22 August 2019

News Flash

करावे मनाचे

मीरा एक हुशार मुलगी. तिने बारावीची परीक्षा दिली.

‘ऐकावे जनाचे करावे मनाचे’ असं का बरं म्हणत असतील? कारण आपल्या सर्वानाच एकमेकांना सल्ले देण्याची फार सवय असते. शाळा-कॉलेजचा प्रवेश, आजारी असलात तर औषध, हॉस्पिटल, घर खरेदी, प्रवास अशा अनंत बाबतीत मतप्रदर्शन मित्र, नातेवाईक करतात. जो कोणी एखादं नवीन काम हाती घेणार असेल त्याने इतरेजनांचं म्हणणं ऐकून घ्यावं, नंतर शांतपणे, सारासार विचार करून निर्णय घ्यावा. कारण ती गोष्ट करणं जरुरीचं आहे का, त्याचे नंतर काय परिणाम होतील याची कल्पना फक्त त्यालाच असते.
मीरा एक हुशार मुलगी. तिने बारावीची परीक्षा दिली. निकालाच्या आधीच तिने पुढे काय शिकावे याबाबतीत सल्ले येऊ लागले. तिची मूकबधिर मुलांकरिता काही चांगलं काम करण्याची इच्छा होती. आई-वडिलांना विश्वासात घेऊन तिने हा कोर्स उत्तम रीतीने पूर्ण केला. परदेशी जाऊन मास्टर्स पदवी घेऊन आली. लहानसं क्लिनिक सुरू करून अशा मुलांनी आपले विचार विशिष्ट भाषेद्वारे कसे प्रकट करावेत हे त्यांना शिकवू लागली. आपण इतरांशी संवाद साधू शकतो हा आनंद तिने त्यांना मिळवून दिला. सर्वाचे ऐकले आणि मनाचे केले म्हणूनच हे साध्य झाले.
समाजकार्याची आवड, आजूबाजूच्या लोकांचे राहणीमान सुधारण्याची इच्छा या गोष्टींसाठी रजनीला गावातील पंचायतीची निवडणूक लढवून जिंकायची होती. कारण हातात सत्ता नसेल तर आपण यातील काहीही करू शकणार नाही हे तिने ओळखले होते. गावात फार राजकारण चालतं, ही पुरुषांनी करायची कामं तिने करू नयेत, उगाच संकटांना आमंत्रण देऊ नको, हे आणि असे बरेच काही तिने ऐकून घेतले. तिचा निर्णय पक्का होता. महिलांचा मूक पाठिंबा, घरची जबाबदारी अगदीच कमी या आपल्या जमेच्या बाजूंचा फायदा घेतला पाहिजे. लोकांचं ऐकलं तर गावात चांगले रस्ते होणार नाहीत, दळणवळण सुधारणार नाही, रोजचा विजेचा प्रश्न सुटणार नाही. त्याकरिता मनीचा विचारच आपण अमलात आणला पाहिजे, लोकांचं बोलणं फक्त ऐकू या. हे तिने ठरविले. निवडणूक जिंकून ती सरपंच झाली. भवानीची तलवार घेऊनच उभी राहिली. मनात होतं ते केल्यामुळे गाव थोडं का होईना सुधारल्याचा आनंद तिला मिळाला.
हेमंत तर लग्न झालेला मध्यम वयाचा, पण त्याने जेव्हा नवीन, मोठे घर घेण्याचा विचार बोलून दाखवला तेव्हा ओळखीच्यांनी, नातेवाईकांनी त्याला खूप वेगवेगळे सल्ले दिले. नवीन ठिकाणी स्थायिक होणे कठीण जाईल येथपासून पार मोठय़ा घराची जरूरच नाही येथपर्यंत सगळ्या गोष्टी पटविण्याचा प्रयत्न केला. मोठय़ा घराची आवश्यकता का, किती, कशी आहे हे तोच जाणत होता. बँकेचे कर्ज घेताना फिक्स्ड व्याजदर द्यावा, हे मित्राचे सांगणे त्याने कानाआड केले. फ्लोटिंग दराने कर्ज घेतले. सहा महिन्यांनी व्याजदर कमी झाला आणि त्याचा फायदा झाला. बायकोने अर्धवेळ नोकरी करून कर्ज फेडण्यास मदत केली. ‘ऐकलं जनाचं केलं मनाचं’ म्हणूनच बघता बघता सगळं व्यवस्थित झालं.

गीता ग्रामोपाध्ये
geetagramopadhye@yahoo.com

First Published on June 18, 2016 1:02 am

Web Title: spiritual article in loksatta chaturang 4