‘‘मोघ्यांच्या मातोश्री व त्यांच्या पत्नी यांच्यामध्ये जवळजवळ रोज एक प्रचंड भांडण होतं. भांडण चालू झालं की ते कमीत कमी तास दीड तास तरी टिकतं. तेवढा वेळ मोघे एक पुस्तक घेऊन घराबाहेर पडतात व मित्रांच्या घराचा आसरा घेतात. एकाच मित्राला रोज त्रास नको व मोघ्यांवरून त्या मित्राच्या घरात भांडण निर्माण होऊ नये यासाठी मोघ्यांनी वार ठरवून घेतले आहेत.’’ ओकांनी माहिती दिली. मोकाशींच्या मनात मोघ्यांविषयी कळवळा दाटून आला खरा पण ..

‘‘मी आपणा तिघांची नावं मोघ्यांना दिली आहेत. आठवडय़ातून एखादा दिवस, कोणत्याही वेळी, मोघे आपल्या घरी येतील. तास-दीड तास बसतील, येताना ते वाचनाकरिता घरून एखादं पुस्तक घेऊन येतील व नंतर जातील. त्यांना साखरेचा चहा देऊ नका, त्यांना मधुमेह आहे.’’ ओकांनी सार्वजनिक बागेत आम्हा मित्रांना सांगितलं.

‘‘माझ्या झोपेच्या वेळी मोघ्यांनी येऊ नये. तसे त्यांना कळवावे,’’ मोकाशींनी आपलं तक्रार तोंड उघडलं.

‘‘आपल्या झोपेच्या आठ-दहा वेळा मला माहीत आहेत. त्यापैकी कोणती कळवू?’’ ओकांनी विचारलं.

परब व गोंधळेकर हसले. कारण ऐंशी वर्षांच्या मोकाशींची झोप ही हसण्यावारी न्यावी अशीच बाब होती! सकाळी अंघोळ झाल्यावर मोकाशी दमतात, त्यांना आडवं व्हावं असं वाटतं. वृत्तपत्रातील, खून-अपहरण-बलात्कार या प्रकारच्या बातम्या, अर्थविषयक लेख (खेळकर, हलक्याफुलक्या भाषेत असले तरीही), घाटात दरड कोसळून, वाहनांच्या मारुतीच्या शेपटाएवढय़ा लांब व अजगराएवढय़ा सुस्त रांगा रस्त्यावर लागल्या आहेत अशी सचित्र बातमी मोकाशींनी वाचली की त्यांचं मन थकतं, डोकं गरगरतं व त्यांना झोप घेरते. वृद्धांच्या विरंगुळा केंद्रात, ‘पैसे, कोठे गुंतवावेत?’, ‘आरोग्य कसे सांभाळावे?’, ‘अर्थसंकल्पाने काय मिळाले?’ वगैरे विषयांवरची भाषणे मोकाशी झोपेतच ऐकतात!

ओकांच्या प्रश्नावर मोकाशी निरुत्तर झाले. ते म्हणाले, ‘‘मोघ्यांना येऊ द्या, केव्हाही येऊ द्या. तशी माझी झोप सावध आहे. पण मोघे का येणार?’’

‘‘मोघ्यांच्या मातोश्री व त्यांच्या पत्नी यांच्यामध्ये जवळजवळ रोज एक प्रचंड भांडण होतं. भांडण चालू झालं की ते कमीत कमी तास-दीड तास तरी टिकतं. तेवढा वेळ मोघे एक पुस्तक घेऊन घराबाहेर पडतात व मित्रांच्या घराचा आसरा घेतात. एकाच मित्राला रोज त्रास नको व मोघ्यांवरून त्या मित्राच्या घरात भांडण निर्माण होऊ नये यासाठी मोघ्यांनी वार ठरवून घेतले आहेत,’’ ओकांनी माहिती दिली.

मोकाशींच्या मनात मोघ्यांविषयी कळवळा दाटून आला. परबांनी आश्चर्यानं विचारलं, ‘‘मोघ्यांच्या मातोश्री व पत्नी रोज भांडायला लहान थोडय़ाच आहेत? मोघ्यांनी आता आता एकाहत्तरीचे पेढे बागेत वाटले. म्हणजे त्यांची पत्नीच पासष्ट सहासष्ट वर्षांची, आई नव्वदीच्या पलीकडची.’’

‘‘आईच्या वयाचा अंदाज योग्य आहे. मोघे व त्यांच्या पत्नी ही दोघंही माझ्या वर्गात होते. मोघ्यांच्यापेक्षा त्यांच्या पत्नी सहा-आठ महिन्यांनी मोठय़ा आहेत. त्यांचा प्रेमविवाह आहे,’’ ओक म्हणाले.

याचा अर्थ ओक, मोघे पती-पत्नींना खूप वर्षे ओळखत होते. मोघ्यांचा प्रेमविवाह होता हे ऐकून मोकाशींच्या मनात मोघ्यांविषयी मत्सर निर्माण झाला; थोडय़ा वेळापूर्वीच्या कळवळ्यात हा मत्सर मिळाला. मोकाशींनीही आपल्या स्वर्गीय, जन्मजन्मांतरीचं प्रेम जमवायचे सहा अयशस्वी प्रयत्न, शाळेपासून ते नोकरीच्या प्रारंभी प्रारंभी केले होते. शेवटी वधू-वर सूचक मंडळ व आई-वडिलांची सालस व सज्जन ही ख्याती या जोरावर त्यांना पत्नी मिळून गेली.

‘‘ओक, प्रौढ वयातील आई व पत्नी अशा पक्व व्यक्तींचं कोणत्या कारणास्तव भांडण होत असेल?’’ गोंधळेकरांनी विचारलं.

‘‘मला कल्पना नाही. मी विचारलं नाही, मोघ्यांनी आपणहून मला काही सांगितलं नाही. मोघे मला एकदा म्हणाले होते, ‘मला एकच बायको आहे व एकच आई आहे. मला कोणालाच दुखवायचं नाही. त्यामुळं मी दोघींच्या भांडणात न्यायाधीश होण्याच्या भानगडीत पडत नाही. मी एक पुस्तक घेतो व रणांगण सोडतो. पुन्हा घरात शिरण्यापूर्वी शांतता प्रस्थापित झाली आहे याची दाराबाहेर उभा राहून खात्री करून घेतो. दोघींचं भांडण चालू झालं की मी घर सोडतो हे दोघींना समजलं आहे. माझ्यावरच्या लोभापोटी दोघीही भांडण आवरतं घेत असणार.’ माझ्या मते मोघे शहाणे आहेत.’’ ओकांनी माहिती दिली.

मोकाशी म्हणाले, ‘‘भांडण कशावरून होत असतील याचा आपण सहज अंदाज बांधू शकतो.’’

‘‘बांधा, अंदाज बांधा.’’ परबांनी आव्हानं दिलं.

मोकाशींनी अस्खलितपणे अंदाज बांधायला प्रारंभ केला, ‘‘मोघ्यांना, कोल्हापूरची, गोरीपान व पाहता क्षणी ती नम्र, सुशील व सुगरण आहे हे कळावं अशी मुलगी सांगून आली होती. मोघ्यांना तीच मुलगी पसंत होती. पण तिला एसएससीला गणितात व संस्कृतात काठावर मार्क होते म्हणून वडिलांनी ती नाकारली. मोघ्यांच्या आईलाही गणित – संस्कृत न येणारीच सून हवी होती. सध्याची सून ग्रज्युएट आहे. ती आईला नापसंत आहे. दोघींची खडाजंगी उडणारच.’’

ओकांनी अडवलं, ‘‘मोकाशी, हा कसला अंदाज? मोघ्यांचा प्रेमविवाह आहे हे मी मगाशीच सांगितलं आहे.’’

परबही आडवे आले, ‘‘कोल्हापूरची मुलगी गोरीपान होती हे ठीक आहे. पण पाहता क्षणी मुलगी नम्र, सुशील व सुगरण आहे हे कसं काय दिसेल?’’ मोकाशी बोलत सुटले, ‘‘मी अंदाज सांगतो आहे. मोघ्यांना सांगलीच्या मोठय़ा घाऊक तांदूळ व्यापाऱ्याची मुलगी सांगून आली होती. दोन्हीकडचा लग्नखर्च, वरती हुंडा देऊन ते लग्न लावून देणार होते, वरती आयुष्यभर ते दर वर्षांला, जुन्या आंबेमोहर तांदळाचं एक पोतं घरपोच करणार होते. सध्याच्या सुनेमुळं, तांदळाच्या पोत्याचं आयुष्यभराचं नुकसान झालं याचा मोघ्यांच्या आईंना त्रास होत असणार. त्या तो बोलून दाखवणारच! पण यात मोघ्यांच्या पत्नीचा काहीच दोष नाही; मोघ्यांच्या पत्नी उलट उत्तर देणार, त्या का ऐकून घेतील? आणखी एक भांडणाचं कारण सांगतो. मोघ्यांच्या मातोश्रींनी आयुष्यभर कष्ट करून, काटकसरीनं तांब्या-पितळेचे हंडे, स्वयंपाकाची भांडी, ताटवाटी तांबे हे सारं जमवलं होतं. मोघ्यांच्या पत्नीनं काय केलं तर सासूबाईंची सर्व भांडी मोडीत टाकली व लोखंडाची चकचकीत भांडी जमा केली. तुम्ही म्हणा स्टेनलेसस्टील, पण ती लोखंडाचीच भांडी आहेत! या भांडय़ावरून, सासू व सून भांडणारच. ‘गावात माहेर असलेली बायको करू नकोस, एक तर तिची माहेरची माणसं आपल्याला चिकटतात किंवा तुझी बायकोसारखी माहेरी पळेल’ असं प्रत्येक आईनं मुलाला बजावलं असतं. पण मोघ्यांनी काय केलं? गावातील मुलगी केली, आईचा सल्ला जुमानला नाही. परिणाम? मातोश्री व पत्नी यांच्या भांडणामुळं मोघ्यांना घर सोडावं लागतं.’’

‘‘मोकशी, थांबा, थांबा. मोघ्यांचा प्रेमविवाह आहे. पण दोघं एका गावातील नाहीत, ते एका कॉलेजात होते. एक सांगलीकर व दुसरा पंढरपूरचा.’’ ओकांनी थांबवलं.

‘‘ओक, मी वस्तुस्थिती मांडत नाही. सासू व सून यांच्यात किती कारणांवरून भांडणं होऊ शकतात यांचा अंदाजी आढावा मी घेत होतो. मोघे हे नाव मी सहज घेत होतो. मोघे म्हणजे अलजिब्रामधील एक्स समजा. तुम्ही मुद्दा लक्षात घ्या. कोणत्याही आजीला नातवंडं प्रिय असतात. मोघ्यांच्या पत्नीनं पैशाच्या हव्यासापोटी दोन्ही मुलांना अमेरिकेला पाठवलं. दोन्ही नातवंडे अमेरिकेत स्थायिक झाली. आजीपासून नातवंडे दूर केली. आजी सुनेवर संतापणारच की!’’

ओक व परब काहीही बोलले नाहीत. मोकाशींची दोनही मुले अमेरिकेत स्थायिक झाली आहेत व मोघ्यांना एकही मुलगा नाही, दोन विवाहित मुलीच आहेत व त्या सासरी सुखात नांदत आहेत हे ओक-परबांना माहीत होतं. त्यामुळं मोकाशी त्यांच्या घरात आई व बायको का भांडत असतात हे सांगत आहेत हे ओक व परब यांना स्पष्ट झालं.

मोकाशी बोलतच होते, ‘‘माझं लग्न झालं. माझा व आईचा, संयुक्त लॉकर बँकेत होता. त्या लॉकरमध्ये माझ्या बायकोचे दागिने मी ठेवले. पण त्या खात्यावर माझ्या बायकोचं नाव यायला बारा वर्षे लागली! बायकोचं नाव तरी लॉकरवर का आलं तर माझ्या आईच्या गुडघ्यांचे सांधे धरले व तिला पहिल्या मजल्यावरच्या बँकेत जिन्यानं चढून जाणं अशक्य झालं म्हणून! आपल्यावर बारा वर्षे अविश्वास दाखवणाऱ्या सासूचा माझी पत्नी राग राग करते व बोलून दाखवते. माझ्या आईच्या मैत्रिणी तिच्या प्रकृतीची चौकशी करायला वारंवार येत असतात. मैत्रिणींशी गप्पा मारल्या की माझ्या आईला बरं वाटतं. त्या सर्वाचं चहापाणी माझी बायकोच पाहते. पण या सर्व सासवा, त्यात माझी आईही आलीच, बैठक मोडताना म्हणतात, ‘‘म्हातारपण आणि वरती सूनवास! सोसायचं पण बोलायचं नाही!’’ माझी बायको माझ्या आईला म्हणते, ‘‘सासूबाई, गुडघेदुखीमुळे तुम्ही कोणाकडे जाऊ शकत नाही. त्यामुळं तुमच्या सर्व बैठका कायम आपल्याकडं होतात. दर खेपेला ‘जमलं तर काही तरी खायला कर’ असं तुम्ही म्हणता, मी करतेही. एकदा तरी तुम्ही मैत्रिणींच्या पुढं, ‘माझी सून चांगली आहे, मला सुनेचा काही जाच नाही’ हे वाक्य म्हणा ना. माझी आई त्यावर म्हणते, ‘तुला माझ्याकडून जे जे वदवून घ्यायचं आहे ते कागदावर लिहून आण. त्याखाली मी सही करते. ते तू आपल्या दारावर चिकटव.’’

मोघे, नंतर अलजिब्रामधली एक्स या टप्प्यावरून मोकाशी नकळत थेट स्वत:वर उतरले. परब व ओक अत्यंत सहानुभूतीनं मोकाशींकडे पाहत होते. मोकाशींच्या घरी सर्व काही ठीक नाही तर!

थोडय़ा वेळानं मोकाशी पुटपुटले,‘‘ओक, माझ्यासाठीही सात वार लावून द्या. मोघ्यांना माझे आभार कळवा. आई व बायको यांचं भांडण चालू झालं की आपण पंच न होता, सरळ मैदानच सोडायचं, घराबाहेर पडायचं हा उतारा मला माहीत नव्हता. घरी राहून मी मध्यस्थ, न्यायाधीश, साक्षीदार वगैरे माझ्या वाटय़ाला येतील त्या भूमिका स्वीकारायचो व दोघांकडून शब्दांचे तडाखे खायचो! घर सोडण्याचा हा पलायनमार्ग पकडावा.’’

ओकांनी होकारार्थी मान हलवली.

भा. ल. महाबळ