29 February 2020

News Flash

पहला पहला प्यार

कॉलेजला गेल्यावर आवडीची जागा हळूहळू प्रेम घेतं.

राग आला की कसं आपण समोरच्यावर ओरडतो, चिडतो. पण समोरच्यावर प्रेम करतो म्हणजे? त्याची काळजी घेतो.. त्याचा आदर करतो.. त्याच्यावर हक्काने रागावतो आणि हे सगळं करूनही अजून बरंच काही उरतं..

उद्या भेटतोय आम्ही खूप.. फायनली.. खूप उत्सुकता आहे.. पाहू काय होतंय.. उद्या आम्ही सगळे शाळकरी मित्र-मत्रिणी भेटणार होतो. रियुनियन.. आमच्या ऋचाने घडवून आणलेली..  ‘आमोद’सुद्धा येणार होता तिथे.. आमो.. त्याचं नाव आठवूनच हसायला आलं मला.. बाप रे हे जास्तच होतंय जरा.. आता काय लहान आहे का मी हे पहला पहला प्यार टाइप आठवणीमध्ये रमून जायला..  छान वाटत होतं मला असंच. शाळेत असताना मला प्रचंड आवडायचा तो. इतका की त्याने माझं नुसतं नाव जरी घेतलं तरी हुरळून जायचे मी आणि दिवसभर त्याचा आवाज कानात घुमत राहायचा. अर्थात शाळेत असताना आपण हे आवडी निवडीचं प्रकरण आपल्यापाशीच ठेवतो म्हणा. अगदीच सांगितलं तर आपल्या एखाद्या खास मैत्रिणीला.. नाहीतर तेही नाही. मुळात ती आवड आपल्याला जाणवायलाच किती वेळ लागतो म्हणा. मग ते बरोबर की.. कोणाला कळलं तर काय बोलतील मला चिडवतीलच.. हजार शंका मग त्या आवडीवर भीतीचं एक घट्ट झाकण बसतं. आवड त्या झाकणाखाली दडपून जाते आणि कधी कधी ती अशी मुरलेल्या मुरांब्यासारखी चटकन समोरसुद्धा येते. अजून हवीहवीशी बनून..

असे नाहीये की आमोदनंतर मला कोणी आवडलाच नाही. कॉलेजला गेल्यावर आवडीची जागा हळूहळू प्रेम घेतं. प्रेम ना खरं तर संशोधनाचाच विषय आहे. पण नको.. करूच नये यावर संशोधन. असू देत ना त्याला तसंच अगम्य, अनाकलनीय.. एकदा का त्याला मनाशी तोडून डोक्याला कनेक्ट केलं की त्यातली जादूच डिसकनेक्ट होते. प्रेमाची जादू ती न उलगडण्यातच असते. म्हणजे काय मज्जा आहे ना. कोणीतरी कोणाला म्हणतं की मी  खूप प्रेम करते तुझ्यावर, पण म्हणजे नक्की काय करते.. राग आला की कसं आपण समोरच्यावर ओरडतो, चिडतो. पण समोरच्यावर प्रेम करतो म्हणजे? त्याची काळजी घेतो.. त्याचा आदर करतो.. त्याच्यावर हक्काने रागावतो आणि हे सगळं करूनही अजून बरंच काही उरतं.. कदाचित ते उरलंसुरलेलंच प्रेम असावं. प्रेमाचं हे गाठोडं कितीही सोडवलं तरी गाठी तशाच राहतात. अगदी घट्ट, सुटता न सुटणाऱ्या.. कधी कधी प्रेम त्या मानगुटीवर बसलेल्या वेताळासारखं वाटतं.. कितीही झिडकारलं तरीही पिच्छा न सोडणारं तर कधी त्या मृगजळासारखं.. नुसताच भास. किती विअर्ड असतं ना प्रेम.. तरीही हवंहवंसं. अरे काय झालंय मला .. अतिरोमँटिक झालेय मी. हळूच डोकावून आरशात पाहिलं. छान वाटलं मला. काही भावना काय फील गुड असतात ना. एकदम रीलॅक्स्ड करतात आपल्याला. आयुष्यात जे होतंय ते छान होतंय असं वाटायला लावतात. पेला अर्धा भरलेला तर आहेच, पण पाणीसुद्धा गोड आहे असंच वाटत राहतं.

चला तयारी करायला हवी. काय घालू मी.. काहीच कळत नाहीये. हवं तेव्हा कोणतेच कपडे सापडत नाहीत, ड्रेस घालू का? नको ते अगदीच पार्टीला आल्यासारखं वाटेल. जीन्स? नको फारच कॅज्युअल वाटेल. हा कुर्ता घालू का? ए दादा आता आहेसच इथे तर जरा मदत कर. हा बघ, हा पिवळा चांगला दिसेल का की गुलाबी? नको ना.. हा डल वाटतोय का फार ? की हा दुसराच फार ब्राइट आहे? आणि चुरगळल्यासारखा वाटतोय ना.. ए मी जाड दिसेन का यात? मला बरोबर बसेल ना हा? सांग ना रे, असा काय बघतोएस? भावाचं कर्तव्य पार पाड की कधीतरी. दादाने एक तुच्छ कटाक्ष माझ्याकडे टाकला आणि ‘तू इम्पॉसिबली यूसलेस आहेस’ असं म्हणत सरळ बाहेर निघून गेला. आता यात काय इम्पॉसिबल आणि यूसलेस, सांगावं ना सरळ मत.. तर नाही. तसंही दादाला कुठे काय कळतंय कपडय़ातलं आणि रंगांचं तर जाऊच दे.. पिवळा, काळा आणि पांढरा हेच काय ते रंग त्याच्या आयुष्यामध्ये.. कधीमधी असला तर निळा रंग डोकावून जातो.. जाऊ दे .. माझं..?

‘हे  बघ ऋचा.. दारावरची बेल शंभरदा वाजवून आपण लवकर पोहोचणार आहोत का तिथे झालीच आहे माझी तयारी.. दोनच मिनिटं..’ घरी बसल्या बसल्याच ऋचाचा तिळपापड होत होता. खुद्द ऑर्गनायझर उशिरा पोहोचतो म्हणजे काय.. ‘हे बघ, मी सांगणारे तुझ्यामुळे उशीर झाला म्हणून.. चल ना गं पटकन.. किती ती तयारी.. आजच लग्नासाठी पसंत नाही करून घेणारेय तो तुला.’ या ऋचामुळे मला कित्ती घाई करावी लागली. तरी अर्धवटच  तयारी  झाली. वेगळंच वाटलं तिथे गेल्यावर.. कित्ती वर्षांनी आम्ही सगळे एकमेकांना पाहात होतो. खरं तर प्रत्येक जण प्रत्येकाचा फेसबुकवर फ्रेंड होता. पण फेसबुकच्या मत्रीबाबत बोलायचं झालं तर तिथे शाहरुख खान आणि ओबामासुद्धा आपले मित्र असतात. त्यामुळे आम्ही अगदी खरोखर खूप वर्षांनी भेटत होतो. अरे हा तो हाच ना.. याला बाई कायम शिक्षा करायच्या आणि ही स्वत:चा डब्बा कधीच खायची नाही.. आणि ही ती.. आणि.तो ..! डोक्याने रिवाइंडचं बटण दाबल्यागत मी पाठी पाठी जात होते.. ‘हाय आमोद, कसा आहेस??’ ऋचा जवळजवळ माझ्या कानात ओरडली आणि मी एकदम गर्द छायेच्या मिट्ट काळोखात का काय म्हणतात ना, त्यात गेले. ‘हे ऋचा, कशी आहेस?’ त्याने छान हसून तिला विचारलं. ‘एकदम मस्त.. आपली बाकीची गँग कुठेय?’ ‘ते काय .. सगळे तिथे आहेत.. चला ना तुम्ही तिथे’ तुम्ही?? म्हणजे त्याने मला नोटीस केलं’. वाव.. ‘हो चल.. बाय द वे तू ओळखलंस न हिला??’ ऋचाने माझ्याकडे पाहात आमोदला विचारलं. ‘अर्थात, अगं इतका विसरभोळा नाहीये मी. काय म्हणतेस.. कशी आहेस?’ ‘मजेत.. तू??’ (बस्स?? इतकंच बोलायचं होतं मला? त्या वेळी माहिती असलेल्या नसलेल्या सर्व शिव्या दिल्या मी स्वत:ला).. त्यानंतरचा वेळ कसा गेला कळलंच नाही.. बाकी काहीही म्हटलं तरी शाळेतल्या मित्र-मत्रिणी स्पेशल असतात. ना धड लहान ना धड तरुण अशा त्या अडनिडय़ा वयात बनलेले हे मित्र.. एकमेकांना पकडून धडपडून पुढे काहीतरी कॉलेजनामक स्वर्ग आहे असं सांगत पुढे चालायचो. पण मेल्यानंतर मला स्वर्गात जायचं आहे असा म्हणणाऱ्या माणसाला मुळात आधी मरायचंच कुठे असतं. त्याला या जमिनीची आस सोडवतच नाही. तसंच तर आहे. कॉलेज म्हणजे स्वर्ग आणि शाळा म्हणजे ही जमीन, जिला घट्ट धरून रहावंसं वाटतं. आमच्या गप्पा संपेचनात. शेवटी सगळ्यांनी मिळून शाळेच्या बाजूलाच असलेल्या चहाकाकांकडे जायचं ठरवलं. त्यांचं हे बारसं आम्हीच केलं होतं शाळेत असताना. तर आमची पूर्ण पलटण चहाकाकांच्या दुकानावर.. बोलता बोलता मी आणि आमोद अचानक एकमेकांच्या समोर आलो.. कळेचना मला काय बोलायचं ते .. एकतर असं पटकन कोणाशी बोलण्यात माझी आधीच बोंब आहे आणि त्यात समोर आमोद असेल तर मग मी तर मौनव्रत मोडमध्येच जाते, पण कदाचित त्याला माझी अडचण समजली असावी.. तोच स्वत:हून बोलायला लागला आणि मग अचानक आम्ही खूप बोललो.. कशा कशावर हेही न आठवण्याइतपत बोललो.. ‘चला निघू या का गं?’ (या ऋचाचं टायिमग नेहमीच इतकं वाईट आहे  की आज काही स्पेशल आहे ) खरं तर मला तिथून एक इंचसुद्धा हलण्याची इच्छा नव्हती. पण नाइलाज होता. मग त्याला दाखवण्यासाठी मीही दाखवलं की खूपच उशीर झालाय वगैरे.. ‘निघताय का तुम्ही? ओके बाय..’ त्याने अगदीच त्रोटक निरोप घेतला. त्याने अजून काहीतरी म्हणायला हवं होतं. इतकं छान बोललो मग ‘छान वाटलं किंवा मजा आली’ असं काहीतरी.. म्हणजे काय अर्थ आहे याला.. एकतर इतकं बोलायचं आणि नंतर असं कोरडं बोलायचं जणू काही त्याला काहीच वाटलं नाही. मी निघून जातेय तर.. पण मी का इतका विचार करतेय.. मला काय करायचंय.. नाही बोलला तर नाही बोलला, गेला उडत.. अ‍ॅज इफ आय केअर.. घरी गेल्यावर डायरीकडे पाहिलं .. लिहावंसं वाटत असूनही न लिहिण्याची इच्छा जास्त प्रबळ होत होती.. काय लिहायचं होतं मला तसंही.. आज कसा पोपट झाला माझा.. इतक्यात फोन वाजला, आमोदचा मेसेज. ‘हे पोहोचलीस ना व्यवस्थित? आज खूप मज्जा आली.. पुन्हा नक्की भेटू आपण.. आवडेल मला..’

मी डायरीकडे पाहिलं.. आता ती माझ्याकडे बघून हसत होती.
प्राची साटम
response.lokprabha@expressindia.com

First Published on February 12, 2016 1:19 am

Web Title: first love
Next Stories
1 मॅजिक ऑफ टेक्नॉलॉजी
X
Just Now!
X