18 January 2019

News Flash

बाकी क्षेम!

वर्षांचा काळ तसा मोठा असतो.

वर्षांचा काळ तसा मोठा असतो. पृथ्वी आपला अजस्र देह सांभाळीत स्वत:भोवती गिरक्या घेत, थंडी-ऊन-पाऊस अंगावर घेत एक प्रदक्षिणा घालते सूर्याला! अर्थात हा झाला भौगोलिक स्थित्यंतराचा वार्षिक लेखाजोखा. मात्र या ‘चतुरंग’ लेखमालेच्या काळ-काम-वेगात हे वर्ष कसं गेलं कळलंही नाही ही वस्तुस्थिती! मनाच्या विश्वात रागलोभ, द्वेष, मत्सर, प्रेम यांचे ऋतू येतात, जातात. आशा-निराशेच्या ऊन-सावल्यांचा खेळ चालू असतो. आनंद-दु:ख यांचे दिवस-रात्र उगवतात, मावळतात. या मनोविश्वाच्या विस्ताराचा एक छोटा आढावा मी या लेखमालेत घेण्याचा प्रयत्न केला.

मानसिक समस्यांची व्याप्ती प्रचंड आहे. रूढार्थाने मनोरुग्ण नसलेले अनेक समस्याग्रस्त लोक आहेत, ज्यांच्या समस्यांना वाचा फोडण्याचं काम हे वृत्तपत्र करीत आलं आहे. त्यासोबत आपसूक घडून येणारी गोष्ट म्हणजे, या समस्या अनेकांना असतात, त्यात ‘मी एकटा नाही’ हे सांगण्याचं आश्वासक काम अशा लेखमालेतून होतं. व्यक्तीची विवंचना समष्टीने भागली गेली की तिची तीव्रता आपोआप कमी होते. माझ्या दु:खाचा सांगाती कोणी तरी आहे, हे सुखही अशावेळी पुरेसं असतं. ही लेखमाला सुरू झाल्यापासूनच तिच्या संवेदना प्रवाहात तिने अनेकांना सामावून घेतलं हे वाचकांच्या प्रतिक्रियेवरनं समजलं, मात्र त्याहून महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या वैयक्तिक वेदना या वैश्विक आहेत हेही कळलं. ‘ज्या गोष्टींना आम्ही अगदी व्यक्तिगत समजतो त्या सगळ्यात जास्त वैश्विक असतात’ हे कार्ल रॉजर्स या मानसतज्ज्ञाचं वाक्य अशावेळी प्रत्ययाला येतं.  मानवी व्यथांच्या कहाणीने मलाही तेच शिकवलं.

या लेखमालेनं मला हे नवीन ज्ञान प्राप्त झालं की, तुमची भाषा, कथनशैली, अनुभव मांडण्याची पद्धत लोकांनी आपलीशी केली की त्यांना त्यात ‘आपलेपणा’ वाटू लागतो. त्यात अनेकांना आपल्या समस्येची छाया दिसते. आपल्या समस्या कुणा तज्ज्ञ व्यक्तीला नेमक्या समजल्या आहेत असं वाटू लागतं. समस्या मांडणारा लेखक हा असा सहप्रवासी, सहोदर, संवेदनशील सखा होऊन जातो. सगळ्या समस्यांना झटपट उत्तरं नसतात. काही समस्यांना उत्तरंच नसतात. काही समस्या या वेगळ्या नजरेनं पाहिलं तर समस्या नव्हत्याच असं लक्षात येतं. ताण परिस्थितीमुळे नाही, आमच्या मन:स्थितीमुळे निर्माण होतो हे अशावेळी प्रत्ययाला येतं. काही वेळा समस्या सहृदय भावनेनं, तद्नुभूतीनं ऐकणं हाच न सुटणाऱ्या समस्येवरचा उपाय असतो. समस्याग्रस्त माणसाला आपलं मन मोकळं करायचं असतं. कदाचित आपल्या समस्येवर झटपट उपाय नाही हेही त्याच्या लक्षात आलंच असतं.

परस्पर नातेसंबंध ही मानसिक आरोग्याशी निगडित महत्त्वाची बाब. आयुष्यात आनंद हवा असेल तर अन्न-वस्त्र-निवारा-आर्थिक स्थैर्य यासोबतच तुमच्या भोवतालचे आप्त-स्वकीय-मित्र यांच्याशी पूरक, संवादी नाते हवे, हे जागतिक स्तरावर मान्य केले गेलेले तत्व. त्यासाठी संवाद हवा. संवादात वाद अध्याहृत आहे. वाद चालेल, थोडा विसंवादही चालेल, पण असंवाद घातक. संवादाअभावी पालक मुलांपासून, पत्नी-पती एकमेकांपासून, राज्यकर्ते जनतेपासून आणि माणूस माणसांपासून तुटून जातात. या सदराच्या निमित्ताने अनेक वाचकांशी संवेदनेचे संवाद स्थापित झाले, हे मला महत्त्वाचं वाटतं. अनेक मान्यवरांनी माझ्या लिखाणातल्या विज्ञानामागील लालित्याचे कौतुक केले! असंख्यांनी साद-प्रतिसाद दिला, त्यात प्रत्येक लेख साक्षेपाने वाचून त्यावर संतुलित पण स्वतंत्र मत व्यक्त करणारे नयन बाराहाते, आशुतोष जोशी आदींचे चिंतन-विश्लेषणही मला मार्गदर्शक ठरले.

मनोव्यथाग्रस्तांची मानवीय बाजू हा नेहमीच मला आकर्षित करणारा विषय, तोच या लेखमालेचा विषय. विकारांची शास्त्रीय मांडणी करणारे अनेक तज्ज्ञ आहेत, आणि तेही लेखन गरजेचे आहे यात शंका नाही. पण माझ्या ‘लेखक’ मनाला विकाराभोवतालच्या माणसांकडे पाहाण्यात जास्त रुची! बहुसंख्य वाचक अशा लेखनात आपल्या आयुष्यातील समस्यांची उत्तरे शोधत असतात. लेखकाने मांडलेला मुद्दा आपल्याच आयुष्याचा आहे, हा लेख डॉक्टरने आपल्यावरच लिहिला आहे, आमच्या घरातलं तुम्हाला कसं कळलं? असं म्हणेपर्यंत हे लेखन वाचकांना आपलंसं वाटलं, कारण त्या सगळ्या समस्या आपल्या रोजच्या जीवनातल्याच आहेत. त्यामुळे मग त्यातून मार्ग काय यावर मार्गदर्शन-सल्ला-उपचार मागणारे अनेक.

या लेखमालेदरम्यान मला थेट अमेरिका, ऑस्ट्रेलियाहून समुपदेशनासाठी विनंतीचे फोन आले. त्यात आता तांत्रिक सोयीमुळे अंतराची आडकाठी उरली नाही. आता एका संवादाने कुणाचे आयुष्य बदलत नाही हे खरं, पण त्याबद्दलची दिशा मिळू शकते हेही खरं! आम्ही बदलू शकतो का? हा सनातन प्रश्न! माणसाचा बुद्धय़ांक जन्मत:च निश्चित असतो, मात्र त्याचा भावनांक बदलू शकतो. दहा वर्षांच्या मुलाची किडनी ५० वर्षांच्या माणसाच्या किडनीइतकीच कार्यक्षम असते, मात्र तेच आपल्या मेंदूबाबत म्हणता येणार नाही. कारण मेंदू-मन हे आयुष्यभर विकसित होण्याची अद्भुत क्षमता असलेले अवयव आहे. मनाची ही भावनिक उत्क्रांती माणसानं आयुष्यभर चालू ठेवली पाहिजे. पत्ते खेळणारा जसा प्रत्येक खेळीनंतर पुन्हा पुन्हा आपले पत्ते पिसतो, क्रमाने लावतो, तसे आपले विचार, भावना पिसून नव्याने लावता आल्या पाहिजेत.

आमच्या आयुष्यात एकेकाळी पत्रलेखनाचा एक कालखंड होऊन गेला. त्या काळात, कार्डाचा पुरेपूर वापर करीत आपल्या सुहृदांजवळ सगळ्या तक्रारी मांडल्या जायच्या, पण पत्राचा शेवट मात्र एकाच वाक्यानं व्हायचा, ‘बाकी सर्व क्षेम! समस्या कधी संपत नाहीत, पण सर्व कथा-व्यथातून शेवटी समाधानाचं हे एकच वाक्य उरावं – बाकी सर्व क्षेम! कारण या ‘बाकी’त सारं आयुष्य सामावलेलं असतं. जीवनाच्या बेरीज-वजाबाकीत शेवटी हातचा उरला क्षण समाधानाचा नसला तर सगळंच व्यर्थ. तुकोबाही शेवटी ‘चित्ती असू द्यावे समाधान’च म्हणाले. समाधानाचा अंत:स्तर केवळ निवृत्तीत नव्हे, तुमच्या वृत्तीतच असेल, तर अवघे आयुष्य एक आनंदयात्रा होईल. तशी ती तुमची होवो, ही सदिच्छा व्यक्त करतो आणि या लेखमालेपुरता निरोप घेतो.

जाते है शाख शाख को देते हुए दुआ

आंधी से बच गये तो इसी रुत मे मिलेंगे!

 

डॉ. नंदू मुलमुले

nandu1957@yahoo.co.in

(सदर समाप्त)

First Published on December 23, 2017 4:40 am

Web Title: dr nandu mulmule 2017 last marathi articles in chaturang