News Flash

सुहास्य तुझे..

त्याच्या बदल्यात आपल्याला नक्कीच हास्य मिळतं.

स्मितहास्य ही अशी एक वक्र रेषा आहे जी आयुष्यातील अनेक गोष्टी सहज सरळ करू शकते. अनोळखी व्यक्तीकडे पाहून आपण सहसा हसत नाही; पण समजा आपण असा प्रयत्न केला तर त्याच्या बदल्यात आपल्याला नक्कीच हास्य मिळतं, अगदी काहीच अपवाद वगळता. वैदेहीच्या स्मितहास्याच्या एका रेषेने शलाका आणि सावली या एका घरात राहून एकमेकींपासून दूरच राहिलेल्या नोकरी करणाऱ्या पेइंग गेस्ट मुलींचे आयुष्य सहज छान केले. ती एम.बी.ए. करायला आली होती. वैदेही त्यांच्याबरोबर नव्याने राहायला आली. रविवार असल्याने दोघी घरी होत्या. आल्याबरोबर ‘हाय फ्रेंड्स’ म्हणून ती गोड हसली. उत्तरादाखल ‘हाय’ आले, पण परत दोघी आपापल्या मोबाइलमध्ये घुसल्या. नाश्ता, जेवण, त्यांची नावे, त्या काय करतात, घरमालकांची माहिती विचारत त्यांना बोलतं करण्याचा प्रयत्न ती करत होती. प्रतिसाद एक-दोन शब्दांतच मिळत होता. आपले सामान लावून, तयार होऊन ती आली तेव्हा जेवणाची वेळ झाली होती. समोरच मालकांच्या घरी सगळी सोय होती. ‘सगळ्या मिळून जाऊ ’ या तिच्या प्रस्तावावर ‘चालेल’ असे उत्तर आले. विनोद, गप्पा करायच्या, खळखळून हसायचे हा तिचा स्वभाव घरमालक भावेकाकूंनापण आवडला. घरी आल्यावर वैदेहीने दोघींना हॉलमध्येच थांबविले. मला कॉलेजला कमी वेळात कसे पोहोचायचे सांगा. बसची, ट्रेनची माहिती सांगा वगैरे मागण्या करून दोघींना बोलते केले. आपल्या गावच्या, कॉलेजच्या गमती सांगितल्या. शलाकाने आधी आणि सावलीने नंतर हळूहळू सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी सकाळी ‘तुम्ही ऑफिसला जा, मला आज उशिरा जायचे आहे, मी सर्वाचे कपडे मशीनमध्ये धुऊन घर स्वच्छ करते,’ असे तिने सांगितल्यावर दोघी खूश झाल्या. आठवडा गडबडीत गेला. तरी थोडेफार संवाद झाले. सगळ्यांच्या जाण्याच्या वेळा वेगळ्या होत्या म्हणून चहा, नाश्ता एकत्र होत नसे, पण रात्री तिघी एकत्र जेवायला जाऊ  लागल्या. तिची पहिली टर्म संपली तेव्हा पूर्वीच्या आणि आताच्या वागण्यात जमीन-अस्मानाचा फरक पडला होता. खरेदी, एखादा चित्रपट, घराची स्वच्छता याचबरोबर वैदेहीला अभ्यासात मदतही त्या करू लागल्या. ‘तू आल्याबरोबर छान हसून आमची ओळख करून घेतलीस म्हणून आज आम्ही एकमेकींच्या मदतीने सोपे आयुष्य जगतोय. आता आम्हीपण रोज दिसणाऱ्या पण अनोळखीच राहिलेल्या व्यक्तींना हसून हाय म्हणतो. ऑफिसचा प्रवास छान होतो. कधी बरं नसेल तर तेच उभे राहून बसायला जागा देतात.

पाश्चात्त्य देशात अनोळखी व्यक्तीशी नजरानजर झाली तर अनोळखी व्यक्तीला हाय म्हणून शुभेच्छा दिल्या जातात. एखादी व्यक्ती रोज जरी भेटत असेल तरीही हे असेच चालते. आपले दु:ख, अडचणी, एकटेपण दुसऱ्यांना सांगणे त्यांना आवडत नाही, त्यांच्या संस्कृतीत ते बसत नाही, पण शेवटी तीसुद्धा माणसेच आहेत. लॉरा एकटी राहून नोकरी आणि शिक्षण दोन्ही करत होती. सोपे असले तरी घरकाम करावेच लागे. दमून जाई बिचारी. कॉलेजमध्ये तिच्याबरोबर दोन विषय शिकणाऱ्या अंजलीच्या हे लक्षात आले.

एकदा बसमध्ये ती मुद्दाम शेवटी चढली. लॉराकडे पाहून हसली. ती हसली. दुसऱ्या दिवशी वर्गात हसून विचारले, ‘कशी आहेस?’ तर ‘बरी’ असे उत्तर आले. अंजली रोज तिच्याकडे पाहून हसायची. लॉरा आता तिची वाट पाहू लागली. हळूहळू थोडे बोलू लागली. दोघी मिळून एखादे प्रोजेक्ट करू लागल्या. कधी लंच बरोबर घेऊ  लागल्या. आयुष्यातील बऱ्याच गोष्टी सोप्या , सुकर झाल्या. अर्थात अंजलीने तिच्याकडे पाहून केलेल्या स्मितहास्यानेच हे केले.

 

गीता ग्रामोपाध्ये

geetagramopadhye@yahoo.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 1, 2016 1:02 am

Web Title: smileness
Next Stories
1 प्रतिक्रिया
2 सुखाचा धागा
3 जे पेराल ते उगवेल
Just Now!
X