आपल्या शाळेच्या अगदी जवळून नदी वाहत होती शाखांबरी. पावसाळ्यात तिला पूर यायचा तेव्हा ऑफ पीरियडला इतर मुलींबरोबर खेळायला न जाता आपण तो पूर पाहात शांत बसत असू. दोघीच. एकमेकींच्या हातांत हात घेऊन. आपली मैत्री तशीच होती जणू खळाळत्या पाण्यासारखी भरभरून वाहणारी, नि:स्पृह, निव्र्याज, निरपेक्ष, सर्वाच्या कौतुकाचा विषय असणारी. सगळं कसं छान चालू असताना वर्ष संपत आलं आणि एक दिवस तू बातमी दिलीस, तुझ्या वडिलांची बदली झाल्याची.. गेली पन्नास वर्षे तुझी आठवण मनाला घट्ट बिलगून आहे.. कधी भेटशील तू..

सखे, मला आठवतोय तो दिवस.. मी परगावाहून नांदगावच्या व्ही. जे. हायस्कूलमध्ये सातवीच्या वर्गात नवीनच आले होते. नवख्या गावातील नवखी शाळा. सारंच नवीन. वर्गात प्रवेश करताना कुठं बसावं असा विचार करत कावऱ्या-बावऱ्या नजरेनं मी इकडं-तिकडं बघत होते. सारेच अनोळखी चेहरे ‘हे कोण नवीन’ अशा नजरेनं अस्मादिकांकडे बघत होते. तेवढय़ात पहिल्या रांगेत बाकांवर एकटीच बसलेली तू प्रसन्न हसून, थोडंसं सरकून मला इशारा केलास आणि म्हणालीस, ‘‘ये, बस इथं माझ्या शेजारी.’’ माझा हात हातात घेऊन मी कोण, कुठली, कुठून आली अशी चौकशी केलीस, स्वत:चीही ओळख करून दिलीच, पण इतर सर्वाना बोलावून त्यांच्याशीही ओळख करून देताना म्हटलंस, ‘‘ही आपली नवीन मैत्रीण भारती. टाळ्या वाजवून तिचं स्वागत करू या.’’

सखे, इतकंआश्वस्त वाटलं होतं ना तेव्हा आणि प्रथम भेटीत हातात घेतलेला माझा हात तू नंतरही घट्ट धरून ठेवला होतास.

अभ्यासात तू हुशार होतीसच. प्रत्येक परीक्षेत सर्व तुकडय़ांतून तुझा पहिला क्रमांक ठरलेला, पण म्हणून त्याचा अहंकार! छे! किंबहुना तुझा स्वभावाच निगर्वी होता. माझं मराठी तसं चांगलं होतं, शिवाय अक्षरही सुवाच्य होतं, त्यामुळे एकदा माझा निबंध आपल्या सर्व तुकडय़ांमधून वाचून दाखवल्या गेला तेव्हा माझ्याइतकाच तुलाही किती आनंद झाला होता. तुझ्या निर्मळ मनाची साक्षच होती ती. तुझ्या-माझ्या घरची आर्थिक-सामाजिक-धार्मिक परिस्थिती एकदम भिन्न आणि आपले स्वभावही वेगळे. मी जेमतेम परिस्थितीतील, सहा भावंडांची सर्वात थोरली बहीण म्हणून नेहमी तडजोडीच्या भूमिकेत आणि कदाचित म्हणूनच भावनाप्रधान असूनही मनातलं मनातच ठेवणारी. डोळ्यांचे तलाव कायमच तुडुंब भरलेले असणारी. याउलट तू मात्र वडील सरकारी नोकरीत असल्याने ऐसपैस क्वार्टरमध्ये आई-वडील आणि भावासोबत राहणारी आणि कदाचित म्हणूनच नेहमी प्रसन्न, मनमोकळी, सदाफुलीसारखी फुललेली. तरीही आपली मैत्री फुलली, बहरली.

मला आठवतंय शाळेच्या पहिल्या दिवशी मधली सुट्टी झाली आणि तू सगळ्यांना हाक मारलीस, ‘‘चला गं डबा खायला.’’ सगळ्या जणी एका झाडाखाली बसलो.. तू एक पेपर पसरला. ‘‘चला, मागच्या वर्षीसारखंच करायचं नं मग ओता आपापले डबे या पेपरवर. भारती, तुला चालेल नं.. सगळ्या जणींचे डबे एकत्र करून खातो आम्ही. गोपालकाला म्हणतो त्याला.’’ मला हे सगळं नवीनच होतं, पण तरीही मी सामील झाले त्यात. सर्वधर्मसमभावाची शिकवण याहून काय वेगळी असेल! शाळेला मोठ्ठं मैदान होतं. तिथं लंगडी, खो-खो, शिवाशिवी इत्यादी खेळ रंगायचे. प्रत्येक खेळात तू प्रवीण होतीस. लंगडी खेळताना पाय दुखू नये म्हणून तू वेणीची लाल रिबन सोडून पायाला घट्ट बांधायचीस. तुझ्या त्या लांबसडक दोन वेण्या आणि एका वेणीवर दररोज माळलेला तो कोरांटीचा पिवळाधम्म गजरा. नजरेसमोर अजूनही तुझी तशीच मूर्ती उभी राहते.

मला आठवतं.. शनिवारी शाळेला अर्धी सुट्टी असायची. तुझ्या स्कूलबसला यायला बराच वेळ असायचा. मग तुझं माझ्या घरी येणं, आईच्या हातच्या भाकरीसोबत पिठलं, ठेचा, भाजी जे असेल ते चवीनं वाखाणत खाणं, नंतर मैलभर लांब असलेल्या तुझ्या स्कूलबसच्या स्टॉपपर्यंत आपल्या दोघींचं रमतगमत जाणं, जवळच्या दूध-डेअरीच्या कुंपणावरच्या मेंदीची पानं तोडणं आणि नंतर हात लालभडक रंगवून शाळेत येणं. अलिखित नियम होता तो आपल्यातला. तू एवढी अजातशत्रू होतीस की तू स्वत: तर नाहीसच पण दुसऱ्या कोणी कट्टी केलेलीही सहन व्हायची नाही. तू लगेच बट्टी करून द्यायला कासावीस व्हायचीस. अडनिडय़ा वयातल्या आपण त्यावेळच्या मुली आपले रागलोभही तसेच असायचे..

सखे, मला आठवतं एकदा वर्गातील काही मुलं गोंधळ करत होती, सर वर्गात आल्यावरही ते शांत बसले नाहीत. आपले रत्नपारखी सर, विद्यार्थीप्रिय पण एकदम शिस्तप्रिय, तर त्यांनी तो गोंधळ पाहिला आणि वर्गात न शिकवण्याचीच शिक्षा दिली की आपल्याला. सर रोज येत आणि तास संपला की तसेच निघून जात. वर्गात टांचणी पडली तरी आवाज येईल अशी शांतता असे तेव्हा पण सरांशी बोलायला त्यांना सॉरी म्हणायला कोणाचीच हिंमत नव्हती होत. त्यांचा दराराच तसा होता. तीन-चार दिवसांनंतर मात्र तुला राहवलं नाही. आपली काही चूक नव्हती तरी तू मला सोबत घेऊन सरांकडे गेलीस आणि सर्वाच्या वतीने क्षमा तर मागितलीसच पण पुन्हा असं होणार नाही याची ग्वाहीही दिलीस. तेव्हा कुठं ती कोंडी फुटली. काही मुलांमुळे संपूर्ण वर्गाचं नुकसान होऊ  नये याची तुला एवढी कळकळ होती की स्वत:कडे कमीपणा घ्यायलाही तुला काहीच वाटलं नाही. किती अभिमान वाटला होता तेव्हा तुझा मला.

कधी एखाद्या शनिवारी तू मला तुझ्या घरी मुक्कामाला घेऊन जायचीस.. आजकालच्या भाषेत ‘नाइट आऊट’ म्हणतात म्हणे त्याला. प्रशस्त कॉलनीतील तुमची ती एकसारखी क्वार्टर्स त्यात तुझी एकटीची स्वतंत्र खोली. मागे-पुढे गार्डन. गावातल्या दाटीवाटीच्या वस्तीत, माणसांच्या गर्दीत राहणाऱ्या मला या सगळ्यांचीच अपूर्वाई होती. मला आठवतं, आपण तेव्हा दोन चित्रपटही पाहिले होते, ‘वैभव’ आणि ‘मधुमती’. आणि हो, आपल्या शाळेच्या अगदी जवळून नदी वाहत होती शाखांबरी. पावसाळ्यात तिला पूर यायचा तेव्हा ऑफ पीरियडला इतर मुलींबरोबर खेळायला न जाता आपण तो पूर पाहत शांत बसत असू. दोघीच. एकमेकींच्या हातांत हात घेऊन. आपली मैत्री तशीच होती जणू खळाळत्या पाण्यासारखी भरभरून वाहणारी, नि:स्पृह, निव्र्याज, निरपेक्ष, सर्वाच्या कौतुकाचा विषय असणारी.

असं सगळं कसं छान चालू असताना वर्ष संपत आलं आणि एक दिवस तू बातमी दिलीस, तुझ्या वडिलांची बदली झाल्याची. सरकारी नियमाप्रमाणे तीन वर्षांपूर्वी तुम्ही इथंही कुठून तरी बदलूनच आला होतातच. मग काय ध्यानी-मनी  एकच विषय, तू मला सोडून जाणार. बस्स! अभ्यास, जेवण काही सुचेना. सगळ्यांना नवल वाटत होतं त्याचं. पण तुला सांगते सखे, आता आज्जी झालेय ना तरीही जिव्हाळ्याच्या माणसांची ताटातूट होताना अजूनही मन सैरभैर होतंच गं!

आणि सखे, अखेर तो दिवस उगवलाच तुला सेन्ड-ऑफ देण्याचा. सर्व वर्गाची, सरांची तू आवडती विद्यार्थिनी असल्याने सर्वाचा मनापासून सहभाग. भरभरून कौतुकभरली भाषणं, भेटवस्तू देणं सुरू होतं. मी तुझी जिवलग मैत्रीण मात्र दूर उभी होते. हातात पिवळा मखमली बटवा तुला देण्यासाठी आणलेला. इतक्यात सरांच्या लक्षात आलं, ‘‘हे काय भारती, दूर का उभी आहेस. तू नाही का बोलणार काही. तुम्ही तर दोघी सख्ख्या मैत्रिणी. ये इकडे.’’ मी हळूहळू पुढे आले, डोळ्यांतली आसवं आवरत बटवा तुझ्या हातात ठेवला आणि तुला कडकडून मिठी मारली. सर्व वर्ग स्तंभित होऊन आपलं हे मैत्र बघत होतं. ‘‘अगं, भारती काय हे, रडू नकोस बाई, नाही तर मलाही.. ‘दोन ओंडक्यांची होते सागरांत भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ’ असं म्हटलंच आहे नं मग आवर स्वत:ला.’’

आणि सखे, तू निघून गेलीस पुन्हा न भेटण्यासाठी. तू कुठे गेलीस, आता कुठे आहेस, काहीच माहीत नाही.. आयुष्यात पुन्हा खूप मैत्रिणी भेटल्या, पण तुझी आठवण अद्यापही मनाला घट्ट बिलगून आहे. आता जवळपास पन्नास र्वष झालीत. अजूनही बापट आडनावाचं कुणी भेटलं की मी तुझी चौकशी करते. इतकंच काय आपल्या शाळेतसुद्धा चौकशी केली मी. कळतंय, माझ्याप्रमाणेच तुझंही आडनाव बदललं असेल. कदाचित उच्चशिक्षण घेऊन तू परदेशात असशील. कदाचित.. कदाचित्.. मला जेवढय़ा असोशीनं तुझी आठवण येते तेवढी मी तुझ्या आठवणीत राहिलीही नसेल..

पण तरीही.. ‘व्हाट्स अ‍ॅप’, ‘फेसबुक’च्या जमान्यात जग फार जवळ आलंय असं म्हणतात.. मला खात्री आहे.. एक दिवस तू भेटशीलच..

 

भारती महाजन-रायबागकर

bharati.raibagkar@gmail.com