News Flash

नकारात्मकता शोषून घेतो तेव्हा..

आपण जर बाहेरची नकारात्मकता आपल्यामध्ये शोषून घेतली आणि तिला बाहेर पडायला मार्ग दिला नाही

आपण जर बाहेरची नकारात्मकता आपल्यामध्ये शोषून घेतली आणि तिला बाहेर पडायला मार्ग दिला नाही तर ती आपल्या शरीरात साठून राहील. आपण कितीही प्रेमळ आणि सुस्वभावी असलो तरीसुद्धा आपण या नकारात्मक भावनांमध्ये अडकून पडतो. जे लोक नकारात्मकता शोषून घेतात आणि त्यांना ती बाहेर कशी टाकायची समजत नाही त्यांच्यामध्ये खालील लक्षणे दिसतात.

प्रेमाची नाकेबंदी – जेव्हा आपण नकारात्मकता शोषून घेतो तेव्हा आपल्याला दोषारोप आणि संताप यांच्याच लाटा जाणवत असतात. आपल्या प्रेमाला कोणीतरी आडकाठी करत असते किंवा कोणीतरी आपल्याला अडवत असते. आपल्याला खूप प्रेमाचा वर्षांव करायचा असतो, पण आपण तो करू शकत नाही. याचा परिणाम असा होतो की प्रेम करण्याची त्यांची आंतरिक ऊर्मी नाहीशी होते.

आत्मविश्वासाची नाकेबंदी – जेव्हा आपण नकारात्मकता शोषून घेतो तेव्हा आपण स्वतमध्ये आत्मविश्वास संपादन करण्याचा, श्रद्धा ठेवण्याचा प्रयत्न करत असतो, पण त्याच वेळी आपल्यामध्ये चिंता आणि संभ्रम यांचे वारे वाहू लागते, त्यामुळे कुठलाही धोका पत्करताना आपण साशंक असतो. आपल्या आत्मविश्वासाची नाकेबंदी होते, तरी आपण आपल्या आत्म्याची इच्छा ऐकतो की आणखी काही करायचे आहे. त्याप्रमाणे करायला जातो, पण आपल्याला कोणीतरी घट्ट पकडून ठेवले आहे अशी जाणीव होते.

आनंदाची नाकेबंदी – जेव्हा आपण नकारात्मकता शोषून घेतो तेव्हा आनंदी राहण्याचा प्रयत्न करतो, परंतु आपण नैराश्य आणि आत्मवंचना यांच्या गर्तेत लोटले जातो. आपल्या आनंदाची तीव्रता कमी होते आणि तो पार भुईसपाट होतो. आपली आंतरिक ओढ आनंदी असण्याची असते पण तो आनंदच हरवलेला असतो.

शांततेची नाकेबंदी – जेव्हा आपण नकारात्मकता शोषून घेतो तेव्हा आपण आपल्याला चांगले वाटावे म्हणून धडपडत असतो, पण तरीही आपल्या मनावर अपराधीपणाची आणि योग्यता नसण्याची घट्ट पकड असते. आपल्या आतील चांगुलपणा व भाबडेपणा आणि मनशांती या भावनांचा शुद्धपणा आपल्याला ही नकारात्मकता जाणवू देत नाही. आपल्या हातून घडलेल्या भूतकाळातील चुका सतत आठवून आपण स्वतला माफ करू शकत नाही, परिणामी इतरांच्या दुखालासुद्धा आपण कारणीभूत आहोत अशी आपल्याला जाणीव होते. म्हणजे लहाणपणाच्या चुकांसाठी तेव्हा आपल्याला कोणीतरी शिक्षा केली असेल तर आजसुद्धा आपण स्वतला शिक्षा करतो. म्हणूनच गरज आहे ती नकारात्मता टाळण्याची.
(मेहता पब्लिशिंग हाऊसच्या ‘स’ सुखाचा या पुस्तकातून साभार. लेखक जॉन ग्रे, अनुवाद शुभदा विद्वांस)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2016 1:15 am

Web Title: how to deal with negativity
टॅग : Chaturang
Next Stories
1 सुकली बाग
2 वेगळे व्हा
3 कौतुकाची भूक
Just Now!
X