News Flash

कोणा कशी कळावी..

प्रेम ही तशी आदिम भावना. मात्र ती मूळ प्राथमिक भावना नव्हे!

‘‘डॉक्टर, माझ्या ‘ब्रेन’ला हे चूक आहे समजतं, पण माझं ‘हार्ट’ किनई, ऐकतच नाही!’’ प्रेमात पडलेली आठवीतली ती जेमतेम तेरा-चौदा वर्षांची मुलगी मला सांगत होती, अन् तिच्या नेमकेपणानं भावना व्यक्त करण्याच्या कसबाचं कौतुक करावं की आठवीतच हे ‘दिवे लावल्याबद्दल’ तिच्या आई-वडिलांसारखीच कानउघाडणी करावी हे मला कळत नव्हतं! तशी पहिली प्रतिक्रिया कौतुकाचीच होती, कारण ब्रेन म्हणजे बुद्धी आणि हार्ट म्हणजे भावना यातला संघर्ष आपल्या मनात चाललाय याची जाणीव होणं हुशारीचंच लक्षण! एका कोवळ्या, निरागस मुलीच्या मनात चाललेले प्रेमभावनेचे ते मानसिक-जैविक-रासायनिक खेळ मला स्तिमित करीत होते.

प्रेम ही तशी आदिम भावना. मात्र चार्ल्स डार्विनच्या मते ती मूळ प्राथमिक भावना नव्हे! उत्क्रांतीच्या ओघात ती माणसात नंतर निर्माण झाली. तिचं मूळ वंशसातत्याचं. त्यामुळे आजही प्रेमाचा उगम आपल्या प्रगत मेंदूत नाही तर मेंदूच्या प्राणिज भागातच होतो. म्हणूनच सुरुवातीच्या टप्प्यावरचे झपाटलेपण, आकर्षण, भावनावेग, उत्कटता हे सगळे प्राणिज भावनांचे आविष्कार. (‘सावज’ हेरून विचारपूर्वक प्रेमात पडणारे व्यावहारिक प्रेम वेगळे!) त्यात पौगंडावस्थेतले प्रेम म्हणजे संप्रेरकांची उसळती कारंजी!

हे सर्व बदल घडून येतात ‘डोपामीन’ या चेता-रसायनामुळे. या डोपामीनमुळेच सारा आसमंत रंगीबेरंगी होतो, ‘आजकल पाव जमींपर, नही पडते मेरे’सारखे हलके वाटू लागते. मुलीच्या आई-वडिलांसाठी मात्र तो कसोटीचा काळ होता. चौदा वर्षांचं ते अडनिडं वय. आई संभ्रमित, वडील रागात. अशा समस्येला तोंड देताना पालकांच्या परिपक्वतेची परीक्षाच होते. त्यांचे प्रत्येकाचे मूळ संरक्षक पवित्रे आपोआप अंगावर चढतात. त्यात क्रोध हे सगळ्यात सोपं अस्त्र. ते वडिलांनी त्वरित चढवलंच होतं. ‘‘कशाचं आलं प्रेम? त्या बदमाश पोरानं आमच्या पोरीला फितवलं आहे दुसरं काय? अन् या मूर्ख पोरीला अक्कल नाही!’’

त्यांचं म्हणणं एका अर्थानं खरंच होतं, कारण अक्कल म्हणजे सारासार विचार असं गृहीत धरलं तर ती अक्कल वयाच्या तुलनेत जरा उशिराच येते. कारण मनाला ती देणारा मेंदूचा ‘प्रमस्तिष्क’ हा भाग तोवर अविकसितच असतो. त्यामुळे मुलांना आपलं बरं-वाईट कळत नाही हे खरंच आहे. त्या वयापर्यंत आई-वडीलच त्यांचा प्रमस्तिष्क व्हायला हवेत.

‘‘तुला केव्हा भेटला तो पहिल्यांदा?’’ मी तिला एकांतात विश्वासात घेत विचारलं, तसे तिचे डोळे चमकले. ‘‘मी रोज बसने जायची शाळेत. एक दिवस उशीर झाला. तो मोटारसायकलवर होता, त्यानं सोडलं मला. तेव्हाच मला आवडला तो!’’ पहिल्या भेटीत प्रेम जडल्याची ती ग्वाही देत असली तरी त्यात बव्हंशी नवलाई, उत्सुकता, साहसाची भावना असणं उघड होतं. ते मला, आई-वडिलांना उथळ वाटत असलं तरी तिच्या भावविश्वात ते महत्त्वाचं होतं. नव्हे, त्या प्रेमभावनेनं तिचं विश्व व्यापून टाकलं होतं. त्यातून तिला बाहेर काढणं, स्थिती-परिस्थितीचं भान देणं, एक  त्रयस्थ दृष्टी देणं महत्त्वाचं होतं. नववीतल्या मुलीच्या आकलनशक्तीच्या मर्यादा लक्षात घेता तिला यातून बाहेर कसं काढायचं? तिच्या वागणुकीतला फोलपणा, अपरिपक्वता कशी समजावून सांगायची? ‘‘तुला तो रोज भेटतो का?’’ मी तिच्या प्रेमकहाणीची लांबी-रुंदी मोजणं सुरू केलं.

‘‘पूर्वी भेटायचा, आता नाही भेट होत. आता बाबा मला शाळेत सोडतात,’’ तिनं व्यथा मांडली. तिच्या प्रेमाचे तपशील विचारायचा ‘वाह्य़ातपणा’ घरी कुणी केलाच नव्हता, तो मी करायला सुरुवात केली. ती उत्साहानं सांगू लागली, ‘‘तो बेचैन असतो सतत. मीही. पूर्वी मी मोबाइलवरनं मिनिटा-मिनिटाला मेसेज करायचे, पण मोबाइल काढून घेतलाय बाबांनी. आईच्या मोबाइलवरून आता चोरून मेसेज करते, डिलीट करून टाकते!’’

‘‘मग आता कुठे भेटतेस?’’

‘‘कधी टय़ूशनला, कधी मैत्रिणीच्या बर्थडे पार्टीला. त्याच्या सोबतच बरं वाटतं. नाही भेट झाली की काही सुचत नाही. संशय ही येतो त्याचा, कुण्या मैत्रिणीबरोबर असेल..!’’ तिनं प्रेमकहाणीचा पट मांडला, अन् मला त्यात अपरिपक्व प्रेमाची सगळी लक्षणं दिसायला लागली. प्रेमाचे टप्पे तीन. पहिले ओळख-जवळीक, मग भावनिक गुंतवणूक-आवेग, अन् कहाणी पुढे गेलीच तर निष्ठा! हिला मेंदू-रसायनांच्या खेळानं अल्पावधीत प्रेमाच्या दुसऱ्या टप्प्यावर आणून सोडलं होतं. अपरिपक्व प्रेमाचा हा दुसरा भावनिक टप्पा धोक्याचा. परिपक्व प्रेमभावना पाच-पाच मिनिटांचे हिशेब मागत नाही, सढळ मोकळीक देते. कुणाचं व्यक्तिमत्त्व गिळंकृत करीत नाही, स्वतंत्र फुलू देते. खऱ्या प्रेमात दोनांचे एक होत नाहीत, एकमेकांचे दोन राहतात. व्यक्तित्वाचा विलय करणं म्हणजे पराकोटीचं परावलंबित्व! ते घातक आहे. कारण प्रेमभंग झाला की हातात काहीच उरत नाही. अर्थशास्त्रातली आर्थिक काय किंवा नातेसंबंधातली भावनिक काय, ऊर्जा विविध खात्यांत विभागून गुंतवणं हिताचं. दुर्दैवाने वाटेला फाटे फुटले आणि हात सुटले तरी इतर आधार हाताशी राहतात. एक तर प्रेमात आणि व्यसनी माणसात, दोहोत ‘डोपामीन’ या एकाच मेंदू-रसायनाचा अतिरेक होतो, त्यामुळे व्यसनी माणसाची सगळी लक्षणं प्रेमात दिसतात! म्हणूनच ही नशा सुटणं कठीण!

‘‘हे बघ, तुझं ‘हार्ट’ ऐकत नाही हे तुझ्या ‘ब्रेन’ला समजतं ही चांगली गोष्ट आहे! म्हणजे कुठे तरी एक आतला आवाज सांगतोय तुला, हे बरोबर नाहीय. तो आवाज मोठा कर. त्याचं ऐकत जा. ‘हार्ट’ आज ऐकत नसेल, उद्या ऐकेल!’’ तिला या वयातल्या अपरिपक्व प्रेमाचे खाचखळगे सांगत मी समजावलं. ‘‘प्रेम करता करता जे काही चाललं आहे तेही समजून घे. प्रेम करणारी वेगळी आहे, तू वेगळी आहेस!’’ मी तिला निरिच्छ दृष्टी देण्याचा प्रयत्न केला.

विवेक शिकवणारा, नैतिक काय अनैतिक काय हे सांगणारा मेंदूचा थर मुलांमध्ये उशिरा तयार होतो. तोवर हे विवेकी हेल्मेट पालकांनी मुलांना घालायचे असते! त्यासाठी मुलांशी सतत संवाद हवा. खेळकर शिस्त हवी, बंदिस्त सक्ती नको. मोकळीक हवी. मोकाटपणा नको. मी आई-वडिलांकडे मोहरा वळवला. आई धास्तावलेली होती, वडील आक्रमक. असं वादळी आव्हान पेलतांना त्या वादळाचा उगम, त्याची व्याप्ती, इथून पुढची दिशा याचं ज्ञान जरुरीचं! शिवाय योग्य ती पावलं उचलायला आपली सारासार बुद्धी शाबूत ठेवणं, आपल्या प्रतिक्षिप्त भावनांची जाणीव करून घेणं, तिच्या भावना समजून घेणं आणि त्या पुरेशा परिपक्वतेनं हाताळणं, ही सगळी व्यवधानं पालकांनी सांभाळणं महत्त्वाचं.

‘‘पहिली गोष्ट म्हणजे क्रोधाचं शस्त्र बाजूला ठेवा. नाजूक शल्यक्रियेला शस्त्रापेक्षा कुशल हातांची जास्त गरज असते. सबुरीची, संवेदनशीलतेची गरज असते. तुमच्या मुलीला डोक्यात डेंग्यूचा ताप झाला असता, तर तुम्ही तिच्यावर रागावला असता का? ती पौगंडावस्थेतल्या संक्रमणातून जाते आहे. हा प्रवास म्हटलं तर खूप सुंदर, म्हटलं तर खाच-खळग्यांचा आहे. तो तिचा तिलाच करायचा आहे. तुम्ही काय करू शकता? आपल्या लेकीशी मोकळी चर्चा करा. शक्य असेल तर त्या मुलाशी, त्याच्या पालकांशी बोला. संवादाने नात्यात सहजता येते, चोरटेपणा नष्ट होतो. बंदिस्त सक्तीने संवाद संपतो. तो संपला की दुरावा वाढतो.  हा संवादाचा हात सुटू देऊ  नका!’’

प्रेमभावनेनं भारलेल्या माणसाला मेंदूची चेतारसायनं फिरवतात. त्यांचं उद्दिष्ट आजही आदिमच आहे, वंशसातत्य! पण आज माणसाचं उद्दिष्ट ते नाही. आज त्यावर विवेकी मेंदूचा थर चढायला हवा. तो अनेकांजवळ नसतो, पौगंडावस्थेतल्या मुलांची गोष्टच सोडा. चेता-रसायनांचा खेळ ओळखणं आणि त्याची जाणीव त्यांना करून देणं हेच पालकांचं काम. ते करताना ‘वेडात काय गोडी’ समजून घेणारं ‘हार्ट’ हवं आणि ती ‘प्रेम-मूढतेची गूढ कोडी’ सोडवणारं ‘ब्रेन’ही हवं!

डॉ. नंदू मुलमुले

nandu1957@yahoo.co.in

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2017 1:07 am

Web Title: dr nandu mulmule article about love
Next Stories
1 न मिळणाऱ्या गोष्टीचं अप्रूप
2 सत्याचा स्वीकार!
3 जरा विसावू या वळणावर..
Just Now!
X