दुसऱ्यापेक्षा आपण मोठं आहोत हे दाखवण्यातच आपण अनेकदा आपलं शहाणपण समजतो. पण या शहाणपणात सुख नक्कीच कुठे तरी गायब झालं आहे. आज इतक्या वर्षांनी सेकंड क्लासमधून केलेल्या प्रवासाच्या निमित्ताने का होईना अनेक गोष्टींचे बोध होत गेले.

नणंदेच्या लग्नासाठी अकोल्याला जायचं ठरलं. जाताना सेकंड क्लासचं रिझर्वेशन होतं आणि अचानक त्यायोगे शाळेच्या, कॉलेजच्या आठवणी जाग्या झाल्या.. सोलापूरच्या. माझं माहेर सोलापूरला.. तेव्हा थ्री टायर एसी, टु टायर एसी परवडत नसे. त्यामुळे आम्ही नेहमी सेकंड क्लासचंच रिझर्वेशन करत असू. कधीच एसी डबा न पहिल्यानं सेकंड क्लासचीच नवलाई अधिक वाटत असे. गावी जाण्याचा उत्साह एवढा असायचा की, आदल्या दिवशी आणि नंतर पूर्ण दिवसभर झोप लागत नसे. आम्ही सोलापूरला नेहमी सिद्धेश्वर एक्स्प्रेसने जात असू. रात्रीचा प्रवास असे. रात्री १० वाजताची गाडी असे. मी, आई-बाबा सीएसटीवरून (त्या वेळचं व्हीटी) ट्रेन पकडत असू. सिद्धेश्वरला पँट्री कार नव्हती आणि असती तरी तिथून काही घेतलंच असतं असं नाही. आम्ही घरून चटणी सँडविच आणि कांदा परतून फोडणीचा भात घेत असू. त्या फोडणीच्या भाताची आणि लोणच्याची चव ट्रेनमध्ये काही वेगळीच लागे आणि गंमत म्हणजे जेवढी वर्षे आम्ही सोलापूरला गेलो तेवढी वर्षे हेच पदार्थ नेले. मला साध्या फोडणीच्या भातापेक्षा कांदा-मिरची घालून केलेला फोडणीचा भात जास्त आवडे. लहान असेपर्यंत आई ट्रेनमध्ये जेवण भरवायची. मग थोडं मोठं झाल्यावर ट्रेनमध्ये एकटं टॉयलेटला जाणं, एकटं खाणं जमायला लागलं. सेकंड क्लासमध्ये खिडक्या उघडय़ा असत. एसी डब्याप्रमाणे कडेकोट बंद नसत. त्या खिडक्यांना दोन शटर्स असायची. एक काचेचं आणि दुसरं लोखंडाचं. मी यापैकी कुठलंच लावत नसे. रात्री खूप थंडी वाजायला लागली तर बाबा ओरडत. मग मी काचेचं शटर अर्ध लावून घेत असे. पण रात्रभर ट्रेनमध्ये झोप लागायची नाही. कधी एकदा सकाळ होते, काका स्टेशनवर घ्यायला येतो, कधी एकदा छोटय़ा बहिणींना कडकडून गळाभेट देतो असं व्हायचं. या विचारांत रात्र सरायची.

पहाटे पाच वाजल्यापासून चहावाले, कॉफीवाले चक्कर मारायचे. त्यांच्या आवाजाने पहाट झाल्याचं कळायचं. मग झोपण्यासाठी वर केलेले बर्थ परत खाली करायचे आणि खिडकीपाशी बसायचं. गार वारं वाहायचं. हिरवी-पिवळी शेतं दिसायची. आनंदानं वाऱ्यावर डोलायची. मधेच कुठे तरी पाण्याचा झरा दिसायचा. नंतर कुठे तरी छोटा तलाव दिसायचा. चित्रात काढल्यासारखी भल्या मोठय़ा शेतात एकच झोपडी दिसायची. प्रदूषण नाही, गर्दी नाही, खेचाखेची नाही, सगळं कसं निवांत पण तरीही सुखी! अशी दृश्य डोळ्यासमोरून सरतात न सरतात तोच कुठे तरी डोंगर दिसायचे. नुकत्याच केलेल्या रस्त्यातनं एखादी जीप किंवा ट्रक येताना दिसायचा. २-३ मजली टुमदार इमारती असायच्या. शहरीकरणाची लागण झालेल्या! दूध डेअरी, किराणा मालाचं दुकान.. सगळं अजून बंदच असायचं. अशातच गरम गरम वाफाळलेला चहाचा कप खिडकीबाहेर यायचा. बघता बघता ओठांना लावला जायचा! एक मस्त घुटका घ्यायचा. एका घोटात मन आणि शरीर ताजंतवानं व्हायचं. मग वाट पाहून मन थकल्यावर सोलापूर यायचं. काही तरी ‘मिळवल्यासारखं’ वाटायचं! काही वर्षांनी नोकरी-शिक्षणामुळे सोलापूरच्या वाऱ्या कमी होत गेल्या.

मग शिक्षण-नोकरी-लग्न-हळूहळू आलेली आर्थिक सुबत्ता यामुळे सेकंड क्लासचा प्रवास मागे पडत गेला आणि त्याची जागा फर्स्ट क्लासने घेतली! आणि मग कधी आपण फर्स्ट क्लासचे भक्त झालो ते कळलंही नाही. आता मुलं झाल्यावर त्यांना नॉन एसीचा प्रवास कसा जमेल, कितपत झेपेल असे उथळ विचार मनात उगीच रुंजी घालतात. पण जेव्हा या वेळेस अकोल्याला जाताना आटोकाट प्रयत्न करूनही एसीचं बुकिंग मिळालं नाही तेव्हा नाइलाजाने सेकंड क्लासचं बुकिंग केलं. अमरावती एक्स्प्रेस रात्री ८.०५ मिनिटांनी सुटणार होती आणि अकोल्याला सकाळी ५.४५ मिनिटांनी पोहोचणार होती. सगळं सामान घेऊन डब्यात चढलो. उघडय़ा खिडक्या, जवळजवळ असलेले बर्थ, खालची जमीन साधीच पण स्वच्छ. येणाऱ्या जाणाऱ्यांची वर्दळ.. सगळं पाहून बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या.

किती फरक पडला आहे आपल्यात! ज्या डब्यातून आयुष्यभर प्रवास केला त्याला आपण किती निष्काळजीपणे दूर लोटलं, सद्य:परिस्थितीतली जीवघेणी स्पर्धा, प्रतिष्ठा स्वत:ला श्रेष्ठ दाखवण्याची, पैशांची चढाओढ.. यामुळे उगीचच नसत्या पोकळ कल्पना आपण उराशी बाळगून आहोत याची जाणीव झाली. आपण ‘फर्स्ट क्लास’ आहोत हे उगीच दाखवावंसं वाटू लागलं. पण यामुळे आपण खचतच चाललो आहोत. प्रतिकूल परिस्थितीत टिकून राहण्याची आणि पुढे जाण्याची आपली क्षमता कमी झाली. सगळं कसं व्यवस्थित, सुनियोजित, बडदास्त ठेवणारं असलं पाहिजे या प्रयत्नात आपली शक्ती, सहनशक्ती, प्रतिकारक शक्ती कमी झाली. माणूस प्रतिकूल परिस्थितीतच जास्त सक्षम बनतो आणि कितीही ‘मोठे’ झालो तरीही आपण आपली पाळंमुळं विसरता कामा नये हे आपण सहजपणे विसरून गेलो आहोत. आज तू मोठा तर मी तुझ्यापेक्षाही मोठा, तुझं घर चार खोल्यांचं तर माझं घर पाच खोल्यांचं, तुझी मोठी गाडी तर माझी तुझ्याहून ही मोठी हे दाखवण्यातच आपण आपलं शहाणपण समजतो. पण या शहाणपणात सुख नक्कीच कुठे तरी गायब झालं आहे. आज इतक्या वर्षांनी सेकंड क्लासमधून केलेल्या प्रवासाच्या निमित्ताने का होईना बालपणीच्या आठवणींबरोबरच बालपणी दिलं गेलेलं बाळकडू, लहानपणी जगलेलं तडजोडीचं आयुष्य आणि तरीही आनंदी असल्याची जाणीव हे आता नव्यानं कळतंय.

– कीर्ती पाटसकर