13 August 2020

News Flash

रागाचे कारण सांगा…

राग येणं, चिडणं स्वाभाविक असतं. पण तो क्षण आपण आपल्या ताब्यात ठेवला तर...

‘एक्सप्लेन युवर अँगर, डू नॉट एक्स्प्रेस इट, अँड इमिजिएट्ली ओपन डोअर टू सोल्युशन्स इन स्टेड ऑफ आग्र्युमेंट्स.’ असं म्हटलं जातं. आपला राग भांडण करून किंवा वादावादी करून व्यक्त करू नये तर रागाचे कारण सांगावे. ताबडतोब आणि सहजतेने प्रश्नांची उत्तरे मिळतील. अगदी रोजच्या व्यवहारातील गोष्ट आहे ही!

नवीनच घेतलेल्या घराच्या अंतर्गत सजावटीचे काम डॉ. सायलीने मेधा नावाच्या प्रथितयश डेकोरेटरला दिले होते. स्टुडिओ टाइप स्वयंपाकघराचे काम पाहताना त्या नाराज झाल्या, तेवढय़ात मेधा आलीच. डॉ. रागावल्या होत्याच. त्यांनी तिच्यावर तोफ डागली. ‘‘किचनमध्ये इंद्रधनुष्याचे रंग दाखवणार आहेस का? घरात आल्याबरोबर किचन दिसते, ते अतिशय सुंदर हवे ही साधी गोष्ट तुला कळत नाही? तू छान काम करतेस हे मी पाहिले म्हणून तुला काम दिले, पण पश्चात्ताप करायची वेळ आणलीस. रंगसंगतीचं भानच ठेवलं नाहीस तू.’’ त्यांना मध्ये तोडत मेधा म्हणाली, ‘‘मॅम, रागाच्या भरात काहीही बोलू नका. कोणता सनमायका आवडला नाही, कोणता वाईट दिसतो आहे, कोणता कुठे मॅच होतो असं तुम्हाला वाटतं ते मला स्पष्ट करा. रागावून ताडताड बोललात तर तुम्हाला काय हवं आहे हे मला कळणार नाही. प्रश्न सुटणार नाही. काम करण्याचा माझा मूड जाईल.’’ आता मालकीणबाईंना आपली चूक कळली. मेधाने सांगितलं, ‘‘इथे भरपूर उजेड असतो. थोडासा भडक रंग जास्त ठिकाणी वापरला, फिका मॅच करून वापरला तर चांगला उठाव येईल. क्लिनिक आणि घर यातील रंगसंगती वेगळी असते. आतापर्यंत ठेवला तसा विश्वास ठेवा.’’ आपण बोलून राग व्यक्त केला, पण त्यामुळे मेधा दुखावली असेल, असे वाटून त्यांनी क्षमा मागितली आणि महिन्याभरातच मोठय़ा अभिमानाने मैत्रिणींना त्या किचन दाखवून मेधाचे कौतुक करू लागल्या.

आपली समजूत असते की, वयस्कर माणसं शांतपणे बोलून प्रश्न सोडवतात. काही वेळा तसं होत नाही. ती समजूत चुकीची ठरवणारा हा प्रसंग! ट्रेनने आम्ही पुण्याहून मुंबईला येत होतो. आरक्षित केलेल्या जागांवर बसलो. एक वयस्कर जोडपे घाईघाईने आले आणि आमच्या समोरील आसनांवर बसलेल्यांना उठवायला लागले. ‘‘या जागा आमच्या आहेत, ताबडतोब उठा, आम्हाला बसू द्या.’’ आधी बसलेले उठेनात. म्हणाले, ‘‘आमचे बुकिंग आहे, आम्ही उठणार नाही.’’ बाचाबाची वाढली. अगदी हमरीतुमरीवर आले. गाडी सुटायला वेळ होता. मागे बसलेले एक गृहस्थ बसलेल्यांना म्हणाले, ‘‘तुम्ही कृपया उठा. त्यांना बसू द्या.’’ आजोबा खूश झाले. आता त्यांनी त्या आजोबांचे तिकीट बघायला मागितले. तिकीट दुसऱ्या दिवशीचे होते. जागा त्याच होत्या. त्यांनी ती तारीख सर्वाना दाखवली. आजोबांना दाखवत ते म्हणाले, ‘‘एकदम भांडण करण्यापेक्षा तुम्ही त्यांना विशद करून सांगितले असते की, ‘या जागांचे आरक्षण आमच्याकडे पण आहे तर आपोआपच तुम्ही एकमेकांची तिकिटे पाहिली असती, सगळे वाद टळले असते.’’ आजोबा गप्प झाले आणि गाडी सुटेल म्हणून दोघं पटकन उतरून निघून गेले.

राग येणं, चिडणं स्वाभाविक असतं. पण तो क्षण आपण आपल्या ताब्यात ठेवला तर पुढचे प्रश्न सहज सुटू शकतात.

 

गीता ग्रामोपाध्ये

geetagramopadhye@yahoo.com 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2016 1:12 am

Web Title: reason of anger
Next Stories
1 आत्मविश्वास असेल तर यश तुमचेच
2 मैत्री फक्त रुजवायची असते
3 चुकीची कबुली
Just Now!
X