12 August 2020

News Flash

सुई बना कात्री नको

आयुष्यात सुई बनून राहा, कात्री बनून नको, कारण सुई जोडण्याचे काम करते आणि कात्री कापण्याचे.

‘आयुष्यात सुई बनून राहा, कात्री बनून नको, कारण सुई जोडण्याचे काम करते आणि कात्री कापण्याचे.’ शेतीवाडी, जमीनजुमला, घरदार यावरून भावाभावांत भांडणं होणं ही नित्याची बाब आहे. आई-वडिलांचे छत्र, त्यांचा वचक असेपर्यंत ही भांडणं सहसा होत नाहीत. पण ते छत्र हरपले की, भांडणं सुरू होतात, नाती फाटू लागतात. अशा वेळी ही नाती जोडायला, शिवायला कोणी तरी सुईचं काम करावं. एक कुटुंब आनंदाने, एकमेकांना सुख-दु:खात साथ देताना पाहण्यात संतोष मिळतो.

नंदाताई आणि अप्पासाहेब यांची कन्या शोभा सासरी खूश होती. प्रसाद, प्रमोद ही मुलं घरची पंचवीस एकर जमीन कसत होती, दोन सुना, तीन नातवंडांसोबत ते चौसोपी वाडय़ात गुण्यागोविंदाने राहत होते. तर तिसरा मुलगा विजय शहरात वकिलीचे शिक्षण घेऊन त्यातच नाव कमावण्याची मनीषा बाळगून होता. अप्पासाहेब शेतात काम करणाऱ्यांचे संसार व्यवस्थित चालतील एवढे उत्पन्न त्यांना देत. गावातील इतर लोकांची गरिबीमुळे होणारी किंवा घरगुती भांडणं ते मिटवत असत. फाटत आलेली नाती ते सुई बनून जोडण्याचे काम करीत. ते राजकारणात नसले तरी लोकोपयोगी कामं करीत, त्यामुळे गावात त्यांना मान होता. पण नियतीला हे मान्य नव्हते. शेतात सर्पदंशाने त्यांचा मृत्यू झाला. इच्छापत्र केलेले नव्हते. नंदाताईंनी वर्षभर गाडा रेटला. शेतमजुरांच्या तक्रारी वाढू लागल्या. दोन्ही मालक शेताकडे फिरकत नाहीत, या-ना त्या कारणावरून भांडतात, अशा गोष्टी नंदाताईंनी ऐकल्यानंतर दोघांमधील दरी कमी करण्याचा प्रयत्न केला. त्यातच सुनांना आपला वाटा घेऊन वेगळे राहण्याचे डोहाळे लागले. परिस्थिती हाताबाहेर जाते आहे, असे लक्षात आल्यावर त्यांनी विहिणींना विनंती केली की, आपापल्या मुलीची समजूत घालून एकत्र राहण्याचे फायदे सांगावेत, दुरावलेले संबंध सुई दोरा होऊन जोडावेत. आपल्या मुलींचे स्वतंत्र संसार असावेत, अशा विचाराच्या त्या होत्या, त्यामुळे त्यांनी कात्रीचेच काम केले.

शोभाला जेव्हा नंदाताईंनी रडवेल्या आवाजात हे सगळं सांगितलं तेव्हा ती म्हणाली, ‘‘अगं, थोडं थोडं मला कळलं, म्हणूनच विचारायला आले.’’ तिने दोन्ही भाऊ, वहिनींना बोलावले. ‘‘भांडण करून, हिस्सा घेऊन स्वतंत्र राहिलात तर अप्पांनी केलेल्या कष्टावर पाणी पडेल. गावात बदनामी होईलच. आईच्या मागे तुम्हीच एकमेकांकरिता आहात. संकटं, अडचणी, मोठय़ा होणाऱ्या मुलांचे प्रश्न यातून मार्ग काढायला मदतीला तुम्हीच आहात एकमेकांकरिता. आता भांडणं लावणारे येणार नाहीत.’’ तिने विजयला बोलावून हेच सांगितलं, ‘‘तू दूर शहरात राहतोस, याचा अर्थ सर्व गोष्टींपासून दूर राहणे असा नाही. वारंवार येऊन आईची, भाचे- पुतणे यांची चौकशी करणे हे तुझे कर्तव्य आहे.’’ वहिनींनी सर्वाशी प्रेमानेच राहिले पाहिजे. विचारांती सर्वाना हे पटले. सोनाराने कान टोचल्याचा उपयोग झाला. शोभाने सुई बनून फाटत आलेली नाती जोडली होती. सर्वच जण असे सुई बनून राहिले तर? तर एकमेकांना सुखी केल्याचा आनंद त्यांना मिळेल.

गीता ग्रामोपाध्ये –  geetagramopadhye@yahoo.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 17, 2016 2:09 am

Web Title: tips for maintaining a long term relationship
Next Stories
1 बदल अत्यावश्यक आहे
2 मनाचा मोठेपणा
3 मन करा रे प्रसन्न
Just Now!
X