News Flash

स्त्रीच शक्तिशाली

स्त्रिया शरीराने पुरुषांपेक्षा दुबळय़ा असतात. ही फारच आश्चर्याची गोष्ट आहे

स्त्रिया वेगळ्या असतात; पण दुय्यम मुळीच नसतात. पण वेगळेपणा आणि असमानता यात फरक आहे. स्त्रिया पुरुषांपेक्षा वेगळ्या असतात हे खरे आहे. त्यांच्यात पुष्कळ फरक आहे हेही खरे आहे; पण त्या दुय्यम नाहीत. आणि हीन तर मुळीच नाहीत. उलट काही बाबतीत त्यांची क्षमता पुरुषांपेक्षा जास्त आहे.
जसे की, आपण सामान्यत: असे समजतो की, स्त्रिया शरीराने पुरुषांपेक्षा दुबळय़ा असतात. ही फारच आश्चर्याची गोष्ट आहे. फारच थोडी खरी आहे. स्त्रियांना मॅस्क्युलर पॉवर शारीरिक ताकद कमी असते, या अर्थाने त्या पुरुषांपेक्षा दुबळ्या असतात; पण दुसऱ्या अर्थाने स्त्रिया पुरुषांपेक्षा खूप बळकट असतात. प्रतिकाराची ताकद त्यांच्यामध्ये पुरुषांपेक्षा जास्त असते. स्त्री आणि पुरुष या दोघांनाही एकच आजार झाला, तर पुरुष लवकर हताश होतो. स्त्रीचे आयुर्मान पुरुषांपेक्षा जास्त आहे. स्त्री आणि पुरुष यांच्या विवाहात आपण वयाचं अंतर राखतो, मुलगा वीस वर्षांचा असला तर मुलगी आपण सोळा-सतरा वर्षांची निवडतो, त्यामुळे विधवांची संख्या विधुरांपेक्षा जास्त दिसते. पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया पाच वर्षे जास्त जगतात.
स्त्रियांपाशी त्यांच्या शरीरातच प्रतिरोधाची शक्ती पुरुषांपेक्षा जास्त असते. निसर्गाने स्वाभाविकपणेच तिला ही शक्ती दिलेली आहे, कारण तिला पोटात नऊ महिने मुलाला वाढवायचे असते. नऊ महिन्यांपर्यंत एका जिवंत व्यक्तित्वाला आपल्या आत विकसित करण्यासाठी जेवढी पीडा सहन करावी लागते तेवढी पीडा सहन करण्याची शक्ती तिच्यापाशी असते. प्रसूतीच्या जेवढय़ा वेदना असतात तेवढय़ा वेदना सहन करण्याची शक्ती तिच्यापाशी असते आणि मुलाला जन्म देणं तर ठीकच आहे, त्याला मोठं करण्यासाठीही खूप संघर्ष करावा लागतो. स्त्रीपाशी वेदना सहन करण्याची क्षमता पुरुषापेक्षा जास्त असते.
एका दृष्टीने पुरुष बलवान असतो, कारण त्याच्या जवळ शारीरिक शक्ती असते. तो मोठा दगड उचलू शकतो; पण दुसऱ्या अर्थाने पुरुष दुबळा असतो. तो जास्त वेदना सहन करू शकत नाही. आणि लक्षात ठेवा यामुळेच स्त्रियांचे भविष्य पुरुषांपेक्षा उज्ज्वल आहे. कारण अंगमेहनतीचं काम आता मशीन्स करू लागल्या आहेत. पण वेदना सहन करण्याचे काम अजून तरी कुठलेही मशीन करू शकत नाही.
पुरुषाची शक्ती रोज निर्थक होत चालली आहे. त्यामुळे पुरुषांचे स्नायूही नाहीसे होऊ लागले आहेत. कारण आता पुरुषाला दगड उचलायचा नाही, ते काम क्रेन करीत आहे. पुरुषाला मोठा वृक्ष तोडायचा नाही, ते काम आरा मशीन करीत आहे. पुरुषाच्या स्नायूंची शक्ती मशीनने घेतली आहे. त्यामुळे भविष्यात आता पुरुषाच्या ताकदीचा फारसा उपयोग राहिलेला नाही. त्याला आता तलवार चालवायची गरज नाही की लाकडं कापायची गरज नाही. दगड फोडायचीही गरज नाही; पण स्त्रीची शक्ती घ्यायला अजून तरी मशीन असमर्थ आहे. म्हणून मला तुम्हाला सांगायचे आहे की, भविष्यकाळात स्त्री रोज शक्तिशाली होत जाईल, तर पुरुष रोज दुबळा होत जाईल. (उत्तरार्ध)

(‘साकेत प्रकाशन’च्या ‘ओशो – स्त्री आणि क्रांती’ पुस्तकातून साभार)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 27, 2016 1:36 am

Web Title: power of women
Next Stories
1 मौल्यवान हृदय
2 क्षमाशीलतेचे महत्त्व
3 एकांताचे भय
Just Now!
X