माझ्या डोळ्यासमोर आज सकाळपासून पाहिलेल्या रस्तोरस्तीच्या त्या माता आणि त्यांची ती तान्ही मुले आली. तान्ह्य मुलाला घेऊन उन्हातान्हात रस्त्यात भीक मागणारी, भर उन्हात रस्त्यावर बांधलेल्या  झोळीत तान्ह्यला ठेवून कामावर गेलेली, मुलाची शाळा बुडू नये म्हणून त्या अवघडलेल्या अवस्थेतदेखील बसचा प्रवास करणारी आणि मालकिणीला बदली बाई देणार म्हणून आश्वस्त करणारी, गर्भारपणात हाता-पायाच्या काडय़ा ओढत पाणी भरणारी झोपडपट्टीतील बाई. मी मनात म्हटलं यातल्या कोणीच रोजचं वर्तमानपत्र वाचत नसणार आणि एका दृष्टीने तेच बरं आहे..

पावसाळा होता तरी त्या दिवशी मात्र चांगली उघडीप होती. दादरला जाऊन आज काही कामे उरकू या म्हणून बोरिवलीहून बस पकडून निघालो. ज्येष्ठ नागरिकांची खिडकी सीट मिळाली. बोरिवलीहून दादर गाठणे म्हणजे कमीत कमी तासा दीड तासाची नििश्चती. म्हणून जाताना बरोबर दोन-तीन वर्तमानपत्रं सोबत घेतली होती. तिकीट काढणं वगैरे सोपस्कार पूर्ण झाल्यावर वृत्तपत्र काढून त्यात डोकं घातलं.

संसदेचं पावसाळी अधिवेशन आदल्या दिवशी संपलं होतं. या वेळी संसदेचं कामकाज उत्तम रीतीने पार पडलं होतं, महत्त्वाची अशी बरीच प्रलंबित विधेयकं मंजूर झाली होती, नेहमीपेक्षा कामकाज विना व्यत्यय यशस्वीरीत्या पार पडलं होतं. त्याकरिता सत्ताधारी पक्षांनी विरोधकांना धन्यवाद दिले होते. नोकरी करणाऱ्या स्त्रियांसाठी दिलासा देणारं एक महत्त्वाचं विधेयक या अधिवेशनात मंजूर झालं होतं. ते म्हणजे यापुढे महिला कर्मचाऱ्यांना सहा महिन्यांची प्रसूती रजा कायद्याने घेता येणार आहे. अशी रजा कुठल्या कुठल्या परिस्थितीत स्त्रियांना घेणं शक्य आहे त्याबद्दल तपशीलवार माहिती होती आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी, विषयतज्ज्ञांनी, विचारवंतानी, सेलेब्रेटी यांनी शासनाच्या या निर्णयाचं स्वागत केलं होतं, आपले विचार प्रगट केले होते. सर्वाच्या मतांचा मथितार्थ असा होता, सुदृढ आणि सक्षम समाज घडवायचा असेल तर अगदी जन्मापासून मुलाला योग्य ती देखभाल आणि संगोपन मिळणं अत्यावश्यक आहे. हे काम मातेशिवाय अन्य कोणी योग्यरीत्या पार पाडूच शकत नाही. थोडक्यात, यापुढे गर्भवती कर्मचाऱ्यांना सहा महिने प्रसूती रजा कायद्यानेच देऊ केली होती, वरिष्ठांच्या मर्जीची आवश्यकता नव्हती.

एका सिग्नलला बस थांबली. मी सहज सवयीने बाहेर रहदारीकडे नजर टाकली. बस शेजारी रांगेने बरीच खासगी वाहने सिग्नलची वाट पाहात थांबली होती. ऊन चांगलंच तापलं होतं. एक घामाने निथळणारी भिकारीण त्या वाहनांच्या रांगातून फिरत होती. गाडी जवळ जाऊन बंद काचेवर टकटक करून चेहऱ्यावर जास्तीत जास्त लाचारी आणून गाडीतील माणसांकडे भीकेची याचना करत होती. त्याला आपली लवकर दया यावी आणि त्यांनी सढळ हाताने भीक द्यावी म्हणून जुनेऱ्यात गुंडाळलेले तान्हे मूल काचेजवळ नेऊन दाखवत होती. एखादी काच जराशी खाली होई, मनगटापर्यंतचा एखाद्या स्त्रीचा किवा पुरुषाचा हात बाहेर येई आणि उपडय़ा तळव्यावर काही तरी ठेऊन परत काचेच्या मागे अदृश्य होई, काच वर जाऊन खिडकी परत बंद. पण बहुतेक काचा बंदच राहात होत्या. डावी- उजवीकडे असणाऱ्या गाडय़ा जवळ जाऊन तिचं चिकाटीने भीक मागणं चालूच होतं. सिग्नल हिरवा झाला आणि बस पुढे सरकली. सवयीने हातातल्या मुलासकट ती सुरक्षितरीत्या पुन्हा फुटपाथवर पोचली असावी. परत सिग्नल पडण्याची वाट पाहात.

मी परत वर्तमानपत्रात डोकं खुपसून इतर बातम्या वाचू लागलो. पुढच्या स्टॉपवर बस थांबली, पुढच्या दरवाजाने एक शाळकरी मुलगा बसमध्ये चढू लागला, त्याच्यापाठोपाठ त्याची मध्यमवयीन आईपण बसमध्ये चढली, चालक म्हणाला, ‘‘सावकाश चढा.’’ ती गर्भार होती. मुलगा नेहमीच्या सवयीने पुढच्या रिकाम्या एका सीटवर बसला, ती बाई माझ्या बाजूच्या रिकाम्या सीटवर येऊन बसली. ती नीट बसली याची खात्री झाल्यावर चालकाने बस सुरू केली. ती बाई अगदी सहज बोलून गेली, ‘‘थँक्यु रे बाबा!’’ तिने घामाघूम चेहरा पदराने पुसत माझ्याकडे पाहात म्हटलं, ‘‘आत्ता शाळा बुडवून कशी चालणार काका, नंतर शाळा बुडणारच आहे.’’ थोडय़ाच वेळाने बस एका मोठय़ा चौरस्त्यावर सिग्नलला थांबली. यावेळी बस अगदी सिग्नलच्या जवळच्याच मार्गिकेमध्ये उभी होती. नेहमीप्रमाणे मी बाहेरची रहदारी न्याहळू लागलो. त्या सिग्नलच्या खांबाला आणि चौकाच्या नामफलकाच्या खांबाला एक कापडाची झोळी बांधली होती. त्यात ठेवलेल्या लहान मुलाची हालचाल बाहेरून स्पष्ट दिसत होती. त्या झोळीच्या चिंचोळ्या सावलीखाली अजून एक लहान मूल पाय पसरून बसलं होतं आणि समोरच्या कागदाच्या तुकडय़ावर ठेवलेले वेफरचे तुकडे एकाग्रतेने तोंडात कोंबत होतं. एका हाताने वरच्या झोळीला हात धरून हलवत जमेल तेवढं ढकलत होतं. माझ्या शेजारी बसलेल्या त्या बाईच्या रुमालात गुंडाळलेला मोबाइल वाजू लागला, रुमालातून मोबाइल काढून ती बोलू लागली. रहदारीच्या आवाजामुळे तिला मोठमोठय़ाने बोलावं लागत होतं. ऐकू आलेल्या संभाषणावरून कळून येत होतं ती घरकाम करणारी बाई होती आणि ती आपल्या मालकिणीला खात्री देत होती, ती रजेवर जाण्यापूर्वी घरकामासाठी कोणीतरी बदली बाई दिल्याशिवाय ती रजेवर जाणार नाही. पुढचा स्टॉप येताच मुलगा म्हणाला, ‘‘आये चल, शाळेचा स्टॉप आला.’’ ती अवघडलेली बाई कशीबशी उठली. परत चालक म्हणाला, ‘‘सावकाश ताई, घाई करू नका, तुम्ही उतरल्याबिगर, गाडी कुठे धावत नाही.’’ तो शाळकरी मुलगा आणि त्याची ती गरोदर आई त्या स्टॉपला उतरून गेले.

मी दादरला गेलो, माझी कामं होती ती केली आणि परतीच्या मार्गावर एका उपनगरात उतरून तेथे काही मित्रांना भेटून परत महामार्गावरील बस स्टॉपवर येऊन बसची वाट पाहात उभा राहिलो. बस स्टॉपच्या मागेच अगदी तुरळक वाहनांची जा ये असणारा सव्‍‌र्हिस रोड होता. त्याच्या फुटपाथवर असंख्य तात्पुरत्या निवाऱ्यातून गरीब संसार थाटलेले दिसत होते. हातापायाच्या काडय़ा झालेली, घामाने निथळणारी एक गर्भार स्त्री आपल्या डोक्यावर दोन पाण्याचे हंडे आणि एका हातात नुकतंच चालू लागलेलं मूल घेऊन आपल्या निवाऱ्याकडे निघाली होती. तिचं तिसरं मूल सर्विस रोडच्या मधोमध येऊन हातातील प्लॅस्टिकच्या चेंडूशी खेळण्यात दंग होतं. एक गाडी त्याच्या अगदी जवळ येऊन उभी राहिली आणि चालक जोरजोराने हॉर्न वाजवू लागल्यावर तिनं रस्त्यात बसलेल्या आपल्या त्या मुलाला एखाद्या निर्जीव वस्तूसारखं एका हातानं खेचून बाजूला केलं. थांबलेली गाडी, पुढे सरकली, ते मूल परत होतं तेथंच जाऊन बसलं आणि खेळू लागलं. आणि बाई पाय ओढत चालू लागली, जणू काही तिच्या लेखी तिथं फार काही गंभीर घडलंच नव्हतं. इतक्यात माझी बस आली, माझा प्रवास बोरिवलीच्या दिशेने सुरू झाला.

माझा स्टॉप येताच मी उतरून घरी निघालो. त्या रस्त्यावरच एक अद्ययावत सूतिकागृह होतं. माझा एक मित्र तिथे दरवाजात उभा दिसला, मी त्याला प्रश्नार्थक हात करून विचारलं, इकडे कुठं? तो म्हणाला, ‘‘आत ये बसून बोलू.’’ त्याच्याबरोबर मी आत गेलो प्रशस्त थंडगार वेटिंग रूममध्ये आम्ही बसलो. त्याची सून दोन दिवसांपूर्वीच तेथे बाळंत झाली होती, मी बाहेर फिरून आलो होतो म्हणून अशा परिस्थितीत बाळाजवळ जाणं योग्य नाही म्हणून बाहेरच मित्राशी गप्पा मारत बसलो. मी त्याला माझा मध्यमवर्गीय प्रश्न विचारला, ‘‘अशा ठिकाणी बाळंतपण म्हणजे खर्चाचं काही विचारायलाच नको.’’ तो म्हणाला, ‘‘हो नारे, पण आम्हाला तरी तशी काळजी नाही. जावयाच्या कंपनीतून त्यांना याचे सर्व पैसे मिळतात.’’ इतक्यात एक लांबलचक आलिशान गाडी दरवाजात येऊन उभी राहिली. अगदी अद्ययावत पोशाखातील तरुण जोडपं त्यातून उतरलं. तरुण आपल्या गर्भार पत्नीची सर्वतोपरी काळजी घेत होता. समोरच्या टिपॉयवर आजचं इंग्रजी वर्तमानपत्र होतं, त्याचा मथळा पाहताच त्या तरुणाने अगदी झडप घालूनच ते उचललं, तो आनंदाने ओरडलाच, ‘‘सी, व्हाट ए गुड न्यूज. त्यांनी पेपर त्याच्या पत्नीसमोर धरला. तीदेखील आनंदाने जवळ जवळ चित्कारलीच, तो म्हणाला, ‘‘नौ, यु कॅन एन्जॉय सिक्स मंथ मॅटिर्निटी लिव, दॅट टू फुल पे. त्या तरुणीने पेपर अगदी भक्तीभावाने कपाळाला लावला आणि पोटावर हात फिरवीत, आतल्या मुलाला बोबडय़ा शब्दांत म्हणाली, ‘‘यू आल लकी माय चायील्द, युवर मामा विल विथ यु फोर सिक्स लाँग मंथ, मजा एय न्या एका मुलाची.’’ त्या तरुणाचा चेहरापण फुलून आला होता.

माझ्या डोळ्यांसमोर आज सकाळपासून पाहिलेल्या रस्तोरस्तीच्या त्या माता आणि त्यांची ती तान्ही मुलं आली. तान्ह्य मुलाला घेऊन उन्हातान्हात रस्त्यात भीक मागणारी, भर उन्हात रस्त्यावर बांधलेल्या झोळीत तान्ह्यला ठेऊन कामावर गेलेली, मुलाची शाळा बुडू नये म्हणून त्या अवघडलेल्या अवस्थेतदेखील बसचा प्रवास करणारी आणि मालकिणीला बदली बाई देणार म्हणून आश्वस्त करणारी, गर्भारपणात हातापायाच्या काडय़ा ओढत पाणी भरणारी झोपडपट्टीतील बाई. मी मनात म्हटलं, यातल्या कोणीच रोजचं वर्तमानपत्र वाचत नसणार आणि एका दृष्टीनं तेच बरं आहे.

मोहन गद्रे

gadrekaka@gmail.com