‘व्हेंटिलेटर’ या चित्रपटाच्या निमित्ताने का होईना आपल्या नात्यांचा विचार तर काही जण करू लागले; आणि हो, अजून इतका वेळ आहे आपल्याकडे, जे याआधी करायचं राहिलं ते आता करायला.. कदाचित यामुळे जर कधी आपण व्हेंटिलेटरवर गेलो तर, त्या वेळी आपल्या नात्यांना कुठल्याच व्हेंटिलेटरची गरज भासणार नाही, हे नक्की.

‘व्हेंटिलेटर’ चित्रपटाच्या निमित्ताने परत एकदा या शब्दाची भेट झाली. दोन वर्षांपूर्वी आयुष्यात पहिल्यांदा भेटलेला हाच तो व्हेंटिलेटर.. लाइफ सपोर्ट सिस्टम एवढाच काय तो त्यावेळी समजलेला अर्थ. पण नंतर वाटलं आजचं मरण उद्यावर ढकलणारं एक साधनच ते.. अगदी जवळच्या माणसाला व्हेंटिलेटरवर पाहणं, यासारखं दुर्दैव नाही. काय गंमत आहे पाहा, एकीकडे या हॉस्पिटलमध्ये आपली व्हेंटिलेटरशी नव्याने ओळख होते आणि दुसरीकडे आपल्याच जुन्या माणसांची परत एकदा नव्याने भेट घडते.. होत राहते, रोजच..

Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
Bijay Anand on Maidaan vs Bade Miyan Chote Miyan clash
सोनाली खरे तिची लेक अन् पती, तिघांचे दोन सिनेमे एकापाठोपाठ प्रेक्षकांच्या भेटीला; बिजय त्यांच्या चित्रपटाबद्दल म्हणाले…
Devendra Fadnavis after Swatantrya Veer Savarkar
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट पाहिल्यानंतर फडणवीसांची राहुल गांधींसाठी खास ऑफर; म्हणाले, “मी माझ्या खर्चाने…”
akshay kumar stepped on alaya F dress video viral
भर कार्यक्रमात अक्षय कुमारने ठेवला प्रसिद्ध अभिनेत्रीच्या ड्रेसवर पाय अन् तिने केलं असं काही…, व्हिडीओ व्हायरल

आपलं कर्तव्य ओळखून दिवस-रात्र रुग्णाची सेवा करणारे डॉक्टर, नर्स हे लोक एकीकडे आणि फक्त रीत म्हणून भेटायला येणारे दुसरीकडे. बरं, ते आधार द्यायला येतात की आधार जाणार याची जाणीव करून द्यायला, हेच समजत नाही. खरं तर तेव्हा प्रेमाचा एक हात हवा असतो, जे आपल्या हातात नाही तरीही त्यासाठी त्यावरच्याशी भांडायला आधार हवा असतो, डोक्यावर हात ठेवून बोलणारा प्रेमाचा एक शब्द हवा असतो..

सर्व छान असताना कधीही भेटायला न येणारे, हक्काने चौकशीचा कधी एक फोन न करणारे चेहरे मग अचानक आजूबाजूला दिसू लागतात, अन् तेव्हा जीव गुदमरू लागतो. अशा वेळी न सांगता आपलं मन ओळखणारे, पाठीवर प्रेमाने हात ठेवणारे, काहीही न बोलता आपला हात घट्ट धरणारे काही हात आपल्यासाठी व्हेंटिलेटर होतात..

रुग्णाचा व्हेंटिलेटर काढायचा की नाही, हा प्रश्न शेवटी डॉक्टर विचारतात आणि तो कर्ता करविता सारेच प्रश्न संपवतो. एक-दोन दिवस होत नाहीत तर ‘पुढची कार्य’ हा चर्चेचा विषय कानावर आदळतो आणि त्याचा परत श्वास अडकतो. अरे जो गेलाय ते दु:ख आधी स्वीकारू तर द्या, मोडलेल्या माणसांना सावरणं महत्त्वाचं की हे बोलणं? ज्याच्यावर वेळ येते तोच फक्त कोसळलेला, बाकीचे फक्त व्यवहाराने चालणारे. बरं, थोडय़ा रूढी, परंपरा सोडू म्हटलं तर त्यावरून वादंग, अरे ज्या कुटुंबाला फरक पडलाय त्याला ठरवू द्या ना, तुम्ही का विडा उचलता? तुम्हाला फरक पडलाय का? नाही ना, नाहीतर ‘ती’ बातमी मिळाल्यावर आधी जेवून नसता आलात हॉस्पिटलात आणि हो काल कुठल्याशा प्रदर्शनात जाऊन जी खरेदी केली तुम्ही, ते चाललं का तुम्हाला या सुतकात.. अरे किती खोटं जगाल?

कर्तव्य विसरायचं आणि वेळ आली की हक्काची मागणी करायची, बहुतांश घरांत दिसणारं एक विदारक सत्य. आयुष्य किती अमूल्य आहे, अस्थिर आहे ते जवळच्या माणसाला जाताना पाहून समजतं, पण म्हणून काय तो अनुभव येईपर्यंत वाट पाहायची? तो खोटा अहम् आधीच नाही का सोडू शकत आपण! किती आणि कसं जगलोय असा विचार करताना किती उरलंय हे पण तर पाहायला नको का? मोकळ्या मनान नात्यांच्या या दुनियेत एक पाऊल पुढे टाकलं; तर आपण लहान नाही होणार, हे कधी समजणार आपल्याला?

पण एक बरं झालं, या चित्रपटाच्या निमित्ताने का होईना आपल्या नात्यांचा विचार तर काहीजण करू लागले आणि हो अजून इतका वेळ आहे आपल्याकडे; जे या आधी करायचं राहिलं ते आता करायला.. एक प्रेमाची मिठी मारायला, हक्काने काही द्यायला काही घ्यायला, मनापासून माफी मागायला, झालं गेलं विसरून जायला, परत एकदा एकत्र यायला.. कधीही न उलगडलेले नात्यांचे धागे या निमित्ताने उलगडण्याचा प्रयत्न करायला. कदाचित यामुळे जर कधी आपण व्हेंटिलेटरवर गेलो तर, त्यावेळी आपल्या नात्यांना कुठल्याच व्हेंटिलेटरची गरज भासणार नाही, हे नक्की!

कविता सहस्रबुद्धे

kavitasahasrabudhe@yahoo.co.in