22 January 2018

News Flash

घोटभर सुख!

नशिबाने दोन परस्परविरोधी स्वभावांची मोट एकत्र बांधली होती.

डॉ. नंदू मुलमुले | Updated: April 1, 2017 12:08 AM

नशिबाने दोन परस्परविरोधी स्वभावांची मोट एकत्र बांधली होती. गर्भधारणेवर फारसे इलाज नव्हते तसे याही समस्येवर नव्हते. अनेक उपाय करून झाले, शेवटी निरुपाय हाच अंतिम इलाज उरला. मग सुरू झाली आयुष्य नावाची मैलोन्गणती लांब पायवाटेची चढण. मुंबईचे रिपोर्ट आल्यापासून गोविंदकाकांचं अवसान गळालंच होतं, त्यांचा होता नव्हता तो समंजसपणाही आटून गेला. उरले ते बोचरे खडक..

एखाद्या माणसाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांना दु:ख व्हावं, शोक व्हावा हे साहजिक, पण तो शोक व्यक्त करण्याचा कालावधी किती असावा याचं मोजमाप काय? असा शोक जास्तीत जास्त सहा महिने असावा, असं मानसशास्त्र सांगतं. सहा महिन्यांहून अधिक काळ हा शोक तुमच्या दैनंदिन कर्तव्यात अडथळा आणत असेल तर तो मनोविकार कक्षेत येतो.

पण शोक अजिबातच न होणं मनोविकार कक्षेत येतं का? कुणास ठाऊक! गोविंदकाका आणि सुमित्राकाकूंच्या कहाणीत मला या प्रश्नाचं महत्त्व जाणवलं. काळ विसाव्या शतकातल्या साठीचा, पण समस्या आजही तशीच तरुण. अशा समस्या कुठे म्हाताऱ्या होतात! फक्त रूप बदलतात एवढंच.

गोविंदकाका मोठा तालेवार माणूस. चार भाऊ , तीन बहिणींतले धाकटे. शिक्षणात लक्ष कमी, पण तालमीची आवड. शरीर कमावलेलं. तरुणपणी कुस्त्याही खेळलेल्या. मूळचा स्वभाव समंजस नसला की शिक्षणाअभावी अशा माणसांना तारतम्य कमी असतं. मग शरीरसौष्ठव पुंडाईपुरतंच उरतं. मोठे भाऊ  वकील, घरी भरपूर शेती. लग्न झालं, सुमित्राकाकूनं नवऱ्याच्या घरात प्रवेश केला अन् कोपऱ्यातली मुसळासारखी मुदगल पाहूनच तिच्या लक्षात आलं; बिनशिक्षणाच्या पहिलवान गडय़ाशी आपली गाठ पडली आहे! गोविंदकाकांचा स्वभावही तापट, त्यामुळे संसाराच्या रिंगणात सदैव अंपायर तेच, विनर तेच!

सुमित्राकाकूंचा आवाज चांगला होता. माहेराहून रुखवतासोबतच त्यांनी पेटीही आणली होती. त्या पेटीवर बऱ्यापैकी सफाईनं बोटं टाकीत त्या भजनं म्हणत; पण बराचसा रियाज गोविंदकाका घरी नसतानाच चाले, कारण गोविंदकाकांचा आणि गाण्याचा संबंध गौरी-गणपतीच्या आरत्यांपुरताच.  सुमित्राकाकूंच्या गाण्याचं कधी कौतुक झालं नाही.

सुमित्राकाकू विणकामही छान करीत.  कुंडय़ात माती इतकी छान भरत, की तुळशीच्या मंजिऱ्या तरारून येत. शेवंती रोज ताज्या सोनफुलांनी कुंडी भरून टाके. टाकाऊ कोऱ्या कागदांची दाभणाने शिवलेली त्यांची एक वही होती. टपोऱ्या वळणदार अक्षराने तीत त्या भक्तिगीतं लिहीत. सगळ्या नातेवाईकांचे पत्तेही इतक्या संगतदार लिहीत, की थोरले दीर लग्नसराईत पत्र पाठवायला आवर्जून ती वही मागवत.

त्या भरल्या वाडय़ात गोविंदकाकांच्या वाटय़ाला पहिल्या मजल्यावरच्या दोन खोल्या आल्या होत्या, त्या सुमित्राकाकू टापटिपीने ठेवीत. आमसूल टाकून केलेली तुरीच्या फोडणीची आमटी हा तर सुमित्राकाकूंचा कॉपीराइट पेटंट! गोविंदकाकांच्या लेखी या गोष्टींची दखल घेणं म्हणजे बायकीपणा! त्यांना त्यात गम्य नव्हतं, त्यामुळे कौतुकाचा प्रश्नच नव्हता. त्या काळी उघड कौतुक हा रिलेशनशिप जपण्याचा मॅनेजमेंटी फंडाही नव्हता. त्यांचा बव्हंशी वेळ गावकुसाची खबर घेण्यात जाई. रात्री थकून छपरी पलंगावर पडल्यावरच नवराबायकोची वर्तुळं एकमेकांना अल्पसा काय तो छेद देत असतील-नसतील.

लग्नाला दोन वर्षे लोटली, सुमित्राकाकूंची कुठलीच ब्रेकिंग न्यूज येईना. गावकक्षेतल्या वैद्यकीय तपासण्या झाल्या. जिल्हा गाठून औषधे घेऊन झाली. शेवटी गोविंदकाकांनी मुंबई गाठली. त्या काळच्या आधुनिक तपासण्या झाल्या. सुमित्राकाकूंमध्ये काही दोष दिसेना. गोविंदकाकांची तपासणी केली. निष्कर्ष आला, शुक्राणूंची संख्या कमी आहे. त्यात, बीजांडात शुक्राणूंच्या विरोधी प्रतिरोधक ‘अ‍ॅन्टीबॉडीज’ निर्माण होतात. थोडक्यात काय, स्त्री-पुरुष बीज ‘इनकॉम्पॅटिबल’ आहेत. त्यांच्यात पूरकता नाही. असा निष्कर्ष काढला गेला.  नशिबाने दोन परस्परविरोधी स्वभावांची मोट एकत्र बांधली होती.

गर्भधारणेवर फारसे इलाज नव्हते तसे याही समस्येवर नव्हते. अनेक उपाय करून झाले, शेवटी निरुपाय हाच अंतिम इलाज उरला. मग सुरू झाली आयुष्य नावाची मैलोंगणती लांब पायवाटेची चढण. मुंबईचे रिपोर्ट आल्यापासून गोविंदकाकांचं अवसान गळालंच होतं, त्यांचा होता नव्हता तो समंजसपणाही आटून गेला. उरले ते बोचरे खडक. ते चिडचिडे झाले. येता-जाता डाफरू लागले. शुक्राणूंचा रिपोर्ट त्यांनी कुणाला सांगितला नाही. कुठल्या तरी डॉक्टरने सुमित्राकाकूंना लहानपणी क्षयरोग झाल्याने बीजनलिका ब्लॉक झाल्याची शंका व्यक्त केली होती, तेच अधिकृत कारण नातेवाईकांना सांगण्यात आलं. कुणाच्या का कमतरतेमुळे असेना, मूलबाळ होणार नाही हेच सत्य उरलं होतं. अपत्यप्राप्ती हेच आयुष्याचं इतिकर्तव्य असण्याच्या काळात आता जन्माचं प्रयोजन अध्र्यातच संपल्यात जमा होतं.

सुमित्राकाकूंच्या कलाकुसरीचं जे काही थोडंबहुत कौतुक होत होतं, ते आता ओसरू लागलं. कलेची कदर संपली, कुसर खुपू लागली. ‘सगळं टापटीप आहे ठीकय् हो, घरात कुणी विस्कटणारं नाही नं, म्हणून’पासून ते, ‘तुम्हाला काय बाई, हे सगळं करायला निवांत वेळ मिळतो ना’ अशा हलक्या शेलक्या अधूनमधून झडू लागल्या. गोविंदकाकांना पूर्वीही या गोष्टीचं फारसं कौतुक नव्हतंच, आता तर त्यांना सारंच निर्थक वाटू लागलं. सुमित्राकाकूंची कलानिर्मिती हळूहळू आटत गेली. कुंडय़ांतली झाडं सुकली, अंगणातली रांगोळी फिकटली. भजनाची पेटी माळ्यावर पडली. गॅलरीच्या कठडय़ाला टेकून त्या तासन्तास शून्यात पाहात. गोविंदकाकांची तिरसट हाक आली की दचकून भानावर येत. सणावारी कौटुंबिक कलरवात भाग घेत, पण ते उसनं अवसान वाटे. हळूहळू दोन खोल्यांच्या पिंजऱ्यात त्या जणू बंदिस्त होऊन गेल्या.

गोविंदकाकांचा तिरसटपणा वाढत गेला. त्यांची पैलवानकी आधीच ओसरली होती, आता त्यांना किडनीचा त्रास सुरू झाला. डॉक्टरांनी कॅथेटर टाकलं. लघवीची पिशवी सांभाळून टॉवेलवर फिरणारे गोविंदकाका आता डॉक्टरवरही डाफरू लागले. बोलता बोलता रडू लागले. मूत्रनलिकेच्या वरचेवर होणाऱ्या शस्त्रक्रियेने त्यांना जीव नकोसा होऊ  लागला, तर सदैव लघवीची पिशवी बदलण्यात सुमित्राकाकूंचा वेळ जाऊ  लागला. दोन खोल्यांचं ते घर रुग्णाईत झालं, त्याला दवाखान्याचा वास येऊ  लागला. दवाखान्याची स्वच्छता ही र्निजतुक वाटते, प्रसन्न वाटत नाही. ओंजळभर प्राजक्ताने होतात तशी त्या स्वच्छतेने मनं प्रफुल्लित होत नाहीत! सुमित्राकाकू पलंगावरची चादर, रबरी चटई, बेडपॅन स्वच्छ ठेवीत, त्यातही कलात्मकता आणीत, मात्र गोविंदकाकांच्या शिव्या सुरू झाल्या, की उशाशी ठेवलेला हजारी मोगरा केविलवाणा पडू लागे. अशी उणीपुरी दहा वर्षे गेली असतील. गोविंदकाका आयुष्यावरच डाफरू लागले, वेदनेवर चिडू लागले. सुमित्राकाकूंचा हात त्यांनी कधी धरलाच नव्हता, मात्र आयुष्याने धरलेला हात सोडवून घेतला. फार गवगवा होऊ  न देता त्यांचे अंत्यसंस्कार उरकण्यात आले.

साऱ्या घटना इतक्या वेगाने घडल्या की, जणू आयुष्यानं सारी मरगळ झटकून निमिषात पुढचा टप्पा गाठला. दहा-वीस वर्षे बंद पडलेली मोटार अचानक किल्ली फिरवताच धडधडत चालावी तसं झालं. सुमित्राकाकूंच्या एकसुरी आयुष्याने एकदम गिरकी घेतली. सांत्वनाला आलेल्या बायकांना त्यांनीच थोपटून शांत केलं. सुरुवातीला दोन-तीन दिवस त्यांच्या मनाला एक थिजलेपण आलं होतं, ते लवकरच वितळलं. तिसऱ्याच दिवशी त्या कामाला लागल्या. एक मोठं विवर पडलं होतं मेंदूला, ते त्यांनी आपल्या छंदांनी बुजवून टाकलं. कुंडय़ा खरवडून माती भरली. तुळस पुन्हा तरारली. माळ्यावरनं पेटी काढली. भजनी मंडळ सुरू केलं. सणवारी आरतीला त्यांचा मोकळा आवाज रेणुकेची स्तुती गाताना छान लागू लागला. भजनी मंडळाला स्पर्धेत भाग घ्यायला लावला. बक्षीस नाही मिळालं, पण साऱ्यांना मुंबईवारी घडली.

गोविंदकाका गेल्यावर त्या दहा वर्षे जगल्या असतील, पण तेवढय़ाच जगल्या. वाटय़ाला आलेला आयुष्य नावाचा चहाचा कप संपता-संपता घोटभर गोड लागला. साखर तळाशीच राहिली होती ना! ती कधी कुणी ढवळलीच नव्हती. ढवळली असती तर सगळंच आयुष्य मधुर झालं असतं, पण आयुष्य असंच असतं!

डॉ. नंदू मुलमुले

nandu1957@yahoo.co.in

 

 

 

First Published on April 1, 2017 12:08 am

Web Title: marathi article by dr nandu mulmule
  1. No Comments.