News Flash

नास्तिक ते आस्तिक – एक प्रवास

मग तोच म्हणाला, ‘‘अगं फक्त दीडशे मीटर अंतर उरलेलं असताना एक जण परत फिरला.

खरा गिर्यारोहक याच मार्गाने जातो आणि त्याच्या रक्तात असते ते फक्त स्वप्न, एव्हरेस्ट सर करण्याचे

तो म्हणाला, ‘‘आपली श्रद्धा, कष्ट, जिद्द कितीही खरी असली तरी ‘तो’ आहे हे पटलं मला. माझ्यासारखा नास्तिक आस्तिक झाला. सर्व काही बाजूला ठेवून त्या दिवशी त्या रोपला नमस्कार केला मी. बेस कॅम्पपासून वाटेत भेटलेल्या प्रत्येकाने काही तरी दिलं, धागा, फोटो, छोटा विक्टरी फ्लॅग आणि आशीर्वाद. सर्व काही बरोबर नेलं मी. माहीत नाही पण विश्वास ठेवावासा वाटला ‘त्या प्रत्येकावर’..

रविवारी किशोरचा फोन आला. ‘सागरमाथा’ सर करून पुण्यात आल्यावर, त्या दिवशी फोनवर अभिनंदन केलं पण खूप काही बोलता आलं नाही म्हणून काल त्यानेच मुदाम फोन केला आणि मनसोक्त गप्पाही झाल्या. जिथे लहानाचा मोठा झाला त्या परिसरात कौतुक सोहळा झाला, अगदी खास मराठमोळ्या पद्धतीत. एव्हरेस्ट मोहिमेवरून त्या दिवशी तो पुण्यात परत आला होता. काल बोलताना फोनवर तोच आवाज, तोच आत्मविश्वास होता आणि या वेळी त्याला समाधानाची झालर होती. जे ठरवलं ते मिळाल्याची, मिळवल्याची!

मी म्हणाले, ‘‘अरे आराम कर थोडे दिवस मग भेटूच,’’ तर म्हणाला, ‘‘अगं बँकेत निघालोय.’’ मी चकितच झाले. ‘‘यू आर सिम्पली ग्रेट, दोन दिवस पण नाही झाले तुला येऊन आणि रुटीन सुरू, कसा आहेस तू?’’ तर म्हणाला, ‘‘मी एकदम मजेत, १२ किलो वजन कमी झालय, थोडा थकवा आहे, बाकी फिट. कधी भेटायचं ते ठरव म्हणजे सगळे भेटू.’’  एव्हरेस्ट मोहिमेवर निघायच्या आदल्या दिवशी शाळेच्या ग्रुपबरोबर कॉफी आणि गप्पा झाल्या होत्या आणि एव्हरेस्ट सर करून आल्यावर परत त्याच जागी भेटायचं हेसुद्धा ठरलं होतं.

न राहवून मी म्हटलं, ‘‘तू जायच्या आधी नाही बोलले, पण आता बोलल्याशिवाय राहवत नाहीये. गणपतीला नक्की जाऊन ये आता. मला माहिती आहे तुझा विश्वास नाही म्हणून जायच्या आधी नाही बोलले तुला, पण आता ऐक माझं. नक्की जा.’’ तो काहीच बोलला नाही. मी विचारलं, ‘‘एक सांग मला, तुझा देवावर विश्वास नाही? पण मग कधी वाटलं का तुला समिटवर असताना की काही तरी नक्कीच आहे जिथे आपल्याला नमावं लागतं?’’ या प्रश्नावर फक्त हसला.. खरंच, त्याचं उत्तर या वेळी बदलल होतं!

तो म्हणाला, ‘‘आपली श्रद्धा, कष्ट, जिद्द कितीही खरी असली तरी ‘तो’ आहे हे पटलं मला. माझ्यासारखा नास्तिक आस्तिक झाला. सर्व काही बाजूला ठेवून त्या दिवशी त्या रोपला नमस्कार केला मी. बेस कॅम्पपासून वाटेत भेटलेल्या प्रत्येकाने काही तरी दिलं, धागा, फोटो, छोटा विक्टरी फ्लॅग आणि आशीर्वाद. सर्व काही बरोबर नेलं मी. माहीत नाही पण विश्वास ठेवावासा वाटला ‘त्या प्रत्येकावर’.. अगं परत येताना नेपाळमध्ये दोन वेळा त्या पशुपतिनाथ मंदिरातही गेलो, काय सांगू.’’ खूप छान वाटलं.

तो बोलत राहिला आणि मी विचारत. ‘‘एक सांग मला, कधी भीती नाही वाटली तुला, ‘नो वन हॅज ट्रॅव्हल्ड द ब्रीज ऑफ सक्सेस विथाऊट एव्हर क्रॉसिंग द स्ट्रीट ऑफ फेल्युअर’ यावर त्याने दिलेलं उत्तर खरच खास होतं. तो म्हणाला, ‘‘वाटली ना, सर्वात पहिल्यांदा १८ एप्रिलला बेस कॅम्पवर झालेल्या अपघातानंतर नेपाळबरोबर चायना रूटसुद्धा बंद होईल का? अशी शंका मनात आली. इथवर येऊन रिकामं परतावं        लागणार का? याची भीती वाटली. पण नशिबाने साथ दिली आणि थोडय़ा उशिरा का होईना आमची चढाई सुरू झाली.’’  बापरे, ‘भीती’ या शब्दांची त्याची आणि माझी व्याख्या खूपच वेगळी होती.

एक क्षण दोघंही गप्प होतो.

मग तोच म्हणाला, ‘‘अगं फक्त दीडशे मीटर अंतर उरलेलं असताना एक जण परत फिरला. शेर्पाशी काही बोलला, मला समजलं नाही तो काय म्हणतोय ते, पण बहुधा म्हणाला असावा, ‘बास, आता नाही जाऊ  शकत मी पुढे.’ आणि माझ्या समोरून परतला. त्याचं स्वप्न इतक्या जवळ होतं आणि तो मात्र! मी विचार करून काही बोलणार तोवर तो निघालाही होता. त्याचा विचार करत मी पुढे जात होतो पण माझं मन मात्र मागेच राहिलं होतं. ‘त्याने असं अर्धवट सोडून जायला नको, मी का नाही थांबवायचा प्रयत्न केला त्याला?’ माझी

पावलं मंदावली. त्याच्यासाठी मीच देवाला विनवू लागलो. माहीत नाही काय झालं पण थोडय़ाच वेळात तो परत फिरून तिथवर आला होता अन् पाहता पाहता मला ओलांडून पुढे गेलाही. किती खूश झालो मी. खूप आनंद झाला त्याला पुढे जाताना पाहून, खूप वेगळं वाटलं..’’ हे ऐकून नकळत डोळ्यांत पाणी आलं.

या संपूर्ण प्रवासात किती वेगवेगळे अनुभव त्याने घेतले होते. अनेक वर्षांची अपार मेहनत, त्याची जिद्द आणि मनाची तयारी आम्ही जवळून पाहिली होती. आतून बाहेरून हालवून टाकणाऱ्या अनेक गोष्टी त्याने पाहिल्या होत्या अनुभवल्या होत्या, पण जिद्द सोडली नव्हती कारण अनेक वर्षांपूर्वी पाहिलेलं स्वप्नं त्याला पूर्ण करायचं होतं. त्याच्यामुळे नकळत आम्हीसुद्धा जोडले जात होतो. त्या एव्हरेस्टशी!!

‘‘मला सांग, एव्हरेस्ट सर करण्याची अपेक्षित वेळ होती सकाळी सहा ते आठच्या मध्ये पण तुला जवळपास दोन ते तीन तास उशीर झाला, तो का? आम्ही बेस कॅम्पच्या सतत संपर्कात होतो. तुझ्या बरोबर असणाऱ्या दोघांनी सकाळी सातच्या सुमारास चढाई पूर्ण केली पण तू खूप वाट पाहायला लावलीस. शेवटी तर आमचाही धीर सुटत चालला होता.’’ मी अजून जाणून घेण्याचा प्रयत्न करत होते. किशोर म्हणाला, ‘‘या वेळी फक्त दोन दिवस वातावरण अनुकूल होतं. त्यातील एक दिवस चीनने आपल्या लोकांकरिता राखीव ठेवला आणि दुसरा बाहेरील सर्वाकरिता. जवळपास तीनशे जण होतो आम्ही समिटकरिता.’’ माझ्या तोंडून एकच शब्द बाहेर पडला, ‘बाप रे!’ किशोरइतकेच ‘वेडे’ इतके जण आहेत हे ऐकून मी नि:शब्द झाले.

‘चायना रूट हा क्लाइम्बर रूट म्हणून प्रसिद्ध आहे. खरा गिर्यारोहक याच मार्गाने जातो आणि त्याच्या रक्तात असते ते फक्त स्वप्न, एव्हरेस्ट सर करण्याचे’, हे वाक्य कानात तसंच रेंगाळलं राहिलं.

कविता सहस्रबुद्धे  kavitasahasrabudhe@yahoo.co.in

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2017 1:54 am

Web Title: man inspiring story who climb mount everest
Next Stories
1 प्रसूती रजेचा अन्वयार्थ
2 दातेरी चक्र
3 उथळ पाण्याला..
Just Now!
X