18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

आईचे यश

मजबूत, भक्कम आणि ठाम विचार-आचार असलेल्या आईची मुले यशस्वी होतात.

गीता ग्रामोपाध्ये | Updated: December 24, 2016 12:44 AM

मजबूत, भक्कम आणि ठाम विचार-आचार असलेल्या आईची मुले यशस्वी होतात. मात्र ‘यशस्वी होणे’ म्हणजे आयुष्यात फक्त भरपूर पैसे कमावणे नव्हे. अनेक गोष्टींचा यात समावेश करावा लागेल. त्यात मुलाने योग्य वयात स्वतंत्र होणे हे ही आलेच. शाळेपासूनच लहान निर्णय त्याचे त्याने घ्यावे. कोणते विषय शिकावे, कोणत्या खेळात तो प्रावीण्य मिळवू शकतो हे त्याचे त्याने ठरवावे. आई मदतीला असतेच. आत्मविश्वासाने घेतलेला निर्णय चुकत नाही, असे सुखदाचे ठाम मत असते. तिचा मुलगा आदित्य उत्तम नेतृत्व करू शकतो, त्याला फुटबॉल खेळायला आवडतो. त्याच्या शाळेत फुटबॉल कोच चांगले प्रशिक्षण देतात हे ऐकल्यावर तिने अगदी सहज आदित्यसमोर उल्लेख केला. थोडासा विचार करून तो शाळेच्या टीममध्ये सामील झाला. त्याला सरावासाठी नेताना, वेळ काढून अभ्यास घेताना तिने कधीही तक्रार केली नाही. कायम प्रोत्साहनच दिले. आता तो कॉलेज टीमचा कॅप्टन आहे. उत्तम विद्यापीठात शिकतो आहे. मजबूत आईचे मन नाजूक असते, पण ती ते कोणाला कळू देत नाही. सारा आजारी असताना रात्रभर जागत बसलेली, बाहेर जाऊन रडून आलेली आई तिने पाहिली, पण हीच आई आपल्या येण्या-जाण्यावर, मित्र-मैत्रिणींवर, फोन कॉल्सवर बारीक नजर ठेवून असते, अपेक्षेपेक्षा कमी गुण आले तर कठोर निर्णय घेते, स्वत: सकाळी लवकर उठून अभ्यास करून घेते हेही तिला ठाऊक होते. ‘मला हे जमणार नाही’ हे ऐकायला तिला आवडत नाही. प्रयत्न केलाच पाहिजे, हे तिचे म्हणणे साराला अवघड वाटणारी बरीच कामे शिकवून गेले. आपल्या मुलांच्या अंगचे गुण ओळखून ते कसे वाढवावे, त्यांचा उपयोग कसा करावा आणि दोष दूर करावेत हे ती आईकडून शिकली.

एकत्र कुटुंबात राहताना आईच्या मतांना कधी कधी किंमत दिली जात नाही. त्या वेळी आपण खरोखरी मुलाच्या फायद्याचा निर्णय घेतोय हे पटवून देण्याची हिंमत, तयारी वनिताच्या अंगी होती. जिद्द, चिकाटीने केलेले कोणतेही काम यशाची पहिली पायरी असते हे तिचे पक्के मत होते. पाचवीनंतर मिलिटरी शाळेत तेही दुसऱ्या शहरात अंकितला पाठविण्याचा तिचा निर्णय कोणालाच आवडला नव्हता. अंकितला स्वत:लाच व्यायाम, बळकट शरीर, धाडसी कामे या गोष्टी आवडत. मनात काहीही किंतु न बाळगता वनिताने त्याला पाठविले. तेवढय़ाच आनंदाने उत्साहाने अंकित गेला. तेथील शिस्त, कणखरपणा, सुनियोजित कामे करण्याची पद्धत या सगळ्या गोष्टी त्याच्या अंगी आपोआप बाणल्या. वनिताची वागणूक वेगळी, थोडी कठोर पण विचारपूर्वक केलेली ठाम वागणूक होती. या वागणुकीचा फायदा अंकितला आयुष्यात आवडीच्या गोष्टी करून यश, समाधान मिळवून देण्यात झाला. ऑल टेरेन व्हेइकल कोर्स घेताना आईकडून मिळालेल्या कणखर मते, करून दाखविण्याची जिद्द, चिकाटी या वारशांचा उपयोग झाला. सर्व प्रकारची वाहने चालवायला शिकविणारा उत्तम प्रशिक्षक अशी आज त्याची ख्याती आहे.

 

गीता ग्रामोपाध्ये

geetagramopadhye@yahoo.com

First Published on December 24, 2016 12:44 am

Web Title: geeta gramopadhye success stories