17 December 2017

News Flash

कैसे जीते है भला..

शहाणे हा चिंताग्रस्त प्राणी होता आणि त्याच्या बायकोचा स्वभाव एकदम उलट होता.

डॉ. नंदू मुलमुले | Updated: February 21, 2017 3:59 PM

शहाणे हा चिंताग्रस्त प्राणी होता आणि त्याच्या बायकोचा स्वभाव एकदम उलट होता. मला शहाणेच्या बायकोचं कौतुक वाटू लागलं आणि थोडं वाईटही! शहाणे व्हिलन नव्हता, एका मज्जा-विकृत स्वभावात बंदिस्त होता. त्याचा स्वभाव त्याची समस्या होती आणि त्यासाठी तो यथाशक्ती उपचारही घेत होता; पण शहाणेच्या बायकोनं रडत न बसता मार्ग शोधला. मला जुनं  गाणं आठवलं, ‘कैसे जीते है भला, हमसे सीखो ये अदा!’

शहाणे माझ्याकडे पहिल्यांदा आला तेव्हा तो असेल तिशीचा. तेव्हा मीही पस्तिशीतलाच होतो. दवाखाना सुरू करून सात-आठ वर्षेच झाली असतील!

मनोविकारतज्ज्ञांकडे येणाऱ्या रुग्णाचे नाव शहाणे असावं हा विनोदच! पण खरं तर शहाणे आणि वेडे यात फार थोडं अंतर असते हे मी अनुभवातून शिकलो होतो! वेडय़ाचं प्रत्येक लक्षण प्रत्येक शहाण्या माणसात कधी कधी दिसतं हे सत्यही मी जाणून होतो.

शहाणे एकटाच आला होता. त्याचं लग्न झालं होतं आणि बायकोशी फारसं पटत नव्हतं. रोज कटकटी होत होत्या म्हणून तो निराश झाला होता. ‘‘शहाणे, लग्न होऊन सहाच महिने झाले आणि तुमची भांडणं व्हायला लागली?’’ मला आश्चर्य वाटलं. ‘‘काय करू साहेब, तिच्या अजब सवयी आहेत, त्या मला पटत नाहीत.’’ बायको कपडे अस्ताव्यस्त टाकते, आळस करते, माझ्या नातेवाईकांचे आदरातिथ्य फार उत्साहाने करीत नाही, सासूचे गाऱ्हाणे सांगत राहाते अशा नेहमीच्या तक्रारी. या तक्रारींनी एकदम नैराश्य येण्याचे आणि मनोविकारतज्ज्ञांकडे धाव घेण्याचं काय कारण?

पण शहाणेला या रोजच्या कटकटींनीही वैताग आला होता. झोप येत नव्हती. उदास वाटत होतं. भूक लागत नव्हती. मुख्य म्हणजे शारीरिक-लैंगिक कमजोरी वाटत होती. मी त्याला समजावलं. गोळ्या लिहून दिल्या. शहाणे निघून गेला. त्यानंतर दर पंधरा दिवसांनी तो नेमाने येत राहिला. जवळ जवळ सहा महिने त्याने नियमित उपचार घेतला. त्याला बरं वाटत होतं. मग त्यानं येणं बंद केलं. अशीच पाच-सहा वर्षे निघून गेली. पुन्हा एके दिवशी शहाणे माझ्यासमोर उभा.

‘‘सर, ओळखलं का?’’

अर्थातच मी त्याला ओळखलं. थोडं पोट सुटलं होतं. थोडे केस विरळ झाले होते, पण शहाणे तोच होता आणि त्याची समस्याही तशीच होती. तशीच म्हणजे रोजच्या आयुष्यातील चढउताराची. शहाणेला मुलगी झाली होती आणि तिच्या आजारपणाने तो बेजार झाला होता. तिला थोडा जरी ताप चढला की झटके येत. त्याचा उपचार बालरोगतज्ज्ञाकडे सुरू केला होता, पण तरी अधूनमधून झटके येतच होते.

‘‘काही काळजी करू नका. अहो, लहान मुलांमध्ये ही प्रवृत्ती सर्वसामान्य आहे. तिला शक्यतो ताप चढू देऊ  नका आणि नियमित औषधे चालू ठेवा.’’ मी समजावलं, पण शहाणेनं हाय खाल्ली होती. त्याला या समस्येला कसं तोंड द्यावं हे कळत नव्हतं. पुन्हा मी त्याला नैराश्य कमी करण्याच्या गोळ्या दिल्या. तो असाच सहा महिने येत राहिला. घरगुती तक्रारी, पोरीच्या तब्येतीच्या तक्रारी सांगत राहिला. मी समजावत गोळ्या देत राहिलो. हळूहळू त्याचं येणं कमी होत गेलं. पोरीची समस्या मिटली असावी.

यानंतर शहाणे सुमारे दहा वर्षे आला नाही. एखादा रुग्ण येईनासा झाला की एक तर तो बरा झाला किंवा त्याने दुसरा डॉक्टर गाठला हे समजावे, हा ठोकताळा धरून मी तो विषय सोडून दिला; पण शहाणे माझ्याशी एकनिष्ठ होता. पुन्हा दहा वर्षांनी तो उगवला एक नवी समस्या घेऊन माझ्याचकडे. मध्यंतरी तो बरा असल्याने आला नव्हता.

‘‘आता काय समस्या?’’ मी विचारण्याची देर की त्याने समस्येचा पाढा वाचायला सुरुवात केली.

‘‘सर, बायकोच्या गर्भाशयाची शस्त्रक्रिया करायची आहे त्याचं मला दडपण आलंय. झोप येत नाही, भूक लागत नाही, धडधड वाढलीय.’’

ज्या बायकोवर शस्त्रक्रिया होती ती माझ्यासमोर शांतपणे बसली होती. ती पूर्वीही एकदा माझ्याकडे आली होती; पण त्या वेळी काही बोलली नव्हती. या वेळी मात्र बोलली.

‘‘डॉक्टर, काय झालंय हो यांना? दर दोन-चार वर्षांला असेच करतात. झोपत नाहीत, जेवत नाहीत, सुस्त बसून राहतात. काळजी करू नका म्हटलं तरी काळजी करतात.’’

एकाच घरात राहणारे दोघं नवरा-बायको. मात्र शहाणेच्या बायकोला या गोष्टींचा जराही ताण वाटत नव्हता, तर शहाणेला प्रत्येक गोष्ट ताणजन्य भासत होती.

मी शहाणेला गोळ्या लिहून दिल्या. त्याच्या बायकोची या वेळी बोलायची इच्छा दिसली. मी शहाणेला बाहेर पाठवलं. ‘‘हे यातून कधी बाहेर पडणार डॉक्टर?’’ शहाणे दाराआड होताक्षणीच तिने माझ्यावर प्रश्नांची सरबत्ती केली.

‘‘कधी म्हणजे? हे येतात माझ्याकडे दोन-चार वर्षांला एकदा.उपचार घेतात पाच-सहा महिने, मग येत नाहीत. मग मध्यंतरी ठीक असतात असं मी गृहीत धरून चालतो.’’

‘‘कशाचं ठीक?’’ बायको सांगू लागली. आपला नवरा हळव्या स्वभावाचा आहे, थोडीशीही गोष्ट मनाला लावून घेतो हे तिच्या लक्षात संसाराच्या सुरुवातीलाच आलं होतं. मात्र तो हळवा नसून कमजोर आहे, ताणाच्या प्रसंगाला तोंड देऊन बायकोला धीर देण्याऐवजी स्वत: तिच्या पदराआड लपून बसतो असं तिला वाटू लागलं.

‘‘काय सांगू डॉक्टर, यांना कसली हौसमौज नाही. सदैव चिंताग्रस्त, भेदरलेले. आम्हाला ट्रिपला नेत नाहीत, बाहेर जात नाहीत. धमाल, मजा करण्याचा यांचा स्वभावच नाही. मी साधं सिनेमाला चला म्हटलं तर यांना कंटाळा येतो. संगीत, नाटक कशाकशात इंटरेस्ट नाही. माझी काळजी घेतात, पण ती नकोशी होईल इतकी. उन्हात जाऊ  नकोस, पावसात जाऊ  नकोस, प्रवास करू नकोस.. अहो, ट्रिपलादेखील मी अट्टहासाने भावाला-वहिनीला घेऊन गेले. हे आलेच नाहीत. सिमला-कुलू-मनाली ही काय एकटय़ाने जाण्याची ठिकाणे आहेत का?’’

शहाणे हा चिंताग्रस्त प्राणी होता आणि त्याच्या बायकोचा स्वभाव एकदम उलट होता. शहाणेसाठी आयुष्य एक समस्यांनी भरलेली वाट होती आणि बायकोला आयुष्याची वाट फुलांच्या ताटव्यांनी भरलेली वाटत होती. आयुष्यानं त्याच्या बायकोची मोट शहाणेशी बांधून तिच्या आनंदावर विरजण घातलं होतं.

‘‘मी जाते एकटी सिनेमाला, ट्रिपला. काय करणार? यांच्यासारखं रडत बसले तर आयुष्य जगणं कठीण होईल. आयुष्य एकदाच मिळतं ना डॉक्टर?’’ शहाणेच्या बायकोनं आपलं तत्त्वज्ञान सांगून करून टाकलं. मला जुन्या ‘दोस्त’मधलं गाणं आठवलं, ‘कैसे जीते है भला, हमसे सीखो ये अदा!’

मला शहाणेच्या बायकोचं कौतुक वाटू लागलं आणि थोडं वाईटही! शहाणे व्हिलन नव्हता, एका मज्जा-विकृत स्वभावात बंदिस्त होता. त्याचा स्वभाव त्याची समस्या होती.

पण संसार हा दोघांचा असतो. इथे परंपरेनं घोडय़ाची मोट गाढवाशी बांधली होती. गाडीचं एक चाक बैलगाडीचं आणि दुसरं चाक बीएमडब्लूचं झालं होतं. असा संसार मोडत नव्हता याचं श्रेय शहाणेच्या बायकोला आणि मध्यमवर्गीय पारंपरिक जोखडाला जात होतं.  शहाणेसोबत लग्न केलं, हा बायकोचाही दोष नव्हता; पण संसार म्हणजे निभावून ‘नेणं’ या समजुतीपायी तिच्या आशा-आकांक्षेचा किती बळी द्याल? अशा संसारात आनंद कोणाच्या वाटय़ाला येतो? एक परंपरेनं चालत आलेली संस्था आणि कालबा मूल्य सांभाळण्यासाठी, शहाणेच्या बायकोच्याच शब्दात सांगायचं तर ‘एकदाच मिळणाऱ्या’ आयुष्यात किती तडजोडी?

शहाणेची बायको रडली वगैरे नाही. मला बरं वाटलं. ही गोष्टही तिने स्वीकारलेलीच होती. उपचार शहाणेचा चालू होता, मात्र आजाराचे परिणाम ती भोगत होती!

 

डॉ. नंदू मुलमुले

nandu1957@yahoo.co.in

First Published on February 18, 2017 12:50 am

Web Title: mind idea