लिलियन डिक्सन या लेखिका आणि वक्त्या. त्यांनी म्हटलंय, ‘लाईफ इज लाईक ए कॉईन. यू कॅन स्पेंड इट एनिवे यू विश, बट यू ओन्ली स्पेंड इट वन्स.’ आपल्याकडचं नाणं आपण आपल्या मर्जीप्रमाणे कसंही खर्च करू शकतो, पण ते फक्त एकदाच खर्च करता येतं, जास्त वेळा नाही. आयुष्याचं तसंच आहे. ते एकदाच व्यतीत किंवा खर्च करता येतं अर्थात आपल्या इच्छेनुसार ते घालवता येतं. ते चांगल्या रीतीने जावं असं प्रत्येकालाच वाटतं. पण ‘चांगलं’ या शब्दाची व्याख्या प्रत्येकाची वेगळी असणार. उत्तम करिअर बनवून भरपूर पैसा कमवावा, गरिबांची, आजाऱ्यांची, देशाची सेवा करावी, वाईट मार्ग स्वीकारणे वगैरे.

चांगल्या आयुष्याची वेगळी व्याख्या अभिप्रेत असलेलं मध्यमवयीन, मध्यमवर्गीय, मूल नसलेलं जोडपं मला एका सरकारी इस्पितळात भेटलं. लहान मुलांच्या वॉर्डमध्ये छोटय़ा मुलीजवळ बसले होते. इस्पितळाच्या सफाई कामगारांबरोबर फिनाईल, साबण, डेटॉल घेऊन ते सरळ बाथरूममध्ये गेले. पंधरा मिनिटांनी बाहेर आले. उत्सुकतेपोटी मी त्यातील बाईंना विचारलं, ‘तुम्ही कोण? कामगारांबरोबर बाथरूममध्ये का गेलात?’ त्या म्हणाल्या, ‘‘आसपासच्या सरकारी इस्पितळांतील लहान मुलांच्या वॉर्डमधील बाथरूम्स दोन-तीन दिवसांनी थोडे पैसे देऊन आमच्या देखरेखीखाली स्वच्छ करून घेतो. अस्वच्छतेमुळे मुलांचे आजार कमी होण्याऐवजी वाढतात आणि एकदाच मिळणाऱ्या आयुष्यात काही चांगलं करावं, आळस, स्वार्थीपणा यात ते वाया घालवू नये असा विचार करून हे सुचलेलं करतोय, तेवढंच समाधान मिळतं!’’

नवी मुंबईत अशाच एक बाई संसार सांभाळून अंथरुणाला खिळलेल्या वृद्धांची सेवा करतात. आर्थिक विवंचना नाहीत, पण मुली-बाळी दिवसभर बाहेर असतात, नोकर धड मिळत नाहीत, म्हणून त्यांचे हाल होतात. शारदाबाईंनी अशांसाठी हा आश्रम सुरू केलाय. पंचवीस वृद्धांकरिता आठ बायका काम करतात. एक डॉक्टर रोज येऊन वृद्धांची काळजी घेतात. स्वत: शारदाबाई असतातच. काम करणाऱ्या निराधार असतात, त्यांची पण राहण्याची, जेवणाची सोय होते. वृत्तपत्र वाचून, भजनं गाऊन त्यातील काही वृद्धांचं मनोरंजन करतात. इंटरनेट वापरणं ज्यांना जमतं त्यांना स्काईप, व्हॉट्स अ‍ॅप अशा ठरावीक गोष्टी शारदाबाई शिकवतात. नातवंडं, नातेवाईक त्यांना त्यातून भेटतात.

शारदाबाई म्हणाल्या, ‘हा खर्च फार आहे, कोणाची मदत नाही म्हणून मी वृद्धांकडून पैसे घेते. फायदा अजिबात मिळवत नाही. देवाने दिलेल्या छोटय़ाशा आयुष्याचं एकदाच काय ते करायचं आहे. मग ते काही चांगलं, मनाप्रमाणे करून दुसऱ्यांना आणि स्वत:ला आनंद, सुख देईल असं तरी करावं. माझ्या दृष्टीने माझं आयुष्य चांगल्या मार्गाने व्यतीत होतंय याचा मला अभिमान आहे.’
आपण हे एकदाच खर्च करायला मिळालेलं आयुष्य कसं खर्च करतोय त्याचा विचार व्हावा.

– गीता ग्रामोपाध्ये