नवऱ्यामुळे आणि परिस्थितीने काटेकोरांटीचे काटेच झालेली सुलूआत्या, पुढे बदलत गेली.
एक-खंबी संसारासाठी कंबर कसली. मुलांना शिस्तीत वाढवलं. तिच्या स्वभावात आमूलाग्र बदल घडला, इतका की तिच्या धाकटय़ा मुलाच्या मते, आई म्हणजे साडी नेसलेले बाबाच.. काळाबरोबर आत्याच्या स्वभावात काटेकोरांटीच्या काटय़ांपेक्षा फुलं फुलायला लागली होती. उद्याच्या जागतिक मातृदिनानिमित्त आईच्या एका वेगळ्या रूपाबद्दल..

मूल जन्माला घातलं की स्त्रीच्या ठायी आई जन्मते असं म्हणतात. पण ते पूर्ण खरं नाही! ते फक्त शारीर मातृत्व. आईपण, वात्सल्याच्या पलीकडचं जबाबदार आईपण ही नंतरची गोष्ट. प्रत्येक स्त्रीच्या अंतरी कमी-अधिक पुरुषपण असतं (तशी प्रत्येक पुरुषाच्या अंतरी एक स्त्री असते) असं काही मानसतज्ज्ञ मानतात. एखाद्या स्त्रीला परिस्थितीनं ते जागं करावं लागतं. ती सुप्त मातृशक्ती!

7 year old boy drowned in swimming pool marathi news
पुणे: जलतरण तलावात बुडून सात वर्षांच्या मुलाचा मृत्यू, वारजे भागातील दुर्घटना
surya grahan 2024 negative impact of solar eclipse on these three zodiac sign read more
५४ वर्षांनंतर सूर्यग्रहणात तयार होणार दुर्मीळ योग, ‘या’ तीन राशींच्या अडचणी वाढणार?
mukhtar ansari umar ansari
“कट रचून विषप्रयोग केला”, मुख्तार अन्सारीच्या मुलाचे गंभीर आरोप; म्हणाला “तीन दिवसांपूर्वी त्यांनी…”
aarzoo khurana advocate and wildlife photographer documents Indias 55 tiger reserves
वकिली सोडली अन् धरली अनोखी वाट; वाइल्डलाइफ फोटोग्राफीत रमलेल्या आरजू खुरानाची गोष्ट

सुलूआत्याच्या ठायी ती अशीच जागी झाली त्याची ही गोष्ट. सुलूआत्याचं आणि माझं कधी पटलंच नाही. अगदी मी लहान असतानापासून. कारण तिचा खोचक स्वभाव! तिला पाहिलं की मला परसात लावलेल्या काटेकोरांटीची आठवण यायची. दिसायला नाजूक पिवळ्या फुलांच्या काटेकोरांटीला बोचरे काटे फार! तिचं बालपण बहिणींशी भांडणे आणि आईचा मार खाणे यातच गेलं. आजोबा वारले अन् तिच्या शिक्षणाची, एकूणच आयुष्याची जबाबदारी वडिलांवर येऊन पडली. सुलूआत्याचं (इतर आत्यामंडळीप्रमाणे) शिक्षण जेमतेम. नव्या युगात चांगलं जगायचं असेल तर शिक्षण आवश्यक या वडिलांच्या हट्टामुळे मॅट्रिक तरी झाली. लग्नासाठी शाळामास्तर पसंत केला. मुलगा तसा उजळ, देखणा, पण खासगी संस्थेत शिक्षक. पगार जेमतेम. घरचे लोकही जेमतेम.

लग्नाला वर्ष-दोन वर्ष उलटली असतील-नसतील, तो नवऱ्याच्या लहान भावाचं लग्न झालं. घरी भावजय आली. भाऊ दुबळा, बायको मात्र त्याच्या मानानं चलाख, चटपटीत. लवकरच दोघांत खटके उडू लागले. सुलूआत्याच्या नवऱ्यानं भावजयीची बाजू घ्यायला सुरुवात केली आणि बघता बघता तिच्यात गुंततही जाऊ लागला. काय होतंय हे कळायच्या आत, ते एक प्रकरण होऊन बसलं. सुलूआत्याला हे प्रकरण नीट हाताळता येईना. बरोबर आहे, अशा वेळी आवश्यक असणारी मनाची परिपक्वता अचानक तिच्यात कुठून येणार? विवेकाचाही एक रियाझ असतो. वाचन (नाही पुस्तक तर परिस्थितीचं वाचन), मनन, संतुलन हे या रियाझाचे भांडवल. तेच नसलं तर परिपक्वत्तेची अपेक्षा कशी धरावी?

शेवटी व्हायचं तेच झालं. नवरोबाचं वागणं हाताबाहेर गेलं आणि सुलूआत्या दोन मुलांसह भावाकडे परत आली. ‘मी आता परत जाणार नाही’ हे असं तिनं जाहीर करून टाकलं. आयुष्य नावाचा डोंगर अर्धवट चढून ती पुन्हा गडगडत पायथ्याशी आली.

त्या दिवसांत तिचा मूळचा खोचक स्वभाव अधिकच खोचक झाला. आपल्या ऑफिसर भावाची बायको म्हणून फुकट वैभव उपभोगते आहे अशी आधीपासूनच तिची आईबद्दलची भावना. त्यात भर पडली स्वत:च्या मोडल्या संसाराची. येता-जाता ती आईला टोमणे मारू लागली. वडील संध्याकाळी थकून आले की त्यांच्यापाशी वहिनीचे गाऱ्हाणे सांगू लागली. उत्तरं-प्रत्युत्तर यांनी घरातला शांतीरस कळकू लागला. मन:स्वास्थ्य हरपलेली सुलूआत्या चिडचिडी होऊ  लागली. एखाद्या आघाताचा परिणाम माणसाच्या भावनिक परिपक्वतेनुसार वेगवेगळा होतो. विचारी माणूस उदास होतो. अविचारी आणि अपरिपक्व माणसं चिडचिडी होतात. प्रसंगी आक्रमकही होतात. मात्र कालातंराने त्यांची आक्रमकता विझायला लागते. कोंडलेल्या मांजराने पिंजऱ्यावर पंजे मारून मारून थकून जावं आणि जखमा चाटत कोपऱ्यात जाऊन बसावं तशी सुलूआल्या शांत होत गेली. मात्र अधूनमधून तिचा टोचरा स्वभाव पंजा काढायचा.

एकदा शाळेतून येताना तारांच्या कुंपणावर चढून उडी मारण्याच्या नादात मी अचानक पडलो आणि माझ्या हाताचं हाड फ्रॅक्चर झालं. रडतच मोडलेला हात घेऊन मी घर गाठलं. धावाधाव झाली. मला दवाखान्यात भरती करण्यात आलं. वडील ऑफिसचा दौरा अर्धवट सोडून धावत आले. शस्त्रक्रिया झाली. मी अर्धवट गुंगीत होतो. दवाखान्यात सुलूआत्याला आजीशी बोलताना मी ऐकलं, ‘‘नसता हात मोडून घेतला पोरानं. माझ्या भावाला उगाच हजार-पाचशेचा फटका!’’

तिची दोन मुले तशी समंजस होती. थोरला तर अगदीच गरीब. तो सतत जेवत असायचा. घट्ट वरण-पोळी. पोळी संपली की वरण आणि वरण संपलं की पोळी असं त्याचं चालायचं! त्याला सतत स्वयंपाकघरात पाटावर बसलेला पाहून माझ्या कपाळावर आठय़ा पडायच्या. पण आता वाटतं, वडिलांच्या सावलीला पारखा झालेल्या त्याच्या बालबुद्धीनं गोंधळलेल्या उदासीन मन:स्थितीवर, जेवत राहणं हा उपाय शोधला असावा.

धाकटा थोडा चालू असावा. तो गुपचूप खोडय़ा करायचा. परिस्थितीने त्याला थोडा बंडखोर केला होता. ‘जावयाचं पोर, थेट बापावर गेलंय’ अशासारख्या टोमण्यानेही तो चिडखोर झाला असावा.

या सर्व प्रकरणाची योग्य सोय लावण्याचं वडिलांनी ठरवलं. सुलूआत्याला शिक्षकीचा सर्टिफिकेट कोर्स करायला लावला. जिल्हा परिषदेत नोकरी लावून दिली. नेहमी सोयीच्या गावाची शाळा मिळेल असं पाहिलं. सुलूआत्या दोन्ही मुलांना घेऊन स्वतंत्र राहू लागली. आर्थिक स्वातंत्र्य मिळाल्यावर, जगाकडे डोळे उघडून पाहिल्यावर माणूस बदलतो. एखाद्या शाळा न आवडणाऱ्या मुलानं जबरदस्तीनं पहिली-दुसरी-तिसरी करीत करीत मॅट्रिक गाठावं तशी सुलूआत्या जगाच्या व्यवहारात खऱ्या अर्थाने मॅट्रिक झाली. पुढे एका ढांगेत पदव्युत्तर परीक्षाही पास झाली! म्हणजे झालं असं की, आत्तोबाचं वेड हळूहळू ओसरू लागलं. घरच्या सण-विवाह-उत्सवप्रसंगी ते जावई म्हणून सामीलही होऊ  लागले. सुलूआत्याकडे जाऊ-येऊ लागले. पुढे त्यांनी तिला ‘ऑफर’ दिली- माझ्याकडे येऊन राहा. माझी नोकरी आहे. तुझी सोडून दे! सुलूआत्याने ठाम नकार दिला. ‘तुम्हीच लागल्यास इथे येऊन राहू शकता!’ अशी उलट ऑफर दिली.

तिच्या खोचक स्वभावाचं रूपांतर आता एका खंबीरपणात होऊ  लागलं होतं. बोचरेपणा बोथट झाला होता. निर्धाराला धार आली होती. आतली झळ विझली होती. एक आत्मिक बळ आलं होतं.

सुलूआत्याची मातृशक्ती खऱ्या अर्थाने जागी झाली. तिने एक-खंबी संसारासाठी कंबर कसली. मुलांना शिस्तीत वाढवलं. जबाबदारीची जाणीव करून दिली. माणसाची भावनिक परिपक्वता वाढवणं त्याच्या हाती असतं. सुलूआत्यानं माझ्या मते भावनिक साक्षरतेत एक अद्भुत उंची गाठली. मुलं जाणत्या वयात आल्यानंतर तिने कधीही त्यांच्यासमोर नवऱ्याबद्दल वाईट उद्गार काढले नाहीत. त्यांच्या भावनांना जपले. त्यांच्या मनात वडिलांविषयी कटुता निर्माण होईल असे बोलली नाही, कुणाला बोलू दिले नाही.

मुलं शिक्षण पूर्ण करून मोठी झाली. थोरला आयुर्वेदिक डॉक्टर झाला. धाकटा थोडा वांड, त्याला वडिलांच्या मदतीनं नेव्हीत घातलं. त्याच्या दांडगटपणाला शिस्तीचा साचा दिला. मागल्या वर्षी सुलूआत्याची सगळ्यांनी एकसष्टी केली तेव्हा नेव्हीत चीफ ऑफिसर झालेला धाकटा मला भेटला. सुलूआत्याची तुला सुरू होती, तिच्याकडे पाहात म्हणाला, ‘आमची आई म्हणजे साडी नेसलेले बाबाच आहेत! आज मी जो आहे, तिच्या शिस्तीमुळे.’ बोलता बोलता त्याचे डोळे पाणावले.

सुलूआत्यानं स्वत:चं घर केलं. आतोबा निवृत्त झाल्यावर घरी परत आले. रुख्मिणीने विठोबासाठी आपलं मंदिर सोडलं नाही!

एकदा मी गावी गेलो असताना सहज आतोबाला भेटायला आणि घर पाहायला गेलो. आत्यानं घराला बाभळीच्या काटय़ाचं कुंपण घातलेलं होतं. अंगणात काटेकोरांटी मस्त फुललेली होती!

डॉ. नंदू मुलमुले nandu1957@yahoo.co.in