गोष्ट आहे मुंबईजवळच्या एका महानगरातली. छोटीशीच; तरी डोंगराएवढी.
स्थळ- एका अत्यंत प्रतिष्ठित, सुविख्यात शाळेजवळची गल्ली. मुलांना पिक-अप करणाऱ्या स्कूल व्हॅन्स, स्कूल बस आणि रिक्षांनी ही गल्ली सदैव अडवलेली असते. त्याशिवाय शहराचा हा मध्यवर्ती भाग असल्याने इतर वाहनांची वर्दळ असतेच. अन् मुलांना न्यायला सोडायला येणाऱ्यांची ये-जा. पण या सगळ्या गर्दीत लक्ष वेधून घेते भावी क्रिकेटीअर्सची टीम.. आपापले रिक्षावाले/ व्हॅनवाले काका येईपर्यंतचा वेळ सत्कारणी लावणारी.
वेळ- सकाळचे साडेअकरा वाजून गेलेत. सातवी-आठवीच्या मुलांची सहामाही परीक्षा नुकतीच संपली असावी असं त्यांच्या एकंदर कल्ल्यावरून वाटतंय. नेहमीप्रमाणेच क्रिकेटचा डाव रंगात आलाय.
इकडे षटकार, चौकार चालू आहेत. पाश्र्वसंगीताला मुलांचा आरडाओरडा, भांडणं आहेतच. समोरून एक आजोबा येताना दिसतात. तसा  क्षेत्ररक्षक गोलंदाजाला ओरडून सांगतो, ‘‘थांब जरा, आजोबा येतायत.’’
‘‘ थांब काय, खरं तर स्टम्प उखडायला, अन्याची विकेट घ्यायला हात शिवशिवतायत नुसते. मला आऊट करतो काय? पण मध्येच हा थेरडा आला. च्यायला० त्या.. येऊ दे तो म्हातारा.. हाडं मोडून ठेवतो त्याची,’’ बाकीचे त्याला गप्प करायला बघत असतात. पण आपल्याच खेळीमध्ये सातत्याने येणारा हा व्यत्यय त्याला मुळीच सहन होत नव्हता. मगाशी अन्याच्या बॉलिंगवर सणसणीत शॉट मारायची संधी आली होती ती पण हुकली. अशीच ऐन वेळी कुणी स्कूटरवाली कडमडली होती मध्ये.
पण म्हणून सरळ ‘हाडं मोडून ठेवतो.. त्याची’ ही भाषा? प्रभा अचंबित होऊन रस्त्यातच उभी राहिली.
तिला दुसरा प्रसंग आठवला. रस्ता तोच. वेळ तीच- शाळा सुटतानाची. त्यामुळे त्या एवढय़ाशा गल्लीमध्ये वाहनांची एकच गर्दी उसळलीये. पहिली दुसरीतली काही मुलं या गर्दीतही आपल्या रिक्षाजवळ घोळका करून उभी आहेत. गप्पा-टप्पा, एकमेकांच्या खोडय़ा काढणं, हसणं, खिदळणं सुखेनैव चालू आहे. समोरच्या सोसायटीच्या एका बाल्कनीमध्ये एक वृद्धा आपल्या शाळेला जाणाऱ्या नातवाला टाटा करायला उभी आहे. या हल्लीच्या मॉड आजी नव्हेत हं.. तर पूर्वीच्या पिढीतल्या वय ८०च्या आसपास रेंगाळणारं.. केस पांढरेशुभ्र झालेले, चेहरा सुरकुत्यांनी भरलेला.. घोळक्यातल्या एका मुलाचं अचानक लक्ष जातं तिकडे आणि त्याला टारगटपणा करायची सुरसुरी येते.. मगाचपासून आपल्याला चिडवणाऱ्या, मस्तीखोर मित्राला तो कोपराने ढोसतो, ‘‘ए, उगीच त्रास देऊ नकोस हं मला. ती बघ, वरती चेटकीण उभीये, बघतीये तुझ्याकडे- खाऊन टाकेल हं तुला ती,’’ झटका बसल्यासारखा तो वात्रट मुलगा आपल्या मर्कटलीला थांबवतो आणि भेदरून वर बघतो. बाल्कनी आणि रस्त्यात जेमतेम १२ फुटांचं अंतर. आजींना ते संभाषण कदाचित स्वच्छ ऐकू गेलं असावं. खालमानेनं त्या आत निघून गेल्या..
प्रसंग तिसरा- स्थळ- कर्वे रोड, वेळ- सीझन लग्न-मुंजीचा. त्या दिवशी पुण्यात मंगल कार्यानी उच्चांक गाठला असावा. त्यामुळे प्रचंड ट्रॅफिक जाम. अशाच नात्यातल्या एका लग्नकार्यातलं भोजन उरकून प्रभा मांडवात नातेवाईकांशी, उषा- अनिरुद्धशी गप्पा मारत बसलेली. अनिरुद्ध तिच्या सतीशदादाचा, मामेभावाचा मावसभाऊ आणि इतकी र्वष न्यूझीलंडला असल्याने खूप काळानंतर भेटलेले. भेटीगाठी घडायच्या त्याही अशाच; लग्न- मुंजीत. ‘‘प्रभाताई, अनायासे आलाच आहात तर आमचा नवा फ्लॅट बघा नं.’’ त्या उभयतांचा आग्रह मोडवेना म्हणून प्रभा आणि तिच्या नवऱ्याच्या खाशा स्वाऱ्या निघाल्या अनिरुद्धच्या मर्सिडिझमधून. सोबत उषाची नात रिया, ३-४ वर्षांची. गोड, गोजिरी बाहुलीच जणू.
सकाळइतकी वाहतुकीची कोंडी नसली तरी गर्दी होतीच. आत्ताही सायकल, रिक्षा, स्कूटरना खो देत, अनिरुद्ध मार्ग काढत होता. गाडी चालवता चालवता मध्येच त्याने करकचून ब्रेक दाबला. गप्पा थांबवून उषा-प्रभाने समोर बघितलं.. गाडीसमोर एक वृद्ध गृहस्थ.. इतक्या लांबूनही त्यांची लटपटणारी काया दिसत होती. ‘‘इतक्या उन्हांत कुठे चाललात, आजोबा?’’ अनिरुद्धने खिडकीतून तोंड बाहेर काढून विचारलं आणि पुढच्याच क्षणी जे कानांवर पडलं ते ऐकून तर प्रभा उडालीच.. ‘‘काय हो आजोबा, वरती जायची घाई झालीये का? सून इतकी छळते?’’ अविश्वसनीय असे हे उद्गार चक्क त्या चिमुरडीचे होते. उषाच्या नातीचे. प्रभाचाच चेहरा पडला. उषा घाईघाईने पुढे झाली. ‘‘श्श, चूप.. असं नाही बोलायचं हं मोठय़ा माणसांना,’’ ..पण त्या दामटण्यात काही दम नव्हता हे त्या बाल(?) जिवालाही कळलं असावं. नंतरही किती तरी वेळ ती तोंडावर हात ठेवून खुदुखुदु हसत होती. आपटे रोडवरचा अनिरुद्धचा महाल म्हणावा असा राजेशाही फ्लॅट, त्यांनी केलेली सरबराई, न्यूझीलंडच्या गप्पा, या कशातच प्रभाचं लक्ष नव्हतं. कानात त्या ‘निष्पाप’ रियाचेच शब्द गुंजत होते..
ही वानगीदाखल दिलेली ३-४ उदाहरणं. अक्षरश: खरी. ही सगळी वक्तव्ये ऐकून विचार येतो, ‘‘हा दोष कुणाचा? पालकांचा, लहानपणापासून दिल्या जाणाऱ्या अमर्याद स्वातंत्र्याचा, बदलत्या-ढासळत्या समाजमूल्यांचा की मुलं ही देवाघरची फुलं असतात असं मानणाऱ्या आपल्या भाबडय़ा पिढीचा?’’
पण आपले संस्कार, आपली जीवनमूल्यं.. सारंच काही वाया जात नाहीये; कुठे तरी, काही तरी रुजतंय, अंकुरतंय हा दिलासा देणारा तो प्रसंग. भजनी मंडळातल्या ‘सीनियरमोस्ट’ सभासद शोभनाताई वय ७५च्या आसपास रेंगाळणारं.. अगदी अचानक गेल्या. आजार नाही. काही नाही.
प्रभा भेटायला गेली तेव्हा नुकतीच त्यांची मुलगी नीलिमा स्वित्र्झलडमधून आलेली. आजोबा बरेच नियंत्रित वाटत होते, पण मुलीला उमाळे येत होते. प्रभा बोलण्याचा, तिचं सांत्वन करण्याचा प्रयत्न करीत होती, इतक्यात आतून अर्णव दुडुदुडु धावत आला.. मुलाचा मुलगा- वय र्वष ३. एका हातात एक औषधी टय़ूब अन् दुसऱ्या हातात सफरचंद. आपले दोन्ही हात आत्याच्या पुढे धरले आणि म्हणाला, ‘‘हे घे बरं वाटेल तुला.’’ क्षणभर कसा प्रतिसाद द्यावा काहीच कळेना तिला, पण मग मात्र सगळ्यांच्याच ओठांवर हलकीच स्मितरेषा उमटली आणि आजोबांकडून स्पष्टीकरणही मिळालं, ‘‘अग नीलिमा, ही टय़ूब आणि हे अ‍ॅपल म्हणजे अर्णवने तुझ्या ‘बाऊ’वर शोधलेला अक्सीर इलाज आहे. समोरचं माणूस दु:खी आहे कळलं की त्याला बघवत नाही अगदी. त्याच्या बालबुद्धीला वाटतं एक तर याला बाऊ झालाय किंवा खूप भूक लागलीये. म्हणून हा बाऊवरचा उपाय आणि हा खाऊ घेऊन धावतो तो, तुझी आई अशीच संवेदनशील होती नं!..’’
तिकडून बाहेर पडताना प्रभाचं मन पिसासारखं हलकं झालं होतं. तिने मनोमन प्रार्थना केली. या निरागस बाळाची कोवळीक अशीच जपली जावो
आणि देवाघरच्या अशा फुलांचा घराघरात सुगंध परिमळो.

आपले संस्कार, आपली जीवनमूल्यं.. सारंच काही वाया जात नाहीए. कुठे तरी, काही तरी रुजतंय, अंकुरतंय असा अनुभव प्रभाला आला ‘तो’ प्रसंग घडल्यावर. तिने प्रार्थना केली. या निरागस बाळाची कोवळीक अशीच जपली जावो आणि देवाघरच्या अशा फुलांचा घराघरांत सुगंध परिमळो.