23 November 2017

News Flash

एक प्लेट इडली, उत्तप्पा

‘‘चला जरा चहा घेऊ या,’’ तो विनंतीच्या स्वरात म्हणाला.

आबासाहेब सूर्यवंशी | Updated: August 19, 2017 2:50 AM

‘‘चला जरा चहा घेऊ या,’’ तो विनंतीच्या स्वरात म्हणाला. ‘‘अहो तुम्ही एवढं माझ्यासाठी थांबलात, उन्हातून माझी सुटका केलीत, कोण कोणासाठी एवढं करतोय? चला चहा तरी घ्या,’’ असं म्हणून त्याने जवळजवळ सक्तीच केली. गुरुजीनींही त्याच्या विनंतीला मान दिला.

आता साठच्या वर वय झाले तरी अजून बापू खोत गुरुजी मोटारसायकलनेच प्रवास करतात. गावाला जाताना, एस.टी.ने प्रवास करण्यापेक्षा मोटारसायकलने प्रवास करायला त्यांना आवडते. एस.टी.ची वाट पाहण्यात बराच वेळ जातो. आपल्या इच्छित ठिकाणी अपेक्षित वेळेत न पोहोचल्याने बऱ्याच वेळा या ना त्या प्रकारे बरेच नुकसान झाल्याने ते कुठेही निघाले तर मोटारसायकलने काळजीपूर्वक प्रवास करतात. कधी कधी रस्त्यात अडले नडलेले वाटसरू उभे असलेले दिसले आणि त्यांनी हात करून विनंती केली की ते त्यांना त्यांच्या मार्गातल्या त्यांच्या ठिकाणापर्यंत घेऊन जाण्याचे समाजकार्यही करतात.

तीन-चार दिवसांपूर्वी बापू गुरुजींना बहिणीची आठवण आली म्हणून मोटारसायकलवरून ढालगावला गेले. शाळा मास्तरच्या नोकरीत गुरफटल्याने आजपर्यंत बहिणीकडे फारसे जाता आले नाही. ढालगावची बहीण ‘बापू तू बहिणीला विसरलास,’ असं सारखी म्हणायची म्हणून बापू गुरुजींनी ढालगावला जायचा बेत केला होता. दोन दिवस बहिणीकडे पाहुणचार घेऊन, मेव्हण्यांना राम राम करून सकाळी नऊ वाजता ढालगावहून मोटार सायकलने निघाले. लंगरपेठ गाव ओलांडून पुढे आले. त्यांनी पाहिले की, रस्त्याच्या कडेला एक पस्तीस-चाळीस वर्षांचा एक जण हात करून गुरुजींना थांबण्याची विनंती करीत होता. उन्हाची वेळ असल्याने, बापू गुरुजींनी गाडी थांबवली.

‘‘कुठपर्यंत?’’ गुरुजींनी विचारले.

‘‘इथंच, जवळ. चार किलोमीटरवर. मळ्यात घर आहे,’’ वाटसरूने सांगितले.

‘‘चला बसा,’’ असं म्हणून वाटसरू बसताच गुरुजींनी गाडी चालू केली.

चार-पाच मिनिटं कोणीच काही बोललं नाही. मागच्यानं बोलायला सुरुवात केली.

‘‘थँक्यू. फार उपकार झाले. अहो कधीपासून एसटय़ांना हात करतोय. एसटीच थांबेना.’’

‘‘गाडी भरलेली असेल तर कशी थांबेल?’’ गुरुजींनी प्रतिसादाची पुश्ती जोडली.

‘‘अन् उन्हाचा तडाखा. झाडंपण नाहीत. दोन-तीन मोटार सायकलना हात केला. कोणीच थांबलं नाही. तुम्हाला हात केला, तुम्ही थांबला. सगळीच माणसं तुमच्यासारखी नाहीत. फार थँक्यू बरं का.’’ मागचा गुरुजींवर खूपच खूश होऊन बोलत होता. गुरुजींना आनंदून लाजल्यासारखं होत होतं.

जरा अंतर गेल्यावर उजव्या बाजूला, उंच उंच झाडांच्या ताटव्यामध्ये एक गार्डन हॉटेल होते. चार-पाच षटकोनी आकाराच्या बांबू-तट्टय़ांच्या झोपडय़ा व मध्ये हॉटेलची इमारत असे ते हॉटेल.

‘‘जरा थांबवा गाडी,’’ त्या वाटसरूने गुरुजींना म्हटले. ‘‘का? काय झालं? तुमचा मळा आला काय?’’ गुरुजींनी विचारलं.

‘‘चला जरा चहा घेऊ या,’’ तो विनंतीच्या स्वरात म्हणाला. ‘‘अहो तुम्ही एवढं माझ्यासाठी थांबलात, उन्हातून माझी सुटका केलीत, कोण कोणासाठी एवढं करतोय? आता नाही म्हणू नका. ’’ असं म्हणून त्याने सक्तीच केली. गुरुजीनीही मान्य केले. ‘‘हं, काय घेऊ या बोला. अरे हो! तुमची ओळख करून घ्यायची राहिलीच. तुमचं नाव, गाव कळेल का?’’ त्यानं आपुलकीनं विचारलं.

‘‘मी निवृत्त शिक्षक आहे. माझं नाव बापू खोत. लोक मला प्रेमानं बापू गुरुजी म्हणतात. थबडेवाडी माझं गाव. तालुका कवठेमहांकाळ,’’ गुरुजींनी  एका दीर्घ वाक्यात ओळख करून दिली.

‘‘नमस्कार, बापू गुरुजी. आता बोला काय घेऊ या? काही तरी खाल्लं पाहिजे. इथले सगळे पदार्थ फार चवदार आणि खमंग असतात.’’ त्याने आग्रह धरला. ‘‘नको नको. अहो खायला कशाला? फक्त चहा घेऊ या,’’ गुरुजींनीही शिष्टाचार दाखवला.

‘‘नाही नाही. तसं कसं! अरे कोण आहे का?’’ इकडे तिकडे बघत त्याने हाक मारली. एवढय़ात एक वेटर येऊन उभा राहिला. दुसऱ्याने पाणी व दोन ग्लास आणून ठेवले.

‘‘अरे, हे बघ, पहिल्यांदा दोन इडली-सांबर आण आणि नंतर थोडय़ा वेळाने दोन उत्तप्पा आण,’’ त्याने उदार मनाने आदेश दिले.

‘‘अहो कशाला एवढं? मला भूक नाही. आत्ताच बहिणीकडे भोजन करून निघालो होतो. उगीच कशाला खर्चात पडताय?’’

‘‘बरं ते जाऊ द्या. तुम्ही इकडे ढालगावला कशाला गेला होता?’’ त्या व्यक्तीने ओळख वाढवायची म्हणून प्रेमाने विचारपूस केली असेल म्हणून गुरुजींनीही प्रेमाखातर सर्व काही सांगितले. सांगून होईपर्यंत गरम गरम इडली-सांबर आले. दोघांनी गप्पा मारत ते खाल्ले. लगेच काही वेळात दोन उत्ताप्पापण आले. ते ही खाल्ले.

‘‘ मी चहा घेत नाही. कॉफी घेतो. तुम्ही?’’

‘‘मला चहा,’’ गुरुजींनी साधेपणा दाखवला.

‘‘ठीक आहे. अरे बाळ, एक कॉफी, एक चहा.’’

त्याने वेटरला टाळी वाजवून ऑर्डर दिली.

गुरुजींनी त्याचे नाव गाव काही विचारले नाही. काही कारणच नव्हते ना. एवढे खायला प्यायला दिल्यावर त्यांचं नाव गाव विचारणे म्हणजे ते योग्य होणार नाही म्हणून गुरुजी आपले गप्पच राहिले. पाचच मिनिटांत चहा, कॉफी आली. दोघांनीही चहा कॉफीचा आस्वाद घेतला.

‘‘गुरुजी, जरा जाऊन आलो. थांबा.’’ त्याने म्हटले आणि प्रसाधनगृहाकडे गेला. बापू गुरुजींनी एक वर्तमानपत्र मागून घेतले आणि तो येईपर्यंत पेपरावर नजर फिरवू लागले. सगळ्या बातम्या वाचल्या तरी त्याचा पत्ता नाही. गुरुजींनी वेटरला विचारले, ‘‘अरे ते माझ्याबरोबरचे कुठं गेले?’’

‘‘काय माहीत? प्रसाधनगृहाकडे बघून या,’’ वेटरनेच गुरुजींना आदेश दिला. गुरुजी लगबगीने प्रसाधनगृहाकडे गेले. तिकडे तर कोणीच नव्हते. तो वाटसरू गेला कुठे? म्हणून बापू गुरुजी गल्ल्यावर बसलेल्या मालकाकडे चौकशीसाठी गेले. त्या मालकानेही, ‘‘कोण माणूस? आम्हाला काय माहीत?’’ असे म्हणून हात वर केले.

गुरुजी हताश झाले. आता काय करावे हे त्यांना सुचेना एवढय़ात वेटरने त्यांच्या हातात बिलाचा कागद ठेवला अन् ‘‘बराच वेळ झाला आहे साहेब, तेवढे बिल भरा,’’ असे म्हणून आत गेला. गुरुजी पुन्हा मालकाकडे जाऊन, ‘‘अहो त्या माणसानेच मला हॉटेलात चहा प्यायला आणले होते. बिल तो देणार होता,’’ पोटतिकडकीने सांगू लागले.

‘‘मग तुम्ही त्यांना घेऊन या. नाही तर तुम्ही बिल भरा. आमचे बिल तर आम्हाला मिळाले पाहिजे,’’ हॉटेलमालकाने करडय़ा आवाजात म्हटले. गुरुजी अब्रूला घाबरले. आता आणखी काही विचित्र घडायला नको म्हणून त्यांनी खिशात हात घातला आणि रुपये एकशे पंच्याऐंशी फक्त गल्ल्यावर ठेवून मुक्त झाले. गाडीकडे येऊन किक मारता मारता सहज म्हणून त्यांनी इकडे तिकडे तो वाटसरू दिसतो का ते पाहिले, पण व्यर्थ. एखाद्या ठगाने ठगवले असावे की गिऱ्हाईक मिळविण्यासाठी हॉटेलमालकाचीच ही खेळी असावी याचा विचार करत गुरुजींनी आपले गाव गाठले.

आबासाहेब सूर्यवंशी

chaturang@expressindia.com

 

First Published on August 19, 2017 12:19 am

Web Title: abasaheb suryawanshi loksatta chaturang marathi articles