आज बऱ्याच दिवसांनी रविवारची सकाळ निवांत होती. आम्हा दोघांना ऑफिसला आणि कांतेयला शाळेला सुट्टी, त्यामुळे बाबा कालच इकडे आले होते. या छान थंडीत, टेरेसवर येणारं कोवळं ऊन अंगावर घेत; आमच्या चौघांच्या रंगलेल्या गप्पा आणि सोबत कांदेपोहे व मस्त वाफाळलेला आल्याचा चहा.. सुट्टीच्या दिवसाची एकदम परफेक्ट सुरुवात.

बोलता बोलता सहज विषय निघाला आणि बाबांच्या जुन्या आठवणींमध्ये आम्ही सारेच रमलो. वयाच्या १९ व्या वर्षी बाबा भारतीय नौसेनेत कसे गेले इथपासून, तेव्हाची प्रवेश परीक्षा, सुरुवातीचे प्रशिक्षण, वेगवेगळ्या ठिकाणी पोस्टिंग झाल्यावरती घरापासून दूर राहतानाचे अनुभव, पुण्यात ‘एनडीए’मध्ये असतानाच्या आठवणी, १९६२ आणि १९६५ च्या युद्धातील अविस्मरणीय क्षण, सिंगापूरला जाऊन त्यांनी घेतलेले सबमरीनचे प्रशिक्षण तसेच आयएनएस राजपूत, आयएनएस ब्रह्मपुत्रा, आयएनएस जमुना आणि आयएनएस विक्रांत या वेगवेगळ्या जहाजांवरचा अनोखा अनुभव आणि आयएनएस विक्रांतवर असलेलं त्यांचं विशेष प्रेम.. सारं काही थक्क करणारं!!

nilesh sambre, kapil patil
“कपिल पाटील डोळ्यांची शस्त्रक्रिया करा”, नीलेश सांबरे यांचे खासदार कपिल पाटील यांना प्रत्युत्तर
mumbai best bus marathi news, mumbai long queues of passengers marathi news
अपुऱ्या बसमुळे प्रवासी थांब्यांवरच, बसगाड्यांची वारंवारिताही एक तासावर; गर्दीचा मुंबईकरांना फटका
clemen lobo arrested after 36 years in salim cassetwala murder case
वसईतील प्रसिध्द सलीम कॅसेटवाला हत्या प्रकरण; फरार आरोपी क्लेमेन लोबोला ३६ वर्षांनी अटक
Sonam Wangchuk
“मी पुन्हा येईन!” २१ दिवसांनी सोनम वांगचूक यांनी उपोषण घेतलं मागे, मोदी आणि शाहांचं नाव घेत म्हणाले…

१९६१ मध्ये माल्टाला भारतीय नौदलाची विशेष तुकडी पाठवण्यात आली होती. ‘विक्रांत’ जहाजाची भारतीय नौदलाशी झालेली ती पहिली ओळख. तेथे ते जहाज कमिशन झाले. म्हणजे आपल्या ताब्यात आले. नौदलाच्या त्याच तुकडीत बाबा होते. आयएनएस ‘विक्रांत’वरून माल्टा ते मुंबई हा त्यांनी केलेला ‘विक्रांत’वरचा पहिला अविस्मरणीय प्रवास..

कदाचित म्हणूनच आजही ‘आयएनएस विक्रांत’ चे नाव काढताच भरून आलेल्या त्यांच्या डोळ्यांनी खूप काही सांगितलं. आयुष्यात इतक्या सुंदर आठवणी बाबांना भारतीय नौसेनेने दिल्या. तेव्हा काळाची गरज म्हणून कमावणं गरजेचं होतं, कुळ कायद्यात शेतजमीन गेलेली, नोकरी नाही, भावंडांत मोठं असल्याने कुटुंबाची जबाबदारी होती. अशा परिस्थितीत समोर दिसला एकच मार्ग.. अर्ज केला. परीक्षा दिली आणि निवडसुद्धा झाली. एका लहान गावातून अनवाणी निघालेला ‘तो’ नौदलात दाखलही झाला. पहिल्याच दिवशी मिळाले तीन प्रकारचे युनिफॉर्म आणि प्रत्येक युनिफॉर्मबरोबर घालायचे वेगवेगळे बुटांचे तीन जोड.. ते पाहून ‘त्याच्या’ डोळ्यांत टचकन पाणी आलं. अनवाणी पायांनी इथवर येऊन, जणू सर्व प्रश्नांची उत्तरं ‘त्याला’ इथेच मिळाली. आता सोबत होती ती निळ्या आकाशाची, अथांग सागराची आणि त्या बोटींची. क्षितिजावर खूप सारी स्वप्नं होती आणि मनात ती पूर्ण करण्याची धडपड. एक एक पाऊल पुढे टाकत खूप लांबचा पल्ला गाठला पण कधीही  सुरुवात कोठून केली, हे ‘तो’ कधीही नाही विसरला.

योगायोगाने भारतीय नौसेना सप्ताह सुरू होता. ‘एनडीए’मध्ये बाबा १९५८ मध्ये होते म्हणजेच आज ५८ र्वष झाली होती ‘एनडीए’ सोडून. काय हा योगायोग..  हाच धागा पकडून आम्ही बाबांना त्याच जागी घेऊन जायचे ठरवले, जिथे त्यांच्या आयुष्यातील अनेक सुंदर आठवणी होत्या. घरापासून अध्र्या तासाचे अंतर होते आणि त्या अध्र्या तासांत बाबा मात्र अठ्ठावन्न र्वष मागे पोहचले होते. तेव्हाचं चित्र आणि आजचं चित्र यांत खूप बदल झाले होते आणि बाबा तेच बदल डोळ्यांत साठवत होते. त्यांच्यासारख्या इतक्या जुन्या ऑफिसरला भेटायला साहजिकच तेथील काही ऑफिसर आले आणि पाहता पाहता काही क्षणात तेथील वातावरण एकदमच बदलून गेले.

शरीराने थकलेला जीव, पण अजूनही तीच ऊर्जा, तोच अभिमान आणि तोच गर्व. एक माजी अधिकारी बोलत होता आणि बाकी आजी ऑफिसर त्यांचं बोलणं ऐकत होते, प्रश्न विचारात होते. आज खऱ्या अर्थाने बाबा त्यांच्या ‘फील्ड’वरती होते. त्या सर्वाचे हावभाव, बोलण्यातील जोश, चेहऱ्यावरचा आनंद मी डोळ्यांत साठवत होते. त्या सर्वाच्या गप्पा अशाच रंगत गेल्या. या काही वेळात बाबा जणू ‘ते’ आयुष्य परत एकदा जगले.

निघायची वेळ झाली, सर्वाशी हस्तांदोलन करून बाबा निघाले. चालताना बाबांचा हात मी धरला होता, एवढय़ात एक क्षण थांबून बाबा मागे वळले आणि म्हणाले, ‘‘कभी जरुरत पडे तो बुला लेना, आ जायेंगे लढने,’’ तेव्हा मात्र त्या ऑफिसरने एक कडक सॅल्यूट मारला. नि:शब्द होऊन आम्ही फक्त पाहात राहिलो.

खूप विलक्षण, खूप वेगळा अनुभव होता. आजच्या या दिवसानं, बाबांसारखंच मला पण खूप काही दिलं. नक्की काय वाटलं, हे शब्दांत मांडता, बांधता येण्याच्या खरंच पलीकडचं होतं.

कविता सहस्रबुद्धे

kavitasahasrabudhe@yahoo.co.in