मनुष्याचं मन, त्याचं मस्तक एखाद्या रोगट जखमेसारखं बनलंय. ते केंद्र निरोगी, स्वस्थ नाही. एखाद्या अस्वस्थ फोडासारखं झालंय ते आणि म्हणून आपलं सारं लक्ष मस्तकाभोवती फिरत राहतं. शरीराचा जो अवयव आजारी पडतो त्याच्याभोवती आपलं लक्ष घोटाळत राहतं, हे कदाचित तुमच्या लक्षात आलं नसेल. आपला पाय दुखायला लागला म्हणजे आपल्या पायाकडे आपलं लक्ष जातं. जोवर पाय दुखत नाही तोपर्यंत पायाकडे आपलं लक्षही नसतं. हातावर फोड आला की त्याकडे लक्ष जातं. फोड आला नाही तर हाताकडेही लक्ष जात नाही. आपल्या डोक्याला खात्रीनं कोणत्या ना कोणत्या प्रकारचा आजार झाला आहे. कारण चोवीस तास आपलं लक्ष फक्त आपल्या मस्तकाकडेच लागलेलं असतं, दुसऱ्या कशाकडेही लक्ष मुळी नसतच.
शरीर जितकं स्वस्थ असेल तितकं आपलं लक्ष त्याकडे जाणार नाही. अवयवात अस्वस्थता निर्माण झाली म्हणजे आपलं लक्ष त्याकडे जातं. आपल्या शरीरामध्ये मस्तकाकडेच आपलं लक्ष जातं, त्याच्याभोवती आपली चेतना फिरत राहते. खात्रीनं तिथं काही तरी रोगट जखम झाली आहे. त्या रोगट जखमेतून सुटका झाल्याशिवाय कोणतीही व्यक्ती जीवनाच्या केंद्रापर्यंत प्रगती करू शकणार नाही. मस्तकाच्या या स्थितीबद्दल आपण विचार करू.

पहिली गोष्ट म्हणजे मस्तकाची स्थिती काय आहे, ते नीट समजावून घ्या. दहा मिनिटांपर्यंत तुम्ही एकांतात बसलात आणि तुमच्या मनामध्ये जे-जे विचार येतात ते एका कागदावर प्रामाणिकपणे उतरवलेत तर अगदी जवळच्या मित्रालाही तो कागद दाखवायला तुम्ही तयार होणार नाही. कारण तुम्हाला आढळून येईल की, त्या कागदावरचे विचार इतके वेडगळ असतील की अशा विचारांची तुमच्याकडून कुणी अपेक्षाही केली नसेल. तुम्ही स्वत:सुद्धा स्वत:कडून अशी अपेक्षा केली नसेल! ते विचार इतके विसंगत, इतके व्यर्थ, एकमेकांशी इतके असंबद्ध असतील की तुम्ही वेडे तर झाला नाहीत ना असंच तुम्हाला भासेल!
तुम्हाला स्वतलाच आश्चर्य वाटेल की, माझ्या मनामध्ये हे काय चाललंय? मी स्वस्थ आहे की विक्षिप्त आहे. पण दहा मिनिटंसुद्धा आपण कधी मनामध्ये तिथं काय चाललंय हे पाहात नाही. हे अगदी अशक्य आहे की, त्या तिथे आत खोल कुठे तरी काय चाललंय हे आपल्याला ठाऊक आहे. म्हणून आपण तिथे डोकावून पाहात नाही. कदाचित आपण भयभीत होऊन जाऊ.

यासाठीच माणूस एकटेपणाला घाबरतो आणि चोवीस तास कुणा ना कुणाची सोबत शोधत राहतो. कुठं कोणी मित्र मिळेल तिथं, कुठं क्लब असेल तिथं, जिथं गर्दी असेल तिथं. कुणीच नाही मिळालं तर निदान वर्तमानपत्र तरी नाही तर रेडिओ तरी मिळेल का ते बघतो, पण एकटं कुणीही राहू इच्छित नाही. कारण एकटं पडल्यावर स्वतची जी वास्तविक अवस्था आहे तिची खरी कल्पना यायला सुरुवात होते. दुसऱ्याच्या उपस्थितीत आपण त्याच्यातच गुंतून बसतो आणि स्वत:कडे आपलं लक्ष जात नाही. दुसऱ्याचा शोध घेणं म्हणजे स्वत:पासून दूर पळण्याचा उपाय शोधणं आहे, दुसरं काही नाही. ते स्वत:पासून पळून जाणं आहे. आपण दुसऱ्या लोकांबद्दल इतके उत्सुक होतो याचं मूळ कारण आपण स्वत:ला घाबरतो हेच आहे. या स्थितीपासून स्वत:ला वाचवण्यासाठी आपण सोबत शोधतो, गर्दीला शोधतो.
(क्रमश:)
(साकेत प्रकाशनाच्या ‘ओशो अंतर्यात्रा’ या पुस्तकातून साभार)