News Flash

ते दोघे

पुरुष इतकं सुंदर घर लावू शकतील यावर माझाच विश्वास बसत नव्हता.

ते दोघे

घर अगदी नीटनेटकं लावलं होतं. घरात कोणी स्त्री दिसते का, याचाही अंदाज घेण्याचा प्रयत्न केला. कारण दोन पुरुष इतकं सुंदर घर लावू शकतील यावर माझाच विश्वास बसत नव्हता. एखादी बाई नक्कीच असावी आत घरात, असं मनाशी म्हणत मी कामाला लागले होते. तोवर त्यातला एक जण तयार होऊन खाली जॉगिंगलासुद्धा गेला होता. देखणाच होता तो, आज आमच्या बायकांच्या ग्रुपवर नक्कीच काही तरी चावट चर्चा सुरू होणार, या कल्पनेनंच मला हसायला यायला लागलं..

आमच्या शेजारचा फ्लॅट रिकामा झाला. तिथं नवं कुटुंब भाडेकरू म्हणून येईल, त्यात माझ्या मुलाच्या वयाचं मूल असावं असं मला वाटत होतं. तशी आमची खूप मोठ्ठी सोसायटी, जवळपास ५००-६०० घरं होती, पण नेमकं आमच्या विंगमध्ये, आमच्या मजल्यावर माझ्या मुलाशी खेळायला कोणी नव्हतं. एके दिवशी रात्री एकदम आवाज कसला येतोय म्हणून आम्ही बघायला गेलो तर त्या फ्लॅटमध्ये कोणी तरी राहायला येत होतं. दोन पुरुष सगळं सामान आणत होते, तसे सगळे बॉक्सेसच होते, पण तरीही किचनचं सामान बायका त्यांच्या सिक्स्थ सेन्सने लगेच ओळखतात. साग्रसंगीत किचनचं सामान दिसतंय म्हणजे नक्की कुटुंब असणार, मी अंदाज बांधला. उगाच कशाला आत्ताच जाऊन विचारायचं, कळेलच उद्यापर्यंत, असा विचार करून आम्ही दार बंद केलं.

अध्र्या तासात बेल वाजली, इतक्या रात्री कोण असेल म्हणून बघितलं तर तेच दोघे होते.

‘‘हाय, आम्ही तुमच्या शेजारी राहायला आलो आहोत. इथे सकाळी दुधाची लाइन कोण घालतं? तुमच्या दूधवाल्याला सकाळी आमच्याकडे पाठवाल का?’’

‘‘हो, पाठवेन ना.’’ माझा नवरा आलेली झोप दाबत त्यांना लवकर कटवायच्या स्वरात म्हणाला. मला खरं तर त्यांना काय काय विचारायचं होतं, त्यांच्या घरात माझ्या मुलाशी खेळू शकेल अशा वयाचं मूल आहे का, वगैरे. पण माझ्या नवऱ्याने सगळी संधी घालवली होती.

‘‘हे दोघे भाऊ  वाटतात ना रे?’’

‘‘हं असतील, आपल्याला काय करायचं आहे?’’ नवीन शेजाऱ्याबद्दलसुद्धा या पुरुषांना काही उत्सुकता नसते.

दुसऱ्या दिवशी मी स्वत: दूधवाल्याला त्यांच्या घरी घेऊन गेले. ओळख करून दिली तेव्हा सगळ्या घरावरसुद्धा एक नजर फिरवली.

घर अगदी नीटनेटकं लावलं होतं. घरात कोणी स्त्री दिसते का, याचाही अंदाज घेण्याचा प्रयत्न केला. पण माझी सकाळची कामं डोक्यात फेर धरून नाचत होती, म्हणून मी चटकन घरी निघून आले. दोन पुरुष इतकं सुंदर घर लावू शकतील यावर माझाच विश्वास बसत नव्हता. एखादी बाई नक्कीच असावी आत घरात, असं मनाशी म्हणत मी कामाला लागले होते. तोवर त्यातला एक जण तयार होऊन खाली जॉगिंगलासुद्धा गेला होता. देखणाच होता तो, आज आमच्या बायकांच्या ग्रुपवर नक्कीच काही तरी चावट चर्चा सुरू होणार, या कल्पनेनंच मला हसायला यायला लागलं.

दोन्ही घरांची स्वयंपाकघरं एकमेकांना लागून होती. त्यामुळे त्या घरात केलेल्या फोडणीचा वास या घरात सहज पसरायचा. त्या घरातल्या कांदेपोह्य़ांच्या फोडणीच्या वासाने मीपण नकळत आमच्या घरीही पोहे केले.

अपेक्षेप्रमाणे ‘वो कौन था’, अशी चर्चा रंगलीच. त्यावर तिखट-मीठ पेरत मी तो आमच्याच शेजारी राहायला आला आहे हे सांगितलं. पण तो एकटाच की त्याची कोणी ती आहे हे मला माहीत नाही, सांगितल्यावर सगळे फुस्स झाले.

संध्याकाळी नवरा घरात असताना जोडीतला दुसरा आमच्या घरी आला.

‘‘जरा थोडं दही मिळेल का विरजणाला.’’

कधीही किचनमध्ये पाऊल न ठेवलेला माझा नवरा एका पुरुषाकडून हा प्रश्न ऐकून जरा बावचळलाच. तोवर मी आतून एका छोटय़ा वाटीत दही आणून दिलं आणि माझा संशय पक्का झाला. नक्की यांच्या घरात एखादी घुंगटवाली असणार. यूपीवाले वगैरे आहेत की काय? आज आलेला जरा थोराड वाटत होता. जरा किनऱ्या आवाजाचा, नाजूक लचके देत बोलणारा. हा मोठा भाऊ  असावा आणि याचीच बायको असावी ती घुंघटवाली. मी आपले कल्पनेचे इमले बांधत होते. माझा नवरा त्याचा टीव्ही, बातम्या यात मश्गूल झाला होता.

रोज वेगवेगळ्या प्रकारच्या मसाल्याचे, रसना जागी करणारे खमंग वास त्या शेजारच्या घरातून येऊ  लागले. रोज सकाळी तो ‘हॉटी’ जॉगिंगला बाहेर जायचा, येताना काय काय सामान घेऊन यायचा. किती घरांमधले कॅमेरे त्याच्यावर रोखून होते, हे त्याला माहीतच नव्हतं. मग थोडय़ा वेळाने दोघं एकत्र बाहेर पडायचे, रात्री उशिरा एकत्रच घरी यायचे. कधी कधी रात्रीचाही मस्त काय काय शिजवल्याचा वास यायचा. घराचे पडदे उत्तम असायचे, दर दोन महिन्यांनी धुवायला काढलेले दिसायचे. बाल्कनीमधली झाडं डंवरलेली असायची. ते दोघं अनेकदा बागकाम करतानाही दिसायचे. घरातली स्त्री दिसत नव्हती, तिचा वावर फक्त जाणवत होता. पुरुषांकडे फार चौकशीही करता येत नव्हती. परंतु घरात मूल नाही हे स्पष्ट झालं होतं.

सहा महिने उलटून गेले तरीही त्यांचं घर हे मलाच नव्हे अनेकांसाठी गूढ होतं. हे दोघंच राहतात का? पण मग आमच्या सोसायटीचा तर नियम होता, बॅचलर मुला-मुलींना घर भाडय़ाने द्यायचं नाही. मुली परवडल्या, पण मुलं? बाप रे, त्यांचा गोंधळ, रात्री-अपरात्री येणं, मुलींना घेऊन येणं याचा इतरांना त्रास व्हायचा. पण हे दोघं त्यांच्या स्वत:च्या जगातच असायचे. सोसायटीच्या कोणत्याही कार्यक्रमात यायचे नाहीत. किती कॉन्ट्रिब्युशन द्यायचं आहे ते सांगा म्हणत देऊन मोकळे व्हायचे. यांच्या घरी लोक यायचे, जरा आवाज वगैरे यायचा, पण ते फारच क्वचित.

एकमेकांना सतत पाहून अथवा शेजारी म्हणून थोडी ओळख झाल्यावरही क्वचित कधी तरी हाय हॅलो फक्त व्हायचं. बाहेर जाताना दोघे हातात हात घालून वगैरे दिसायचे तेव्हा त्यांच्या पाठीमागे हळूहळू थोडी कुजबुज सुरू झाली आणि ती वाढायला लागली, तेव्हा एक दिवस मी नवऱ्याकडे विषय काढला –

‘‘खरेच का रे ते दोघे तसे असतील?’’

‘‘तसे म्हणजे काय?’’

‘‘तुला कळलंय मला काय म्हणायचं आहे ते, तरी तुझ्या समाधानासाठी सांगते. गे!’’

त्यावर मला कुशीत ओढत तो म्हणाला, ‘‘असले तर असले, आपल्याला काय फरक पडतो?’’

उत्सुकता असली तरी पुरुष ती चटकन दाखवत नाहीत.

अशा बातम्यांचे वारे सोसायटीत वाहायला आणि बातमी कानोकानी व्हायला वेळ लागत नाही, तशी ती झालीच. एका रविवारी सुट्टीचा मूड आणि रविवारचा काही तरी वेगळा मेन्यू आखता आखताच मी नवऱ्याला विचारलं, ‘‘आज त्या दोघांना बोलवायचं का आपल्या घरी जेवायला?’’ त्यानं नकार दिला नाही आणि ते दोघे आले तेव्हा छान गप्पाही मारल्या त्यांच्याशी. एरवी कमी बोलणारा माझा नवरा पण त्यांच्याशी मनापासून बोलत होता.

जेवताना माझ्या साध्या स्वयंपाकाचं ते दोघे कौतुक करत होते, तेव्हा मी त्यांना विचारलं, ‘‘तुमच्या घरात स्वयंपाक कोण करतं? त्या खमंग वासानं माझी भूक चाळवते आणि मग मीसुद्धा घरात तसंच काही तरी करायचा प्रयत्न करते.’’

त्यावर दोघेही मनापासून हसले आणि मग विरजण मागायला आलेला म्हणाला, ‘‘ते माझं डिपार्टमेंट, स्वयंपाक ही गोष्ट फक्त स्त्रियांपुरती ठेवून आपल्या समाजानं पुरुषांवर खूप मोठा अन्याय केला असं वाटतं मला. किती स्ट्रेसबस्टर असतं स्वयंपाक करणं, इतरांना खाऊ घालणं.’’

मग ते दोघंही त्यांच्या झाडांबद्दल, छंदांबद्दल खूप आपुलकीने बोलत राहिले. एखादं मुरलेलं जोडपं बोलतं तसं संसारातल्या छोटय़ा छोटय़ा गोष्टींबद्दल ते बोलत होते. त्यातून काहीही न बोलता सगळं स्पष्ट होत होतं. असं मोकळेपणी सांगणारे, स्वीकारणारे, पुरुष पहिल्यांदाच बघत होते मी. माझा मुलगा त्यांच्या अवतीभोवती खेळत होता. कधीही समाजाच्या चौकटी न मोडलेला माझा नवरा, परंपरांची बंधनं झुगारून शरीराची हाक ऐकणारे ते दोघे आणि अजून अशा कुठल्याही बंधनांची जाणही नसलेला माझा मुलगा.. पुरुषांची तीन रूपं पाहत होते मी. गप्पा मारता मारता त्यातला ‘हॉटी’ गंभीर झाला आणि म्हणाला, ‘‘आम्हाला लोक समजून घेतील की नाही या भीतीनं आम्ही कुणाशी फार संवाद वाढवत नाही.’’

‘‘लोक समजून घेतील हळूहळू,’’ माझा नवरा उगाचच काही तरी बोलावं म्हणून बोलला.

मग दुसरा जणू पहिल्याचं अर्धवट वाक्य पूर्ण करावं तशा स्वरांत म्हणाला, ‘‘प्रत्येक ११ महिन्यांनी नवी सोसायटी शोधावी लागते. हे शोधणं थांबेल तेव्हाच म्हणता येईल लोक समजून घेत आहेत. तुमची ओळख असेलच, तुम्ही बोलाल का सेक्रेटरीशी?’’

माझा नवरा ‘हो’ म्हणाला, पण त्यात किती अनिश्चितता होती हे मला आणि त्या दोघांनाही कळलं.

manasi.holehonnur@gmail.com   

chaturang@expressindia.com  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 14, 2018 12:14 am

Web Title: manasi holehonnur article in marathi
Next Stories
1 बुकमार्क
2 कमलाच्या पोटात वणवा
3 मलाच मी सापडलो
Just Now!
X