चिन्मय म्हणाला, ‘‘अहो आजोबा, चला, जेवून आपण जायचं आहे कुठे तरी.’’ ‘‘अरे पण मी कुठे जात नाही रे आताशा.’’ बाबा अजूनही तिथेच होते. पण चिन्मयचं पुढचं वाक्य मी ऐकलं आणि जे मला जमलं नाही ते त्यानं एका क्षणात करून दाखवलं..

मागील वर्षी आजच्याच दिवशी सुरू झालेला तिचा शेवटचा प्रवास. आज त्या आठवणी अगदी अस्वस्थ करत होत्या. सकाळपासून का कोण जाणे ते चित्र डोळ्यांसमोरून जातच नव्हते. हॉस्पिटल, डॉक्टर, नर्स आणि समोरचं देऊळ. ‘आईला बरं करा हो’ असा आतून येणारा आर्त आवाज एकीकडे त्या डॉक्टरांपर्यंत आणि दुसरीकडे त्या देवळातल्या देवापर्यंत पोहोचतच नव्हता. एक एक दिवस खालावत जाणारी तिची प्रकृती अस्वस्थ करत होती. ‘छान, सात्त्विक आयुष्य जगल्यानंतर इतकं अनपेक्षित मरण यावं’ हा विचार, मनातून जातच नव्हता.
आज बाबा पहिल्यांदा माझ्याकडे राहायला आले. माझ्या लग्नानंतर १५ वर्षांत प्रथम आणि तेही आता आई नसताना.. बाबांना पाहून मला नेहमीच अभिमान वाटायचा, तर कधी आदरयुक्त भीती वाटायची पण आज त्यांना पाहून मी अक्षरश: मोडून पडले.
तिन्हीसांज झाली म्हणून देवाजवळ दिवा लावला. बाबा आरामखुर्चीत बसले होते. दोघांच्याही मनात खूप काही होतं पण आज शब्दांची ताकदही कमी पडली होती, शब्दांनाही ते मांडता येत नव्हते. ही भयाण शांतता नकोशी झाली म्हणून मी रेडिओ लावला आणि हातात पुस्तक घेऊन बसणार इतक्यात जाहिरात संपून रेडिओवर गाणं लागलं. ‘अभी ना जाओ छोडकर के दिल अभी भरा नही’ नेमकं हेच गाणं लागायला हवं होतं का आता? माझं सर्वात आवडतं गाणं पण आज मात्र मला नको होतं.
डोळे बंद करून तन्मयतेने गाणं ऐकणारे बाबा, त्यांच्या डोळ्यांतून अलगद वाहणारे ते पाणी, जणू ते त्याच वळणावर परत जाऊन पोहोचले होते जिथे आई त्यांना एकटं सोडून गेली होती. गाणं बंद करावं की तिथून निघून जावं या संभ्रमात असतानाच दारावरची बेल वाजली.
चिन्मय, कॉलेजमधून आज स्वारी थोडी उशिरा आली होती. ‘‘आई, आजोबा कुठे आहेत? आज एक सरप्राइज आहे त्यांना.’’ मी एकदम दचकले.
‘‘कसलं सरप्राइज देतोस आता या म्हाताऱ्याला?’’ बाबांचा मागून आवाज आला.
चिन्मय म्हणाला, ‘‘अहो आजोबा, चला, जेवून आपण जायचं आहे कुठे तरी.’’
‘‘अरे पण मी कुठे जात नाही रे आताशा.’’ बाबा अजूनही तिथेच होते. पण चिन्मयचं पुढचं वाक्य मी ऐकलं आणि जे मला जमलं नाही ते त्यानं एका क्षणात करून दाखवलं.
‘‘आजोबा तिकीट काढली आहेत मी
आपली आणि ते ही ‘कटय़ार काळजात घुसली’ ची, चला आपण जाऊ या’’ आणि हे ऐकताच
‘त्या’ गाण्याने बदललेला सूर आता मात्र एकदमच बदलून गेला.
लहान मुलांना आमिष दाखवून शांत करता येतं याचा जणू प्रत्ययच आला, म्हातारपण म्हणजे दुसरं बालपणच की शेवटी.
kavitasahasrabudhe@yahoo.co.in