आजींच्या समंजस, सहनशील व तडजोड स्वीकारणाऱ्या स्वभावाचं कौतुक करीतच मी घरी पोहोचले. त्या दोघांचा त्या पार्कमधला नित्याचा कार्यक्रम मला भावला. मनात आलं शेजारच्या काळ्यांकडच्या आजी-आजोबांचे सततचे वादविवाद. मुलांकडून-सुनांकडून होणारी अवहेलना, घरातील ढळणारी शांती, यापेक्षा हे सहजीवन बरंच नाही का?

मॉर्निग वॉकला गेलं की रोज एक दृश्य हमखास दिसायचंच! नानीपार्कमधल्या एका डेरेदार वृक्षाखालील बाकावर ती दोघं अगदी हसत हसत गप्पा मारत असलेली दिसायची. ती दोघं म्हणजे पती-पत्नीच, ६५ ते ७० वयोगटातील! वेळही अगदी ठरावीक, सकाळी साडेसहा ते ८ पर्यंत. पण एक गोष्ट मात्र माझ्या लक्षात आली होती, ती म्हणजे ते दोघं कधी बरोबर येत नसत अगर बरोबर जातही नसत. आजोबा पार्कमधल्या डाव्या बाजूच्या गेटने येत व तेथूनच बाहेर पडत, तर आजींची पार्कमधल्या उजव्या बाजूने ये-जा सुरू असे. पण तिथे जाईपर्यंत मागे वळून दोघं हात मात्र हलवायचे. हे माझ्या नजरेतून कधीच सुटलं नव्हतं आणि त्यामुळे मनातील कुतूहल वाढतच चाललं होतं, जे मला स्वस्थ बसू देत नव्हतं.
गेटमधून बाहेर पडताना एक दिवस मी आजींना गाठून माझ्या शंकेचं निरसन करायचा निश्चयच केला व ती संधी साधली. ‘‘अहो आजी, रोज तुम्ही इकडून व आजोबा तिकडून का बरं जाता? बरोबर नाही का जात?’’ आजी जरा बोलक्या, मनमोकळ्याही वाटल्या. माझ्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह पाहून त्या पटकन म्हणाल्या, ‘‘अहो, ते मोठय़ा मुलाकडे राहतात. त्यांना त्या गेटनं जाणं सोयीचं पडतं. मी धाकटय़ा लेकाकडे राहते.’’
परत माझ्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह त्यांनी वाचलं व त्या म्हणाल्या, ‘‘अहो, दहा वर्षांपूर्वी
सगळीजणं एकत्रच राहात होतो मोठय़ाकडे. वन्-बीएचकेमध्ये. मग धाकटय़ाचं लग्न झालं. जागा पुरेना म्हणून त्यांनी समोरच्या बिल्डिंगमध्ये, वन्-बीएचके घेतला,’’ त्या बिल्डिंगकडे बोट दाखवत आजी म्हणाल्या, ‘‘मोठय़ा लेकाची मुलं आता मोठी व समजती झालीत. त्याचा ब्लॉकही तळमजल्यालाच आहे. धाकटय़ाची लेक अजून लहान आहे. मोठी सूनही समंजस आहे. यांना छान सांभाळते. त्यांचं आणि तिचं पटतंही. पण धाकटी आहे, अमराठी. वडिलांच्या बिझनेसमध्ये पार्टनर आहे. अखंड बिझनेस व पैशांत बुडालेली. त्यातून कपडेलत्ते- रहन- सहन तर विचारूच नका. तिच्याकडचं ते जेवण म्हणजे फास्ट फूड! व तेलातुपांत न्हायलेल्या भाज्या. यांना का ते
पटणार व पचणार? त्यातून हम करे सो कायदा. फटाकडी अगदी! लेक सकाळीच जाणार रात्री परतणार! मी घेते हो, कसंतरी जमवून. यांना कसलं पटतंय ते!’’
‘‘मग अखेर मोठय़ा लेक-सुनेनेच ‘अॅडजेस्टमेंट’ सुचवली.’’ ‘अॅडजेस्टमेंट’ शब्दावर जोर देत आजी म्हणाल्या. तो म्हणाला, ‘‘बाबा तुम्ही राहा माझ्याजवळ. आईला राहू दे धाकटय़ाकडे. आईमध्ये सहनशीलता आहे व शेंडेफळ म्हणून तोच तिचा लाडका! त्याच्या लेकीला सांभाळेल ती. घेतलं मग आम्ही दोघांनी समजून! दुसरं काय करणार? नाइलाज ना! पहिल्या पहिल्यांदा जड गेलं दोघांना! आता पडलंय अंगवळणी. सकाळी इथं भेटतो. तास-दीड तास सुख-दु:खाच्या गप्पा मारतो. बरं वाटतं. तसं मुलं काळजी घेतातच हो! आपआपल्या परीनं सर्वजण सुखी. नाही तरी या वयात दुसरं काय हवं असतं हो माणसाला?’’
आजींच्या समंजस- सहनशील व तडजोड स्वीकारणाऱ्या स्वभावाचं कौतुक करीतच मी घरी पोहोचले. त्या दोघांचा तो नित्याचा कार्यक्रम मला भावला. मनात आलं शेजारच्या काळ्यांकडच्या आजी-आजोबांचे सततचे वादविवाद. मुलांकडून-सुनांकडून होणारी अवहेलना, घरातील ढळणारी शांती, यापेक्षा हे सहजीवन बरंच नाही का? त्यानंतर सात-आठ महिने मीही आजी-आजोबांचा हा कार्यक्रम एन्जॉय केला.. आणि एक दिवस मला तो बाक रिकामा दिसला. मनात चर्र्र झालं. नको त्या शंकेनं मन ढगाळलं. असे दोन- तीन दिवस गेले. मनातली बेचैनी वाढली. कुणाकडे काही चौकशीही करता येईना..
आणि एक दिवस सकाळी ती दोघे त्या बाकावर बसलेली मला दिसली व मी मनोमनी सुखावले. मी जवळ जाऊन विचारायच्या आतच आजींनी मला हाक मारून शेजारी बसवले व सांगायला सुरुवात केली. ‘‘अहो, तुम्हाला भेटण्याकरिताच आज आम्ही मुद्दामहून इथं बसलोय. आजोबांचा चेहरा प्रसन्न दिसत होता. अहो, हे मोठय़ा मुलाजवळ राहातात ना त्या बिल्डिंगचा पुनर्विकास करायचाय म्हणून सोसायटीने त्याला जागा रिकामी करायला सांगितलीय. त्यांनी नवी मुंबईत घेतली आहे तीन-चार वर्षांसाठी जागा. पण तिसरा मजला हो! यांना काय झेपणार? परत आमच्या दोघांची गैरसोय व ताटातूट नको म्हणून दोघा भावांनी आमची सोय तिथल्याच एका छानशा वृद्धाश्रमात केली आहे. त्याची बिल्डिंग तयार झाली की त्याला मोठी जागा मिळणार. मग परत येणार हं आम्ही इकडे. अहो वृद्धाश्रमही छान आहे हो तो! तळमजल्याची रूम व अगदी मोकळी हवा. बघा नं या उतारवयात परत आमचं सहजीवन सुरू होणार. चोवीस तास दोघे एकत्र. कसलीही जबाबदारी नाही. कसलं बंधन नाही. गप्पा मारायला भरपूर वेळ, एकमेकांशी वादविवाद घालायला, वेळ आली तर भांडायलाही स्वतंत्र जागा. हो की नाही हो?’’ आजोबांकडे बघत आजी म्हणाल्या. आजोबांनीही आजींच्या हसण्याला दाद दिली.
‘‘या उतारवयात आणखी काय हवं असतं
हो एकमेकांच्या सहवासाशिवाय? खरं की
नाही?’’ आजींनी माझ्याही हातावर टाळी दिली व आपल्या आनंदात सहभागी करून घेतलं. मीही सुखावले..

– शुभदा कुलकर्णी