पन्नास वर्षांची मैत्री असणारे आम्ही चौघं.. अलीकडेच भेटलो.. परतताना कल्पिताने पर्समधून सोनचाफ्याची फुलं आणि बकुळीचा वळेसर काढला. मला देत म्हणाली, ‘‘मिळालेल्या यशाचा आनंद म्हणून सोनचाफा आणि मिळवायच्या गोष्टीची आठवण होत राहावी म्हणून बकुळ. हे वळेसर सहा र्वष जपून ठेवणार आहेस तू..’’

परवा आम्ही चौघांनी खूप धम्माल केली. आम्ही म्हणजे मी, प्रमोद, शिरीष आणि आमची मैत्रीण कल्पिता. गेली ५० वर्षे तरी आमची मैत्री घट्ट आहे. एकत्र वाढलो, शिकलो, खेळलो आणि भांडलोही. निमित्त होतं, त्या तिघांनी मला दिलेल्या पार्टीचं. आर्थिक विषयांवर २००० भाषणं मी पूर्ण केली त्याचं सेलिब्रेशन. ठिकाण अर्थात दादर. दुपारी जेवण, गप्पा आणि नाटक पाहाणं हे स्वरूप. आम्ही तिघं दादर स्टेशनचा पूल चढत होतो तेव्हाच कल्पिता आमच्या पुढे एकीकडे फोनवर बोलत चालत होती. तितक्यात आमच्यापैकी एकाचा फोन वाजला.
‘‘ कुठे आहेस?’’
‘‘जरा मागे वळून बघितलंस तर आम्ही तिघंही दिसू.’’ फोन बंद.
‘‘तुम्ही तिघं आधीच भेटलात?’’
‘‘आम्ही तिघं ठरल्याप्रमाणे एकाच ट्रेनने आलो म्हणजे बरोबरही असणार आणि भेटणारही ना?’’
‘‘मग मला का नाही सांगितली ती ट्रेन? मीही तुमच्यासारखी डोंबिवलीहूनच आले नं?’’
‘‘या गर्दीत तू जेंटस्मधून येणार होतीस?’’
‘‘वयाच्या ५६ व्या वर्षी मला तेवढं कळतं. पण मी निदान त्याच ट्रेनने तरी आले असते ना!’’
‘‘सॉरी’’
‘‘ओके. आधी नाटकाची तिकिटं काढू या का? मग फिरू या’’
‘‘ओके कल्पिता.’’
यथावकाश आम्ही पार्कच्या कट्टय़ावर पोहोचलो. पायावर पाय घेत, पर्स मांडीवर घेत कल्पिता बाकावर विराजमान.
‘‘इथे शेखरची बटाटा भजी मिळाली तरी स्ट्राँग फिल्टर कॉफी नाही ना रे मिळणार?’’ .
‘‘कल्पिता, तुझा हा कुचकटपणा तळला तर काल्र्याची भजी म्हणून विकता येतील.’’
‘‘लगेचच इतका स्कोर लेव्हल नाही केला तरी चालेल.’’
राग निवळल्याचं हे ओळखीचं लक्षण दिसल्यावर भजी प्लेट तिच्या समोर हजर झाली. ती पहिल्यापासूनच अख्खं भजं तोंडात टाकते आणि मग ते तिला खाता येत नाही. आताही तसंच झाल्यावर आम्हाला संधी मिळालीच..
‘‘आपण टाइमपास करायला जमलो ना?’’
‘‘ऑफ कोर्स’’
‘‘मग ही सॉक्स, शूजमध्ये?’’
‘‘अरे बाबा! मला त्याशिवाय चालता येत नाही.’’
‘‘कल्पित, म्हणूनच तुला तुझ्या सवडीच्या ट्रेनने येता यावं म्हणून तुला ट्रेन न सांगता तू दादरला पोहचलीस की फोन कर असं सांगितलं. तर तू चिडलीस.’’
‘‘ओके माय डिअर फ्रेंड्स.’’
नांदी पूर्ण.

‘‘ए, आता ‘जिप्सी’त बसूनच गप्पा मारू या का? सॉलिड गरम होतंय इथे कट्टय़ावर.’’
मुक्काम पोस्ट जिप्सी.
‘‘आज नो सूप. स्ट्रेट चायनीज् डिश आणि वाइन.’’
‘‘आज शेखर आपल्यासाठी चायनीज् डिश खाणार आणि आपण सगळे त्याच्यासाठी वाइन.’’
‘‘काय सुंदर मार्ग आहे हा आपली आवड दुसऱ्यावर लादण्याचा.’’
‘‘कम ऑन यार’’
‘‘अरे, शेखर चक्क स्टिकने नूडल्स खातोय.’’
‘‘२००० भाषणांत आपला दोस्त सुधारला.’’
‘‘मी सांगते तुम्हाला, हे जर शेखरने खूप आधी जमवलं असतं तर ब्यूटी क्वीन आपली वहिनी असती आज. पण तेव्हा हा वेडा सोप्या गोष्टी कठीण करायचा. तेव्हा कोणालाच वाटलं नसेल की हे आमचं वेडं कोकरू पुढे कठीण गोष्टी सोप्या करेल.’’
‘‘कल्पित, ही माझी स्तुती नाही हे नक्की.’’
‘‘शेखर, मी तुझी मैत्रीण आहे; फॅन नाही. माझा नवरा तुझा फॅन आहे.’’
‘‘कल्पित, त्याला का नाही आणलास आज? तुला म्हणून सांगतो की आम्ही त्याला केवळ तुझा नवरा म्हणून नाही ओळखत. तो आपल्याच शाळेत, कॉलेजमध्ये होता. फक्त ३ बॅच सीनियर आणि आपण सगळे पहिल्यापासून एकाच गावात राहतो.’’
‘‘हो का? मग याच न्यायाने तुम्ही का नाही आणले तुमच्या पत्नीस? मी त्याला साफ सांगितलं की आम्ही मित्र म्हणून जमणार आहोत. आमचा मित्र म्हणून येणार असशील तर ये; माझा नवरा म्हणून येऊ नकोस.’’
‘‘कल्पित, तू डेन्जरस आहेस.’’

‘‘ए, आत सोडत आहेत. जाऊ या?’’
‘‘तुझी पर्स दे. धरतो मी.’’
‘‘कल्पित, तुझी पर्स जड नाहीये.’’
‘‘तुम्ही तिघं बरोबर आहात म्हणून काही नाही त्यात.’’
‘‘कल्पित, शेखर ते सांगत नाहीये. तुझ्या पर्समध्ये नारळाच्या वडय़ांचा डबा नाहीये, असं सांगतोय तो. म्हणून तर तो मगाशी त्याला आवडत नसूनही तुझ्या चायनीज्ला तयार झाला.’’
‘‘अरे वडय़ा ही कधी करायला लागली? त्या काकू करायच्या.’’
‘‘आता घरी नवरा करतो.. बास’’

‘‘शेखर, नाटकाची तिसरी घंटा झाली. मोबाइल बंद कर. कोणाचा एवढा मोठा मेसेज वाचतोयस आताच?’’
‘‘तुझ्याच नवऱ्याचा.’’

‘‘शेखर, पुन्हा अभिनंदन. तुझा ५ मार्चचा कार्यक्रम कळल्यापासून कल्पिता खूप खूश आहे. तुझ्यासमोर नाही रडली त्यादिवशी, पण संपूर्ण कार्यक्रम तिच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहात होते. गेले कित्येक दिवस ती फक्त तुझी भाषणं, तो कार्यक्रम आणि तुम्हा चौघांची ५० वर्षांची मैत्री यावरच बोलत आहे. मी तिचा प्रियकर, तिचा पती आहे. तरीही मला त्याचा हेवा जरासुद्धा नाही. कारण तुम्हा चौघांत असलेलं निरागस, निरलस, आत्मिक नातं मला माहीत आहे. मला असे मित्र नाहीत याचं मला वाईट वाटतं. आजच्या तुमच्या भेटीसाठी ती खूप एक्साइटेड आहे. सध्या कोणती वाइन चालते इथपासून ते आजचा तिचा वेष इथपर्यंत. ब्लॅक ट्राऊझर आणि ब्राउन शूज हा तुझा चॉइस असतो म्हणून तो तिने घातला आहे. सैलसर पांढरा टॉप प्रमोदची पसंती म्हणून तर लाल काळ्या चेक्सचा स्ट्रोल शिरीषची आवड म्हणून. तू आज तिला ‘ती फुलराणी’ हे नाटक दाखवशील याची तिला पूर्ण खात्रीच आहे. आज सकाळी तुमच्या भेटीसाठी ती बाहेर पडल्यावर माझी सून म्हणाली की, ‘तुम्ही तिघं तिचे मित्र आहात की पोटचे मुलगे?’ ती तिच्या आईला हे सगळे फोनवर कौतुकानं सांगत होती. शेखर, तुम्ही एन्जॉय करा. यू ऑल डिझव्‍‌र्ह इट. कारण तुम्ही एकमेकांच्या मनाजवळ आहात.’’

‘‘ऐ, ही हॅज स्टेटेड फॅक्टस्. आपण सगळेच एकमेकांचे आहोत.’’
‘‘कल्पित, हा माझा खरा सत्कार.’’
‘‘आपला सत्कार.’’

परतीच्या प्रवासात ट्रेननं ठाणे स्टेशन सोडलं आणि कल्पिता पटकन म्हणाली की, नानी पालखीवाला एकूण ३४ र्वष अर्थसंकल्पावर बोलले ना? म्हणजे तुला अजून ६ वर्षे तरी बोलायचं आहे.

आम्ही चौघं डोंबिवलीला उतरलो. कल्पिताने पर्समधून सोनचाफ्याची फुलं आणि बकुळीचा वळेसर काढला. ते मला देत म्हणाली, ‘‘चिकू, मिळाल्या
यशाचा आनंद म्हणून सोनचाफा आणि मिळवायच्या गोष्टीची आठवण होत राहावी म्हणून बकुळ. हे वळेसर सहा र्वष जपून ठेवणार ूआहेस तू..’’
आम्ही चौघं एकमेकांचे सोनचाफाही आहोत आणि बकुळही.
कल्पिता, तो रेशीम बंध!

tilakc@nsdl.co.in