‘सही वक्त पर पिये गये कडवे घूँट अक्सर जिंदगी मीठी बना देते है’
‘कडवे घूँट’ वा कडू घोट म्हणजे काय? आयुष्यात येणाऱ्या अडचणी, संकटे आणि कठीण प्रसंग आणि या सर्वाना धीराने तोंड देत, त्यांच्यावर मात केली तर आपण यशस्वी होतो. ‘आमच्या नशिबात काही चांगलं नाहीच, नशीबच मेलं वाईट’ असं नशिबाला दोष देत रडत न बसता अडचणींवर मात केली तर आयुष्य सुखी, आनंदी, गोड होणारच.

आयुष्यात आलेले असेच अनेक कडू घोट पिणाऱ्या स्नेहाची ही गोष्ट. पंचेचाळीस वर्षांपूर्वी सुरू झाली. पदवी प्राप्त करण्यापूर्वीपासून तिला अमेरिकेचे वेध लागले होते. त्या वेळी आजच्या प्रमाणे ऊठसूट कोणी अमेरिकेला जात नसे. वर्गमित्र असलेल्या अरुणबरोबर लग्न करून, सर्वाचा विरोध पत्करून ती निघाली. तीन दिवसांच्या खडतर प्रवासानंतर दोघे फिलाडेल्फिया येथे, त्यांची राहण्याची सोय झाली होती तेथे पोहोचले. पैसे कमी, वाहन नाही, कुठे काय मिळते ते माहीत नसल्याने प्रत्येक गोष्ट मालकिणीला विचारावी लागे. अशा अनंत अडचणी पार करत नवलाईचे दिवस केव्हा संपले कळलंच नाही. स्वतंत्र विचाराच्या स्नेहाचे दादागिरी करणाऱ्या नवऱ्याशी पटेनासे झाले. त्याला पण हिची जबाबदारी नकोशी वाटू लागली. एके दिवशी तिला सोडून तो मित्राकडे निघून गेला तो कायमचाच.

आता संकटांचे डोंगर तिला एकटीला पार करायचे होते. भारतात परत जाण्याचा विचारसुद्धा ती करू शकत नव्हती. त्या वेळी ग्रीन कार्ड चार-पाच महिन्यांच्या आत मिळत असे. ते मिळाल्यानंतर तिला नोकरी मिळाली. पण कसली नोकरी होती ती? वॉलमार्ट या डिपार्टमेंटल दुकानात गोदामामधून येणारी सामानाची खोकी ट्रकमधून उतरवून त्यातील वस्तू जागेवर लावणं. अतिशय कष्टाचं काम, पण तिने ते बरेच दिवस केले. जिद्दीने लढाई देत प्रगती करायची, हा एकच विचार सतत मनात असायचा. तेथे सार्वजनिक परिवहन अगदीच कमी असते, त्यामुळे स्वत:चे वाहन असणे ही निकड असे, आजही आहेच. तिने जुनी कार विकत घेतली, वाहनचालक परवाना मिळविला. हवामानाच्या फरकाचा त्रास होई. नैराश्य येई. पण हार मानेल तर ती स्नेहा कसली? मॅनेजरला आपली अडचण सांगून आणखी काम देण्याची विनंती केल्यावर तिला हिशेब ठेवण्याचे काम त्याने दिले. तेथे काम करताना, अमेरिकेत उत्तम नोकरी मिळविण्यासाठी जरूर असणारी पात्रता, शिक्षण तिने मिळविले. भारतात असताना सुखासीन आयुष्य जगणारीच्या वाटय़ाला हे खडतर आयुष्य आले ते सुद्धा परदेशात. तिची तपश्चर्या फळाला आली आणि सहा-सात वर्षांनंतर चांगले दिवस आले. एक रांच (एकमजली छोटं अंगण, एक कार ठेवण्याचं गॅरेज असलेलं घर) थोडं कर्ज काढून खरेदी केलं. अमेरिकी माणसाशी लग्न केलं. सुखी, आनंदी जीवन जगत असताना दोन मुलांची आई झाली. आता नातवंडांबरोबर राहताना, तिला आयुष्यात परिस्थितीने दिलेले चटके, पचविलेले ‘कडवे घूँट’ आठवले की, वाटतं त्या सगळ्याशी दोन हात केले म्हणून आज ती राणीसारखी राहते आहे. त्याच कडू घोटांचा गोडवा तिच्या आयुष्यात आला आहे.

– गीता ग्रामोपाध्ये