13 July 2020

News Flash

एकाची व्यथा दुसऱ्याचं आकळणं

संवाद हा मनापासून मनापर्यंतचा विचार-सेतू. एकाची व्यथा दुसऱ्याचं आकळणं हा तिचा हेतू.

प्रतिनिधिक छायाचित्र

तो माझ्याकडे पाहत राहिला. मी त्याला विचार करू दिला. निर्णयाचा क्षण ज्याच्या-त्याच्या आतून यावा लागतो. तो लादून चालत नाही. लादलेल्या गोष्टी चांगल्या असूनही पचनी पडत नाहीत. जे मनाला रुचते ते मनात रुजते आणि जे रुजते तेच उमजते! मी त्याच्यासाठी नि:स्वार्थी निर्णय घेऊ  शकणारा सुहृद झालो होतो. धर्माने, जातीने येणारे किंतू गाळून मानवीयतेचा एक निखळ ओहोळ आमच्यात वाहता झाला होता. त्याने निर्णय घेतला..

संवाद हा मनापासून मनापर्यंतचा विचार-सेतू. एकाची व्यथा दुसऱ्याचं आकळणं हा तिचा हेतू. तो कधी प्रत्यक्ष होतो, कधी अप्रत्यक्ष. मात्र मनापासून केला आणि मन लावून ऐकला, तर ईप्सित साधण्यासाठी त्याला कुठलेच अडथळे अडवू शकत नाहीत!

अनिस एकटा चिठ्ठी घेऊन आला, तेव्हा त्यालाच रुग्ण समजून मी त्याच्या हाताला तपासण्याचा पट्टा बांधू लागलो. तो ओशाळला. ‘‘मैं नहीजी मरीज, ये मेरी बीवी का है!’’ एक जुनाट चिट्ठीची पुंगळी सरळ करीत तो समोर जाऊन बसला.

‘‘तो किधर है तुम्हारी बीवी?’’

‘‘दो साल पहले बताये थे आपको. अभी उसकी तबियत ठीक नै ना, इसलिए आई नई. ये चिठ्ठी दिया उसने.’’

मुलाच्या वहीतून व्यवस्थित फाडलेली ती चिठ्ठी. ठळक ‘प्रौढसाक्षर’ अक्षरात दोन ओळी लिहिलेल्या, ‘डोकियात दुखने, डोल्याच्या बिचात दुखने.’

‘‘किसने लिखा ये?’’ मला ‘डोल्याच्या बिचांत’ कळेना.

‘‘मेरी बीवीने, अंजुमने. थोडा मरेठी आता उसको. पढती, लिखती!’’ अंजुमचं मरेठी मला थोडय़ा वेळानं कळलं. डोळ्याच्या बिचात म्हणजे मधोमध दुखते! म्हणजे टेन्शन हेडेक? मी पंधरा दिवसांच्या गोळ्या लिहून दिल्या. पुढल्या वेळी तिला आणायला सांगितलं. मात्र पंधरा दिवसांनी पुन्हा एकटा अनिसभाई हजर.  हातात औषधाची चिठ्ठी आणि बायकोने लिहिलेले वहीचे पान! त्यात लिहिलं होतं, ‘घुटख्याचा वास येने, मलमल होणे, नींद नही..’ मी अनिसकडे पाहिलं. त्याने उग्र वासाचा गुटखा खाल्ला होता. त्या वासानं तीन फुटावरनं माझं डोकं उठलं होतं, ती अंजुम रोज या संकटाला कसं तोंड देत असेल?

‘‘अनिसभाई, गुटखा थूक के आओ’’ तो ओशाळा होऊन गुटखा थुंकून आला. त्याला मी छोटय़ा आरशात आतून गालावर उमटलेली पांढरी रेष दाखवली. ‘ये कॅन्सर की पहिली स्टेज है. गुटखा छोडो, बीवी का सरदर्द भी कम हो जायेगा!’ माझ्याजवळ तंबाखू सोडवायच्या महागडय़ा गोळ्यांचे सॅम्पल होतं ते त्याला दिलं. बायकोला आणण्याबद्दल बजावलं. ‘हौजी’ म्हणत निघून गेला.

परत महिनाभराने एकटाच. मात्र या वेळी तोंडात गुटख्याचा तोबरा नव्हता. ‘‘गुटखा छोड दिया साब. तुमने केन्सर का डर बताया नं.’’ बोलता बोलता बायकोची चिठ्ठी समोर ठेवली, आणि धंद्यापाण्याच्या झंझटी सांगू लागला, ‘‘दिनभर गाडे पे मौज (केळी) बेचता हू, बाजूवाले से आदत लग्गई. मूं में गुटखा पकडा की बात भी नहीं करता था, गिऱ्हाक चले जाते थे. अब घुटका बंद है तो शाम तक सारे मौज बेचे जाते. इधर उधर थूंकने की जरूरत नै ना!’’ तो बऱ्यापैकी स्वच्छ दात दाखवीत हसू लागला.

मी चिठ्ठी वाचली. ‘आंग दुखने. जेवन कम करणे, पिणेची आदत.’ मी अनिसकडे पाहिले. तो अट्टल पिणारा वाटत नव्हता. रोज पिणाऱ्याचा चेहरा सुजवट होतो. हातात सूक्ष्म थरथर येते. मी कडेकडेने अनिसची चौकशी सुरू केली. ‘‘रोज सवेरे दस बजे गाडा लगाता हूँ, रात के दस बजे तक. दोपहर को आधा घंटा छांव में बैठ के रोटी खाता. कभी कभी दो-तीन मौज खा लेता.’’

‘‘बहोत थक जाते तो कभी शराब पीते होंगे?’’

‘‘कभी-कभार’’ अनिसने कबुली दिली.

‘‘गुटखे से शराब खतरनाक. मत पियो. कभी थक गये तो ये गोली खाओ.’’ मी त्याला माझ्याजवळच्या गोळ्या दिल्या. त्याने शंभराची एक नोट, दहा रुपयाच्या स्वरूपात उर्वरित फीची चळत दिली होती. मला कसेसे झाले. मी दहाची सर्व चिल्लर त्याला परत केली. ‘‘कभी शराब पीने का मन करे, तो इसमे से दस रुपये के मौज खा लेना!’’ त्याला आभार मानणेही जमेना!

महिन्याने एकटाच उगवला, पण या वेळी मीही बायकोला का आणलं नाही हे विचारणं सोडून दिलं होतं. ओढगस्तीच्या संसारातून, एरवी धडधाकट दिसणाऱ्या बाईला बसच्या तिकिटाचे पैसे खर्च करून दवाखान्यात आणणं ही त्याच्यासाठी न परवडणारी चैन होती. पाच वर्षांपूर्वी कधी तरी तिला आणल्याचा दाखला तो देत होता. त्या वेळी त्याचं नुकतंच लग्न झालं होतं, आणि बायकोच्या ‘दौखाने में जाने का’ हट्ट पुरवणं ही त्याची अत्त्युच्च चैन असावी!

मी अनिसने पुढे केलेली चिठ्ठी पाहण्यापूर्वी प्रश्न केला, ‘‘शराब बंद किया ना?’’

‘‘हौजी. वो बाजू के गाडेवाला पिता था. अब मैं गाडा दुसरी जगे लगारा.’’

मी चिठ्ठी पाहिली. ‘‘माहवारी बंद होणे. कमर दुखने. रगत कमी. थकान..’’

मी मनोमन काही ठरवून अनिसकडे पाहिले. त्याची कौटुंबिक माहिती मी सुरवातीला काढलीच होती. दोन भाऊ, एक म्हातारी आई. अब्बा वारले, भाऊ  वेगळे झाले. म्हातारी अम्मी हा स्वभावाने चांगला म्हणून त्याच्याचकडे राहते. पाच वर्षांत त्याला चार मुलं झालीत, तीन मुली, एक मुलगा. आता माहवारी बंद होणे म्हणजे अंजुमला पाचव्यांदा दिवस गेल्याची शक्यता होती. काय रक्त उरलं असेल तिच्या अंगात? ‘‘अनिसभाई, तुम्हारी बीवी अम्मी को देखती, चार बच्चों को देखती, तो उसको तबियत कहाँ से ठीक रहेगी?’’ अनिस माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागला.

‘‘उसकी तबियत ठीक रखना, दवा-दवाखाने का खर्चा कम करना तो उसका बोझ कम करना पडेगा! बच्चों को अच्छी जिंदगी मिली नहीं तो वो क्या करेंगे? मौज बेचेंगे?’’

‘‘नहीं साब, मेरी जिंदगी गई, उनकी नही जानी चाहिये,’’ तो मनापासून म्हणाला.

‘‘उपरवाले ने तुमको चार बच्चे दिये, अब चार बच्चों को पढाना, बडा करना, तो..’’ मी थांबलो.

‘‘तो क्या करना?’’

तो माझ्याकडे पाहात राहिला. मी त्याला विचार करू दिला. निर्णयाचा क्षण ज्याच्या-त्याच्या आतून यावा लागतो. तो लादून चालत नाही. लादलेल्या गोष्टी चांगल्या असूनही पचनी पडत नाहीत. जे मनाला रुचते ते मनात रुजते, आणि जे रुजते तेच उमजते!

अनिसची माझ्यावर श्रद्धा जडली होती. मी त्याच्यासाठी नि:स्वार्थी निर्णय घेऊ  शकणारा सुहृद झालो होतो. धर्माने, जातीने येणारे किंतू गाळून मानवीयतेचा एक निखळ ओहोळ आमच्यात वाहता झाला होता. माझं शास्त्रीय ज्ञान आता पुस्तकांच्या पानातून उतरून त्याच्या आशा-आकांक्षेला साद देणारा एक सेतू झाला होता. मी डॉक्टर नव्हतो, त्याच्यासोबत ‘मौज’ विकणारा एक गाडेवाला झालो होतो.

‘ऑपरेशन करो. मैं तुम्हारी जिम्मेदारी लेता हू. खर्चा नही आयेगा. मेरे दोस्त बडे डॉक्टर है. दस मिनट मे छुट्टी करेंगे! एक दिन आराम करो, दुसरे दिन काम को लग जाओ!’ अनिस स्तब्ध झाला. पारंपरिक प्रतिक्षिप्त विरोधाचं संरक्षक अस्त्र त्यानं उचललं नाही ही माझ्यासाठी समाधानाची बाब. ‘‘पूछना पडेगा जी’’ म्हणून गेला.  एक दिवस तयारी करून आला! शेजारच्या सर्जन मित्राची मदत घेऊन मी त्याचं काम करून दिलं. मी शेजारी असल्यानं तो आश्वस्त झाला. दोन-तीन तासांतच घरी जायला सज्ज झाला. ‘साब,’ निघता निघता बोलला, ‘‘आप के हॉस्पिटल में पीछे पपिते का झाड है, उसके पपिते उतार के ले जाऊ?’’ मी ताबडतोब कम्पाउंडरच्या हातून त्याला पपया तोडून दिल्या. त्याचा त्या दिवशीच रोजगार अनायासे निघाला. पंधरा दिवसांतच उगवलेला घोडय़ासारखा ठणठणीत अनिस पाहून मला हायसं वाटलं. डझनभर मौजचा पिकला घड त्याने माझ्यासमोर ठेवला. सोबत वहीचं नेटकं फाडलेलं पान. अंजुमनं फक्त एवढंच लिहिलं होतं, ‘सुकून. चांगले वाटने!’ त्यात ‘सुकून’वर अश्रूचा ठिपका पडून ते पुसट झाले होते!

डॉ. नंदू मुलमुले nandu1957@yahoo.co.in

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2017 1:01 am

Web Title: story on humanity by dr nandu mulmule
Next Stories
1 कोणा कशी कळावी..
2 न मिळणाऱ्या गोष्टीचं अप्रूप
3 सत्याचा स्वीकार!
Just Now!
X