‘देव त्यांनाच मदत करतो, जो दुसऱ्यांना मदत करतो’ ही म्हण खूप भाषांमध्ये आहे.ज्याला मदतीची नितांत गरज आहे, मदत मिळाली नाही तर ज्याचं मोठं नुकसान होणार असेल किंवा त्याला कठीण परिस्थितीला सामोरं जावं लागणार असेल अशा माणसाला मदत करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य असतं.
छोटय़ा गावात जाऊन तेथील रुग्णांना औषधपाणी करणं हे हल्ली अनेक डॉक्टरांना आवडत नाही. डॉ. शशी याला अपवाद आहेत. त्यांनी एका तालुक्याच्या गावी दहा बेड्सचं हॉस्पिटल सुरू केलंय. आजूबाजूच्या पाडय़ातून तिथे रुग्ण येतात. आठवडय़ाचा बाजार करून, डॉक्टरकडे जाऊन येईपर्यंत खूप उशीर होतो. बस सेवा मर्यादित असते. मग घरी पोहोचायचं कसं? हा प्रश्न असतो. ज्यांची बस निघून गेलेली असते अशांना डॉ. शशी यांच्या हॉस्पिटलच्या व्हरांडय़ात रात्र काढण्याची परवानगी असते.
हॉस्पिटलमध्ये असलेल्या रुग्णांना किंवा बाळंतिणींना अगदी साध्या पण स्वच्छ जेवणाची जरूर असते. लांबून येणाऱ्या नातेवाइकांना घरून जेवण आणणं शक्य नसतं. हॉटेलचं जेवण तर व्यज्र्यच असतं. या रुग्णांच्या जेवणाची सोय डॉ. शशींच्या घरातून केली जाते. त्यांच्याकडे स्वयंपाक करणाऱ्या मावशींना कायमस्वरूपी सूचना आहे की, त्यांनी सकाळी येतानाच हॉस्पिटलमध्ये जाऊन कोणत्या रुग्णाला काय जेवण द्यायचं हे विचारून त्याप्रमाणे स्वयंपाक करायचा. खिचडी, वरण भात, एखादी पोळी, कमी तिखटाची भाजी असं जेवण करायचं. मावशी हे काम आनंदाने करतात. आजाऱ्याला वेळेवर जेवण देणं हे त्या पुण्याचं काम समजतात. गावातील दोन व्यापारी स्वखुशीने पैशाच्या, धान्याच्या स्वरूपात मदत करतात. नैसर्गिक आपत्ती येतात तेव्हा सगळेच आपापल्या परीने
मदत पाठवतात.
डॉ. शशींप्रमाणेच गरजवंतांना मदत करणारी सॅली यासुद्धा आसपासच्या दोन-तीन शाळांतील मुलांना इंग्रजी शिकवतात. गरिबाघरच्या या मुलांच्या माता अर्थार्जनासाठी दिवसभर बाहेर असतात. सॅलीला प्रश्न पडला, शाळा सुटल्यावर दुपारी आईच्या गैरहजेरीत ही मुलं काय करत असतील? कुठे जात असतील? चौकशी केल्यावर तिला कळलं कोणी आजीकडे जातात, कोणी शेजारीपाजारी खेळून, अभ्यास करून वेळ घालवतात. या मुलांना मदत करायचा विचार तिने पक्का केला.
जवळच्या चर्चमधील फादरना आपला विचार सांगितला. गरजूंना मदत करण्यासाठीच तर आपण आहोत हे त्यांचेपण मत होते. चर्चमधील एक छोटा हॉल दुपारी एक ते सहा या वेळात त्यांनी सॅलीला वापरायला दिला. सॅली आनंदली. ‘आफ्टर स्कूल’ हा उपक्रम सुरू झाला. मुलं शाळेनंतर तिथे आपला डबा खातात, झोपतात, सॅलीच्या देखरेखीखाली अभ्यास करतात. ही बातमी गावात पसरली.
रविवारी प्रार्थनेसाठी येणारे काही ना काही मदत करू लागले. थोडय़ाशा का होईना मुलांचं आयुष्य आपल्या मदतीने घडतंय हा आनंद सॅलीसाठी खूप मोठा आहे. आपल्या गैरहजेरीत मुलं चांगल्या ठिकाणी, चांगल्या माणसांबरोबर सुखरूप असतात हा मोठा दिलासा मुलांच्या पालकांना मिळालाय.

गीता ग्रामोपाध्ये
geetagramopadhye@yahoo.com