भावनिक परिपक्वता हा तर आयुष्यभराचा रियाझ. कितीही स्वर घोटले तरी योग्य वेळी योग्य स्वर लागतीलच याची खात्री नाही. मग त्यात मुलांना न झेपणाऱ्या पट्टीत गायला लावणारे पालक त्यांचं जीवनसंगीत बेसूर करून टाकतील यात काय शंका? मुलांची पट्टी ओळखणं, त्यांचं घराणं (कला की क्रीडा की विज्ञान) ओळखणं इथे पालकांचीच परिपक्वता कसोटीला लागते. मात्र उत्क्रांतीची घाई झालेल्या पालकांना कोण समजावणार!

‘येथे नैसर्गिकरीत्या पिकवलेली केळी मिळतील’ ही पाटी पहिल्यांदा वाचली तेव्हा मी थोडा अचंबितच झालो. अशी जाहिरात करावी लागते, कारण नैसर्गिक क्रियेला लागणारा वेळ कमी करण्याच्या बाजारस्पर्धेत, कच्ची फळं कार्बाइडच्या भयंकर उष्ण द्रावणात टाकून रातोरात पिकवली जातात हे अभद्र तंत्रज्ञान! अशा केळींचे घड पिवळेधम्म दिसतात, मात्र त्यांचे देठ हिरवे राहतात. अकाली पिकवलेली ही केळी खायला घातक असतात.

परीक्षेच्या भीतीने भयग्रस्त झालेल्या दहावीच्या साकेतला पाहिल्यावर मला हीच गोष्ट आठवली. आईबाप सुखवस्तू. पोराच्या प्रगतीची वाट काटेकोर आखून त्याबरहुकूम त्यानं उडय़ा मारत धावावं अन् डॉक्टर होण्याचं लक्ष्य गाठावं ही अपेक्षा, नव्हे खात्री असलेले. मात्र चिंतेने अकाली प्रौढ झालेल्या चेहऱ्याचा हा पोरगा शरीरानं लहानखुरा दिसत होता.

‘‘काय त्रास आहे याला?’’ मी.

‘‘डॉक्टर त्याला नं अभ्यासाचं काहीच लक्षात राहात नाहीए. अभ्यास खूप करतो. सारखं पुस्तक असतं डोळ्यासमोर, पण चाचणी पेपर समोर आला की काही आठवत नाही. आता तर परीक्षेच्या नावानंही घाबरतो. शिकवणीच्या क्लासला जात नाही म्हणतो, अन परीक्षा तर आलीय आठ महिन्यांवर!’’ आई श्वास घेण्यासाठी थांबली अन् मी विचार केला, शैक्षणिक सत्रच एकूण नऊ महिन्याचं. त्यात प्रवेश घेतल्यापासूनच पालकांनी पोराच्या उपग्रहाचं काऊंटडाऊन सुरू केलंय. ही उलट गणती यांत्रिक अवकाशयानासाठी ठीक आहे, पण दहावीतल्या घाबरलेल्या मुलाची आत्तापासून वात पेटवून ठेवण्यात काय अर्थ आहे?

त्याच्यासमोर परीक्षेची चर्चा नको म्हणून मी आईला बाहेर पाठवलं. एव्हाना तो थोडा शांत झाला होता. साकेत अकाली प्रौढ दिसत होता.

‘साकेत, तू सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत काय काय करतोस?’ संवाद सुरू करण्यासाठी सहज विचारलेल्या या प्रश्नाच्या उत्तरादाखल त्याने जो दिवसभराचा व्यस्त क्रम सांगितला, त्याने मीही चक्रावलो. शाळा आणि शिकवणी यात स्वतसाठी त्याला फुरसतीचे चार क्षणही नव्हते. त्याला शिकवलेलं समजत नव्हतं असं नाही, मात्र विषयांची व्याप्ती त्याला दम आणत होती. एक हाती घ्यावं तर दुसरं आठवत होतं, ते वाचावं तर तिसरं खुणावत होतं. त्यामुळे तो अस्थिर, बचेन झाला होता. मेंदू थकल्याची ही लक्षणे होती. वाचन, श्रवण हे मेंदूचं खाणं असेल तर चिंतन-मनन हे चर्वण. तोंडात कोंबलेल्या अन्नाचं पचनाशिवाय ऊर्जेत रूपांतर होत नाही, नुसत्या वाचन-श्रवणाने माहितीचं ज्ञानात रूपांतर होत नाही. त्यासाठी निवांतपणा हवा. तो नसला तर मेंदू चिडचिडा होतो. त्याची शक्ती कमी होते. एका ठरवीक उत्तेजनेनंतर मेंदूच्या चेतापेशी सततच्या संदेश वहनाने थकतात. त्यांच्या रासायनिक कुप्या रिकाम्या होतात. त्या भरायला वेळ लागतो.

या सर्व चच्रेत मला राहून राहून साकेतच्या किरकोळ प्रकृतीचं गूढ वाटत होतं. मानसिक क्षमता जाऊ द्या, याची मेरिटच्या अभ्यासाची शारीर क्षमता तरी आहे का हा प्रश्न पडत होता. हा मुलगा सोळा वर्षांचा वाटत नव्हता. शेवटी न राहवून मी आईला छेडलं. साकेतला बाहेर पाठवून ती दबक्या आवाजात बोलली, ‘त्याचं काय आहे, साकेतचा जन्म माझ्या माहेरगावी झाला. जन्मल्यापासून हुशार, मग आम्ही जन्मदाखल्यावर मागली तारीख टाकून तिसऱ्या वर्षीच त्याला पहिलीत बसवलं. वाटलं, पटापट दहावी गाठेल, इतरांच्या पुढे राहील! आठवीपर्यंत खूप छान चाललं होतं. नववी थोडी अवघड गेली, अन् दहावीत असं! त्याचे वडील सारखे लक्ष ठेवून असतात त्याच्या प्रगतीवर. त्यांनाही धक्काच बसलाय!’ आई-वडिलांच्या अपेक्षेला तडा गेल्याचं दुख करीत होती अन् मला पालकांच्या या राक्षसी महत्त्वाकांक्षेने सुन्न करून टाकलं होतं.  जेमतेम साडेतेरा वर्षांच्या मुलावर दहावीच्या अभ्यासक्रमाचा भार टाकणारे पालक पाहून मला हसावं की रडावं कळेना.

माणसाच्या उभ्या-आडव्या हयातीला तिसरी मिती आहे काळाची. मेंदूची वाढ ही कालबद्ध असते हे विकासाचं मानसशास्त्र सांगतं. मूल जन्माला येतं ते मेंदूत टिकटिकणारं एक जैविक घडय़ाळ घेऊन. वयाच्या सहा महिन्याआधी वस्तू-सातत्य म्हणजे दृष्टीआड गेलेल्या वस्तूंनाही अस्तित्व असतं हे त्याला कळत नाही. वयाच्या तीन वर्षांआधी आप-पर भाव, मी आणि हे जग वेगळं आहे हे समजत नाही. वयाच्या सहाव्या वर्षांपूर्वी तर्कबुद्धी येत नाही, वयाच्या सातव्या वर्षांआधी सामान्यत अमूर्त कल्पनांचे आकलन नसते. म्हणून बीजगणितासारख्या अमूर्त विषयांचा अंतर्भाव इयत्ता सातवीच्या पुढे होतो.  हे सर्व वाढीचे टप्पे कालबद्ध असतात. ते घडवून आणणारं जैविक घडय़ाळ फास्ट फॉर्वर्ड करता येत नाही.

जन्मल्यापासून प्रत्येक मूल एका अर्थाने आदिमानवापासून आधुनिक माणसापर्यंतच्या उत्क्रांतीच्या टप्प्यांची संक्षिप्त स्वरूपात उजळणी करीत असतं. ही उत्क्रांती फरफरा ओढत आणता येत नाही. भावनिक परिपक्वता हा तर आयुष्यभराचा रियाझ. कितीही स्वर घोटले तरी योग्य वेळी योग्य स्वर लागतीलच याची खात्री नाही. मग त्यात मुलांना न झेपणाऱ्या पट्टीत गायला लावणारे पालक त्यांचं जीवनसंगीत बेसूर करून टाकतील यात काय शंका? मुलांची पट्टी ओळखणं, त्यांचं घराणं (कला की क्रीडा की विज्ञान) ओळखणं इथे पालकांचीच परिपक्वता कसोटीला लागते. मात्र उत्क्रांतीची घाई झालेल्यांना कोण समजावणार!

‘तुमचा मुलगा हुशार आहे, मात्र त्याच्या वयाइतकाच! त्याला कार्बाईडच्या द्रावणात बुडवून अकाली पिकवू नका.’ साकेतच्या आईपुढे मीच समस्या मांडली.

‘मग आता काय करता येईल?’

‘त्याला एखादं वर्ष मागे ठेवलं तर ?’ मी प्रस्ताव मांडला. साकेतची आई घुटमळली. ‘पण डॉक्टर, त्याच्या मनावर ड्रॉपचा आघात नाही का होणार? त्यानं हे अपयश मनाला लावून घेतलं तर?’

‘त्याला आपण विश्वासात घेऊन त्याच्या वयाची कल्पना देऊ. उलट थोडी उसंत मिळाल्याचं त्याला हायसंच वाटेल! तुम्हालाही गाथा वाचायला वेळ मिळेल!’ मी हसून बोललो.

‘गाथा?’ मातोश्रींच्या चेहऱ्यावर अनाकलनाचे भाव तरळले. ‘सोळाव्या शतकात तुकाराम नावाचे महाकवी होऊन गेले. त्यांनी लिहून ठेवलेलं वाचता येईल,’ बोलण्यात खवचटपणा न येऊ देण्याचा आटोकाट प्रयत्न करीत मी पुढची ओवी ऐकवली!

‘फळ देंठीहून झडे / मग मागुते नं जोडे/

म्हणऊनि तांतडी खोटी,कारण उचिताचे पोटी !’

डॉ. नंदू मुलमुले nandu1957@yahoo.co.in