News Flash

निरभ्र

आठवडय़ाचा दौरा आटोपून मी घरी आले ती थकल्या शरीरानं म्हणण्यापेक्षा थकल्या मनानं.

आठवडय़ाचा दौरा आटोपून मी घरी आले ती थकल्या शरीरानं म्हणण्यापेक्षा थकल्या मनानं. खेडय़ापाडय़ातील शालेय विद्यार्थ्यांसाठीच्या एका प्रकल्पाच्या निमित्ताने झालेला आमचा दौरा खरं सांगायचा तर चांगलाच यशस्वी झाला होता. शहरीकरणाचा स्पर्श न झालेल्या खऱ्या अर्थाने रानपाखरं म्हणावीत अशा त्या मुलांचं बालपण त्यांच्या बालसुलभ शंका, समज, जगाबद्दलचे प्रचंड कुतूहल सारच मोहून टाकणारं. निसर्गाशी लय साधत जगणाऱ्या त्या चिमण्या पाखरांनी गप्पागोष्टींच्या ओघात रानावनातील असंख्य कोडी माझ्यासारख्या शहरी बाईला सहजपणे उलगडून सांगितली. आपलं ज्ञान त्यांच्या झोळीत टाकण्याऐवजी त्या मुलांनीच त्यांच्याकडच्या अनेक अनुभवांनी माझी झोळी शिगोशीग भरून दिली. ते अनुभवांचे त्याहीपेक्षा प्रचंड समाधानाचे जड गाठोडे काखोटीला मारून त्या मुलांच्या प्रेमाचा आणि त्यांच्या निरक्षर पालकांचा तसंच शिक्षकांचा कृतज्ञतेचा निरोप घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो.

वाटेवर आमच्या सहकाऱ्याच्या मित्राचं गाव लागलं. किमान एक दिवसाच्या मुक्कामाचा त्यांचा आग्रह कुणालाच मोडवेना. अखेर त्यांच्या गाडीपाठोपाठ आमच्या गाडीनं मोर्चा वळवला. दोन राज्यांच्या हद्दीवरचे ते जेमतेम दोन अडीच लाख वस्तीचे गाव म्हणजे केंद्रशासित प्रदेश होता. ना धड गाव ना धड शहर अशा संमिश्र रूपडय़ाच्या गावात आमचे यजमान बडे व्यावसायिक तसंच स्थानिक पुढारी होण्याच्या मार्गावर होते, असं आमच्या सहकाऱ्यानं सांगितलं. त्यांच्या घराच्या गल्लीत शिरता शिरता एका मोठय़ा फलकानं लक्ष वेधून घेतलं. व्यावसायिक मॉडेलप्रमाणे पोझ दिलेल्या एका छोटय़ा मुलाचे २-३ पोशाखातील फोटो झळकत होते. त्याखाली जिग्नेशला १०व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या असंख्य हसतमुख चेहऱ्यांची त्यांच्या नावासकट दाटी झाली होती. यजमानांनी मुलाच्या वाढदिवसाला येण्यासाठी आम्हाला ‘खास’ आग्रह केला होता पण तो वाढदिवस किती ‘खास’ पद्धतीचा होता याचा त्या फलकावरून अंदाज आला.

यजमानांच्या अंगणातील १-२ महागडय़ा गाडय़ा शुभ्र कपडय़ातील मोबाइलधारी कार्यकर्त्यांचा वावर अदबीने फिरणाऱ्या चाकरवर्गाला पाहून त्यांच्या पुढारीपणाच्या सत्तासुबत्तेच्या खुणा घरात सहजपणे दिसत होत्या. आगत-स्वागत होईस्तोवर बहुधा नुकतेच औक्षण झालेला अत्यंत गोड निरागस चेहऱ्याचा जिग्नेश समोर आला. जिग्नेशला पाहताच कालपर्यंतच्या आठवणीत गुंतलेल्या मला त्या चिमणपाखरांचे चेहरे डोळ्यांसमोर आले. त्यांचा आणि जिग्नेशचा स्तर सर्वार्थाने भिन्न होता, तरीही चेहऱ्यावरचा निष्पाप भाव तोच होता. त्याला जवळ घेऊन हॅप्पी बर्थ डे म्हणत वाढदिवसानिमित्त आमच्या टीमतर्फे त्याला गोष्टीच्या पुस्तकांचा संच भेट दिला. त्यासरशी त्याच्या वडिलांनी त्याला सर्वाना खाली वाकून नमस्कार करायला लावला. मुलांच्या संस्काराबद्दल आपल्या प्रथा-परंपरा जपण्याबद्दल आपण किती दक्ष आहोत ते आडवळणानं सांगायचा प्रयत्न करत होते.. मात्र जिग्नेशसमोरच नोकरांबरोबरच्या त्यांच्या अरेरावीच्या वर्तनाने मुलावर होणाऱ्या विपरीत संस्कारांचा त्यांना बहुधा अंदाज नसावा. त्यांचे विचार ऐकल्यावर भावनाविरहित केलेली कुठलीही कृती म्हणजे संस्कार नाहीत तर ती फक्त सवय बनते वगैरे वगैरे..बरेच काही सांगायची माझी प्रबळ ऊर्मी मी शिकस्तीनं दाबून टाकली.

वाढदिवसाचा घरगुती समारंभ आटोपल्यावर थोडा आराम करून संध्याकाळी दिवेलागणीच्या सुमारास यजमानांच्या गाडय़ा आमंत्रितांना घेऊन समुद्रकिनाऱ्यावर पोचल्या. त्या अथांग सागराच्या किनाऱ्यावर गाडय़ांचाही अथांग सागर पसरलाय असं वाटलं. आजूबाजूला अंतराअंतरावर दिव्यांच्या रोषणाईत न्हाऊन निघालेली काही हॉटेल्स पाहून तर मला दिवाळी असल्याचा भास झाला. यजमानांच्या कार्यकर्त्यांनी गर्दीतून वाट काढत आम्हाला एका मोठ्ठय़ा डिस्कोथेककडे नेलं. आजवर हे डिस्कोथेक प्रकरण फक्त ऐकलं किंवा फार तर १-२ चित्रपटांत बघितलं होतं. आज प्रत्यक्षात बघायला मिळालं. आत शिरताना तर आधी जीवच दडपला. त्यात भर पडली तिथल्या ढणढणाटी आवाजाने. अवाढव्य म्हणावं अशा त्या डिस्कोथेकमध्ये स्टेजसमोरच्या एका भागात जिग्नेशच्या वाढदिवसाची पार्टी होती. हॉटेल्समध्ये खास छोटय़ा मुलांच्या वाढदिवसासाठी गेम्स नाचगाणी वगैरे ठेवून बर्थ-डे इव्हेंट साजरा करणारे बरेच पालक माझ्या पाहण्यात आहेत. पण छोटय़ा मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ‘अशा’ ठिकाणी जमून फेसाळत्या मद्याचे ग्लास उंचावून त्याच्यासाठी चीअर्स करणारे, चमेली आणि जलेबीच्या गाण्यावर हातातील ग्लाससह नाचणाऱ्या वडीलधाऱ्यांचा कंपू बघून माझ्या तोंडातलं आइसक्रीम कडू झालं.

कानावर आदळणारा गोंगाट टाळणं अशक्य होतं. काही वेळाने ‘हॅप्पी बर्थ डे’ची सुरावट कानी पडली तेव्हा स्टेजकडे नजर गेली. सकाळच्या कार्यकर्त्यांच्या घोळक्यासह जिग्नेशचे वडील त्याला कडेवर घेऊन वादकांसमोर उभे होते. त्यांच्या सूचनेनुसार जिग्नेश वडिलांच्या हातातील नोटांच्या गड्डीतून सहजतेने नोटा काढून हसत हसत समोरच्या वादकांना अदा करत होता आणि ते त्याला शुभेच्छा देताना मानही तुकवीत होते. ‘अशा’ ठिकाणी ‘अशा’ पद्धतीनं संपत्तीची उधळण करणाऱ्या आणि मुलाला करायला लावणाऱ्या एका वडिलांच्या ‘त्या’ कृतीने मी व्यथित झाले. सकाळी संस्काराच्या बाता करणाऱ्या जिग्नेशच्या वडिलांना यातून कुठले संस्कार अभिप्रेत असतील याचा विचारच मी मनातून हद्दपार केला. कुणी सांगावं.. भावी सरंजामशहा बनण्याची ती पूर्वतयारीही असेल कदाचित. सर्व असह्णा होऊन मी बाहेरच पडले. पण हॉटेलसमोरचा माहोलही पूर्ण निराशाजनकच होता. करमुक्त मद्य मिळणाऱ्या त्या प्रदेशात वीक-एंड साजरा करायला आसपासहून सहकुटुंब आलेले मद्यप्रेमी समुद्रकिनाऱ्यावर मद्याच्या पुरात अक्षरश: न्हात होते. रात्रीसोबतच त्यांची धुंदीही चढताना दिसत होती.

पहाटे आमची गाडी मुंबईकडे निघाली. कालचा ‘तो’ प्रसंग, ‘ती’ माणसं, ‘ते’ ठिकाण सारं मागे पडत गेलं तरी त्याची चित्रफीत मिटल्या डोळ्यांसमोर रिवाइंड होऊन अस्वस्थ करत होती. आपली भावी पिढी घडवण्यासाठीच्या आमच्या छोटय़ाशा प्रयत्नाच्या मर्यादा कुणी तरी स्पष्टपणे दाखवतंय असं वाटत राहिलं. सूर्योदयाच्या वेळी आकाशातील सुंदर रंगांची उधळण बघत असतानाच एखाद्या धटिंगण काळ्या मेघाने मधेच घुसून ते मोहक दृश्य झाकोळून टाकावं तसं झालं होतं. त्याच ठसठसणाऱ्या मन:स्थितीत एके दिवशी मला आंतरदेशीय पत्र आलं. प्रकल्पासाठी गेलेल्या त्या शाळेतील छोटय़ा कृष्णाचं पत्र होतं ते.
जिल्हा पातळीवरच्या कसल्याशा स्पर्धेत तिला पहिलं बक्षीस जाहीर झाल्यावर ही आनंदाची बातमी सर्वप्रथम तिनं मला मोठ्ठय़ा ढोबळ्या अक्षरात लिहून सांगितली होती. त्या सर्व मुलांना आमची आमच्या कार्यशाळेतील गमतीची खूप आठवण येत होती. त्या सर्वाबरोबरच त्यांच्या शिक्षकांनी त्याहीपेक्षा त्यांच्या निरक्षर पालकांनीही आम्हाला तिथं पुन्हा पुन्हा येण्याचं खास आमंत्रण दिलं होतं. पत्र वाचता वाचता मनावरचं मळभ हलकं हलकं दूर होत मी पार त्या गावांमध्ये पोचले. पत्राची घडी करताना माझं लक्ष खिडकीबाहेरच्या स्वच्छ निरभ्र आकाशाकडे गेलं. कुठेही अस्ताव्यस्त काळ्या-करडय़ा ढगांचा मागमूस नव्हता. समाधानाने मी कृष्णाला अभिनंदनाचं पत्र लिहायला घेतलं..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2016 1:05 am

Web Title: changing celebration trends
टॅग : Celebration
Next Stories
1 त्या उन्हावल्या सकाळी..
2 ये है बॉम्बे.. मेरी जान!
3 गोड बातमी
Just Now!
X