‘ज्येष्ठ नागरिक मायदेशी अन् मुलं परदेशी’ ही आजकाल घरोघरीची परिस्थिती आहे. दूरचित्रवाणी मालिकांमधले कलाकार ज्येष्ठ नागरिकांना ‘चालतीबोलती’ सोबत करतात हेही तितकंच खरंय! परंतु ‘द्वेष, असूया, हेवेदावे इत्यादी भावनांना पार करून पुढं जाणं अपेक्षित असलेल्या वयातली ही मंडळी मालिकांमधल्या याच भावनांमध्ये रुतत जाताना पाहिल्यामुळे मला नवल वाटलं. प्रत्यक्षातल्या नात्यांमधले भावबंध विसरताना पाहिल्यावर वाईटही वाटलं..

सकाळी ११च्या सुमाराला दारावरची बेल वाजली.  ‘आत्ता कोण बरं आलं असेल’ या विचारातच मी दार उघडलं, तर समोर कमाआत्या!

‘‘अरेऽऽ, आत्या तुम्ही? या! या! बसा आरामशीर!’’

‘‘तू घरात असशील की नाही, अशी धाकधूक होती मनात थोडी,’’ असं म्हणत हसतहसतच त्या घरात आल्या.

कमाआत्या म्हणजे ‘प्रसन्न आणि बोलकं’ व्यक्तिमत्त्व.

‘‘काय म्हणतेय अर्चना? काय नवीन बातमी?’’ मी उत्सुकतेनं त्यांच्या नातीबद्दल विचारलं!

‘‘नातीची तारीख अगदी जवळ आलेय. तिचे आई-बाबा गेलेयत न्यूजर्सीला, त्याच मिशन बाळंतपणसाठी.’’

‘‘तुम्ही का नाही गेलात आत्या?’’

‘‘नाही गं! तिथली थंडी नाही मानवत अजिबात!’’

‘‘मग काय आता सहा महिने एकटय़ा?’’

‘‘एकटी आहे, पण ‘तुकाराम सांगाती’ आहेत, ‘बाप्पांच्या कथा आहेत. त्यामुळे ‘चालतंय की’ बारीकसं हसत आत्या म्हणाल्या. त्यांच्या हास्यापाठची ‘उदासी’ नकळत जाणवत असतानाच दूरचित्रवाहिनीवरील मालिकांमधली त्यांची मानसिक गुंतवणूकही चटकन् लक्षात आली माझ्या. सरबताचा ग्लास त्यांच्या हातात देताना त्यांची अस्वस्थता पाहून मी काही विचारणार इतक्यात,

‘‘तू कोणकोणत्या मालिका बघतेस? सकाळी लावत नाही का टीव्ही?’’आत्यांनी विचारलं.

‘‘सहसा नाही! तुम्हाला बघायचंय का काही?’’

‘‘नकुशी, पाहायचं राह्य़लंय कालचं! तू असं कर नं मला लावून दे टीव्ही आणि तुझं चालू दे आत.’’

टी.व्ही. सुरू करून मी किचनकडे वळले. आत्या आणि त्यांच्या सूनबाईंमधल्या तणावांची कल्पना होती मला. पण ‘या नकुशीला’ त्या टी.व्ही.तली ‘नकुशी’ इतकी ‘हवीहवीशी’ वाटावी? मनातल्या विचारांच्या वेगाबरोबर हातही झरझर चालू लागले. सेकण्ड ब्रेकचा कानोसा घेऊन आत्यांना म्हटलं, ‘‘आता जेवायलाच थांबा. घरी एकटय़ाच आहात नं! इथेच होईल पंगत खाण्या-बोलण्याची.’’

‘‘घरी तयार आहे सगळं! येईन परत निवांत! आता बारीकसारीक खरेदी करून घरी जाईस्तवर सव्वा वाजेल. मग ‘खवयै आणि मेजवानी’ बघता बघता माझी पण पोटपूजा होऊन जाईल. नंतर ‘खुलता कळी खुलेना’ बघायचं आरामशीरपणे!’’

‘‘म्हणजे मधली सुट्टीच म्हणायची.’’ मी जरा थट्टेचा सूर लावला.

‘‘हो नं! एक वेळापत्रकच करून ठेवलंय, म्हणजे मग सगळ्या वाहिन्यांवरच्या मालिकांमधलं काहीही राहत नाही. तू आत्ता घरात होतीस म्हणून बरं झालं बाई, नाही तर कालचा एपिसोड मिस झाला असता. त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य हे मी ‘भेटल्यामुळे’ नसून मी ‘घरात असल्यामुळे’ होतं हे जाणवून मी जरा नाराज झाले. आता पूर्वीसारख्या जिवाभावाच्या गोष्टी शेअर करून ‘वेळ’ घालवण्यात त्यांना काहीच ‘रस’ नसून त्या मालिकांच्या ‘वेळापत्रका’ला त्यांच्या दृष्टीने खूप महत्त्व आलंय हे लक्षात आलं माझ्या. आत्यांना थांबण्याचा आग्रह करावा की नाही या विचारात असतानाच निरोप घेऊन लगबगीनं त्या गेल्यासुद्धा, अगदी इतर कोणाचीही वास्तपुस्त न करता.

एवढा बदल? काही वर्षांपूर्वी कमाआत्या यायच्या तेव्हा, माझ्या मुलांची धावपळ पाहून, ‘‘अगं, शाळेचं व्यग्र वेळापत्रक पाळावंच लागतं मुलांना. पण छंदवर्ग आणि इतर क्लासमुळे तू त्यांना जराही उसंत देत नाहियेस.’’ अशी माझ्याबद्दल तक्रारवजा टिप्पणी करायच्या. पण मग आता या ‘भरपूर उसंत’ असलेल्या वयात आत्यांनी स्वत:चं वेळापत्रक एवढं ‘व्यस्त’ ठेवावं? का? नात्यातली ‘कोमलता’ जपण्यापेक्षा, फुलून परिपक्व  झालेल्या वयातल्या कमाआत्यांना ‘कळी खुलेना’ बघायचं महत्त्व जास्त असावं?

या प्रश्नांचा मागोवा घेत असताना मला आठ दिवसांपूर्वीचा प्रसंग आठवला. दाजीकाका आणि काकूंच्या दोन्ही मुली लग्न होऊन परदेशी गेलेल्या. घरात दोघंच-दोघं कंटाळत असतील म्हणून मुद्दाम शनिवारी संध्याकाळी त्यांना मी घरी बोलावलं होतं. सगळ्यांचं एकत्र भेटणं होईल या हेतूनं माझे दीर-जाऊ  पण येणार असं ठरलं. आमच्या घरी येईपर्यंत थोडा उशीर झाला त्यांना. वाटेत कसा ट्रॅफिक लागला हे सांगेपर्यंत ७ वाजले.

‘‘तुम्ही ७ वाजताची मालिका नाही बघत? आजचा एपिसोड चुकवता कामा नये असा आहे.’’ काकूंनी अस्वस्थ होऊन विचारलं.

‘अतिथी देवो भव’ या संस्कारांमुळे तातडीने टीव्ही लावला. पुढच्या सर्व मालिकांनी ‘ओव्हरपॉवर’ केलं आणि ‘एकत्र भेटण्या’च्या माझ्या कल्पनेला ब्रेकमधल्या जाहिरातींइतकंही महत्त्व उरलं नाही.

पुढची सगळी ‘खान-पान’ व्यवस्था टीव्हीच्या साक्षीने करावी लागली. मालिकांमधली ‘काळी कृत्यं, हेवे-दावे’ यांची चटक इतकी तीव्र की त्यापुढे माझे ‘चटकदार चाट’ पदार्थ ‘कॉम्प्लिमेंट’विना उपेक्षित राहिले.

‘ज्येष्ठ नागरिक मायदेशी अन् मुलं परदेशी’ ही आजकाल घरोघरीची परिस्थिती आहे. मालिकांमधले कलाकार ज्येष्ठ नागरिकांना ‘चालती बोलती’ सोबत करतात हेही तितकंच खरंय! परंतु द्वेष, असूया, हेवेदावे इत्यादी भावनांना पार करून पुढं जाणं अपेक्षित असलेल्या वयातली ही मंडळी मालिकांमधल्या याच भावनांमध्ये रुतत जाताना पाहिल्यामुळे मला नवल वाटलं. प्रत्यक्षातल्या नात्यांमधले भावबंध विसरताना पाहिल्यामुळे वाईटही वाटलं थोडं!

‘वेळापत्रक’ काटेकोरपणे सांभाळून (प्रसंगी नात्यांचं मोल देऊनसुद्धा) ज्येष्ठांकडून पाहिल्या जाणाऱ्या या नायक-नायिका, ज्येष्ठांची ‘कठीण वेळ’ सांभाळायला टी.व्ही.तून धावून येणार का? असा एक विचार येऊन गेला मनात. परंतु माझ्या ‘संस्कारी’ मनाला ‘ज्येष्ठांना हा प्रश्न कसा विचारावा’ असा प्रश्न पडतो.

कोणे एके काळी ‘वेळापत्रक’ पाळायची शिस्त लावलेल्या आई-वडिलांनाच ‘तुमची शिस्त मोडा जरा अन् हे वेळापत्रक शिथिल करा’ असं सांगायची वेळ मुलांवर येईल.. वाटलं नव्हतं!

अनुजा बर्वे

neelimabarve@gmail.com