News Flash

जगणं नव्हे धावणं

आज आपल्यापैकी प्रत्येक जण धावतोय.

छ्या..दोन वाजून गेले. आजपण झोपायला उशीर. मग उद्या उठायला आणि मग पुढची सगळी कामं रेंगाळणार. नीट आखलेल्या प्रत्येक प्लॅनचे तीनतेरा वाजणे गरजेचे आहे का? उद्या सगळंच बोंबलणार. अर्र..डायरीसुद्धा लिहायची राहून गेली या नादात. अं..जाऊ दे. नंतरच लिहीन आता.

ब्बापरे.. किती उशीर झालाय मला. हा सगळा काल रात्रीचा परिणाम. नको होतं इतकं जागायला. आता आज रात्री नीट वेळेवर झोपायचं. ‘ए आई, येते गं. हो केलाय मी नाश्ता. पुरे झाला तेवढाच. चल, ब्बाय.’ ‘काय ही हल्लीची मुलं. दिवस-रात्र तर सोडाच, मध्यरात्रसुद्धा पुरत नाही यांना. कसली इतकी कामं आणि कसली इतकी घाई असते यांना देवच जाणे.’ सकाळी सकाळी माझी तंद्री भंग करणारे आईचे अभंग कानी पडले म्हणजे आता दिवस ‘फारच चांगला’ जाणार म्हणायचा.

रस्त्यावरून मी अगदी भरभर चालत होते. पण का कुणास ठाऊक मला मात्र मी भरभर चालतेय असं बिलकूल वाटत नव्हतं. याला कारण म्हणजे माझ्या आजूबाजूची माणसं. मिल्खा सिंगनंतर ऑलिम्पिकमध्ये आपणच धावणार असल्याच्या आवेशातच चालत होती. त्यातच रस्त्यावर ट्रॅफिकची पार बोंब उडालेली. चौकात लावलेला तो बापुडा सिग्नल निमूटपणे आपले रंग दाखवत होता. मात्र त्याला न जुमानता सर्व गाडीवाले मात्र आपले वेगळेच रंग उधळण्यात मश्गूल होते. प्रत्येक गाडीला तिच्या पुढच्या गाडीच्या पुढे जायचं होतं. दहावीच्या विद्यार्थ्यांचीसुद्धा प्रथम क्रमांकासाठी इतकी चुरस नसेल जितकी या गाडय़ांची आपापसात होती. दुचाकीवाले तर रिकाम्या जागा भरायचे काम अगदी चोख बजावत होते. जराशी कुठे मोकळी जागा दिसली की घुसव गाडी तिकडे. त्याला अगदी फुटपाथही अपवाद नव्हता. सगळ्यांनाच घाई होती कुठे तरी पोहोचायची, जायची. खरंतर हे रोजचेच. अंगवळणी पडलेले. नेहमीची व्यथा. पण कधी कधी या नेहमीच्या गोष्टींचेही एक वेगळंच रूप अचानक आपल्या समोर येते आणि आपण भांबावतो. आज माझ्या लक्षात आले, की मी आणि माझ्या आजूबाजूला असलेले आम्ही सर्व जण धावतोय. नुसतेच धावतोय. एका ठिकाणाहून दुसरीकडे, तिथून अजून तिसरीकडे आणि पुढे अजून चौथीकडे. आपल्या पायांना चक्र लावल्यागत वेग आहे. पळापळ चालू आहे फक्त. प्रत्येक जण घाईत आहे. ऑफिसला गेल्यावर काम संपवण्याची घाई, मग घरी जाण्याची घाई, घरी गेल्यावर उद्याच्या तयारीची घाई. एवढंच कशाला, शाळेत असताना कॉलेजला जायची घाई, कॉलेजला गेल्यावर कॉलेज संपायची घाई आणि मग नोकरीची घाई. हल्ली तर प्रेमात पडायची पण घाई असते आपल्याला. भावनांची घाई करायला लागलो की समजायचे कुठे तरी काही तरी बिघडतंय. लग्न करायच्या घाईने तर कित्येकांचं काय काय बिघडलं असेल हे त्यांचं त्यांनाच माहीत.

आपल्याला ना खूप पटापट पुढे जायचं असतं, पण तसं करताना आपण हे विसरतो की या फास्ट फॉरवर्ड केलेल्या आयुष्यात काही स्लो मोशन क्षण दडलेले होते आणि दुर्दैवाने ते अनुभवण्यासाठी आपल्याकडे रिवाइंडचे बटणसुद्धा नसते.

एखाद्या उंच डोंगरावर लोक सूर्यास्त पाहण्यासाठी जमलेले असतात आणि जसजसा सूर्य अस्ताला जातो, तसतसे लोकांचे कॅमेरे (ऊर्फ मोबाइल) सरसावून पुढे येतात. जो क्षण डोळ्यांनी कैद करायचा असतो तो त्या लेन्समध्ये कृत्रिमरीत्या कैद होतो. एका सजीव क्षणाला आपण क्षणार्धात निर्जीव करतो. हा असा क्षण जगायच्या ऐवजी त्याला पिंजऱ्यात अडकवतो. किती घाई असते ना त्या क्षणाला पकडून ठेवण्याची, पण हाताच्या मुठीत गच्च आवळून ठेवला म्हणून काही तो क्षण आपला होत नाही. खरे तर त्याला अलगद तळहातावर पसरू द्यायचे असते. पण एवढा वेळ आहे कोणाकडे?

आज आपल्यापैकी प्रत्येक जण धावतोय. अगदी जीव मुठीत घेऊन धावतोय. प्रत्येकाची स्वत:शी कसली तरी स्पर्धा सुरू आहे. त्या दिवशी मी सहज म्हणून डोळे मिटून बसले आणि मला धड दोन मिनिटंही स्वस्थ बसवले नाही. मी पटकन डोळे उघडले. आजकाल आपल्याला स्वस्थतेची भीती वाटायला लागली आहे. ताण, चिंता या गोष्टी वरवरून कितीही नकोशा म्हटल्या तरी त्यांची एक नशा चढली आहे आपल्याला. त्या नसल्या (किंबहुना त्या नसतात यावर आपला विश्वासच नाही मुळी) की आपण बेचैन व्हायला लागतो. शाळा-कॉलेज-नोकरी-लग्न-मुलं-म्हातारपण-मरण हा आपला प्लॅन आपण आखूनच ठेवलाय. असे सगळे विचार मनात आले की मला प्राणी, पक्ष्यांचा फार हेवा वाटतो. ते या मॅनमेड चक्रापासून किती लांब असतात. येणारा क्षण समरसून जगतात. पुढचा क्षण आपला असेल की नाही याची पर्वा आणि घाई न करता..

त्या दिवशी रणबीर-दीपिकाचा ‘ये जवानी है दिवानी’ सिनेमा टीव्हीवर सुरू होता. त्यात ती त्याला सांगते असते, ‘जितना भी ट्राय करो, लाइफ में कुछ ना कुछ तो छूटेगा ही, तो जहां हैं वही के मजे लेते हैं..’ आयुष्याच्या आपण आखलेल्या या चक्राचे एखादे पाते तोडून बाहेर यायला काय हरकत आहे?
प्राची साटम – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 15, 2016 1:17 am

Web Title: modern days fast paced lifestyle
टॅग : Lifestyle
Next Stories
1 जंगलातली वाट
2 डायरी
3 पहला पहला प्यार
Just Now!
X