27 September 2020

News Flash

विभ्रमाची वारी

स्किझोफ्रेनिया म्हणजे एक विभ्रमावस्था. वास्तव आणि कल्पित यातली सीमारेषा पुसून टाकणारा एक भयावह अनुभव.

स्किझोफ्रेनिया म्हणजे एक विभ्रमावस्था. वास्तव आणि कल्पित यातली सीमारेषा पुसून टाकणारा एक भयावह अनुभव. दत्ता त्यातून मुक्त झाला. या सृष्टीतले अतक्र्य अद्भुत अनुभव एकाच मानसी निर्माण होतात, काही काळ राहतात, मग लयाला जातात. निर्मिती, स्थिती आणि विध्वंसाचा असाच एक सोहळा दत्ताच्या मेंदू-रसायनांनी मांडला. त्या अनुभवाने दत्ताला दाही दिशा फिरवलं, घरापासून तोडलं..

मानसोपचारतज्ज्ञाचं काम रुग्णांच्या लक्षणांची वर्गवारी करून त्यांना एका निहित निदानाचं नाव देणं आणि नियोजित उपचार करणं. मात्र ज्या माणसाच्या बरगडीत या विकृतीची वेडी बाभूळ मूळ धरते, ती त्याच्या श्रद्धा-अंधश्रद्धेची एक अद्भुत कहाणी होऊन सामोरी येते.

दत्ता माझ्या आजोबांकडे पौरोहित्य शिकायला आला, तेव्हा तो जेमतेम दहावी पास होता. संस्कृतात त्याचं डोकं चालत नसे, मात्र पुराणकथांची त्याला फार आवड. आजीजवळ बसून चिलया बाळाच्या, प्रल्हादाच्या कथा ऐकायचा. तप केल्यानं देव प्रसन्न होतो असल्या कल्पनांमध्ये रममाण असायचा! घरची परिस्थिती बेताची, दत्ताने कधी कपडय़ाचा सोस केला नाही, खाण्याचा माज केला नाही.

अशातच त्याला दत्तभक्तीचा लळा लागला. दत्तसंप्रदाय कडक शिस्तीचा! या दत्तभक्तीने आधीच एकलकोंडा दत्ता अजून स्वमग्न झाला. गुरुवारी उपवास करी. वर्ष-सहा महिन्यांत कारंजाची बस धरून नृसिंहसरस्वती मंदिरात जाऊन येई. आमच्या घरी उंबराचा मोठा वृक्ष होता. दत्ताने त्या उंबराखाली गुरुचरित्राचे पारायण मांडले. त्याचे विशेष पुण्य असते असं त्यानं सांगितलं. एकावन्न अध्याय, सात दिवसांचं पारायण. या सात दिवसांत पारायण करताना उठायचं नाही, जमिनीवर झोपायचं, एकभुक्त राहायचं, असे सगळे कडक नियम.

पारायणाचा सहावा दिवस. दत्ताने पारायण सुरू केले. दुपारचे तीन वाजले असतील, एकाएकी वादळ सुरू झालं. पावसाच्या टपोऱ्या थेंबाचा ताशा दत्ताच्या पाठीवर कडकडू लागला. पोथी घट्ट धरून बसलेल्या दत्ताची घालमेल होऊ  लागली. पारायणात उठायचं कसं? बाजूच्या घरावरचे पत्रे हवेत उडू लागले, लोक सैरावैरा धावत त्याच्या नावानं ओरडू लागले, तेव्हा नाइलाजाने दत्ता पोथी उचलून घरात धावत आला. जीव वाचला.

अध्र्या तासातच वादळ आलं तसं गेलं. दत्तानं दूर उडून पडलेलं आसन पुन्हा मांडलं. उर्वरित पोथी वाचली. पण पारायणात खंड पडल्याची गोष्ट त्याच्या मनाला लागली. त्याच्या चेहऱ्याकडे पाहवेना! तो तंद्रीत राहू लागला. हाक मारली की दचकून भानावर येऊ लागला. त्या अवस्थेतच दत्ताचं लग्न ठरलं. नव्हे, तोच समस्येवरचा उपाय समजला गेला. एका गरीब बापाची सालस मुलगी तोळाभराचं पोत बांधून दत्ताच्या घरी आली. दत्ता लग्नातही गंभीरच होता! नव्या नवरीलाही पाहीना! आणि एके दिवशी बाहेर गेला तो घरी परतलाच नाही. रात्र गेली, सगळ्या संभाव्य ठिकाणी शोधून झालं. दत्ता जणू हवेत विरघळून गेला होता. दत्ताचे वडील हळूहळू हताश होत स्वस्थ बसले. नवी नवरी विरक्त होऊन गेली. दत्ता कुठे आहे, कसा आहे, आहे की नाही हे कुणालाही समजत नव्हतं. अंगवळणी पडलं की दु:खही अळणी होतं. वेदनेचं वय वाढलं की तिची सवय होते. उंबराचा पार खचला होता, आजोबांना तो पुन्हा बांधवासा वाटेना.

या घटनेला दोन वर्षे उलटली असतील. अशीच आषाढाची रात्र. साऱ्या गावची वीज गेलेली, जणू दु:ख अंधारून आलं होतं. एकाएकी पाऊस सुरू झाला. थेंबांचा तडतडाट दोन खोल्यांच्या पत्र्यावर सुरू झाला. तेवढय़ात दारावर क्षीण थाप पडली. वडिलांनी दार उघडलं. क्षणभर अंधारात वीज कडकडली. दत्ताची बायको पुढे होत किंचाळली. दारात दत्ता उभा! दाढी वाढलेली, केस धुळीने थिजलेले, डोळ्यात विलक्षण भयाचे भाव. भीती, आश्चर्य, उमाळा यांचा एकच कोलाहल माजला. बायको भयानंदाने बधिर झाली. हळूहळू सारे सावरले. दत्ता परतला ही बातमी पंचक्रोशीत पसरली. साऱ्यांच्या तोंडी प्रश्न एकच, दोन वर्षे दत्ता कुठे होता? घरी येऊन आजोबांच्या पाया पडला, त्यांनी पोटाशी धरलं, तेव्हा दत्ता न विचारता बोलू लागला.

‘‘मला गुरू घेऊन गेले. गुरूने वादळ पाठवून माझी परीक्षा पाहिली, मी मृत्यूच्या भयाने पारायण अर्धवट सोडून पळालो. गुरूची आज्ञा झाली, ‘चल ऊठ, नीघ, तोड हे पाश, सोड माया, चल माझ्या मागे’, मी गेलो, आवाजाच्या मागे गेलो. किती दिवस-रात्री चालत राहिलो कोण जाणे. कुणाच्या शेतात राबलो, हॉटेलात काम केलं, मिळेल ते खाल्लं,  कधीतरी भान यायचं घराचं. थोडाच वेळ, पुन्हा आवाज यायचा, ‘कडगंचीला चल. सायंदेवाच्या पाया पड. तू पापी आहेस, प्रायश्चित्त घे!’ भान आलं तेव्हा गुलबग्र्याला होतो. थकून एका रिकाम्या इमारतीत झोपलो. ती मशीद होती! दुसऱ्या दिवशी पहाटे अजान कानावर पडली. एक दाढीवाला मौलवी जवळ आला. त्याने प्रेमाने माझी चौकशी केली. ओळख विसरलो होतो मी स्वत:ची त्या वेळी. संभ्रमाच्या वावटळीत सापडलेला एक जीव होतो. फक्त वेदना तिची ओळख. मौलवीनं घरी नेलं. किती दिवसांनी मी गरम पाण्यानं आंघोळ केली. लांडा पैजामा, जुना कुर्ता घातला. त्यांनी मला नमाज शिकवला, इबादत शिकवली. मशिदीची झाडलोट करणे, वजू करण्यासाठी पाणी भरणे, नमाज पढणे, भिंतीला टेकून सुन्न बसणे, असे दिवस जाऊ लागले. एके दिवशी असाच बसलो होतो. मौलवीसाहेबांची विधवा सून भात, मुरूकूची थाळी घेऊन जवळ आली. आजवर मी बुरख्याआड तिचे डोळेच पाहिले होते. अथांग वेदना दिसायची डोळ्यात तिच्या. खाली वाकताना तिचा बुरखा सुटला. एक म्लान उदास चेहरा सामोरा आला. क्षणभरच, मी भांबावून गेलो. घराची आठवण झाली. मी थाळी दूर सारली. धावत सुटलो. किती काळ धावलो कोण जाणे. कडगंची गाठलं. पादुकांना अश्रूंचा अभिषेक झाला. मन निवलं, सगळं आठवलं. कानातले आवाज शांत झाले. घरची वाट धरली. मनात गुरुचरित्र सुरू झालं. आजोबांच्या सल्ल्यावरनं दत्ताला मनोविकारतज्ज्ञाकडे नेण्यात आले. त्यांनी दत्ताला स्किझोफ्रेनिया (छिन्नमानस) झाल्याचं निदान केलं. गोळ्या दिल्या. दत्ताचे आवाज नाहीसे झाले. त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा स्मित उमटलं. स्किझोफ्रेनिया म्हणजे एक विभ्रमावस्था. वास्तव आणि कल्पित यातली सीमारेषा पुसून टाकणारा एक भयावह अनुभव. दत्ता त्यातून मुक्त झाला. निर्मिती, स्थिती आणि विध्वंसाचा असाच एक सोहळा दत्ताच्या मेंदू-रसायनांनी मांडला. त्या अनुभवाने दत्ताला दाही दिशा फिरवलं, घरापासून तोडलं, पुन्हा घरी आणून सोडलं.

दत्ता परतला त्याच रात्री वीज कोसळून घरच्या उंबराची मोठी फांदी जळाली. मात्र दर चैत्रात त्याच्या बुंध्याला पुन्हा पालवी फुटते. आमचं घर ओसाड पडलं आहे, उंबराखाली बसून गुरुचरित्राचं पारायण करणारं कुणी उरलं नाही, मात्र उंबर सावरला आहे. शांत उभा आहे, दत्तासारखाच.

डॉ. नंदू मुलमुले

nandu1957@yahoo.co.in

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2017 3:52 am

Web Title: schizophrenia psychotherapist marathi articles
Next Stories
1 यू टर्न!
2 शंभर पायांची गोम!
3 साडीतले बाबा!
Just Now!
X