पाहून राघवजी हो म्हणाले. मोरोपंतांनी सुंदर व्याख्यान दिलं. श्रोत्यांच्या शंका, प्रश्नांची यादी त्यांच्या हातात आली, आता ते गडबडले. कारण विषयाचे ज्ञान नव्हते. पण बुद्धीचातुर्य होते. ते म्हणाले, ‘‘फार सोपे आहेत तुमचे प्रश्न, माझा व्यवस्थापक त्या प्रश्नांची उत्तरे देईल.’’ राघवजी मंचावर आले, हात जोडून त्यांनी श्रोत्यांची क्षमा मागितली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे असे करावे लागले हे पण सांगितले. ज्यांनी पूर्वी राघवजींचे व्याख्यान ऐकले होते ते म्हणाले, ‘‘आम्हाला काही फरक जाणवला नाही, फक्त चेहरा वेगळा कसा?’’ असा प्रश्न क्षणभरच पडला. पंतांना अनुभव खूप होता, म्हणून ‘प्रेझेंटेशन’ छान झालं. ज्ञानाअभावी थोडी कुचंबणा झाली. शाळा, महाविद्यालयांतील प्रयोगशाळेतील लॅब असिस्टंटची हीच परिस्थिती असते. प्रयोगासाठीचे साहित्य, प्रयोग कसा करायचा, उत्तर काय हे अनुभवाने माहीत असते, पण ते तसे का याची कारणमीमांसा विषयाचे ज्ञान नसल्याने माहीत नसते.

– गीता ग्रामोपाध्ये
geetagramopadhye@yahoo.com

First Published on June 11, 2016 1:03 am

Web Title: experience and knowledge
Just Now!
X