28 January 2020

News Flash

जे पेराल ते उगवेल

वाईट वागाल तर वाईट वागणूक मिळेल.

‘पुढील पिढी समृद्ध, प्रगल्भ, उत्तम आचारविचारांची बनविण्यासाठी आजच्या पिढीचे वागणे त्याला पूरक असावे’. आपल्याकडे एक द्वयअर्थी म्हण आहे- ‘जे पेराल ते उगवेल’. लोकांशी चांगले वागाल तर तुम्हाला त्यांच्याकडून चांगली वागणूक मिळेल, अर्थात वाईट वागाल तर वाईट वागणूक मिळेल.

ही दोन छोटय़ा बहिणींची गोष्ट आहे. बागेत खेळायला जाताना रस्त्यावरील दुकानांतील सुंदर कपडे, खेळणी त्यातील धाकटय़ा बहिणीला आकर्षित करीत होती. ती पाहात असताना ती एका टाळ्या वाजविणाऱ्या जोकरसमोर रेंगाळली. मोठीने मागे वळून पाहिल्यावर तिच्या ते लक्षात आले. तिने जवळ जाऊन विचारल्यावर, छोटी

म्हणाली,‘मला ते खेळणे हवे आहे,’’ मोठीने एखाद्या परिपक्व माणसाप्रमाणे आत जाऊन दुकानदाराला विचारले, ‘‘या खेळण्याची किंमत किती ? माझ्या बहिणीला ते हवं आहे.’’ ‘‘तुझ्याकडे जे आहे ते दे,’’ असे त्याने सांगितले. तिने घरी जाऊन साठवलेली पोस्टाची तिकिटे, रंगीत गोटय़ा आणून त्याला दिल्या. दुकानदाराने दोन गोटय़ा, दोन तिकिटं घेतली आणि तिला खेळणे ते दिले. ‘‘ते महागडे खेळणे दोन गोटय़ा, तिकिटांच्या बदल्यात का दिले?’’ असे दुकानातील नोकराने विचारल्यावर दुकानदार म्हणाला, ‘‘या मुली मोठय़ा झाल्यावर त्यांना व्यवहार कळू लागेल तेव्हा त्यांना नक्की माझी आठवण होईल. आणि दुसऱ्यांना उपयोगी पडतील.  चांगले काम चांगल्या रूपातच समोर येते.’’ आपण स्वत: ऊर्जा शक्तीचा उत्तम स्रोत असतो. त्याचा उपयोग केला पाहिजे.

या ऊर्जा शक्तीच्या स्रोताच्या गुंतवणुकीचा इन्स्टंट रिझल्ट आहे हा! अमेरिकेत बऱ्याच ठिकाणी थंडीच्या दिवसांत बर्फ पडतो. मुख्य रस्त्यावरील बर्फ काऊंटीचे अधिकारी स्वच्छ करतात. ड्राइव्ह वे, पाथ वेवरील बर्फ ज्याचा त्याने काढायचा असतो. एकदा एक आजोबा शेजारच्यांच्या ड्राइव्ह वेवरील बर्फ काढत होते. ते पाहून दोनतीन छोटी मुले आली, त्यांनी विचारलं, ‘‘तुम्ही का दुसऱ्यांच्या रस्त्यातील बर्फ काढताय?’’ आजोबा म्हणाले, ‘‘ते बाहेर गेले आहेत, रात्री आल्यावर त्यांना बर्फ काढायला वेळ नसेल. सकाळी त्यांची मुले शाळेत जाण्यासाठी बसपर्यंतपण पोहचू शकणार नाहीत, म्हणून त्यांची तयारी करून ठेवतोय मी!’’ ‘‘हे अवघड काम तुम्ही करू नका. आम्ही आमच्या मोठय़ा भावंडांना पाठवतो, त्यांच्याकडून सांगून करून घ्या हे काम!’’ असं सांगून ती मुलं निघून गेली. पाचच मिनिटांत त्यांचे मोठे भाऊ  आले आणि थोडय़ाच वेळात त्यांनी बर्फ काढला. त्या घरातील माणसांना आपल्या ड्राइव्ह वेवर बर्फ दिसला नाही. हा त्यांना सुखद धक्का होता. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना ही घटना कळली.  या चांगल्या कामाची पावतीच देणे जणू सुरू झाले. ज्यांना बर्फ काढणे कठीण असते त्यांच्या वेवरील बर्फ कोणी ना कोणी तरी काढू लागले. विशेषत: मुलांचा उत्साह वाढला. चांगल्या कामाचा परिणामही चांगला! म्हणून चांगले पेरू या!

 

गीता ग्रामोपाध्ये

geetagramopadhye@yahoo.com

First Published on September 10, 2016 1:03 am

Web Title: spring to sow
Next Stories
1 भीती घालवा, यश मिळवा
2 जगण्याचा अधिकार
3 रागाचे कारण सांगा…
Just Now!
X