29 February 2020

News Flash

आयुष्य वजा एक वर्ष

आत्ता कुठे फांदीवर विसावत होता अन् आता लगेच उडूनसुद्धा गेला आणि मी कुठे होते?

आत्ता कुठे फांदीवर विसावत होता अन् आता लगेच उडूनसुद्धा गेला आणि मी कुठे होते? विसावण्याच्या आणि उडण्याच्या मध्ये कुठे तरी अडकलेले. स्वत:ला भानावर आणण्याच्या प्रयत्नात..

वाढदिवसांचं ना हे असंच असतं.

थकल्यामुळे डोळ्यात प्रचंड झोप होती. सरळ बिछान्यावर आडवं व्हावं असंच वाटत होतं, पण तरीही डायरीच्या पानाशी कुजबुज करायचा मोह काही आवरत नव्हता. खरं तर उद्या सकाळी उठून डायरी लिहिली असती तरी काही फरक पडला नसता. डायरी म्हणजे काही वेळेला बांधलेलं घडय़ाळ नसतं. ती तर आठवणींचं मुक्त पुस्तक.. कधीही, कुठूनही वाचावं आणि कुठेही संपवावं. तर ..डायरी आत्ताच्या आत्ता लिहायला कारणही तसंच होतं. काही गोष्टी ना तेव्हाच्या तेव्हाच व्हायला हव्यात. टायिमग हा जो काही फंडा आहे ना तो उगाचच महत्त्वाचा नाहीये. त्या त्या क्षणाचं महत्त्व हे त्या त्या क्षणालाच असतं. दुसरा एखादा क्षण त्या क्षणाला कधीच रिप्लेस करू शकत नाही. प्रत्येक क्षण हा युनिक असतो. त्यामुळे या मध्यरात्री माझ्या हातात असलेल्या त्या क्षणांना चिकटून असलेले माझे मन उद्या सकाळी असे बिलकूल नसणारेय. त्यामुळे हे जे लिहिणं आहे ते आज आत्ता ताबडतोबच व्हायला हवं असं त्या झोपेने गच्च भरलेल्या डोळ्यांना मी निक्षून सांगितलं. पुन्हा एकदा मनाने अशी झोपेवर मात केली होती.

कसा गेला ना आजचा दिवस. भुर्रकन एकदम. आत्ता कुठे फांदीवर विसावत होता अन् आता लगेच उडूनसुद्धा गेला आणि मी कुठे होते? विसावण्याच्या आणि उडण्याच्या मध्ये कुठे तरी अडकलेले. स्वत:ला भानावर आणण्याच्या प्रयत्नात.. वाढदिवसांचं ना हे असंच असतं. ते येतात छान अलगद आणि जातात मात्र बुलेट ट्रेनच्या वेगात. फायनली २५ वर्षांची झाले बाबा मी. काय वेगळं घडलंय? काय बदललंय, असा विचार करत मी हळूच पाठी वळून पाहते, दबकतच अन् लक्षात येतं की खूप काही बदललंय, खूप काही वेगळंय आणि तरीही काहीच बदललं नाहीये. मी तीच आहे. तीच आहे मी? पेन अचानक पूर्णविरामसारखं त्या प्रश्नचिन्हावर थांबलं. वाढदिवस काय असतो हे कळायला लागल्यापासूनच तो येण्याची मी आतुरतेने वाट बघायचे. शाळेत युनिफॉर्म न घालता मला माझ्या आवडीचे कपडे घालायला मिळणार म्हणून मला माझा वाढदिवस आवडायचा. सगळ्या पांढऱ्या बगळ्यांमध्ये मीच काय ती मोरपंखी मयूर. (अशी उगाच माझ्या मनाची कल्पना..) सगळ्या वर्गाने मिळून माझ्यासाठी वाजवलेल्या टाळ्या. त्यानंतर वर्गात चॉकलेट वाटताना तर मला अगदी सम्राज्ञी झाल्यासारखंच वाटायचं. ती नाही का तिच्या प्रजेला असं काहीबाही देत पूर्ण राज्यभर फिरायची. तसंच काहीसं. लहानपणीचा वाढदिवस म्हणजे जपलेलं स्वप्न असायचं. कित्येक महिन्यांआधीपासून पाहिलेलं. वाढदिवसाचा फारसा खोलवर अर्थ कळत नसूनही मनापासून जगलेला दिवस असायचा लहानपणी तो आणि या दिवशीचे हायलाइट असायचे ते त्या दिवशी मिळणारे गिफ्ट्स. म्हणजे मुळात वाढदिवस सेलिब्रेटच या कारणासाठी व्हायचा. संध्याकाळी घरी वाढदिवसासाठी आलेल्यांनी काही तरी गिफ्ट आणलं आहे ना याची खातरजमा ते इवलेसे डोळे अगदी पटकन करून घ्यायचे अन् मग त्यानंतर सोहळा अगदी रंगात यायचा. चॉकलेट, केक, गिफ्टस् आणि गोड गोड विशेस्च्या सुरेख कोंदणात तो दिवस आपोआप बुकमार्क होऊन जायचा. लहानपण संपायला येतं तसं वाढदिवसाच्या अर्थाचा तळ हळूहळू दिसायला लागतो. आधी दिसणारी हिरवळ, मऊ मऊ गालिच्यांखालचे दगडगोटेच जास्त रुतायला लागतात.

विशी-एकविशीपर्यंत वाढदिवसाची तशी िझग होतीच ना मला. तसं हातातलं पेन अचानक थांबलं आणि आठवणीतल्या वाढदिवसांशी सलगी करायला लागलं. त्या वयातला वाढदिवसपण कसा त्याला साजेल असा अल्लड असायचा. रात्री १२ वाजता त्या ‘समवन स्पेशल’चा फोन येऊ दे यासाठी मनोमन किती प्रार्थना केल्या जायच्या आणि दुसऱ्या दिवशी त्या समवन स्पेशलने मला स्पेशल फील करवावं यासाठी. वाढदिवसाच्यासुद्धा प्रेमात पडण्याचं वय होतं ते. लिहिता लिहिता मला, विसाव्या वाढदिवसाला मिळालेल्या त्या रेड हार्ट ग्रीटिंगची मेणबत्तीवर फुंकर मारावी तितक्या सहज आठवण झाली. काही म्हणा आठवणी या विझलेल्याच बऱ्या..

आणि आज.. पंचविसावं संपवून सव्विसाव्या वर्षांत पोहोचलेय मी. तसा काही विशेष वाढदिवस नाहीये हा. जसा पहिला असतो (जो कोणालाही आठवत नाही. फक्त आईबाबा सांगतात आणि आपले नाकाला केक लागलेले, रडणारे फोटो असतात म्हणून आपण कसाबसा विश्वास ठेवतो) किंवा जसा साठावा असतो (जो नको तितका लक्षात राहतो कदाचित), तर तसा काही पंचविसावा वाढदिवस लक्षणीय नसतो. फार फार तर तो आपल्याला जाणीव करून देतो की, आपण कसे बल झालो आहोत, आपल्या बरोबरीच्या मुलांनी कशी चंद्रावरसुद्धा झेप घेऊन तिथे बंगला बांधला आहे, आणि आपण मात्र कसे विरारलासुद्धा वनरूम किचन घेऊ शकत नाही. (तसं खड्डय़ांचं साम्य वगळता बाकी बराच फरक आहे चंद्र आणि विरारमध्ये). पंचविसावं वर्ष आपल्याला झोपेतून जागं करतं. रात्री झोपताना तर मी १५-१६ वर्षांची होते आणि उठल्यावर डायरेक्ट पंचवीस वर्षांची? ही मधली र्वष कशी काय कापरासारखी उडून जाऊ शकतात? मग मी स्लीपिंग ब्युटी तर नाही ना, असा एक भ्रष्ट विचारही माझ्या मनात आला, म्हटलं शक्यच नाही. इतका वेळ काही आई आपल्याला झोपू द्यायची नाही. हल्ली हल्ली तर मला खात्रीच वाटायला लागलीये की विसाव्यापासून २३-२४व्या वर्षांपर्यंत कोणीतरी आपल्याला गुंगी देतं आणि आपल्याला अचानक पंचविसाव्या वर्षी जाग येते.

हा पंचविसावा वाढदिवस म्हणजे ना एक कोडं असतं. याच वर्षी आपल्याला अचानक स्वत्वाची जाणीव वगरे व्हायला लागते. आधी वर्षांनुवष्रे घोरत पडलेला तो ‘आतला मी’ कसा काय याच वर्षी जागा होतो? आपल्याकडे असलेल्या नोकरी आणि छोकरी दोघांवरचाही विश्वास उडायला लागतो. फिल्म्सनी इन्स्पायर होऊन आपण पण एक ट्रिप आखतो (जी आधी दहा वेळा कॅन्सल होते.) स्वत:ला शोधण्यासाठी आणि फारात फार गोवा नाही तर गेला बाजार अलिबागला जाऊन येतो. हाच तो वाढदिवस असतो जेव्हा आपल्याला आयडिया येते की, खरं तर आपल्याला कसलीच आयडिया नाहीये. घरातल्यांच्या वाग्बाणांनी जर्जर होऊनसुद्धा आपण लढत असतो.. लढाईचं कारण माहीत नसताना. याच वर्षी आपल्याला जाणीव होते की, आपण फक्त मजा करण्यापुरते पसे कमावतो, घर चालवण्याइतके नाही. आणि हेच ते वर्ष असतं जेव्हा आपला वाढदिवस या संकल्पनेवरून विश्वास उठायला सुरुवात होते. संपूर्ण दिवस एन्जॉय केल्यावर हातात उरतं काय.. आयुष्य वजा एक वर्ष!
प्राची साटम – response.lokprabha@expressindia.com

First Published on November 4, 2016 2:39 pm

Web Title: life 2
Next Stories
1 हनुमानउडी
2 नातं…
3 जगणं नव्हे धावणं
X
Just Now!
X