मनस्वी स्कूलमधल्या घडामोडी, शिक्षकांची नक्कल, आईवर रुसवा.. सगळं सगळं या आजोबांशी शेअर करू लागली. तेही तिचा मूड पाहून तिला आपल्या आठवणी सांगायचे, त्यांनी केलेल्या खोडय़ा सांगायचे. वेळ मजेत जायचा. मम्मीला याचा पत्ताच नव्हता. मात्र मनस्वी आणि आजोबांमध्ये रेशीमबंध जुळून आले..

दोन पानं, ‘‘आय वील नॉट टॉक इन द क्लास’’ असं लिहून झाल्यावर मनस्वीनं हात झटकला. बोटं आखडून गेली होती, त्यांच्याकडे पाहात मनस्वी विचार करू लागली, ‘कधी बोलायचं मी? क्लासमध्ये बोलले तर मॅडम अशी शिक्षा देतात.. घरात बोलायला कुणीच नसतं.. मम्मी आल्यावर बोलायला जावं तर मम्मी म्हणते, ‘मनू, आता जरा गप्प बस पाहू! आधीच ऑफिसमधल्या कटकटींनी डोकं बेजारून गेलंय, त्यात कंपनीच्या खटारा बसचा गडगडाट ऐकत प्रवास करायचा! घरी तरी जरा निवांत राहू दे मला!’ एक सुस्कारा सोडत मनस्वीनं शाळेची बॅग भरली. टिफिन, वॉटरबॉटल बेसिनमध्ये टाकून तिनं दूध, बिस्किटं खाल्ली नि खाली खेळायला पळाली.

साडेसहा वाजता ती दरवाजा उघडून आत आली तर मम्मी अजून आली नव्हती. तिला आठवलं, सकाळी मम्मी म्हणाली होती, ऑफिस सुटल्यावर महिन्याचं किराणा सामान, आठवडय़ाची भाजी घेऊन येईन म्हणून. म्हणजे आज मम्मी यायला उशीर होणार होता. उडी मारून तिनं लाईट लावले. भूगोलाच्या मॅडम सांगत होत्या या दिवसात दिवस लहान असतो व रात्र मोठी असते.. अच्छा, म्हणजे हे अंधारून आलंय त्यासाठीच तर! तिनं गॅलरीचं दार उघडलं. खरं तर, तिला फार भूक लागली होती व तहानही! तिनं किचनमध्ये डोकावलं, किचनमध्ये अंधार होता. समोरच्या खिडकीतून टय़ूबलाइटचा उजेड भिंतीवर पडला होता व त्यात पाठीमागच्या झाडाची सावली भयानक हलत होती. दिव्याचं बटण वर होतं, इथं तिला स्टुलावर चढून दिवे लावावे लागत. अंधाराला ती घाबरायची.

फ्रिज किचनमध्ये होता. कालच मम्मीने ज्यूस वगैरे भरले होतं. तिनं आवंढा गिळला. फ्रिजला व्हील्स का नाही बसवले? म्हणजे सकाळी किचनमध्ये व संध्याकाळी ढकलून हॉलमध्ये आणता आला असता.. अशा फ्रिजला नाव ठेवायचं, ‘फ्रिज ऑन व्हील्स’ व्वा! काय कल्पना आहे! पप्पांना स्काइपवर सांगितलं पाहिजे. यावर विचार करता करता मनस्वीला एक भन्नाट कल्पना सुचली. त्या कल्पनेनं तिला हसू आलं. खुदुखुदु हसतच तिनं फोनवर वेगवेगळे नंबर दाबत रिसिव्हर कानाला लावला. फोनची िरग वाजताच मनस्वीच्या काळजाची धडधडही वाढली,
‘‘हॅलो’’ पलीकडून कोणी तरी बोललं.
‘‘हॅलो ऽऽ.. तुमच्या घरी फ्रिज आहे का?’’
‘‘फ्रिज? हो! का?’’
‘‘तो चालतो?’’
‘‘होऽऽ’’
‘‘मग पकडून ठेवा त्याला! पळून जाईल तो!’’ नि खदखदून हसत तिने रिसिव्हर खाली ठेवला. असे दोन-चार फोन केले तिनं. खूप मज्जा आली तिला असले हे खेळ खेळताना..
इतक्यात दार वाजलं. मम्मी आली होती. खदखदणारं हसू दाबत तिनं दार उघडलं, मम्मीच्या हातातलं सामान घेत ती शहाण्यासारखी पुढं झाली. मनस्वी तिसरीत होती. तिच्या वडिलांना कंपनीतर्फे जर्मनीला पाठवलं होतं तीन वर्षांसाठी. मम्मी नोकरी करायची.
सकाळी लवकर उठून ती स्वयंपाक करायची. बरोब्बर सात वाजता स्कूल बस यायची, त्यात मनस्वीला बसवून, डबा घेऊन ती ऑफिसला जायची. दुपारी स्कूल बसने मनस्वी यायची तेव्हा तिच्याबरोबर लिफ्टमन रामजीची बायको सीता वर यायची. तिला जेवण गरम करून वाढायची, घरात साफसफाई करून, धुणी, घर पुसणं करून निघून जायची. घरचा अभ्यास करून, चार वाजता दूध-बिस्किटं खाऊन मनस्वी खाली खेळायला जायची. संध्याकाळी खेळून घरी येई तोवर मम्मी घरी आलेली असायची. मग त्यांच्या गप्पा, टीव्ही पाहणं होत असे. दर गुरुवारी व सोमवारी रात्री दहा वाजता पप्पांबरोबर स्काइपवर बोलायच्या. पप्पा अजून दोन र्वष जर्मनीला राहाणार होते. कधी कधी मम्मी खूप उदास असायची. तिचा मूड ओळखून मनस्वी मग शहाण्यासारखी वागे, पप्पांना प्रॉमिस केलं होत ना!
त्या संध्याकाळी मनस्वी अशीच एकटी होती. घरचा फोन वाजला. तिनं रिसिव्हर कानाला लावून हॅलो म्हटलं.
‘‘तुमच्याकडे फ्रिज आहे?’’
‘‘हो आहे.’’
‘‘तो चालतो.’’
‘‘हो. चालतो की.’’
‘‘मग पकड पकड त्याला! पळून जाईल तो!’’ पलीकडून माणूस म्हणाला नि जोराने हसू लागला. ‘‘काय? त्या दिवशीचा तुझा फोन परतवला की नाही?’’
‘‘हं.. पण काका, तुम्हाला आमचा नंबर कसा कळला?’’ तिनं विचारलं. ‘‘अगं, माझ्याकडे कॉलर आयडी आहे. तुझा नंबर येतो यावर. मी लिहून ठेवला. पण त्या दिवशी मला जाम मजा आली हां! म्हटलं, थोडय़ा दिवसांनी तुझीच मज्जा करू या.’’
‘‘हो?’’ हसत मनस्वी म्हणाली, ‘‘काका तुमची मुलं कुठं आहेत? कुठल्या स्कूलमध्ये जातात?’’
‘‘अगं बाळ, माझा मुलगा खूप मोठा आहे. तुझ्या वडिलांएवढा! तो असतो दूर कॅलिफोर्नियाला. मी इथे एकटा. त्या दिवशी खूप दिवसांनी तुझा फोन आला.. खूप बरं वाटलं बघ! जिवंत असल्याची जाणीव झाली. करत जा हं अधून-मधून फोन.’’
‘‘हेऽऽ म्हणजे तुम्ही आजोबा झालात माझे,’’ ती म्हणाली.

यानंतर खूप गप्पा झाल्या. तिनं आपलं नाव, कुठल्या स्कूलमध्ये जाते, कितवीत आहे, आई काय करते, पप्पा काय करतात, सगळं सगळं सांगितलं.. मग रोजच त्यांचे फोन येऊ लागले. मनस्वी स्कूलमधल्या घडामोडी, शिक्षकांची नक्कल, आईवर रुसवा.. सगळं सगळं या आजोबांशी शेअर करू लागली. तेही तिचा मूड पाहून तिला आपल्या आठवणी सांगायचे, त्यांनी केलेल्या खोडय़ा सांगायचे. वेळ मजेत जायचा. मम्मीला याचा पत्ताच नव्हता.

एक दिवस मनस्वीला शाळेमधून मम्मीच्या मैत्रिणी घेऊन घरी आल्या. मम्मीच्या पोटात फार दुखत होतं, उलटय़ा सुरू झाल्या होत्या. तापही होता अंगात. पोटात दुखणं सहन होण्यापलीकडे गेल्यावर मैत्रिणीही घाबरल्या. मनस्वीने आजोबांना फोन लावला. ते गाडी घेऊन पत्ता शोधत आले. मम्मीला गाडीत बसवून हॉस्पिटलमध्ये नेले. मम्मीला स्पेशल ट्रीटमेंट मिळाली. लगेच ऑपरेशन झालं. या सर्व वेळेत आजोबा मनस्वीबरोबर होते. फळं, ज्यूस, खाणं वेळोवेळी आणून द्यायचे. पाच दिवसांनी मम्मीला डिस्चार्ज मिळाला. आता रोज विचारपूस करायला आजोबा येऊ लागले. मनस्वीच्या मम्मीने पप्पांना सांगायला बंदी केली होती.
एका रविवारी सर्व काही ठीकठाक झाल्यावर मम्मीने पप्पांना सर्व काही सांगितलं. पप्पा फार भावुक झाले. स्काइपवरूनच आजोबांच्या पाया पडले. त्यांना बोलताच येईना.

मनस्वीने फोनवरील मैत्री सांगितली. ‘‘मनस्वीच्या फोनमुळे आम्हाला एक नवे प्रेमळ आजोबा मिळाले.’’ मम्मी म्हणाली.
‘‘मलाही एक छाऽऽन फॅमिली मिळाली. एक मुलगी, एक नात आणि एक जावई.. इतकी र्वष ‘एकटा जीव सदाशिव’ होतो. पण ही नाती जुळली अन् जीवनच बदलून गेलं. प्रत्येक दिवस नवीन विचार, नवीन उमेद घेऊन येतो.’’ मनस्वीला जवळ घेत आजोबा म्हणाले नि सर्वानाच भरून आलं.

– अपूर्वा कर्पे