रिया म्हणाली, ‘‘मला तुला काहीतरी सांगायचं आहे.’’ मला वाटलं इतक्या दिवसांच्या सहवासाबद्दल काहीतरी सांगेल. पण म्हणाली, ‘‘तू मधे आलीस! तू खरंच मधे आलीस.’’ मी बुचकळ्यात पडल्यासारखी तिच्याकडे बघू लागले..

आज खूप दिवसांनी आमच्या ‘आयसीयू’ परिसरात प्रफुल्लित वातावरण होतं. नेहमीच्या कल्लोळापेक्षा आनंदच आनंद होता. कारणही तसंच होतं. आमची रिया आज घरी चालली होती. हो! आमची रुग्ण.. आमची मत्रीण. तिच्यावर उपचार करता करता आम्ही आमच्यातल्याच जिद्दीला पुन्हा भेटलो होतो. आयसीयूमध्ये काम करताना निर्धार, जिद्द नेहमीच पक्की असावी लागते, पण शेवटी मन कुठे तरी, कधी तरी निसर्गाच्या नियमांपुढे खचतं आणि मग निराशा येते. रियासारखे काही रुग्ण मात्र परत तो आत्मविश्वास जागवून जातात..

महिनाभरापूर्वी.. सगळी कामं संपवून, आयसीयूमध्ये असलेल्या रुग्णांचे पुढचे उपचार माझ्या सहकाऱ्यांना समजावून मी घरी जायला निघाले. तेवढय़ात वॉर्डमधून निरोप आला. ‘‘डॉक्टर, एक मुलगी खूप घामेजली आहे, खूप अस्वस्थ वाटतेय. तुम्ही या लगेच.’’ सिस्टरचा आवाज कापत होता. मी तडक वॉर्डात गेले आणि पहिल्यांदा रियाला बघितलं. घामाघूम झालेली, श्वास घ्यायला तडफडणारी एक निरागस पोर! ताबडतोब तिला आयसीयूमध्ये घेऊन आले, काही वेळातच तिच्या हृदयाचे ठोके थांबले! सगळंच स्थिर आणि नि:शब्द झालं; पण आम्ही लगेच थोडंच स्वीकारणार होतो. लगेच उपचार सुरू केले. हृदयाचे ठोके बंद पडल्यावर, ते परत आणायला औषधांसोबत कार्डियाक मसाजची प्रक्रिया सुरू केलीच होती. तिला श्वासाच्या कृत्रिम मशीनवर घेतलं. न थांबता निरंतर मसाज चालू होता. पंधरा मिनिटं झाली, अर्धा तास झाला, ठोके परत यायचे काहीच चिन्ह नव्हते; पण प्रयत्न सुरूच होते. अथक, एकच ध्येय जणू.. तिला जगवायचं. कुठून इतकी जिद्द, इतकं आत्मबळ येतं कुणास ठाऊक! पण यमराजाशी चाललेली झुंज संपत नव्हती. त्याच सुमारास आम्हाला हृदयाच्या स्कॅनवर एक मोट्ठी रक्ताची गाठ आढळून आली आणि आम्ही ती गाठ विरघळायचे औषधही सुरू केले.. इकडे तब्बल चाळीस मिनिटं झाली होती.. ती अजूनही निपचित पडलेली होती आणि आम्ही प्रयत्न सोडत नव्हतो. इतका कसोटीचा क्षण क्वचितच आयुष्यात अनुभवला असेल..

सगळ्यांनी, डॉक्टर, जाऊ द्या आता, असं खुणावून झालं होतं; पण मी मसाज चालूच ठेवला होता आणि माझे सहकारीसुद्धा धावून आले. साठ मिनिटांच्या अथक प्रयत्नानंतर हृदयाचे ठोके परत आले. आशेची किरणं हळूच डोकावून गेली. आता प्रश्न होता तिच्या मेंदूच्या परिस्थितीचा (मेंदूला तीन मिनिटंसुद्धा रक्तपुरवठा मिळाला नाही तर माणूस आयुष्यभरासाठी अपंग होतो). इथे तर एक तास लागला होता रक्तप्रवाह परत यायला; पण एवढं नक्कीच माहिती होतं, जर सकारात्मकता रक्तात असेल तर त्याचा प्रभाव नक्कीच पडतो. आम्ही एका वेळेला एकच पायरी चढायची असं ठरवलं. हळूहळू तिचा रक्तदाब वर येऊ लागला. थकलेली वाटत होती ती झोपल्या झोपल्या, पण आम्ही थकायचं नाही असं ठरवलं होतं..  आपुलकी आणि औषधं या दोन्हीच्या माध्यमांतून आम्ही तिला जगवत होतो. आत्ता डोळे उघडेल, नंतर डोळे उघडेल.. हाच ध्यास आणि आमचा प्रयास! त्या दरम्यान आम्हाला वैद्यकीय ‘हिस्ट्री’मधून कळलं की, एक दिवसाआधी तिची छोटीशी गुडघ्याची शस्त्रक्रिया झाली होती आणि त्याच्यामुळे तिच्या पायाचा रक्तप्रवाह संथ झाला होता. त्याचमुळे अशी गाठ बनली असावी. त्या अनुरूप उपचार सुरूच होते, सोबत चालली होती संयमाची परीक्षा. आम्ही पेपरवर पेपर लिहीत होतो, उत्तीर्ण होण्याच्या इवल्याशा आशेवर आणि तिचे आईवडील माझ्या त्या आशेवरच जणू दिवस काढत होते.

शेवटी तिसऱ्या दिवशी मी नेहमीप्रमाणे सकाळी तिला हाक मारली आणि तिनं अलगद डोळे उघडले. मी स्तब्ध झाले, हळूच आवाज दिला.. ‘‘रिया!’’ माहिती होतं मेंदूवर नक्कीच परिणाम झाला असेल, तरी परत एकदा हाक दिली, ‘‘रिया!’’ तिने परत एकदा डोळे उघडले. माझ्या हृदयाचे ठोके जितक्या वेगाने धावत होते तितक्याच वेगाने मी मनाला आवर घालत होते. तिच्या श्वासनलिकेमध्ये नळी असल्यामुळे ती बोलू शकणार नाही हे माहिती होतं, म्हणून तिला म्हटलं, ‘‘तुझं नाव रिया असेल तर फक्त मान डोलाव.’’ सगळे माझ्याभोवती एव्हाना जमा झाले होते, आज त्यांच्यासाठीही निकालाचा दिवस होता. अखेर तिनं मान डोलावली! आम्ही सगळे पाणावलेल्या डोळ्यांनी तिच्याकडे बघत होतो. एक एक पायरी पार पडत होती. एक तास कार्डियाक मसाजनंतर मेंदू शाबूत राहणं चमत्काराशिवाय शक्य नाहीये हे सगळ्यांना जाणवत होतं; पण मनातल्या ठाम सकारात्मकतेशिवाय हे शक्य नव्हतं, हेही जाणवत होतं. मी बोललेलं तिला समजत होतं, ही गोष्ट खूप दिलासा देऊन गेली.

हळूहळू तिच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली. आयसीयूमधली सगळी मंडळी रुग्णांवर इतका जीव लावतात, की अर्धा आजार तर प्रेमानेच बरा होतो. त्यात रिया तर त्यांच्यासाठी एक प्रेरणा होती, प्रयत्नांती परमेश्वरची प्रचीती होती. काही दिवसांत ती हातापायांची हालचाल व्यवस्थित करू लागली. तिच्या हृदयातली गाठसुद्धा पूर्ण विरघळली गेली होती. आता फक्त श्वासनलिकेतील नळी काढणं तेवढं राहिलं होतं. तरीसुद्धा नेहमी वाटायचं की, खुणांमधून ती काही तरी सांगायचा प्रयत्न करते आहे. लिहायला सांगितलं तर थोडी संकोच करायची. कित्येकदा तरी माझा हात धरून एकटक माझ्याकडे बघत राहायची. नेमकं काय ते नाही कळायचं. शेवटी एकदाची तिची नळी निघाली आणि ती बोलू लागली. सगळं बोलायची, पण माझ्याशी बोलताना शब्दांपलीकडेसुद्धा काही तरी सांगायचा प्रयत्न करत असायची. कळत होतं ते मला, उलगडा मात्र होत नव्हता. एवढय़ा दिवसांच्या सान्निध्यामुळे तिच्या आई-वडिलांचीसुद्धा आमच्याशी छान गट्टी जमली होती आणि आम्हाला त्यांनी रियाच्या खूप साऱ्या गमतीही सांगितल्या होत्या. रिया ‘ऑलराऊंडर’ होती. महाविद्यालयात, घरी सगळ्यांना खूप आनंदी आणि सकारात्मक ठेवणारी. आम्हाला नेहमी वाटायचं, तिचा हाच स्वभाव तिच्या मदतीला आला होता.

शेवटी ठरलं, आज रिया घरी जाणार! सगळे खूप सुखावले, मनापासून आनंदी झाले. रियाला सांगायला गेले तर तीपण खूश! मला म्हणाली, ‘‘बस ना एक मिनिट शेजारी.’’ तिचा हात हातात घेतला. मला म्हणाली, ‘‘बरं वाटतं आहे ना तुला खूप.. बर्थडे प्रेझेंट आहे ना मी तुझी! मला माहिती आहे ज्या दिवशी मला आयसीयूमध्ये नेलं त्या दिवशी वाढदिवस होता तुझा.’’ मी भावुक झाले. मला खूपदा सगळ्यांनी समजावलं आहे की, रुग्णांशी भावनात्मक गुंतवणूक नसावी. मी खूप प्रयत्नही केला सुरुवातीला, पण ते काही जमलं नाही. उलट त्या भावनात्मक गुंतवणुकीशिवाय रुग्ण बरा होत नाही या मताची मी आहे.

रिया म्हणाली, ‘‘जायच्या आधी मला तुला काही तरी सांगायचं आहे.’’ मला वाटलं, इतक्या दिवसांच्या सहवासाबद्दल काही तरी सांगेल. मी विचारात असतानाच ती मला अचानक म्हणाली, ‘‘तू मधे आलीस! तू खरंच मधे आलीस.’’ मी बुचकळ्यात पडल्यासारखी तिच्याकडे बघू लागले. ‘‘म्हणजे नेमकं काय रिया?’’ आणि जे तिने सांगितलं त्याने मी अवाक्  झाले. रिया म्हणाली, ‘‘मला आयुष्यभर नेहमी हेच वाटत आलं की, मी नको आहे कुणाला. माझं बालपण काही अडचणींमुळे आजी-आजोबांच्या

घरीच घालवावं लागलं. मी आई-बाबांना नकोशी आहे, ही भावना माझ्या मनात त्यामुळे कायमची घर करून राहिली. मी जेव्हा शस्त्रक्रियेसाठी इथे आले, तेव्हा मला माहिती होतं की, खूप किरकोळ आहे. तरी मी देवाला प्रार्थना करत होते की,मला काही तरी व्हावं आणि मी कायमची सुटावी.’’ ती बोलत होती आणि मी चकित होऊन ऐकत होते.. ‘‘पण डॉक्टरांनी सांगितलं की, शस्त्रक्रिया एकदम चांगली झाली आणि मी अक्षरश: हिरमुसले. दुसऱ्या दिवशी फिजिओथेरपिस्ट मला चालवत होती आणि मी कोलमडले. मला आनंदच झाला एकदम. वाटलं, देवाने माझं ऐकलं आणि तेवढय़ात तू मधे आलीस! आयसीयूमध्ये मी तुला थांबवायचा प्रयत्न करत होते, हे सगळं नको करू, मला जाऊ दे; पण तू थांबलीच नाहीस. आणि गेले काही दिवस जाणवायला लागलं, मी बदलले आहे. मला आई-बाबांची सतत चाललेली घालमेल, त्यांची काळजी जाणवायला लागली. मला होणारा त्रास त्यांनाही होत होता. इतक्या वर्षांचा गरसमज दूर झाला. त्यांच्यातलं प्रेम दिसलं, जे कधीच मला कळलं नव्हतं आणि आयुष्याचं मोल समजलं. मी बाहेर कितीही सकारात्मक वागत असले तरी आतून मी खूप नकारात्मक आयुष्य जगत होते. मला माझं आयुष्य नको होतं, पण तू मधे आलीस आणि मी परतले.’’ तिनं माझा हात गच्च धरला आणि मग म्हणाली, ‘‘थँक यू!’’ मी नि:शब्दच होते..  तिच्या डोक्यावरून मायेनं हात फिरवला आणि एवढंच म्हणू शकले, ‘‘मी नाही केलं काही, तूच तुझी उत्तरं शोधलीस.’’

विचार होते मनात, पण वादळ नव्हतं, एक झुळूक होती. खुळी असतात मुलं, कोवळं असतं मन. भावनांच्या ओघात स्वत:शीच झुंजतात मनातल्या मनात. आज रिया जिंकली होती. कसंही का होईना, तिने स्वत:ला परत शोधून काढलं होतं.

आज ती घरी चालली होती, खऱ्या अर्थाने..

डॉ. स्वप्ना खानझोडे swapna.khanzode@gmail.com